BREAKING NEWS
latest

मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी हजारो समर्थकांसह मुंबईत दाखल..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई :  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे आंतरवाली सराटी चे नेते मनोज जरांगे पाटील दि. २९ रोजी मुंबईत दाखल झाले असून, आझाद मैदानावर त्यांनी निर्णायक आंदोलनाची सुरुवात केली आहे. हजारो समर्थकांच्या उपस्थितीत हे आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू झाले असून, सरकारवर दबाव वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. मुंबई पोलीसांनी सांगितले की, “मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांना त्यांच्या निषेधासाठी आणखी एक दिवसाची मुदत देण्यात आली आहे. ते उद्या आणखी एक दिवस आझाद मैदानावर त्यांचे निषेध सुरू ठेवू शकतात.”

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आधी केवळ एका दिवसासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण मिळेपर्यंत मुंबई सोडणार नाही अशी भूमिका घेतली होती. त्याचबरोबर जरांगे पाटलांनी आंदोलनासाठी वाढीव मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता जरांगे पाटलांच्या आंदोलनाला एका दिवसाची मुदत वाढ देण्यात आली आहे. या काळात सरकारचे काही प्रतिनिधी जरांगे पाटलांची भेट घेणार असल्याचेही बोलले जात आहे.

मनोज जरांगे यांनी स्पष्टपणे सांगितले की, “२६ ऑगस्टपर्यंत सरकारने आमच्या मागण्या मान्य करायला हव्या होत्या. आता वेळ संपली आहे. जर सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही, तर आम्ही सरकार उलथवून टाकण्याची ताकद दाखवू.” त्यांच्या या इशाऱ्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. राज्य सरकारने यापूर्वी मराठा-कुणबी नोंदींचा अभ्यास सुरू केला होता. सुमारे ५८ लाख जुन्या नोंदी तपासल्या गेल्या असून, त्यातून काही समाज घटकांना आरक्षणाचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, जरांगे यांच्या मते, ही प्रक्रिया अत्यंत संथ असून, मराठा समाजाची फसवणूक केली जात आहे.
मराठा आंदोलकांना अन्न पाणी मिळू नये म्हणून खाऊ गल्ली बंद केल्या, तसेच स्वच्छतागृहेही मिळू नयेत अशी व्यवस्था केली असा आरोप मनोज जरांगे यांनी केला. हे सरकार म्हणजे इंग्रजांपेक्षा बेकार आहे, मराठ्यांच्या मुलांना वाईट वागणूक मिळत आहे असंही ते म्हणाले. मराठ्यांची मुलं माज आणि मस्ती घेऊन आले नाहीत तर मोठ्या वेदना घेऊन मुंबईत आले आहेत, त्याची सरकारने जाण ठेवावी असं आवाहनही मनोज जरांगे यांनी केलं.

मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू केलं असून त्यांना आणखी एक दिवसाची परवानगी दिली आहे. त्यानंतर मनोज जरागेंनी सरकारला आरक्षण देण्याचं आवाहन केलं. या सरकारने जर मराठ्यांना आरक्षण दिलं तर मराठ्याची पोरं आयुष्यभर विसरणार नाहीत असं मनोज जरांगे म्हणाले.

गणेश भक्ताकडून लालबागच्या राजाला अमेरिकन डॉलर्सचा हार अर्पण..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई : भाद्रपद गणेशोत्सवाला सुरुवात झाल्याने गणेश भक्तांच्या उत्साहाला उधाण आले आहे. मुंबईतील प्रसिद्ध गणपती लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी प्रचंड गर्दी केली. राजाला अर्पण करण्यात येणाऱ्या वस्तू या नेहमीच एक उत्सुकतेचा विषय ठरतो. या वर्षी चर्चा आहे ती अमेरिकन डॉलरच्या हाराची. गणेशाला देश-विदेशातून आलेल्या भक्तांनी नवसापोटी मोठ्या प्रमाणावर दान अर्पण केले. पहिल्याच दिवशी ४६ लाख रुपयांची रोकड जमा झाली असून दानपेटीत कोट्यावधीचे सोने-चांदी व परदेशी चलन मोठ्या प्रमाणात मिळाले आहे. त्यात विशेष म्हणजे भाविकाकडून आलेला अमेरिकन डॉलर्सचा हार.

बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचारी दानपेट्यांतील नोटांची मोजणी करत असून त्यात ₹ १०, ५०, १०० आणि ५०० रुपयांच्या नोटांसह परदेशी नोटाही आढळल्या. लालबागच्या राजाला भाविकांकडून मिळालेल्या दानामध्ये दोन लाख रुपये किमतीचा सोन्याचा मोदक, सोन्याची पावपले, हार, मुकुट, अंगठ्या, नाणी, सोन्याचे गणपती तसेच एक किलो वजनाची चांदीची वीट, चांदीचे मोदक, गणपती, मुकुटं, हार, पाळणे, समया आणि फुलघरे यांचा समावेश आहे. याशिवाय कोट्यवधी रुपयांची रोकड आणि अगदी क्रिकेट बॅटसुद्धा दानपेटीत मिळाली आहे असे मंडळाचे खजिनदार मंगेश दळवी यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

मतदान प्रक्रियेतील ११ कागदपत्रांमध्ये आधार कार्डचाही समावेश होणार असल्याचा सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिल्ली : आधार कार्डसंदर्भात सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. राहुल गांधी यांनी बिहारमधील मतदार यादीवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असतानाच सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय आला आहे. सुप्रीम कोर्टाने वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या निवडणुकीपूर्वी मतदार यादीतून वगळल्याबद्दल आव्हान देणारे बिहारचे मतदार निवासस्थानाचा पुरावा म्हणून आधार सादर करू शकतात, असं स्पष्ट केलं आहे. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला सरकारने जारी केलेले ओळखपत्र इतर ११ कागदपत्रांच्या यादीत जोडण्याचे निर्देश दिले. मतदार यादीच्या 'विशेष सघन पुनरावृत्ती'ला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की, पुनर्समावेशासाठी अर्ज त्या ११ पैकी एका किंवा आधारसह सादर केले जाऊ शकतात.

न्यायालयाने बिहारमधील राजकीय पक्षांसाठी काही कठोर टिप्पण्यादेखील केल्या आहेत. अनेकांनी पारंपारिकपणे मतदान करणाऱ्यांना 'मताधिकारापासून वंचित' ठेवण्यासाठी केलेल्या सुधारणांना विरोध केला आहे, त्यांनी ६५ लाखांहून अधिक वगळलेल्या मतदारांना मदत का केली नाही? अशी विचारणा सुप्रीम कोर्टाने केली आहे. "राजकीय पक्ष त्यांचे काम करत नाहीत," अशी कठोर टिप्पणी न्यायालयाने केली. आक्षेप वैयक्तिक राजकारण्यांनी, म्हणजेच खासदार आणि आमदारांनी नोंदवला नसू पक्षांनी नोंदवला असल्याचं यावेळी कोर्टाने म्हटलं. "तुमचे बीएलए (बूथ-स्तरीय एजंट) काय करत आहेत ? राजकीय पक्षांनी मतदारांना मदत करावी," अशी सूचनाही कोर्टाने केली.

बिहार एसआयआर (SIR) प्रकरणी निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं की, एसआयआर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून गोंधळ घालणाऱ्या राजकीय पक्षांनी आतापर्यंत आयोगाच्या टीमसमोर एकही आक्षेप नोंदवलेला नाही. तर राजकीय पक्षांकडे १.६१ लाख बूथ लेव्हल एजंट आहेत. एक बीएलए एका दिवसात १० पर्यंत आक्षेप किंवा सूचना पडताळून पाहू शकतो आणि सादर करू शकतो. त्याला कोणतीही अडचण किंवा वेळेची कमतरता नाही. तर १ ऑगस्टनंतर २.६३ लाख नवीन मतदारांनी मतदार यादीत नोंदणीसाठी अर्ज दाखल केले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने कडक टिप्पणी करत म्हटले की, राजकीय पक्षांची निष्क्रियता आश्चर्यकारक आहे. न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला की बीएलए (बूथ लेव्हल एजंट) नियुक्त केल्यानंतर ते काय करत आहेत आणि लोक आणि स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांमध्ये इतके अंतर का आहे. न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले की, राजकीय पक्षांनी मतदारांना मदत करण्यासाठी पुढे यावे.

निवडणूक आयोगाचे वकील राकेश द्विवेदी यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर अनेक महत्त्वाचे युक्तिवाद सादर केले. गेल्या सुनावणीत न्यायालयाने निवडणूक आयोगाला ६५ लाख लोकांची यादी जाहीर करण्यास सांगितलं होते ज्यांची नावे मसुदा मतदार यादीत समाविष्ट केलेली नाहीत. आयोगाला त्यांची नावे मसुदा यादीत समाविष्ट न करण्याचे कारणही यादीत नमूद करावे लागले. निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल केले आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांचे पालन करण्यात आले आहे आणि मसुदा मतदार यादीत समाविष्ट नसलेल्या सुमारे ६५ लाख लोकांची बूथनिहाय यादी वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आली आहे.

दोन हजार किलोमीटरचा प्रवास करत खडकपाडा पोलीसांनी विशाखापट्टनम जंगलातून अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या १३ जणांना केली अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे - कल्याणच्या खडकपाडा पोलीसांनी दोन हजार किलोमीटरचा प्रवास करत अंमली पदार्थाच रॅकेट चालवणाऱ्या तस्करांचा भांडाफोड केला. विशाखापट्टनमच्या जंगलात सुरू असलेल्या अंमली पदार्थ विक्रीच्या रॅकेटचा भांडाफोड करण्यात यश मिळवल्याची माहिती ठाणे जिल्ह्याचे अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. विशेष म्हणजे या जिगरबाज कारवाईत एकूण १३ तस्करांना अटक झाली आहे. त्यांच्याकडून वॉकी टॉकी, पाच विविध वाहने आणि लाखोंचा अंमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आंबिवली गावातून एका ड्रग पेडलरला दहा ग्रॅम गांजासह अटक केली होती. त्याच्याकडे चौकशी केली असत कल्याण, पुणे आणि कोल्हापूर असा तपास करत पोलीस पथक थेट विशाखापट्टनमच्या जंगलात स्थानिक पोलीसांच्या मदतीनं पोहोचले. त्यावेळी हे तस्कर जंगलात मोबाईलचे नेटवर्क नसल्याने वॉकी टॉकीचा उपयोग करीत असल्याची माहिती समोर आली आहे.

लाखोंचा अंमली पदार्थाचा साठा जप्त

आरोपींवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीसांनी आतापर्यंत या अंमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यात १३ आरोपींना अटक केली आहे. बाबर उस्मान शेख (वय: २७ वर्षे), गुफरान शेख (वय: २९ वर्षे), सुनील राठोड (वय: २५ वर्षे), आझाद अब्दुल शेख (वय: ५५ वर्षे), रेश्मा अल्लाउद्दीन शेख (वय: ४४ वर्षे), शुभम उर्फ सोन्या भंडारी (वय: २६ वर्षे), सोनू हबीब सय्यद (वय: २४ वर्षे), आसिफ शेख (वय: २५ वर्षे), प्रथमेश नलावडे (वय: २३ वर्षे), रितेश पांडुरंग गायकवाड (वय:२१ वर्षे) ,अंबादास नवनाथ खामकर (वय: २५ वर्षे), आकाश बाळू भिताडे (वय: २८ वर्षे) आणि योगेश दत्तात्रय जोध (वय: ३४ वर्षे) अशी आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अटकेतील बहुतांश आरोपींवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.

७० लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

अटक तस्करांकडून पोलीस पथकानं ११५ किलो ग्रॅम अंमली पदार्थ जप्त केल्याची माहिती ठाणे जिल्हा पोलीस अप्पर आयुक्त संजय जाधव यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे. त्याची बाजारात किंमत सुमारे २८ लाख ७५ हजार रुपये आहे. यासह एक पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, वॉकी टॉकीचे दोन संच, दोन मोटार कार, एक ऑटोरिक्षा, एक बुलेट आणि दुचाकी आणि काही रोख रक्कम असा एकूण ७० लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या पोलीसांनी सदर कारवाईत घेतला सहभाग - अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव आणि पोलीस उपायुक्त परिमंडळ -३ अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, गुन्हे पथकाचे मारुती आंधळे, पोलीस निरीक्षक संभाजी नाईक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, संदीप भालेराव, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र ठोके, पोलीस हवालदार सदाशिव देवरे, राजू लोखंडे, संदीप भोईर, योगेश बुधकर, निसार पिंजारी, पोलीस शिपाई सुरज खंडागळे, अनिल खरसान, राहुल शिंदे, अमित शिंदे, खुशाल नेरकर, कांतीलाल वारघडे, अनंत देसले आणि सुरेश खंडाळे या पोलीस पथकाने ही कामगिरी यशस्वीरित्या केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली आहे.

अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवून नवजात अर्भकास कचऱ्यात टाकणाऱ्या आरोपीला अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : कल्याण पश्चिम येथील खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बारावे भागात एक स्त्री जातीचे अर्भक बेवारस टाकले गेले होते. अत्यंत हृदयद्रावक व माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक अशी घटना उघडकीस आली आहे. गुन्ह्यातील एका १९ वर्षीय युवकाला खडकपाडा पोलीसांनी अटक केली असून १७ ऑगस्ट २०२५ रोजी गुन्हा नोंदवण्यात आला असून गु.र.नं. ६७०/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ६४(२),(एम),९३,३(५), बाल न्याय (मुलाची काळजी व संरक्षण) कायदा २०१५ चे कलम ७५ आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम (POCSO) २०१२ अंतर्गत कलम ४,८,१२ अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याच्या तपासानुसार आरोपी रोहित प्रदीप पांडे (वय: १९ वर्षे) राहणार: बारावे, त्याने अल्पवयीन असल्याचे माहित असूनही पीडित मुलीसोबत मागील दोन वर्षापासून शारीरिक संबंध ठेवले, त्यात ती गर्भवती राहिली. सदर मुलीने नवजात मुलीला जन्म दिला. अर्भकाचा जन्मानंतर कोणताही पुरावा मागे न ठेवता, ते अर्भक रात्रभरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकून दिले, ज्यामुळे बाळाचा जीव धोक्यात आला. कल्याण, आंबिवली व शहाड परिसरात तांत्रिक विश्लेषण आणि प्रत्यक्ष तपासणीद्वारे पीडित व आरोपीचा शोध घेण्यात आला. त्यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

पुढील तपासा दरम्यान आरोपी रोहित पांडे यांस १९ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त परिमंडळ-३ अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग कल्याणजी घेटे, तसेच खडकपाडा पोलीस ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे, निरीक्षक (गुन्हे) मारुती आंधळे, पोलीस निरीक्षक विजय गायकवाड, सतीश पाटील, उपनिरीक्षक भूषण देवरे, व तपास पथकाच्या इतर अंमलदारांनी केला. ही घटना केवळ कायद्याचा भंग करणारी नसून सामाजिक दृष्टिकोनातूनही अत्यंत चिंताजनक आहे. संबंधित आरोपीवर कायद्यानुसार कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

संसदेचा स्फोटक निर्णय! Dream11, MPL, PokerBaazi ऑनलाईन गेम रातोरात होणार बंद ?

प्रतिनिधी: अवधुत सावंत

नवी दिल्ली : ऑनलाईन गेमिंगवर सरकारचा मोठा निर्णय! The Promotion and Regulation of Online Gaming Bill, 2025 गुरुवारी राज्यसभेत पारित झाला असून आता तो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या स्वाक्षरीसाठी गेला आहे. हा कायदा लागू झाल्यानंतर पैशांवर आधारित सर्व गेम्स म्हणजेच Real Money Games (RMGs) देशात पूर्णपणे बंद होणार आहेत.
- ७२ तासांत दोन्ही सभागृहांतून मंजुरी – विधेयकाला मंत्रिमंडळ, लोकसभा आणि राज्यसभेची झपाट्याने मंजुरी मिळाली.
- मोठ्या कंपन्यांना धक्का – Dream11, MPL, PokerBaazi सारख्या कंपन्यांचा प्रमुख महसूल रातोरात कोसळणार.
- सरकारचा ठाम पवित्रा – “ऑनलाइन पैशांच्या गेममुळे अनेक कुटुंबांचं नुकसान झालं आहे. समाजातल्या गैरप्रकारांवर लगाम घालणं हीच संसद व सरकारची जबाबदारी आहे,” असं आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत स्पष्ट केलं.
- विरोधकांचा गोंधळ – काही विरोधी खासदारांनी विधेयक बदलण्याचे प्रस्ताव मांडले, मात्र मुख्य भर हा “मत चोरीच्या आरोपांवर”च होता.- 

त्वरित अंमलबजावणी 
मंत्री वैष्णव यांनी सांगितलं की, हा कायदा त्वरित लागू केला जाणार असून त्यासाठी स्वतंत्र नियमावली किंवा दीर्घकालीन सल्लामसलत होणार नाही.
- उद्योगात खळबळ – उद्योग क्षेत्राने गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून सवलतीची मागणी केली आहे. मात्र सरकारने ई-स्पोर्ट्सला प्रोत्साहन देण्याची घोषणा केली आहे.

गेम खेळा, पण पैशांचा मोह केला तर थेट तुरुंगाची हवा खावी लागेल !

या निर्णयामुळे शेअर बाजारावरही परिणाम दिसून आला. PokerBaazi मध्ये गुंतवणूक केलेल्या Nazara Technologies च्या शेअर्समध्ये २% घसरण झाली असून Delta Corp Ltd. च्या शेअर्समध्ये ३.१४% घट नोंदली गेली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर केले ‘लाडकी सून’ अभियान..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
ठाणे, दि. १८ : ‘लाडकी बहीण’ योजनेच्या यशानंतर आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यांनी ठाणे शहरातून ‘लाडकी सून’ या राज्यव्यापी अभियानाची त्यांनी सुरुवात केली आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश घरगुती अत्याचार आणि अन्यायाला बळी पडणाऱ्या महिलांना तात्काळ मदत करणे हा आहे. या अभियानांतर्गत पीडित सुनांना मदत करण्यासाठी एक हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला आहे. ८८२८८६२२८८ या नंबरवर पीडित महिला थेट संपर्क साधून मदत मागू शकतात. त्यांनी दिलेली माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल. हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबवले जाणार असून, प्रत्येक शिवसेना (शिंदे गट) शाखेतून पीडित महिलांना मदत आणि मार्गदर्शन केले जाईल. एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “सासर काही वाईट नसते, पण काही ठिकाणी अप्रिय घटना घडत असतात. आपली मुलगी जशी लाडकी असते, त्याचप्रमाणे सूनही लाडकी असावी, यासाठी आम्ही हे अभियान सुरू केले आहे.”

हे अभियान विशेषतः सून आणि सासू यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी आणि प्रत्येक सुनेला घरात सन्मान मिळावा यासाठी सुरू करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या पुढाकाराने या अभियानाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. शिंदे यांनी एक्सवर (ट्विटर) माहिती दिली की, आपल्या घरात जशी आपली लेक लाडकी असते तशीच सूनही लाडकी असायला हवी. तिला योग्य वागणूक देऊन सन्मानाने वागवायला हवे, आणि जे असे करणार नाहीत त्यांना आता शिवसेना महिला आघाडी योग्य पद्धतीने धडा शिकवणार आहे. त्यासाठी ‘लाडक्या सुनेचे रक्षण हेच शिवसेनेचे वचन’ हे अभियान हाती घेणार आहे. महिला कुटुंबासाठी सर्व काही करतात, पण स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे आपली नियमित तपासणी करून घेण्यासाठी ठाणे मनपा आणि रोटरी क्लबच्या पुढाकाराने ‘उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियान’ सुरू करण्यात आले असून जास्तीत जास्त महिलांनी त्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील शिंदे यांनी केले