BREAKING NEWS
latest

राज्यात आता दरवर्षी महसूल क्रीडा स्पर्धा : चंद्रशेखर बावनकुळे

प्रतिनिधी: अवधुत सावंत

नांदेड : येथे गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये कोकण विभागाने अव्वल राहत जेते पद पटकावले आहे. दुसरा क्रमांक यजमान छत्रपती संभाजी नगरला तर पुणे विभागाला तिसरा क्रमांक मिळाला. रविवारी सायंकाळी झालेल्या समारोप कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी महसूल मंत्र्यांनी दरवर्षी ही स्पर्धा घेण्याचे व त्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा केली.

दोन हजारावर अधिकारी-कर्मचारी क्रीडापटूंचा तीन दिवसांचा क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा महोत्सव आज सायंकाळी थाटात संपन्न झाला. वैयक्तिक, सांघिक आणि मिश्र अशा विविध क्रीडा प्रकारामध्ये नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, कोकण तसेच नोंदणी मुद्रांक व भूमि अभिलेख विभाग अशा एकूण सात विभागांमध्ये ८३ क्रीडा प्रकारात लढती झाल्या.
   
२१ तारखेपासून दोन हजार खेळाडू विविध मैदानावर लढत देत होते. तर २१ व २२ तारखेला यशवंत कॉलेज मैदानावर सायंकाळी या सर्व खेळाडूंनी सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेतला. डोळ्याचे पारणे फेडणारे रंगमंच आणि अतिशय व्यावसायिकतेने सादर केलेली प्रत्येक कलाकृती यामुळे सांस्कृतिक कार्यक्रम लक्षवेधी ठरला. सांस्कृतिक स्पर्धेमध्ये नाशिक विभागाने प्रथम, कोकण विभागाने द्वितीय व नागपूर विभागाने तृतीय पुरस्कार मिळवला.

संचलन लक्षवेधी

या स्पर्धेमध्ये कर्मचाऱ्यांनी केलेले संचलन हे देखील एक उपलब्धी ठरली आहे. यजमान छत्रपती संभाजी नगरने यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक नाशिक तर तृतीय क्रमांक कोकण विभागाने पटकावला.
    
८३ क्रीडा प्रकारात भिडंत

क्रिकेट, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, फुटबॉल, धावणे, चालणे, जलतरण, बुद्धिबळ, कॅरम, टेबल टेनिस, लॉन टेनिस, बॅडमिंटन, गोळा फेक, थ्रो बॉल, थाळीफेक, भालाफेक, रिंग टेनिस, जलतरण, संचलन अशा १५ क्रीडा प्रकारामध्ये पुरुष, महिला व मिश्र संघ, ४५ वर्षांवरील संघ, असे एकूण ८२ क्रीडाप्रकार होते. तसेच सांस्कृतिक आयोजन अशा एकूण ८३ घटकातून गुणानुक्रमांक देण्यात आले. यामध्ये कोकण विभागाने सर्वाधिक ३४१ गुण मिळवले. तर त्या पाठोपाठ यजमान छत्रपती संभाजी नगरने २२७ गुण मिळवले तर तिसऱ्या क्रमांकावर २१७ गुणांसह पुणे विभाग राहिला.

दरवर्षी होणार क्रीडा स्पर्धा - महसूलमंत्री

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी संबोधित करताना  बारा वर्षानंतर नांदेडमध्ये या क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्याचा आनंद व्यक्त केला. मात्र यापुढेही क्रीडा स्पर्धा दरवर्षी घेतली जाईल. यासाठी राज्य शासन एक कोटीची तरतूद करेल अशी घोषणा केली. तसेच नियुक्ती आणि पदोन्नती देताना क्रीडापटूंना अग्रस्थान दिले जाईल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

व्हॉट्सअप ग्रीव्हियन्स ऍप लोकार्पित

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नागरिकांना तक्रारी करता येईल अशा पद्धतीचे व्हॉट्सअप ग्रिवियन्स ऍप आज महसूल मंत्र्यांच्या हस्ते नांदेडच्या नागरिकांना लोकार्पित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या कल्पकतेतून ही सुविधा नागरिकांना बहाल करण्यात येत आहे. *९२७०१०१९४७* ह्या व्हॉट्सअप क्रमांकावर आपली तक्रार, मागणी, म्हणणे पाठवता येणार आहे. याला प्रतिसाद येणारी यंत्रणा उद्यापासून कार्यान्वित होणार आहे. यावेळी पालकमंत्री अतुल सावे यांनी महसूल मंत्र्यांनी १२ वर्षानंतर या स्पर्धा पुन्हा सुरू केल्याबद्दल आभार व्यक्त केले. पालकमंत्री म्हणून इतक्या मोठ्या आयोजनात माझं दायित्व असल्याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.

बक्षीस वितरणाच्या या कार्यक्रमाला खासदार डॉ.अजित गोपछडे, आमदार बाबुराव कदम कोहळीकर, आ. तुषार राठोड, आ. राजेश पवार, विभागीय आयुक्त दिलिप गावडे, विशेष पोलीस महानिरीक्षक शाहाजी उमाप, छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी दिलिप स्वामी, धाराशिव जिल्हाधिकारी प्रकाश अहिरराव, जालनाचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली, सहाय्यक जिल्हाधिकारी अनुष्का शर्मा,अपर आयुक्त महसूल श्रीमती नयना बोंदार्डे, अपर आयुक्त प्रदीप कुळकर्णी, अपर आयुक्त कोकण नितीन महाजन, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये साकारला प्रतिकृती 'महाकुंभ मेळा..

                                 
प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : १४४ वर्षांनंतर तीर्थक्षेत्र प्रयागराज मधे ४५ दिवस महाकुंभ मेळा साकारला व शाही स्नान, मंगल स्नान आणि अमृत स्नानाने संपूर्ण भारत वर्ष पवित्र झाला. त्याच महाकुंभ मेळ्याची प्रतिकृती दिनांक २५ व २६ फेब्रुवारी रोजी 'जे एम एफ' शिक्षण संस्थेच्या प्रांगणात साकारली गेली. ब्रह्मा रंगतालया मध्ये गंगा, यमुना आणि गुप्त सरस्वती या त्रिवेणी संगम नद्या कृत्रिमरित्या निर्माण केल्या गेल्या. संस्थेचे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे यांनी स्वतः प्रयागराज कुंभमेळा येथे जाऊन त्रिवेणी संगमाचे जल तसेच सप्त नद्यांचे जल घेऊन आले, व या नद्यांच्या पाण्यानी त्रिवेणी संगम निर्माण केला. भगवान शंकराच्या जटा मधून गंगेचा प्रवाह सुरू ठेवला तर बाजूलाच (बर्फानी बाबा) बर्फाचे शिवलिंग तयार केले.
                                 
सकाळच्या सत्रामध्ये 'जन गण मन' इंग्रजी माध्यमिक शाळा तसेच 'वंदे मातरम्' पदवी महाविद्यालय चे सर्व विद्यार्थी, पालक वर्ग, शिक्षक आणि मान्यवरांनी हजेरी लावून महाकुंभ मेळाचा आनंद घेतला. सकाळी सूर्योदय होताच संस्थेचे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे , खजिनदार जान्हवी कोल्हे तसेच इतर पदाधिकारी, मान्यवर पाहुणे श्रीमती अल्का मुतालिक अध्यक्ष गणेश मंदिर संस्थान, श्री बालकृष्णजी पाटील महाराज व अनेक मान्यवर आणि सर्व विद्यार्थी शिक्षकांनी गंगेची आरती केली. तत्पूर्वी सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी भारतीय संस्कृतीप्रमाणे गंगा मातेची व यमुना मातेला साडी अर्पण करून ओटी भरली व नंतर आरती ला सुरुवात झाली. 
                                 
सर्व विद्यार्थी ऋषी मुनींच्या वेषात आले होते. तर काहीजण शंकराचा अवतार घेऊन आले होते त्यांच्यासाठी रथाची सोय केली होती. मंगलमय शोभायात्रा काढण्यात आली, त्यामधे लेझिम, ढोल ताशे वाजवत 'हर हर महादेव' च्या गजरात सर्वजण तल्लीन झाले होते. सर्व मुलांनी गंगा नदीमध्ये मंगल स्नान केले. विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणात 'आनंद मेळ्याचे' आयोजन केले होते, खाद्य पदार्थांची रेलचेल होती, त्याचा सर्वांनी आस्वाद घेतला.
गायत्री परिवार, हरिद्वार येथून गायत्री परिवाराचे गुरुजी, गुरु भगिनी आणि त्यांचे शिष्य यांनी प्रांगणात 'महा गायत्री यज्ञ' होम हवन केले. त्यानंतर मधुबन वातानुकुलीत दालनांत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यामध्ये शंकराचे भावगीत, शिव तांडव स्तोत्र, नृत्य, सती नाटिका, सागर मंथन नाटक अशा विविध प्रकारचे कार्यक्रम शालेय विद्यार्थी व पदवी महाविद्यालय चे विद्यार्थांनी सादर केले, तर शिशु विहार च्या मुलांनी साधू वेष धारण करून हातात डमरू घेऊन शंकराचे डमरू नृत्य सादर केले. इस्कॉन चे कृष्ण भक्त यांचे सुरेल संगीतमय कीर्तन झाले, ज्यामध्ये सर्व उपस्थित वर्ग तल्लीन होऊन भजन गाऊ लागले. मठ दर्शन घेऊन सर्वांनी महा प्रसादाचा लाभ घेतला.
                                                                                                  
दुपारच्या सत्रामध्ये दुपारी चार वाजता जन गण मन विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय मधील सर्व विद्यार्थी, पालक वर्ग, शिक्षक आणि इतर मान्यवरांनी महाकुंभ मेळ्याचा लाभ घेतला. संध्याकाळी सहा वाजता गंगेची महाआरती करण्यात आली व शोभायात्रा काढण्यात आली. रथांमध्ये बसून सर्व साधू, शंकर वेशात आलेल्या  मुलांची मिरवणूक काढण्यात आली. ब्रह्माकुमारीज राजयोग यांचा कार्यक्रम झाला तर आनंद बाजार मध्ये सर्व विद्यार्थी पालकांनी खाद्य पदार्थांचा आनंद लुटला. संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले त्यांनतर स्वामी अयप्पा महापूजेचे आयोजन करण्यात आले, उपस्थित सर्वांनी भक्ती भावने पूजा केली. व त्यानंतर महा प्रसादाचा भोग घेतला. दोन दिवशी साधारण तीन हजार लोकांनी प्रतिकृती महाकुंभ मेळा ला हजेरी लावून सर्व धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेतला.
                                 
दैवी शक्तीचा हात पाठीशी असल्याशिवाय अशा धार्मिक गोष्टी घडत नाहीत, कर्ता करविता साक्षात परमेश्वर आहे आणि आम्ही निमित्त मात्र आहोत, केवळ डोक्यात कल्पना आली की आपल्या डोंबिवली मध्ये, आपल्या शाळेतही कुंभ मेळा करावा आणि तत्परतेने त्या कल्पनेला कलाटणी मिळाली आणि परमेश्वराच्या आशीर्वादाने अकस्मात सर्व गोष्टी जुळून आल्या आणि त्या घडत गेल्या. व त्यातूनच ही मोठी महा कुंभ मेळा ची प्रतिकृती अवतरली असे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. इच्छा असून देखील  सर्वजण प्रयाग राजला जाऊ शकत नाही, आणि असा हा दुर्मिळ योगायोग सर्वच भाविकांना प्राप्त व्हावा अशी कल्पना आम्ही प्रयाग राजमधे त्रिवेणी संगमावर असतानाच मनामध्ये आली. आपण काही करू शकतो का हे विचार करत असतानाच साक्षात गंगा, यमुना, सरस्वती ने आमच्या मस्तकावर आशीर्वादाचा हात ठेवला असावा आणि डोंबिवलीत आल्यावर अचानक सर्व गोष्टी जुळून आल्या, हा विलक्षण योगायोग आहे, सर्व भाविकाना गंगेत स्नान करता यावे या हेतूने इथे प्रतिकृती महाकुंभ मेळा चे आयोजन केले, असे सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी सांगितले.
प्रतिकृती महा कुंभ मेळा उभारण्याचे श्रेय नरेश पिसाट, अवधूत देसाई, मोहीत व त्यांचे सहकारी यांचे आहे तर सर्व शिक्षकांनी देखील भक्ती भावाने सहकार्य केले. सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत हजारो भाविकांची आवक जावक होती. महाशिवरात्री दिवशी सकाळी पुन्हा गंगा आरती करून शंकराची मनोभावे पूजा अभिषेक करून महाकुंभ मेळा चे उत्तर पूजन केले. न भूतो न भविष्यती अशा या महाकुंभ मेळा मुळे सकारात्मक लहरी सर्वत्र पसरल्या व एक नवीन ऊर्जा घेऊन भाविक धन्य झाले व सर्वांनी संस्थेचे आभार मानून भरभरून आशीर्वाद दिले.

मूळनिवासी भूमिपुत्र हाच खरा विकासाचा केंद्रबिंदू..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

निळजे : भूमिपुत्रांच्या मौल्यवान जमिनीशिवाय विकास करणे अशक्य आहे. जेव्हा एखाद्या प्रकल्पामध्ये या भूमिपुत्राची जमीन बाधित होते तेव्हा त्याच्या शरीरातून कूणीतरी काळीज काढून घेतंय अशी अवस्था ह्या प्रकल्पबाधिताची होते.

सध्या वेगवेगळ्या प्रकल्पांच्या बांधणीपूर्वी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. शासनाच्या धोरणानुसार या प्रकल्पात बाधित होणाऱ्या जमिनीचा मोबदला समाधानकारक नसताना हा तुटपुंजा मोबदला स्वीकारण्याकरिता समस्या निर्माण झाली आहे ती म्हणजे “खाजगी दलालांची टक्केवारी”.

माझ्या भोळ्या भाबड्या शेतकरी भूमिपुत्राच्या अशिक्षित अज्ञानपणाचा फायदा घेऊन काही खाजगी दलाल मंडळी “अधिकारी, नेते-पुढारी यांना टक्केवारी दिल्याशिवाय शेतकऱ्याला मोबदल्याची रक्कम मिळणार नाही” असे सांगून प्रकल्पग्रस्ताची फसवणूक करण्याचा प्रयत्न होत असल्याचे काही प्रकल्पग्रस्तांकडून माहिती मिळाली आहे. हे नक्की खरं आहे का..?? असल्यास प्रकल्पग्रस्तांसाठी ही अत्यंत चिंतेची बाब आहे.

“एक खिडकी योजना राबवावी..”

माझी स्थानिक लोकप्रतिनिधींना विनंती आहे की, अशाप्रकारे शेतकरी भूमिपुत्राची आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणून प्रकल्पग्रस्ताला मोबदल्याची रक्कम मिळवण्याकरिता लागणारे कागदपत्र व इतर माहिती सक्षम प्राधिकारी कार्यालयात “एक खिडकी योजने” अंतर्गत देण्यात यावी व अशी आर्थिक फसवणूक करणाऱ्या खाजगी दलालांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत असे स्थानिक भूमिपुत्र गजानन पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.

जेएमएफ' शिक्षण संस्थेत दिनांक २५ व २६ रोजी साकारली जाणार महा कुंभमेळ्याची प्रतिकृती..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली :  भक्तांना आणि 'जेएमएफ' शिक्षण संस्थेच्या हितचिंतकांना, तसेच सर्वांना महाकुंभमेळ्याच्या प्रतिकृतीच्या ऐतिहासिक सोहळ्याचा भाग होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ.राजकुमार कोल्हे हार्दिक निमंत्रण देत आहेत.

पृथ्वीवरील आपल्या जीवनात आपण जीवनाच्या अनेक टप्प्यांतून जातो. आपण आपले तान्ही शरीर सोडतो, मूल होतो आणि नंतर प्रौढ होतो आणि नंतर वृद्धत्वात जातो. मग आपण हे भौतिक शरीर सोडून आध्यात्मिक स्तरावर जाऊ. त्यामुळे आम्ही वाढणे कधीच थांबवत नाही आणि विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांतून जातो. तर, जीवन म्हणजे वाढणे, नूतनीकरण करणे, शिकणे आणि निवडी आणि निर्णय घेणे.

आपले शरीर हे आपल्या आत्म्याला या पृथ्वीवर वाहून नेण्याचे एक वाहन आहे जे अनंतकाळ टिकते, म्हणून आपण त्याच्या विकासासाठी कार्य केले पाहिजे. प्रयागराज, (यूपी) येथे गंगा, यमुना आणि गुप्त सरस्वती या पवित्र नद्यांच्या काठी श्री महाकुंभमेळा हा आपल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीच्या, आपला प्रिय देश भारत  यांच्या आध्यात्मिक आणि धार्मिक पाळण्याचा उत्तम साक्षीदार आहे.

सध्याचा महाकुंभमेळा हा १४४ वर्षांच्या प्रदीर्घ काळातील अमृत आहे आणि आता आपल्या प्रिय महर्षी, संत, साधू, तपस्वी आणि या सुंदर ग्रह पृथ्वीवरील सर्व दिव्य आत्म्यांच्या प्रयत्नांचे परिणाम सापडले आहेत. १३ जानेवारी २०२५ ते २६ फेब्रुवारी २०२५ चा शुभ दिवस महाशिवरात्री पर्यंत ४४ दिवस हा महाकुंभ मेळा प्रयागराज येथे साजरा केला जात आहे. या जीवनकाळात, आपल्यापैकी बहुतेक जण प्रयागराज येथे वैयक्तिकरित्या दिव्यत्वाच्या अशा सार्वभौमिक मेगा दैवी उत्सवाचा एक भाग बनण्याचे स्वप्न पाहतात. 'जेएमएफ' शिक्षण संस्थेत २५ फेब्रुवारी २०२५ रोजी एकादशी आणि २६ फेब्रुवारी २०२५ रोजी महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी *महाकुंभ मेळा* आयोजित करण्यात येत असून या 'जेएमएफ' मेगा महाकुंभमेळ्याच्या प्रतिकृती मध्ये पवित्र नद्यांच्या गंगा, यमुना आणि गुप्त सरस्वती आणि संगम घाट यांचे प्रतीकात्मक प्रवाह असतील. यात ब्रह्माकुमारीज, भारत मंडपम, प्रभू सुदामादास हरे राम हरे कृष्ण, इस्कॉन, गायत्री परिवार, (महाकुंडी यज्ञ) श्री शबरी अय्यप्पा स्वामी भजन मंडली संस्था, जेएमएफचे जन गण मन विद्यालय आणि  ज्युनियर कॉलेज (सीबीएसई आणि स्टेट बोर्ड), वंदे मातरम डिग्री कॉलेज आणि इतर अनेक संस्थांचा समावेश असेल, ज्यात आध्यात्मिक, सामाजिक,  सांस्कृतिक कार्यक्रम असतील.

स्थळ - 'जाह्नवीज मल्टी फाउंडेशन' संचालित जन गण मन कनिष्ठ महाविद्यालय आणि वंदे मातरम पदवी महाविद्यालय, जे एम एफ मंडपम, ब्रह्मा रंगतालय मैदान, मधुबन बँक्वेट हॉल, डॉ. नेमाडे रोड जुनी डोंबिवली (पश्चिम).
महा कुंभमेळ्याची प्रतिकृती 
दिनांक २५/०२/२५ सकाळी ६ ते दुपारी १ वाजेपर्यंत व दुपारी ४ ते ९ वाजेपर्यंत 
आणि
दिनांक २६/०२/२५ महाशिवरात्री. सकाळी ७ ते दुपारी १ वाजे पर्यंत. 

प्रती महाकुंभमेळा दिनांक २५ फेब्रुवारी २०२५

व्यवस्थापन - जनगणमन इंग्लिश सेकंडरी स्कूल वंदे मातरम डिग्री कॉलेज

कार्यसूची
* शोभायात्रा, अमृत स्नान व महा गंगा आरती :-  सकाळी ६.३० ते ८  
* आनंद बाजार :-  सकाळी ८ ते ८.३० 
* गायत्री  यज्ञ :- सकाळी ८.३० ते  १० 
* सांस्कृतिक कार्यक्रम :-  सकाळी १०.१५ ते ११.१५ 
* संगीतमय किर्तन :- सकाळी ११.३० ते १२.३०
* मठ दर्शन व महाप्रसाद :- दुपारी १२.३० ते १.३० 

दिनांक २५ फेब्रुवारी २०२५

व्यवस्थापन - जनगणमन विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेज 

कार्यसूची 
* शोभायात्रा व अमृत स्नान संध्याकाळी ४ ते ५ 
* ब्रह्माकुमारीज राजयोग संध्याकाळी ५ ते ५.३०
* आनंद बाजार, मठ दर्शन :- संध्याकाळी ५.३० ते ६
* सांस्कृतिक कार्यक्रम व गंगा आरती :- संध्याकाळी ६ ते ७
* स्वामी अय्याप्पा महापूजा :- संध्याकाळी ७ ते ८.३० 
* मठ दर्शन व महाप्रसाद रात्री ८.३० ते ९  

प्रती महाकुंभमेळा दिनांक २६ फेब्रुवारी २०२५
   
व्यवस्थापन - जनगणमन इंग्लिश सेकंडरी स्कूल, वंदे मातरम डिग्री कॉलेज, जनगणमन विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय

कार्यसूची
* शोभायात्रा,अमृत स्नान व महा गंगा आरती :- सकाळी  ७ ते ८  
* शिवरात्री  महापूजा :-  सकाळी ८ ते १०.३०
* ब्रह्माकुमारीज प्रर्दशनी व मूल्य खेल :- सकाळी ११ ते १२
* मठ दर्शन व प्रसाद :- दुपारी १२ ते १

दैवी सेवेवर तत्पर -
डॉ. राजकुमार मा. कोल्हे (संस्थापक/अध्यक्ष) 
डॉ.प्रेरणा राजकुमार कोल्हे (सचिव)
जान्हवी कोल्हे
(खजिनदार) 
जे एम एफ व्यवस्थापन आणि जे एम एफ कुटुंब

डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारतींमधील रहिवाशांना विस्थापित होऊ देणार नसल्याचे खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांचे आश्वासन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : मुंबई उच्च न्यायालयाने तोडण्याचे आदेश दिलेल्या डोंबिवलीतील ६५ महारेरा प्रकरणातील रहिवाशांच्या पाठीशी राज्य सरकार, शासन आहे. या इमारतींमधील रहिवाशांच्या पाठीशी सरकार म्हणून आम्ही आहोत. या इमारतींमधील एकाही रहिवाशाला आम्ही विस्थापित होऊ देणार नाही. समिती स्थापन करून, काही धोरणात्मक निर्णय घेऊन या रहिवाशांच्या निवासाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकार म्हणून आम्ही प्रयत्न करू, असे आश्वासन कल्याण लोकसभेचे शिवसेना खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीतील ६५ महारेरा प्रकरणातील बेकायदा इमारतींमधील सुमारे ६०० रहिवाशांना गुरुवारी मुंबईत दिले.

उच्च न्यायालयाने डोंबिवलीतील ६५ महारेरा प्रकरणातील बेकायदा इमारती तोडण्याचे आदेश दिले आहेत. कल्याण डोंबिवली पालिकेने या बेकायदा इमारती तोडण्याची कार्यवाही सुरू केली आहे. या पार्श्वभूूमीवर ६५ बेकायदा इमारतींमधील सुमारे २८०० कुटुंबांना बेघर होण्याची वेळ आली आहे. आमचा काही दोष नसताना या बेकायदा इमारतींची उभारणी करणाऱ्या विकासकांमुळे आम्ही अडचणीत आलो आहोत, अशी भूमिका घेत या इमारतींमधील रहिवाशांनी पालिकेच्या इमारत तोडकामाच्या भूमिकेला विरोध केला आहे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, माजी नगरसेवक रवी पाटील, नितीन पाटील, महेश पाटील, सागर जेधे, गोरक्षनाथ म्हात्रे, संजय निकते आणि इतरांच्या नेतृत्वाखाली सुमारे ६०० रहिवाशांनी मुंबई मुक्तागिरी या शासकीय बंगल्यावर जाऊन रहिवाशांंनी खासदार डाॅक्टर शिंदे यांची भेट घेतली.

खासदार डाॅक्टर शिंदे यांनी रहिवाशांना मार्गदर्शन करताना सांंगितले, ६५ इमारतीप्रकरणी न्यायालयाचे आदेश आहेत. त्यामुळे या प्रकरणात कोणताही थेट हस्तक्षेप करता येणार नाही. या इमारतींमधील एकही रहिवासी विस्थापित होणार नाही यादृष्टीने मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील आहेत. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात रहिवाशांची बाजू मांडण्यासाठी वकिलांची एक फळी तयार केली जात आहे.

बनावट कागदपत्रांच्या आधारे रहिवाशांची फसवणूक करणाऱ्या विकासकांवर कारवाई करण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले जातील. कायद्याच्या चौकटीत, धोरणात्मक निर्णय घेऊन ६५ इमारतींमधील रहिवाशांना शहरी गरीबांसाठी घरे, म्हाडा अन्य काही निवास योजनांमध्ये घरे देता येतील का यादृष्टीनेही प्रयत्न केले जातील. बाधित एकाही रहिवाशावर अन्याय होऊ दिला जाणार नाही, असे आश्वासन डाॅक्टर खासदार शिंदे यांनी रहिवासी आणि त्यांच्या शिष्टमंडळाला दिले.

विकासकांनी दाखविलेल्या बांधकामांच्या कागदपत्रांच्या आधारे रहिवाशांंनी डोंबिवलीत ६५ बेकायदा इमारतीत घरे घेतली. त्यावर कर्ज घेतली आहेत. ती कागदपत्रे खोटी आहेत हे रहिवाशांंना माहिती नव्हते. दोष नसताना विकासकांनी केलेल्या फसवणुकीचा फटका रहिवाशांना बसला आहे. परंतु, बाधित एकही रहिवाशी विस्थापित होणार नाही. शासन, सरकार पूर्णपणे या रहिवाशांच्या बाजुने आहे. या रहिवाशांंची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडण्यासाठी, धोरणात्मक निर्णय घेऊन रहिवाशांना अधिक संरक्षित कसे करता येईल यादृष्टीने प्रयत्न केले जातील. – डाॅक्टर श्रीकांत शिंदे, खासदार.

शहरातील ११ केव्ही विज केंद्रात तांत्रिक बिघाड झाल्याने लागलेल्या आगीत ट्रान्स्फॉर्मर जळून खाक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

गंगाखेड : उपजिल्हा रूग्णालय कर्मचाऱ्यांचे निवासस्थान आहे. त्याच्या समोरील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या ११ केव्ही विज वितरण केंद्रातील विजेचा ट्रान्स्फॉर्मर तांत्रिक बिघाडाने लागलेल्या आगीत पूर्णतः जळून खाक झाला. अग्निशमन दलाची गाडीला ट्रान्स्फॉर्मर जवळ जाण्यासाठी मोकळा रस्ता असल्याने सदरील आग आटोक्यात आणण्यात यश आले. अन्यथा परीसरात वाऱ्याच्या वेगाने आग सर्वत्र पसरत होती. सुदैवाने मोठी हानी टळली. ही घटना दि.१० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत ट्रान्स्फॉर्मरचे प्राथमिक अंदाजानुसार एक कोटीचे रूपयाचे नुकसान झाले.
      
गंगाखेड शहरात विज वितरण करणाऱ्या ११ केव्ही केंद्रात सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ट्रान्स्फॉर्मर मधुन धुर येत होता. या धुराचे आगीत रूपांतर झाल्याने आगीचे लोळ मोठ्या प्रमाणावर उडत होते. उडणाऱ्या या आगीच्या लोळामुळे परिसरातील दुकाने व घरांना आगीचा धोका निर्माण झाला. येथिल महावितरण केंद्रातील कर्मचाऱ्यांनी नगरपालीकेच्या अग्निशमन दलास बोलावुन घेतले. अग्निशमन दलास येण्यास एक तास लागला. अग्निशमन दलाचे वाहन जळत असलेल्या ट्रान्स्फॉर्मर जवळ जाण्यासाठी मोकळा रस्ता असल्याने अग्निशमन दल थेट ट्रान्स्फॉर्मर जवळ गेले. अग्निशमन दलाने पाण्यानी आग आटोक्यात येत नसल्याने पाण्यात ए.एस.के.ए.या केमिकलचे डबे मिसळून आग आटोक्यात आणली. दोन तासाच्या अथक परीश्रमाने आग आटोक्यात आणल्याने परीसरातील संभाव्य दुर्घटनेचे संकट टळले. या आगीत ट्रान्स्फॉर्मर, केबल वायर, इन्सुलेटर, व इतर साहित्य जळून  खाक होऊन जवळपास अंदाजे एक कोटीची नुकसान झाले.
    
ट्रान्स्फॉर्मरमधुन धुर येत असताना ट्रान्स्फॉर्मर बंद केले नाही. तसेच ११ केव्ही विज केद्रापासुन नगरपालीकेचे अग्निशमन दल केवळ हाकेच्या अंतराऐवढे असताना अग्निशमन दलास बोलावण्यात उशिर का झाला. सदरील घटनाच संशयाच्या भोवऱ्यात फिरत असल्याने अनेक तर्क वितर्क नागरीक काढत आहेत.

३९५ व्या शिवजयंती दिनी शिव गर्जनेत घुमला 'जे एम एफ' शिक्षण संस्थेचा प्रांगण..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली: अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत, रयतेचा राजा आणि महाराष्ट्राच्या कडा कपारीतून घुमणारा आवाज म्हणजे 'छत्रपती शिवाजी महाराज' यांची दिनांक १९ फेब्रुवारी रोजी जयंती. 'जे एम एफ' शिक्षण संस्था संचलित वंदे मातरम् पदवी महाविद्यालय, जन गण मन इंग्लिश सेकंडरी शाळा आणि विद्यामंदिर यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात यंदा ३९५ वी शिवजयंती साजरी केली गेली. एखादे वादळ घोंगावत असताना त्या वादळामधून येणारा आवाज हा सर्वत्र ठिकाणी घुमतो तसंच जणू 'जय भवानी, जय शिवाजी' चा ध्वनी ने संपूर्ण 'जे एम एफ' संस्था आणि संस्थे बाहेरचा परिसर गजबजून गेला. एक महिना पूर्व तयारी करत असलेले महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी हिंदुत्वाच्या ओतप्रोत भावनेने आज शिवजयंती साजरी केली. 
'जे एम एफ' शिक्षण संस्थेचे संस्थापक माननीय डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नाडर सर, शाळेच्या उप-मुख्याध्यापिका तेजावती कोटीयन तसेच सर्व शिक्षक , कर्मचारी, पालक यांनी हजेरी लावून कार्यक्रमाचा आनंद लुटला. पालखी मध्ये शिवाजी महाराज यांचा पुतळा ठेऊन ढोल ताशे, लेझिम वाजवत भव्य दिव्य  शिवाजी महाराजांच्या पालखी ची मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण शाळा व परिसर फुलांनी सजवला होता. शिवकालीन संस्कृती जपत सर्व विद्यार्थिनींनी अंगावर नऊवारी चा साज चढविला होता तर सर्व विद्यार्थी भगव्या वेशात हातात हिंदुत्वाचा  भगवा झेंडा फडकवत गर्जनेत नृत्य करत होते. प्रवेश दाराजवळ पालखीचे आगमन होताच संस्थेचे संस्थापक माननीय डॉ. राजकुमार कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे औक्षण केले तर सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे व संगीत शिक्षिका सौ. श्रेया कुलकर्णी यांनी पालखी वीरांचे चरण प्रक्षाळून त्याचे स्वागत केले. 
प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुलभ गायकवाड तसेच माजी नगरसेवक महेश पाटील व इतर मान्यवर यांची उपस्थिती प्रार्थनीय होती. शाल,श्रीफळ व प्रेमाचे प्रतीक म्हणून भेटवस्तू देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले व त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. शालेय विद्यार्थ्यांनी बाळ शिवाजीचा पाळणा म्हणत नृत्य सादर केले तर मुलांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा आणि शिवगीत सादर केले. इयत्ता तिसरी मधील यश खामकर ह्या विद्यार्थ्याने मावळा होऊन गायन व नृत्य सादर केले, त्याच बरोबर इतर विद्यार्थ्यांनी शिव गर्जना करून शिवाजी अफझलखान ह्यांची नाटिका सादर केली. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देखील बहारदार नृत्य सादर करून शिवरायांना मानवंदना दिली. 
ज्या प्रमाणे काशी-विश्वेश्वर हे भगवान शंकराच्या त्रिशूळावर टिकून उभे आहेत त्याच प्रमाणे आपला हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीच्या टोकावर भक्कमपणे उभा आहे, भारदस्तपणे विराजीत आहे, प्रत्येकाच्या नसानसात भिनलेल्या शिवाजी महाराजाचे नाव म्हणजे अभिमानाने आणि गर्वाने फुगणारी छाती आहे, असे उद्गार काढून डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सर्वांना शिव जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. इयत्ता चौथी मधील अर्णव डोंगरे या विद्यार्थ्याने स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्कृष्ट चित्र रेखाटले होते, खजिनदार जान्हवी कोल्हे यांनी त्याचे कौतुक करून प्रशस्ती पत्रक व बक्षीस दिले. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे कौतुक करून आज आपल्याल्या बाल शिवबा ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे एकाच वेळी दर्शन घडले यासारखा मणी कांचन योग नाही असेही जान्हवी कोल्हे यांनी वक्तव्य केले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन श्री.एकनाथ चौधरी यांनी केले व पुनश्च शिव गर्जना करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.