BREAKING NEWS
latest

'बीएचएमएस' डॉक्टरांची नोंदणी रद्द..

प्रतिनिधी:अवधुत सावंत
   
मुंबई : न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत बीएचएमएस
(BHMS) डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमधील (MMC) नोंदणी बंद ठेवण्याचा तातडीचा निर्णय राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) आणि सेंट्रल मार्ड (MARD) या डॉक्टरांच्या संघटनांनी केलेल्या तीव्र विरोधानंतर सरकारने हा निर्णय जारी केला आहे. बीएचएमएस (BHMS) डॉक्टरांनी ३ ऑगस्टच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी करण्यात यावी, यासाठी मुंबईत मोठे आंदोलन केले होते. मात्र, होमिओपॅथी डॉक्टरांचा एमएमसी (MMC) मध्ये समावेश करण्यास ॲलोपॅथी डॉक्टरांच्या संघटनांनी (IMA आणि मार्ड) जोरदार विरोध दर्शवल्याने वैद्यकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला होता.

वैद्यकीय शिक्षण विभागाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सध्याची परिस्थिती आणि वातावरण निवळेपर्यंत, तसेच नोंदणीची योग्य कार्यपद्धती निश्चित होईपर्यंत नोंदणी थांबवणे आवश्यक आहे. मुख्य म्हणजे, या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत बीएचएमएस (BHMS) डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी करणे संयुक्तिक राहणार नाही, असे शासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष उच्च न्यायालयाच्या आगामी निर्णयाकडे लागले आहे.

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये बीएचएमएस (BHMS)डॉक्टरांच्या नोंदणीला इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) आणि मार्ड (MARD) ने आक्रमक भूमिका घेत विरोध केला होता. यापूर्वी झालेल्या संपामुळे आरोग्य सेवेवर झालेला परिणाम लक्षात घेता, प्रशासनाने दोन्ही बाजू समजून घेऊन मध्यस्थीचा मार्ग अवलंबला आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने यासंदर्भात अधिकृत पत्रक जारी करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

स्वातंत्र्य दिनी डोंबिवलीत फडकणार ३५ हजार चौरस फुटांचा विश्वविक्रमी तिरंगा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : देशाच्या ७९व्या स्वातंत्र्य दिनाच्या सन्मानार्थ, देशाच्या गौरवाचा झेंडा महाराष्ट्रात उंचावण्यासाठी डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने यंदा कल्याण लोकसभा मतदारसंघातील डोंबिवलीत ऐतिहासिक आणि 'तिरंगा रॅली'चे आयोजन करण्यात आले आहे.
यापूर्वीचा तिरंगा रॅलीचा विश्वविक्रम २१ हजार चौरस फुटांचा होता; मात्र यंदा कल्याण लोकसभेत ३५ हजार चौरस फुटांचा तिरंगा फडकवून आधीचा विक्रम मोडीत काढला जाणार आहे. त्याची विश्वविक्रम म्हणून अधिकृत नोंद होणार आहे. शनिवार, १५ ऑगस्टला सकाळी सात वाजता रॅली आयोजित केली आहे. रॅलीचा प्रारंभ ७:३० वाजता डोंबिवली पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौक (घारडा सर्कल) येथील कॅप्टन विनयकुमार सचान स्मारक येथून होईल. समारोप दत्तनगर येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर उद्यान परिसरातील १५० फूट उंच राष्ट्रध्वज स्तंभाजवळ होणार आहे असे सांगण्यात आले.

भरती परिक्षा पद्धती सुधारणांसाठी राज्यात उच्चस्तरीय समिती स्थापन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई दि १२ : महाराष्ट्रात विविध सेवाभरतींसाठी होणार्‍या परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक, अधिक सुरक्षित आणि सर्वसंमतीने सुधारणांसाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला. या समितीने राज्यात प्रत्येक विभागात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत सर्वंकष सुधारणांबाबत अहवाल सादर करायचा आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा उपस्थित होते, त्यांनीही अनेक उपयुक्त सूचना या बैठकीत केल्या. 

वर्षा निवासस्थानी आज विशेषत्वाने आयोजित बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे निर्देश दिले. ही उच्चस्तरीय समिती सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेत राहणार असून राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते, माहिती-तंत्रज्ञान विभागाचे सचिव वीरेंद्र सिंग, पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. एन. रामास्वामी आणि नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांचा त्यात समावेश असेल. या समितीने प्रत्येक महसुली विभागात जाऊन विद्यार्थी, शिक्षण संस्थाचालक आणि संबंधित घटकांशी चर्चा करून त्यांची मते जाणून घ्यायची आहेत. त्याआधारावर राज्यासाठीचे समग्र धोरण ठरेल.

अलिकडेच केंद्र सरकारने पेपरफूट आणि परीक्षा गैरव्यवहारासंदर्भात संसदेत एक कायदा केला आहे. महाराष्ट्राचाही स्वतंत्र कायदा आहेच. तथापि संसदेने केलेला कायदा अधिक कठोर असल्याने तो महाराष्ट्रातही लागू करण्यासंदर्भात येणार्‍या पंधरवड्यात प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, असेही निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

राज्यात किमान 25 हजार सुरक्षित क्लासरुम उभारण्यात याव्यात, असेही निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत दिले. या विविध परीक्षांमध्ये जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, पोलीस अधीक्षक, शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांचीही समन्वय भूमिका, इतर विविध देशांमधील परीक्षा पद्धती, विद्यमान प्रक्रिया आणि त्यातील विविध संभाव्य सुधारणा अशा अनेक विषयांवर यावेळी सांगोपांग चर्चा झाली. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल आणि इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

'जे एम एफ' शिक्षण संस्था व ब्रह्मा कुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नशा मुक्त भारत परिसंवादाचे आयोजन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

 कोपर - डोंबिवलीतील कोपर येथील 'जे एम एफ' शिक्षण संस्था व ब्रह्मा कुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नशा मुक्त भारत परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात हिरोशिमा अणूबाँब मृत्यूमुखी हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. भारताची युवा पिढी ही भारताचे उज्वल भविष्य आहे आणि म्हणूनच या युवा पिढीला सामाजिक आणि वैयक्तिक काही बंधने आणि जबाबदाऱ्या देखील आहेत. म्हणुनच 'जे एम एफ' शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी नशा मुक्त भारत या परिसंवादाचे आयोजन मधुबन वातानुकूलित दालनात आयोजित केले होते.
'नशा मुक्त भारत..एक पाऊल पुढे..'  ह्या नाजूक विषयाची हाताळणी करताना परिसंवादाचे वक्ते डॉ. राजकुमार कोल्हे यांनी अनेक उदाहरणे संदर्भासहित स्पष्टीकरण देऊन सांगितले. आम्ल पदार्थ, दारूचे व्यसन ह्या समाजाला घातक ठरणाऱ्या गोष्टी जर समूळ नष्ट करायच्या असतील तर देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या युवा पिढीने एकत्रित येऊन शपथ घ्यायला हवी की आजचा आणि उद्याचा भारत हा नशा मुक्त भारत करूनच आपण दाखवू.
नशा म्हणजेच व्यसन. व्यसन हे शिकण्याचे असावे, वाचनाचे असावे, व्यक्तीने व्यासंग असावे परंतु व्यसनिक नसावे. व्यासंग तुम्हाला घडवतो तर व्यसन तुम्हाला रसातळाला नेतो, आणि हाच फरक ओळखून युवा पिढीने नशा करण्यापासून लांब रहावे ह्याचे उदाहरण देताना प्रसिद्ध सिने अभिनेता संजय दत्त, गायक हनी सिंग हे कधी काळी व्यसनाच्या आहारी गेले होते त्यातून त्यांना बाहेर पडताना भोगावा लागलेला त्रास आणि नशा मुक्त झाल्यावर कळलेला जीवनाचा अर्थ याचा सारासार विचार केला असता नशा मुक्त भारत घडविण्यासाठी कितीतरी गोष्टींना सामोरे जावे लागते असे सांगत वक्ते डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या परिसंवादामध्ये नमूद केले की आताची पिढी ज्याला जेन झी म्हणून संबोधिले जाते त्याच पिढीने नशा मुक्त भारत घडवावा अशी अपेक्षा आहे.
🤔परिसंवादाच्या अखेरच्या टप्प्यात शाळा महाविद्यालयाच्या अनेक मुलांनी प्रश्न विचारून समाधानकारक उत्तरे मिळवली तसेच शपत घेतली तर वंदे मातरम् महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांनी नशा मुक्त भारत हा विषय घेऊन पथनाट्य सादर केले. परिसंवादाला शाळा महाविद्यालयाचे मिळून पाचशे विद्यार्थी हजर होते.

कर्जमुक्ती योजनेतील ६.२२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये ५ हजार कोटींची रक्कम जमा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
 
मुंबई : राज्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने आज योजनेच्या पहिल्या टप्प्यात ६.२२ लाख पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये ५,०२८ कोटींची रक्कम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थेट ऑनलाइन हस्तांतरित करण्यात आली. 

सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्जमुक्ती योजनेच्या ऑनलाईन लाभ वितरणास प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री गिरीश महाजन, पंकजा मुंडे, शंभूराज देसाई, संजय सावकारे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच सर्व पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि सहकारी संस्थांचे निबंधक दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पहिल्या टप्प्यात आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या ६.२२ लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये ५,०२८ कोटींची रक्कम थेट जमा करण्यात आली आहे. राज्य शासनाने सर्व बँकांना कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना तातडीने खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून शेतकऱ्यांना नव्याने शेतीसाठी आवश्यक आर्थिक बळ मिळेल.

ही योजना पूर्णपणे ऑनलाइन असून, शेतकऱ्यांना कुठेही अर्ज करण्याची आवश्यकता नाही. योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी संबंधित बँकांनी महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड केली असून, ग्रामपंचायत कार्यालये, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था तसेच संबंधित बँक शाखांमध्येही प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीतील प्रत्येक शेतकऱ्याला एक विशिष्ट क्रमांक देण्यात आला आहे. हा क्रमांक घेऊन शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर ॲग्रीस्टॅकवरील नोंदणी करून आधार प्रमाणीकरण करावे. एवढीच सहज आणि सोपी प्रक्रिया असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

ज्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी अथवा प्रलंबित बाबी असतील, त्या संबंधित पालकमंत्र्यांनी निदर्शनास आणून द्यावे, त्या सर्व विषयांवर मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये सविस्तर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल. अशा सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

या योजनेतील कर्जमुक्ती आणि एकवेळ समझोता या घटकांच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील ३० जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, १२ राष्ट्रीयकृत बँका आणि इतर खासगी बँकांसह एकूण ५३ बँकांनी महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती अपलोड केली आहे. विविध बँकांकडून सुमारे ३२ लाख कर्जखात्यांचा डेटा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आला असून, ६ ऑगस्ट २०२६ अखेर १२.१० लाख कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्याची माहिती सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी सादरीकरणाद्वारे दिली. 

शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात विभागनिहाय माहिती -

अमरावती विभागात १ लाख ५८ हजार १४६ शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात १,३७२.१७ कोटींचा लाभ,

नाशिक विभाग - १ लाख ४० हजार ८९ शेतकऱ्यांना १,२०९.३९ कोटी रुपये,

छत्रपती संभाजीनगर विभाग - १ लाख ३० हजार ९३४ शेतकऱ्यांना ९३२.६१ कोटी रुपये,

पुणे विभाग - १ लाख ४ हजार ६१ शेतकऱ्यांना ८६०.९७ कोटी रुपये,

नागपूर विभाग - ७० हजार २९० शेतकऱ्यांना ५४४.७१ कोटी रुपये,

कोकण विभागातील १८ हजार ६८७ शेतकऱ्यांना १०८.८६ कोटीं रुपयांचा लाभ.

'जेएमएफ' शिक्षण संस्थेत स्काऊट आणि गाईडचा एकदिवशीय माहिती वर्ग संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोपर - दिनांक २४ जुलै २०२६ शुक्रवार रोजी सकाळी ११.०० ते ४.०० या वेळेत 'जेएमएफ'चे जन गण मन विद्यामंदिर आणि ज्युनिअर कॉलेज मधील ५०१ हॉलमध्ये स्काऊट आणि गाईड ठाणे जिल्ह्यातर्फे एकदिवशीय *माहिती वर्ग (बिगीनर्स कोर्स )* घेण्यात आला. त्याकरिता संस्थेच्या सचिव डॉ.सौ.प्रेरणा राजकुमार कोल्हे मॅडम प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
तसेच मार्गदर्शन करण्यासाठी ALT सुरेश लोहार सर, ठाणे जिल्हा संघटक-स्काऊट श्री.संदिप भुसिंगे सर, जिल्हा संघटक-गाईड सौ. हेमांगी पाटील मॅडम, डोंबिवली स्थानिक संस्थेचे अध्यक्ष श्री. अशोक जगताप सर, उपाध्यक्ष श्री.एकनाथ चौधरी सर, सचिव श्री.जगदीश उगले सर, माजी अध्यक्ष श्री. सुनिल भावसार सर, सल्लागार श्री.सूर्यवंशी सर तसेच विविध शाळा, कॉलेज मधून २५ ते ३० स्काऊट मास्टर आणि गाईड कॅप्टन उपस्थित होते.
 या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे सर यांचे विशेष सहकार्य लाभले त्याबद्दल सरांचे विशेष आभार मानण्यात आले.

डोंबिवलीतील ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. प्रदीप ढाके यांच्या ३८ वर्षांच्या निरंतर सेवेला नागरिकांचा सलाम..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली - डोंबिवली शहरात गेल्या ३८ वर्षांपासून अत्यल्प शुल्कात उत्कृष्ट वैद्यकीय सेवा देत गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. प्रदीप ढाके यांनी त्यांच्या वैद्यकीय व्यवसायाची ३८ वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण केली. या निमित्ताने विविध क्षेत्रातील नागरिक तसेच त्यांचे रुग्ण आणि नातेवाईकांनी डॉक्टरांच्या दवाखान्यात जाऊन त्यांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. 
यावेळी त्यांच्या उपस्थित मान्यवर व रुग्णांसमोर त्यांच्या समाजाभिमुख कार्याचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी उपस्थित खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचे कार्यालय प्रतिनिधी तथा माजी नगरसेवक श्री. प्रकाश माने यांनी  डॉ. ढाके यांच्या सेवाभावी वृत्ती, रुग्णांप्रती असलेली आत्मीयता आणि कमी खर्चात दर्जेदार उपचार देण्याच्या कार्याचे मनापासून कौतुक केले. यावेळी श्री. प्रकाश माने यांनी सांगितले की, "वैद्यकीय सेवा ही केवळ व्यवसाय नसून समाजसेवेचे प्रभावी माध्यम आहे, याचे जिवंत उदाहरण म्हणजे डॉ. प्रदीप ढाके." गेल्या ३८ वर्षांत त्यांनी हजारो रुग्णांना योग्य उपचार व आरोग्याविषयी मार्गदर्शन करून समाजात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. प्रदीप ढाके आणि कुटुंबीयांना पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि डॉक्टरांच्या मार्फत अशीच निरंतर समाजसेवा करण्यासाठी सर्व उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या. 
या शुभप्रसंगी शिवसेनेचे डोंबिवली विधानसभा समन्वयक तथा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह श्री. विजय देशमुख साहेब, शिवसेनेच्या डोंबिवली शहर उपसंघटक सौ. प्रतीक्षा प्रकाश माने, टिळक नगर सुयोग गल्लीतील हरी मुकुंद सोसायटीचे पदाधिकारी श्री. महाजन साहेब, श्री. महापदी साहेब, डोंबिवलीतील ज्येष्ठ समाजसेविका माननीय श्रीमती मालती ताई साटम, कल्याण रोडवरील एकरूप सहकार मित्रमंडळाचे पदाधिकारी, तसेच डॉक्टर प्रदीप ढाके यांच्या आरोग्य विषयक कार्याला दिवस-रात्र हातभार लावणारे यामध्ये त्यांचा स्टाफ श्री. रघुनाथ कांबळे, सौ. प्रियांका गायकर, सौ. मनीषा गरुड, सौ. सोनल पिस्ते, दर्शन सोनावणे, नागेश पवार, पुनम जाधव तसेच उपचारासाठी व काही खास कार्यक्रमासाठी आलेले अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक आनंदाने उपस्थित होते.