BREAKING NEWS
latest

डोंबिवलीतील निळजे येथील कटाई-पलावा पुलाचे उदघाट्न संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली, ४ जुलै - अनेक वर्षे कल्याण-शीळ मार्गावरून वाहतूक कोंडीने हैराण झालेल्या प्रवाश्यांची वाहतूक कोडीतून काहीशी मुक्ती होणार आहे. शिवसेना (शिंदे गट) माध्यमातून औपचारिकरीत्या निळज्यातील काटई-पलावा पुलाचे उदघाटन केले. कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे आणि शिवसेना कल्याण जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांनी फित कापून अधिकृतरित्या पुलाचे उदघाट्न झाल्याचे जाहीर केले. यावेळी शिवसेनेचे हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

निळजे काटई-पलावा पुलाच्या उदघाट्ना प्रसंगी जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांनी आम्ही फक्त ट्विट करत नाही तर आम्ही कामही करतो असे सांगत विरोधकांना टोलाही लगावला. गेले दहा वर्षे ज्यांनी काम करायला पाहिजे होते त्यांनी काहीही काम केले नाही. मात्र शिवसेना जे बोलते ते काम करते असेही सांगितले. कल्याण-शीळ रस्त्यावर वाहतूक कोंडी होत होती. अनेक वर्षांपासून येथून वाहतूक करणाऱ्यांसाठी हा रस्ता डोकेदुखीचा विषय ठरला होता. विशेष म्हणजे या मार्गावरील पलावा जंक्शन पुलाचं काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेलं होतं. त्यामुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत होती.

या पुलाबाबत मनसेचे नेते व माजी आमदार राजू पाटील यांनी वारंवार आवाज उठवला होता. याच पुलाच्या कामावरून ठाकरे गट आणि मनसे हे दोन्ही पक्ष एकत्र आले होते. तसेच या दोघांनी पलावा पुलाच्या ठिकाणी मोर्चे  काढून आंदोलनही केले होते. परंतु आता हा पुल नागरिकांसाठी शुक्रवारपासून खुला करण्यात आला आहे. आता पलावा एक्सपिरिया मॉल येथे वाहतूक कोंडी होणार नाही. वाहन चालकांना रखडावं लागणार नाही. यापूर्वी पलावा पुलाचं काम कधी पूर्ण होईल? असा प्रश्न विचारला जात होता त्यातून आता सुटका झाली आहे. आता हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यामुळे कामावरून घरी येणारी लोकं वेळेत घरी पोहोचतील. पण सत्ताधारी महायुतीने या पलावा पुलाचे उदघाट्न करताना गोपनीयता का ठेवली असेही विचारले जात आहे. शिवसेना कोणतेही काम गाजावाजा करून करते त्याला यावेळी फाटा देण्यात आला आहे.

निळजे काटई पलावा पुलाच्या उदघाट्ना प्रसंगी, लताताई पाटील, सदानंद थरवळ, राजेश कदम, महेश पाटील, बंडू पाटील, अर्जुन पाटील, दत्ता वझे, संजय पावशे, जनार्दन म्हात्रे, रणजित जोशी, भरत भोईर, सतीश मोडक यांच्यासह असंख्य  पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कल्याण तालुका पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

टिटवाळा : पत्रकारितेच्या क्षेत्रात निर्भीडपणे काम करणाऱ्या आणि सरकारी माती चोरीचा पर्दाफाश करणाऱ्या ‘पुढारी’ दैनिकाचे प्रतिनिधी अजय शेलार यांनी दिलेल्या तक्रारीनंतर कल्याण तालुका पोलीस ठाण्यात पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत ‘निर्भय महाराष्ट्र पार्टी'च्या तिघा पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा कल्याण तालुका पोलीस ठाण्यात  या कायद्यांतर्गत नोंदविण्यात आलेला पहिलाच गुन्हा ठरला आहे. महाराष्ट्रात या कायद्याअंतर्गत साधारणत: ३६ गुन्हे नोंद आहेत.

दि.१८ जून २०२५ रोजी, शेलार यांनी प्रकाशित केलेल्या “सरकारी मातीची खासगी विक्री” या बातमीने प्रशासनात खळबळ माजवली होती. त्यानंतर संदीप नाईक या इसमाने २७ जून रोजी फेसबुक लाईव्ह करून आपल्या सहकार्यांसमवेत शेलार यांना “अजय शेलार पुन्हा आमच्या बातम्या लावशील तर समजून घे,आमच्या बातम्या करशील तर लक्षात ठेव" अशी थेट धमकी दिली, तसेच समाजमाध्यमांवर त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता.

या संपूर्ण प्रकारामुळे शेलार यांचे प्राण धोक्यात आले असून, पत्रकारितेच्या स्वातंत्र्यालाच आव्हान उभे राहिले होते. शेलार यांनी यासंदर्भात टिटवाळा येथील कल्याण तालुका पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती.त्यानंतर पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करत, पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात ‘निर्भय महाराष्ट्र पार्टी’चे राज्य संघटक मंत्री संदीप नाईक, राजेंद्र जाधव व अनंता कोल्हे  हे तिघे प्रमुख पदाधिकारी आरोपी आहेत. या प्रकरणाची माहिती गृह राज्यमंत्री, ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडेही देण्यात आली आहे.

या तक्रारीला दिलेल्या गंभीर प्रतिसादामुळे आता इतर पत्रकारांमध्येही एक विश्वास निर्माण झाला आहे की, पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात कायदा आता प्रत्यक्षात उभा राहत आहे. हा गुन्हा केवळ एका पत्रकाराचा लढा नाही, तर ही लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर झालेल्या हल्ल्याला दिलेली सडेतोड प्रतिक्रिया आहे. प्रशासनाच्या या निर्णायक पावलामुळे पत्रकार संरक्षण कायदा आणि पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न केंद्रस्थानी येणार हे निश्चित झाले आहे.

एमजीए फाउंडेशन आयोजित इनडोअर क्रिकेट स्पर्धेत ऑडिट आर्मीसला विजेतेपद..

प्रतिनिधी: अवधूत सावंत
 
मुंबई : एमजीए फाउंडेशनतर्फे मुंबई इनडोअर क्रिकेट स्पोर्ट्स असोसिएशन आणि महाइनडोअर क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेने भव्य इनडोअर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा गोरेगाव (पश्चिम) येथे खेळली गेली. आघाडीची सल्लागार संस्था असलेल्या एमजीए ग्रुपतर्फे आयोजित दुसऱ्या टॅक्स प्रीमियर लीग (टीपीएल २.०) स्पर्धेचा यशस्वी समारोप झाला. कर सल्लागार, वित्त व कायदा क्षेत्रातील तज्ज्ञांना एकत्र आणणाऱ्या या अनोख्या क्रिकेट स्पर्धेने खेळासोबतच नेटवर्किंगलाही नवा आयाम दिला. या स्पर्धेत देशभरातील नामांकित कंपन्यांमधील व्यावसायिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. मैदानावरील चुरशीच्या लढतींमधून संघभावना, समन्वय व एकोप्याचे उत्तम दर्शन घडले. व्यावसायिक जगतातील सहकार्य आणि सुसंवादाचे महत्त्व या स्पर्धेद्वारे पुन्हा अधोरेखित केले.
 
या स्पर्धेतील अंतिम सामन्यात 'ऑडिट आर्मीज' संघाने 'रिटर्न्स मेकर्स'वर ८९-७७ असा १२ धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यात ऑडिट आर्मीजने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निणर्य घेतला व त्यांच्या फलंदाजांनी तो निर्णय सार्थ ठरवत ८९ धावा करताना विजयाचा पाया मजबूत केला. या वेळी ऑडिट आर्मीजच्या पहिल्या जोडीने (कृष्णा समंत्रा १९ धावा, १ षटकार व स्वप्निल शिंदे ८ धावा) २ षटकांत २७ धावा धावफलकावर लावल्या. तर दुसऱ्या जोडीने (सचिन कुंभार ९ धावा व नवीन सोमणी १५ धावा) २ षटकांत २५ धावा धावफलकावर लावल्या. तिसऱ्या जोडीने (मोहित कुमार १४ धावा केल्या त्यात त्यने एक षटकार सुध्दा खेचला व दिव्यांशु पटोडिया १० धावा केल्या पण ते दोघेही एक-एकदा बाद झाल्याने त्याच्या व संघाच्या धावसंखेतून ५,५ एकूण १० धावा वजा झाल्या) २ षटकांत १४ धावा मिळवण्यात यशस्वी ठरले. तर चौथ्या व शेवटच्या जोडीने (शिवेंद्र द्विवेदी १० धावा व विनय डालमिया (१८ – ५ = १३ धावा)) २३ धावांची भर घालत संघाला एक सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. रिटर्न्स मेकर्सच्या पहिल्या जोडीने (गौरव अग्रवाल ११-५ = ६ धावा, १ विकेट व सुरेश नायर १७ धावा, एक षटकार) २३ धावा करून ऑडिट आर्मीजला जोरदार लढत देण्याचा इशारा दिला. दुसऱ्या जोडीने (हितेन रुघाणी ११ धावा व संस्कार शुक्ला ९-१५ = -६ धावा (३ वेळा बाद)) फटकेबाजी करण्याच्या नादात फक्त ५ धावा करण्यात यश मिळवल. तिसऱ्या जोडीने (चिंतन नाईक १७ धावा १ षटकार, २ विकेट व परिमल वाशी १२ धावा) २९ धावा काढत पुन्हा एकदा संघाला सुस्थित आणण्याचा प्रयत्न केला. तर चौथ्या व शेवटच्या जोडीला (गौरव रतन ८-१० = -२ धावा व सुधीर गुप्ता २२ धावा व दोन षटकार) फटकेबाजी करण्याच्या नादात २० धावाच करता आल्या. त्यामुळे रिटर्न्स मेकर्स संघाला १२ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. 

स्पर्धेचा बक्षीस समारंभ अतिशय भव्य स्वरुपात पार पडला. त्यावेळी एमजीए ग्रुपचे सहसंस्थापक मनीष अग्रवाल व आणि स्नेहा पाटील, क्षितीज वेदक (संस्थापक चेअरमन, महाइनडोअर (महाराष्ट्र) क्रिकेट असोसिएशन), बाळासाहेब तोरसकर (संस्थापक सेक्रेटरी, महाइनडोअर (महाराष्ट्र) क्रिकेट असोसिएशन) उपस्थित    होते. मनीष अग्रवाल आणि स्नेहा पाटील म्हणाले, “टीपीएल २.० ही केवळ क्रिकेट स्पर्धा नव्हती, तर ती होती कौशल्य, संघभावना व अनुपालन समुदायाच्या आत्म्याचा उत्सव. जेव्हा सहकारी मैदानावर एकत्र येतात, तेव्हा ते व्यवसायातही अधिक सशक्त भागीदार होतात. पारंपरिक ऑफिसच्या चौकटीपलीकडे जाऊन अर्थपूर्ण संबंध निर्माण करण्यासाठी अशा व्यासपीठांची गरज आहे.”
या उपक्रमाला महिमा अग्रवाल व ज्योतिका राय यांचा भक्कम पाठिंबा लाभला. त्यांनी संपूर्ण आयोजनात मोलाची भूमिका बजावली.

चोरी व गहाळ झालेले मोबाईल परिमंडल-३ चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या हस्ते मुळ मालकांना केले वितरित..

प्रतिनिधी - अवधुत सावंत

कल्याण - परिमंडल-३ कल्याण  अंतर्गत सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभागातील खडकपाडा पोलीस ठाणे, बाजारपेठ पोलीस ठाणे, महात्मा फुले पोलीस ठाणे व कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीतील नागरीकांच्या वापरातील मोबाईल चोरी तसेंच गहाळ झाले होते. सदर चोरी व गहाळ झालेबाबतच्या तक्रारीनुसार मोबाईल फोनचा शोध घेणेबाबत वरिष्ठांच्या सुचना प्राप्त झाल्या होत्या. त्याप्रमाणे अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, संजय जाधव, पोलीस उप-आयुक्त, परिमंडल-३, कल्याण अतुल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त कल्याण विभाग कल्याणजी घेटे यांच्या मागदर्शनाखाली खडकपाडा पोलीस ठाणे, बाजारपेठ पोलीस ठाणे, महात्मा फुले पोलीस ठाणे व कोळसेवाडी पोलीस ठाणे मध्ये तांत्रिक ज्ञान असलेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांची पथके नियुक्त करण्यात आली होती. सदर पथकांनी सीईआयआर या पोर्टलचा वापर करून तांत्रिक विश्लेषन करून खालीलप्रमाणे किंमतीचे चोरी व गहाळ झालेले मोबाईल हस्तगत करण्यात आलेले आहेत.
खडकपाडा, महात्मा फुले, बाजारपेठ, कोळसेवाडी पोलीस ठाणे येथील मोबाईल फोन चोरी व गहाळ झालेले असे ७२ मोबाईल फोन ज्याची एकुण ११,१८,७८०/- रू. किंमतीचे संबधीत तक्रारदार यांना ओळख पटवुन दिनांक ०२/०७/२०२५ रोजी पोलीस उप-आयुक्त, परिमंडल-३ चे अतुल झेंडे, व सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभागाचे कल्याणजी घेटे यांच्या हस्ते मुळ मालकांना हस्तांतरित करण्यात आले.