BREAKING NEWS
latest

'अनिल आय हॉस्पिटल'च्या ठाणे येथील सातव्या रुग्णालयाचे भव्य स्वरूपात उद्‌घाटन समारंभ संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे दि.१८ - ठाणे जिल्ह्यात गेली तब्बल ५४ वर्षे विश्वासार्ह व दर्जेदार नेत्रसेवा देणाऱ्या 'अनिल आय हॉस्पिटलच्'या ठाणे शहरातील दुसऱ्या आणि एकूण सातव्या रुग्णालयाचे उद्घाटन आनंद भवन सोसायटी, भक्ती मंदिर रोड, तीन हात नाका, नेक्सा शोरूमच्या वर,  ठाणे येथे आज मोठ्या उत्साहात व सकारात्मक वातावरणात पार पडले. या अत्याधुनिक नेत्ररुग्णालयाच्या  उद्‌घाटन प्रसंगी कल्याण लोकसभेचे लाडके लोकप्रिय खासदार मा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित राहून 'अनिल आय हॉस्पिटल'च्या सेवेचे भरभरून कौतुक केले व पुढील वाटचालीस त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी मा. श्री.निरंजन डावखरे यांनी देखील कार्यक्रमाला सदिच्छा भेट देत रुग्णालयाच्या सामाजिक योगदानाचे कौतुक केले. कार्यक्रमात मा. श्री.नरेश म्हस्के यांनीही उपस्थित राहून 'अनिल आय हॉस्पिटल'च्या ठाणेकरांसाठी सुरू झालेल्या या नव्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
या उद्घाटनप्रसंगी ठाणे शहरातील नगरसेवक, नामवंत डॉक्टर, रोटरी क्लबचे पदाधिकारी व सदस्य, तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी रुग्णालयाची पाहणी करून उपलब्ध सुविधांचे कौतुक केले.
यावेळी बोलताना 'अनिल आय हॉस्पिटल'च्या संचालिका तसेच महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी (MOS) च्या अध्यक्षा डॉ. अनघा हेरूर म्हणाल्या, “ठाणेकरांकडून मिळणाऱ्या प्रचंड प्रेम, विश्वास आणि पाठबळामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. ठाणे शहरासाठी सर्वोत्तम, आधुनिक आणि रुग्णकेंद्रित नेत्रसेवा देण्याचा आमचा संकल्प पुढेही तितक्याच निष्ठेने सुरू राहील.”
ठाणे येथील हे नवीन रुग्णालय 'अनिल आय हॉस्पिटल'च्या सेवाविस्तारातील एक महत्त्वाचा टप्पा ठरत असून, ठाणेकरांसाठी नेत्रसेवेच्या दृष्टीने एक नवा विश्वास निर्माण करणारे केंद्र ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली (ईस्ट) आयोजित 'व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड' समारोह संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट आयोजित Vocational Excellence Award (व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड) कार्यक्रमाचे सुंदर आयोजन हे शनिवार दिनांक १७ जानेवारी रोजी रोटरी भवन डोंबिवली येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे हे निवृत्त माजी भारतीय प्रशासकीय अधिकारी श्री. महेश झगडे हे होते. ह्या वर्षीचा पुरस्कार हा विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रदान करण्यात आला त्यात चित्रलेखा वैद्य (पर्यावरण आणि कचरा व्यवस्थापन), चारुदत्त कोलारकर (सामाजिक सेवा), अर्णव पटवर्धन (युवा पक्षीतज्ज्ञ) आणि सुधाश्री ट्रस्ट (सामाजिक कार्य) ह्यांना प्रदान करण्यात आला. शेला, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे प्रमुख स्वरूप होते. तसेच विशेष असा जीवन गौरव पुरस्कार हा श्री. जे के. साबू ह्यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला. 
'व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड'' समारोहासाठी डोंबिवली मधील अनेक मान्यवर उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली (ईस्ट) चे अध्यक्ष डॉ. संदीप घरत, क्लब चे सचिव विनायक आगटे, प्रकल्प प्रमुख मानस पिंगळे, प्रकल्प संचालक दीपक नेरकर, माजी रोटरी जिल्हा प्रांतपाल डॉ. उल्हास कोल्हटकर, रोटरी सदस्य आरती बापट, संगीता पाखले, वीणा बेडेकर, शंतनू पुराणिक, पूनम यादव, वर्षा नेरकर राजन सावरे, सतीश अटकेकर, मंजिरी घरत, क्लब चे माजी अध्यक्ष कौस्तुभ कशेळकर, रघुनाथ लोटे, राधिका गुप्ते पुढील वर्षीचे अध्यक्ष अथर्व जोशी आणि इतर अनेक क्लब चे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे रोटेरिअन विश्राम परांजपे ह्यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे महानगर पालिका निवडणुकीतील भाजपच्या ऐतिहासिक विजयाचे धुरंधर शिल्पकार..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली, दि. १६ जानेवारी - महापालिका निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकसित महाराष्ट्राच्या प्रचाराला राज्यातील जनतेने उत्स्फूर्तपणे पाठिंबा व्यक्त केल्याचे चित्र निकालांमुळे स्पष्ट झाले आणि त्याच बरोबर शहरी मतदाराची अचूक नस माहिती असलेल्या भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केलेल्या विचारधारे सोबत राहण्याच्या आवाहनाला मतदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे निकालांवरून दिसले. मागील वर्षी जानेवारीत रविंद्र चव्हाण यांनी भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर राज्यात दीड कोटी प्राथमिक सदस्यांचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले होते तिथेच ते अर्धी लढाई जिंकल्याचे आज या दणदणीत विजयाने स्पष्ट झाले.

भाजपा हा धोरण आखणारा आणि धोरण राबविणारा पक्ष आहे. निवडणुकांचे नियोजन, तिकीट वाटप, सभांचे नियोजन याबरोबरच विरोधी पक्षांना जोखण्याचे कसब “देवेंद्र आणि रविंद्र” या भाजपाच्या जोडीकडे आहे. सरकार आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश पक्ष यातील समन्वयाचे हे यश असल्याने हा अभूतपूर्व विजय मिळाल्याचे विश्लेषण राजकीय पंडितांनी केले आहे. महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे शीर्षस्थ नेतृत्त्व म्हणून पक्षासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी रविंद्र चव्हाण यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात बोलून दाखवलेली. त्यांच्या रूपाने भाजपाला रस्त्यावर उतरून आंदोलन केलेला आणि मातीशी जोडलेला कार्यकर्ता अध्यक्ष म्हणून मिळाला. निवडणूक काळातील वक्तव्याने, पेहरावाने झालेल्या वैयक्तिक स्वरूपाच्या टीकेमुळे रविंद्र चव्हाण बिलकुल विचलित झाले नाहीत. उलट त्यांनी विरोधकांना जनतेसाठी अनावश्यक अशा विषयात गुंतवून ठेवून, भाजपासाठी विजयाची वाट अधिक सुकर केल्याचे स्पष्ट झाले. विरोधकांनी चव्हाण यांच्यावर केलेल्या वैयक्तिक टीकेला जनतेच्या दृष्टीने कवडीमोल किंमत असल्याचेही या निमित्ताने दिसले. २५ वर्षांच्या राजकीय वाटचालीत रविंद्र चव्हाण त्यांच्यावर झालेल्या प्रत्येक टीकेनंतर एक पाऊल पुढे जातानाच दिसले. याचे कारणच कायम संघर्ष करून यश संपादन केलेला रविंद्र चव्हाण यांच्यासारखा नेता महाराष्ट्रातील जनतेने अजून नीटसा पाहिलेला वा ओळखलेला नाही आणि राजकीय निरीक्षकांनी अजून अभ्यासलेला नाही. रविंद्र चव्हाण हे अत्यंत मुरलेले आणि मुरब्बी राजकारणी म्हणून महाराष्ट्रात आजच्या भाजपाच्या विजयाने उदयास आलेले आहेत हे दिसले.

देवेंद्र फडणवीस यांना रविंद्र चव्हाण यांची बलस्थानं माहिती आहेत. पक्षासाठी २४ तास समर्पित अध्यक्ष म्हणून त्यांचे महत्त्व फडणवीस जाणून आहेत. रविंद्र चव्हाण यांचा शहरी महाराष्ट्राच्या राजकारणाचा अनुभव आणि त्यांची कायम "निवडणूक सिद्धता" म्हणजेच इलेक्शन रेडीनेस अशा स्वरूपाची कार्यशैली देवेंद्र फडणवीस ओळखून आहेत. त्यातच अडीच वर्षे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम करताना अवघा महाराष्ट्र पिंजून काढत रविंद्र चव्हाण यांनी खात्याच्या माध्यमातून विकासकामे करताना संपूर्ण महाराष्ट्रात हेरलेली आणि पेरलेली माणसं ही भाजपासाठी महत्त्वाची ठरली असं दिसत आहे. आजच्या भाजपाच्या दैदिप्यमान विजयाचे शिल्पकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे अष्टपैलू नेतृत्व जितके प्रखरतेने माध्यमांसमोर दिसलं तसेच प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा नियोजनाचा आवाका महाराष्ट्राच्या लक्षात येईल जेव्हा संपूर्ण विजयाची आकडेवारी प्रकाशित होईल.

'अनिल आय हॉस्पिटल'च्या ठाणे येथील सातव्या रुग्णालयाचे १८ जानेवारी रोजी उद्घाटन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : ठाणे जिल्ह्यात गेली तब्बल ५४ वर्षे विश्वासार्ह व दर्जेदार नेत्रसेवा देणारे 'अनिल आय हॉस्पिटल' ठाणे शहरात आपल्या दुसऱ्या आणि एकूण सातव्या रुग्णालयाचे उद्घाटन करत आहे. हे अत्याधुनिक नेत्ररुग्णालय १८ जानेवारी २०२६ रोजी ठाणे पश्चिम येथे सुरू होत आहे. या रुग्णालयाचे उद्घाटन कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट लोकप्रिय खासदार मा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या शुभहस्ते होणार असून, मा. श्री. नरेश म्हस्के हे गेस्ट ऑफ ऑनर म्हणून कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यावेळी ठाणे व परिसरातील अनेक मान्यवर, डॉक्टर, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींची उपस्थिती अपेक्षित आहे.
पांचपाखाडी, भक्ती मंदिर रोड येथे सुरू होणाऱ्या या नव्या रुग्णालयामध्ये अत्याधुनिक नेत्रतपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रेटिना, ग्लॉकोमा, बाल नेत्रचिकित्सा तसेच लेझर उपचार यांसारख्या सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सन १९७२ साली सुरू झालेल्या अनिल आय हॉस्पिटलने आज डोंबिवली (पूर्व व पश्चिम), ठाणे, कल्याण, पलावा, बदलापूर अशा विविध भागांमध्ये आपल्या सेवांचा विस्तार केला असून, हजारो रुग्णांच्या विश्वासावर ही संस्था उभी आहे.

याबाबत बोलताना 'अनिल आय हॉस्पिटल'च्या संचालिका तसेच महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी (MOS) च्या अध्यक्षा डॉ. अनघा हेरूर म्हणाल्या, “ठाणेकरांनी दिलेल्या प्रेम व विश्वासामुळेच आम्ही ठाणे शहरात दुसरे रुग्णालय सुरू करत आहोत. दर्जेदार, आधुनिक आणि रुग्णकेंद्रित नेत्रसेवा प्रत्येकापर्यंत पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे.” ठाणे शहरातील नागरिकांसाठी हे नवीन रुग्णालय नेत्रसेवेच्या दृष्टीने एक महत्त्वाची उपलब्धी ठरणार आहे.
कार्यक्रम तपशील
📅 दिनांक: १८ जानेवारी २०२६
⏰ वेळ: सकाळी १० ते दुपारी २
📍 पत्ता: अनिल आय हॉस्पिटल,
दुसरा मजला, भक्ती मंदिर रोड,
पंचपाखाडी, नेक्सा शोरूमच्या वर, ठाणे (पश्चिम)
संपर्क: ९९२५२३५९६९

सार्वत्रिक महापालिका निवडणूक २०२५-२६ साठी निवडणूक यंत्रणा सज्ज!

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण दि.१३ - कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक  २०२५-२६ साठी महापालिका निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, या सार्वत्रिक निवडणूकीत ३१ पॅनलमध्ये बहुसदस्य पध्दतीने निवडणूक संपन्न होणार आहे. या निवडणूकीसाठी १५४८ मतदान केंद्रांवर आणि ३८२ ठिकाणी मतदानाची प्रक्रिया संपन्न होणार आहे. यापैकी १०१३ मतदान केंद्रे तळ मजल्यावर, ९ मतदान केंद्रे पहिला मजल्यावर, ४७१ मतदान केंद्रे पार्टीशन स्वरुपात, ५५ मंडपात असणार आहेत. महापालिका क्षेत्रात एकुण १४,२५,०८६ इतकी मतदारांची संख्या असून, त्यापैकी एकुण ७,४५,६६४ पुरुष मतदार, एकुण ६,७८,८७० स्त्री मतदार व इतर मतदारांची संख्या ५५२ इतकी आहे. 

महापालिका सार्वत्रिक निवडणूकीची मतमोजणी एकुण ८ ठिकाणी (निवडणूक निर्णय अधिकारी २ व ४ ची मतमोजणी एका ठिकाणी) होणार असून, त्यांची माहिती खालील प्रमाणे..

१. निवडणूक निर्णय अधिकारी - १ यांचेकडील पॅनल क्रमांक – २, ३ व ४ ची मतमोजणी बिर्ला वन्य, केडीएमटी इमारत, तळ मजला, शहाड (पश्चिम).

२. निवडणूक निर्णय अधिकारी - २ यांचेकडील पॅनल क्रमांक – १, ५, ६ व १० ची मतमोजणी मुंबई विद्यापीठ यांचे उपकेंद्र, वसंतव्हॅली, खडकपाडा, कल्याण (पश्चिम).

३. निवडणूक निर्णय अधिकारी - ३ यांचेकडील पॅनल क्रमांक – ७, ८ व ९ ची मतमोजणी प्रभाग क्षेत्र ३/क चे कार्यालय, तळ मजल्यावरील वाहन पार्किंग क्षेत्र,‍ आधारवाडी, कल्याण (‍पश्चिम).

४. निवडणूक निर्णय अधिकारी - ४ यांचेकडील पॅनल क्रमांक – ११, १२ व १८ ची मतमोजणी मुंबई विद्यापीठ यांचे उपकेंद्र, वसंतव्हॅली, खडकपाडा, कल्याण (पश्चिम).

५. निवडणूक निर्णय अधिकारी - ५ यांचेकडील पॅनल क्रमांक – १३, १४, १५ व १६ ची मतमोजणी साकेत कॉलेज, १०० फुटी रस्ता, राम म्हात्रे चौक, काटेमानिवली, कल्याण (पूर्व).

६. निवडणूक निर्णय अधिकारी - ६ यांचेकडील पॅनल क्रमांक – २०, २६, २७ व २८ ची मतमोजणी आयईएस पाटकर विद्यालय, राजाजी पथ, डोंबिवली (पूर्व) या शाळेच्या स्टील्ट हॉलमध्ये.

७. निवडणूक निर्णय अधिकारी - ७ यांचेकडील पॅनल क्रमांक – २१, २२, २३ व २५ ची मतमोजणी कडोंमपा शाळा क्र. २०, रेती बंदर रोड, मोठा गांव, डोंबिवली (पश्चिम).

८. निवडणूक निर्णय अधिकारी - ८ यांचेकडील पॅनल क्रमांक – २९ व ३० ची मतमोजणी धनजी नानजी चौधरी विद्यालय हॉल, पहिला मजला, नांदीवली, डोंबिवली (पूर्व).

९. निवडणूक निर्णय अधिकारी - ९ यांचेकडील पॅनल क्रमांक – १७, १९ व ३१ ची मतमोजणी सावित्रीबाई फुले कलामंदिर, घरडा सर्कल, डोंबिवली (पूर्व).

शिवसेना-महायुतीच्या पाठीशी नेहमीच दिवेकर भक्कमपणे उभे - खासदार डॉ.श्रीकांत शिंदे

विशेष प्रतिनिधी

दिवा - “शिवसेना-महायुतीच्या नेहमीच दिवेकर पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. गेल्या दहा वर्षांत जे काम करण्याचे वचन दिले ते पूर्ण केले आहे. दिवा शहराचा कायापालट करून, तुम्हाला सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण देण्याचा आमचा निर्धार पक्का आहे. भविष्यात दिवा ते सीएसटी लोकल सुरू होईल, ज्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. याशिवाय, दिव्यातील विविध विकासकामे सुरू असून, दर्जेदार शिक्षण, आरोग्य सुविधा आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. काम करणारा पक्ष आणि काम करणारे सरकार हे शिवसेना महायुतीचेच आहेत, त्यामुळे पुढील काळात दिवा शहराचा अधिक आणि वेगाने विकास होईल", असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदेने प्रतिपादन केले. ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत दिव्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.

ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिवा येथे शिवसेना-भाजप महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली. या सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी डॉ.श्रीकांत शिंदे यांनी दिव्याच्या कायापालटाचा उल्लेख करत आगामी काळात 'दिवा ते सीएसटी' विशेष लोकल सुरू करण्याचे आश्वासन दिले. यावेळी दिवा शहरात गेल्या दहा वर्षांत झालेल्या आणि सध्या सुरू असलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा देण्यात आला. दिवा-शीळ मार्गाचे काँक्रीटीकरण, दिवा रेल्वे स्थानकाचा सर्वांगीण विकास, प्रवाशांसाठी वाढविण्यात आलेल्या सुविधा, बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत दिवा येथील स्थानकाचे सुरू असलेले काम, क्लस्टर पुनर्विकास योजना, भुयारी गटारी योजना, आगरी-कोळी वारकरी भवन, नानासाहेब धर्माधिकारी सभागृह, अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण, महापालिकेच्या शाळांचा विकास, प्रशस्त पोलिस स्टेशन, डम्पिंग ग्राउंड हटविण्याचा निर्णय आणि आरोग्य सुविधांमधील सुधारणा यांचा उल्लेख यावेळी करण्यात आला.

दिवा शहराचा बदल अधोरेखित करताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, “दहा वर्षांपूर्वी दिवा केवळ गाव स्वरूपात होता. रस्ते, पाणी, स्वच्छता आणि रेल्वे स्थानकाची परिस्थिती अत्यंत बिकट होती. एका प्लॅटफॉर्मवरून प्रवाशांना जीव धोक्यात घालून उतरावे लागायचे. आज दिवा स्थानकाचा कायापालट झाला असून सुरक्षितता आणि सुविधा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.”  दिवा शहरात मोठ्या गृहसंकुलांचा विस्तार होत असून, वाढती लोकसंख्या लक्षात घेता दर्जेदार शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. अंबरनाथ येथे मंजूर करण्यात आलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचे उदाहरण देत, भविष्यात दिवा शहरातही असे प्रकल्प उभारले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रेल्वे सुविधांबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, दिवा स्थानकावर फास्ट व लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा, प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण आणि तिकीट खिडक्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. भविष्यात कोकणात जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्याही दिव्यात थांबतील, तसेच दिवा-सीएसटी विशेष लोकल सुरू होणार असल्याने प्रवाशांना प्रवासाचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होईल. युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी कल्याण रोड परिसरात टाटा स्किल सेंटर उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, पुढील सहा ते सात महिन्यांत ते सुरू होणार आहे. भविष्यात दिवा शहरात उद्योजक घडवण्यासाठी विशेष प्रशिक्षण केंद्र उभारण्याचाही मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

दिवा शहरात आगरी-कोळी वारकरी भवन, नानासाहेब धर्माधिकारी सभागृह, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, अग्निशमन केंद्र, पोलिस स्टेशन, तलाव सुशोभीकरण, परिवहन सेवा आणि महापालिकेच्या शाळा उभारण्यात आल्याची माहिती देण्यात आली. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी बायोमायनिंग प्रकल्प मंजूर झाल्याने, भविष्यात डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न पूर्णतः सुटणार असल्याचेही सांगण्यात आले.

दिवा येथील प्रभाग क्रमांक २७ चे शिवसेना-भाजपा महायुतीचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार शैलेश पाटील, आदेश भगत, दिपाली भगत, स्नेहा पाटील, प्रभाग क्रमांक २८ मधील रमाकांत मढवी, साक्षी मढवी, दीपक जाधव, दर्शना म्हात्रे तसेच प्रभाग क्रमांक २९ चे अधिकृत उमेदवार बाबाजी पाटील, अर्चना पाटील आणि वेदिका पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली. यावेळी विविध सामाजिक संघटनांनी शिवसेना-महायुतीला जाहीर पाठिंबा दिला.

सभेच्या शेवटी १५ जानेवारी रोजी धनुष्यबाण आणि कमळ चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केले. “काम करणारा पक्ष आणि काम करणारे सरकार हे महायुतीचेच आहे. पुढील काळात दिवा शहरात आणखी मोठ्या प्रमाणावर विकासकामे होतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
क्लस्टर पुनर्विकास योजनेचे सर्वेक्षण ९५% पूर्ण, लवकरच काम सुरू होणार

क्लस्टर पुनर्विकास योजनेबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “ही योजना म्हणजे केवळ घर नव्हे, तर सर्वांगीण विकास आहे. धोकादायक आणि अनधिकृत इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना हक्काचे, अधिकृत आणि मोठे घर विनामूल्य मिळणार आहे. ठाणे शहरात एकाचवेळी १३ क्लस्टर प्रकल्प सुरू आहेत. दिवा शहरातही ९५ टक्के सर्वे पूर्ण झाला असून, लवकरच प्रत्यक्ष काम सुरू होईल.”

आम्ही दहा वर्षांत दिलेला शब्द पाळला - खासदार डॉ.श्रीकांत शिंदे

"प्रत्येक निवडणुकीत राजकीय पक्ष लोकांसमोर येतात. मुंबईच उदाहरणं, आज मराठीच्या नावावर एकत्र आलेले आहेत, पण २५ वर्षांत काय केलं ते त्यांनी सांगितलेलं नाही. उलट पुढे काय करणार ते सांगण्यासाठी लोकांच्या समोर जात आहेत. पण आम्ही १० वर्षांत दिलेला शब्द पाळला आहे, हे अभिमानाने सांगतो” अशा शब्दांत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधला.

'रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट' आयोजित ‘डोंबिवली ऑलिम्पिक २०२६’ हा भव्य क्रीडा सोहळा संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : 'रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट' आयोजित ‘डोंबिवली ऑलिम्पिक २०२६’ हा भव्य क्रीडा सोहळा १० व ११ जानेवारी रोजी संपन्न झाला असून डोंबिवली व परिसरातील ३५ शाळांमधील ३,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. उद्घाटन समारंभाला रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर हर्ष माकोळ हे मुख्य अतिथी म्हणून लाभले, तर RPSF १२वी बटालियनचे असिस्टंट कमांडंट श्री. दाहाके आणि इन्स्पेक्टर दिनेश कुमार यांनी मान्यवर म्हणून सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे प्रायोजक Galaxy IEC India Pvt Ltd चे संचालक रोटेरियन विजय अव्हाड, Union Bank चे DBM अतुल शिंदे तसेच स्वच्छता भागीदार Sumeet Elkoplast तर्फे श्री. सानू वर्गीज यांनीही कार्यक्रमाला आपली उपस्थिती देऊन उपक्रमाला बळ दिले.
RPSF ग्राउंडवर ऍथलेटिक्स, कबड्डी, खो-खो, डॉजबॉल, लंगडी आणि टग ऑफ वॉर, कानविंदे हॉलमध्ये बॅडमिंटन (व्हेन्यू पार्टनर : नॅशनल यूथ ऑर्गनायझेशन), डोंबिवली स्पोर्ट्स अरेना टर्फवर फुटबॉल आणि रोटरी भवन येथे बुद्धिबळ अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व समन्वय क्लब अध्यक्ष डॉ. संदीप घरत, सचिव विनायक आगटे, प्रकल्प संचालक संतोष प्रभुदेसाई आणि प्रोजेक्ट चेअरमन विवेक गोठे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले . या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा २१ जानेवारी रोजी रोटरी भवन येथे आयोजित करण्यात येणार आहे.