BREAKING NEWS
latest

नॅशनल गेम्सच्या खो-खो मध्ये महाराष्ट्राचाच डंका - बाळ तोरसकर

प्रतिनिधी: अवधूत सावंत

  ३७ वर्षापूर्वी म्हणजे १९८५ साली नवी दिल्ली येथे झालेल्या २६ व्या 'नॅशनल गेम्स' मध्ये पहिल्यांदा खो-खो चा समावेश करण्यात आला आणि आज आपण गोवा येथे ३७ व्या नॅशनल गेम्स खो-खो स्पर्धेला ४ ते ८ नोव्हेंबर या कलावधीत सुरवात करणार आहोत. आतापर्यंत नॅशनल गेम्स मध्ये खो-खो च्या ११ स्पर्धा पार पडल्या. त्यात महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांनी डंका वाजवला आहे. यात महाराष्ट्राच्या पुरुष संघाने ९ वेळा सुवर्ण तर २ वेळा रौप्य पदक मिळवत निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. तर महिला संघाने ५ वेळा सुवर्ण, ४ वेळा रौप्य, १ वेळा कांस्य तर एकदा ४ थ्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे.     

  १९२० च्या ऑलिम्पिकनंतर, दोराबजी टाटा यांनी ऑलिम्पिक खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील संस्था सुचवली आणि ऑलिम्पिकसाठी निवड समितीच्या बैठकीनंतर, अखिल भारतीय ऑलिम्पिक समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने त्यावेळेच्या हिंदुस्थानात असलेल्या लाहोर येथे १९२४ मध्ये पहिल्या राष्ट्रीय खेळांचे आयोजन केले होते. तेव्हा त्याला 'ऑल इंडिया ऑलिम्पिक गेम्स' असे म्हटले गेले ! तर आज गोवा येथे ३७ व्या नॅशनल गेम्सचे मोठ्या दिमाखात सुरवात झाली आहे.

१९३६ च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये इतर पारंपारिक भारतीय खेळांसोबत खो-खो चे प्रात्यक्षिक करण्यात आले होते. लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या पुण्याच्या डेक्कन जिमखान्याने खो-खो ला आधुनिक स्वरूप देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्यानंतर १९८७ मध्ये कोलकाता येथे झालेल्या दक्षिण आशियाई फेडरेशन (एसएएफ) गेम्समध्ये खो-खो चा प्रात्यक्षिक खेळ म्हणून समावेश करण्यात आला होता. या गेम्स दरम्यानच आशियाई खो-खो फेडरेशनची स्थापना करण्यात आली होती. नंतर पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका येथे खो-खो खेळ लोकप्रिय करण्यात खो-खो महासंघाला यश आले. २०१६ च्या दक्षिण आशियाई खेळामध्ये खो-खो चा अधिकृत खेळ म्हणून समावेश करण्यात आला आहे. आज जवळजवळ २४-२५ देशांमध्ये खो-खो खेळ पोहचला आहे. कधीकाळी आपल्या देशावर ज्यांनी राज्य केले त्या साहेबाच्या म्हणजे इंग्रंजांच्या देशात म्हणजे ऋषी सुनक यांच्या इंग्लंड मध्ये सुध्दा खो-खो खेळला जात आहे.

  १९८५ साली नवी दिल्ली येथे झालेल्या २६ व्या 'नॅशनल गेम्स' मध्ये पहिल्यांदा खो-खो चा समावेश करण्यात आला. त्यानंतर झालेल्या प्रत्येक स्पर्धेत महाराष्ट्राने आपली छाप पाडली आहे. तत्पूर्वी भारतीय ऑलिम्पिक समितीने खो-खो ला अधिकृतपणे संलग्नता दिल्याने १९८५ च्या नॅशनल गेम्समध्ये खो-खो ला अधिकृतपणे खेळता आले. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी सुवर्ण पदकाला गवसणी घालत महाराष्ट्राची मान उंचावली.
   त्यानंतर केरळ येथे झालेल्या १९८७ च्या स्पर्धेत पुरुषांनी सुवर्ण तर महिलांनी रौप्य पदकाची कमाई केली. तर खो-खो चा समावेश झाल्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रात झालेल्या १९९४ च्या मुंबई पुणे येथे पार पडलेल्या स्पर्धेत पुरुष व महिला संघांनी सुवर्ण पदकाला गवसणी घातली. त्यानंतर १९९७ साली झालेल्या बेंगलोर मैसूर स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे पुरुषांनी सुवर्ण पदक मिळवले मात्र महाराष्ट्राचा महिला संघ ४ थ्या स्थानी फेकला गेला. १९९९ (इंफाळ) व २००१ येथे झालेल्या स्पर्धेत पुरुष व महिला संघांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते.
  २००२ साली आंध्र प्रदेश येथे झालेल्या स्पर्धत महाराष्ट्राच्या पुरुषांनी सुवर्ण तर महिलांनी कांस्य पदक मिळवले होते. २००७ साली गुवाहाटी येथे झालेल्या स्पर्धत महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांनी जोरदार पुनरागमन करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. २०११ साली झारखंड येथे झालेल्या स्पर्धेत पुरुषांनी अपेक्षेप्रमाणे सुवर्ण तर महिलांनी रौप्य पदक मिळवले.   

महाराष्ट्राला दुहेरी सुवर्ण पदकाच्या हॅटट्रिकची संधी

केरळ येथे झालेल्या २०१५ सालच्या स्पर्धेत व त्यानंतर झालेल्या २०२२ च्या गुजरात स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांनी सुवर्ण पदक काबीज करत पुन्हा एकदा खो-खो खेळा मध्ये निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. आता गोवा येथे सहभागी होणारे महाराष्ट्राचे दोन्ही संघ तगडे असून सुवर्ण पदक मिळवण्याच्या शर्यतीत असून ते महाराष्ट्राला दुहेरी सुवर्ण पदकासह हॅटट्रिक मिळवून देतील हीच अपेक्षा.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत