BREAKING NEWS
latest
महाराष्ट्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
महाराष्ट्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बेतवडे गावकऱ्यांचा 'मॅरेथॉन नेक्सवर्ल्ड' च्या विरोधात आंदोलनाचा इशारा..

विशेष प्रतिनिधी

दिवा - बेतवडे गावातील ५० टक्के कुटुंबांची 'मॅरेथॉन नेक्सवर्ल्ड' च्या मयुर शाह या विकासकाने फसवणूक केल्यामु‌ळे ग्रामस्थ संतंप्त झाले आहेत. त्याच्या शेतीच्या जमिनी कवडीमोलाने घेऊन तेथे टोलेजंग इमारत बांधूनही बेतवडे ग्रामस्थांचा मोबदला, फ्लॅट विकासकाने ठरलेली तारिख ओलांडूनही अजून दिलेली नाही. त्यामुळे आज बेतवडे ग्रामस्थ यांनी त्यासंबंधित माहिती पत्रकारांना देऊन विकासकाला आंदोलनाचा इशारा दिला आहे.
बेतवडे हे दिवा शहरातील पूर्वेकडील एक गाव आहे. तेथे काही एकर उपजाऊ जमीन 'मॅरेथॉन नेक्सवर्ल्ड' च्या मयुर शाह या विकासकाने शेतकरी आणि ग्रामस्थ यांच्या कडून कवडीमोलाने घेतली. त्या सर्व स्थानिकांबरोबर सागर गाला व सौरभ शाह यांनी व्यवहार केले. तेव्हा हे दोघे 'मॅरेथॉन रियल्टी प्रायव्हेट लिमिटेड. मध्ये कार्यरत होते. या व्यक्ती वारंवार बिल्डर तर्फे हामी व आश्वासन देतो पण त्याची कोणत्याही प्रकारे अंमलबजावणी अजूनही झालेली नाही.    
तर बेतवडेच्या ग्रामस्थांनी 'मॅरेथॉन नेक्सवर्ल्ड' चे मयुर शाह याने (बेतवडे) येथे बांधकामांच्या संदर्भात फसवणुक केल्याचा आरोप केला आहे. व्यक्तीने / कंपनीने ग्रामस्थांना (फसवणूकीचे तपशील - जसे की खोटी माहीती देणे, पैसे ठरवून व्यवहार पूर्ण न करणे, बनावट कागदपत्रे वापरणे, फ्लॅट न देणे वा त्याचे भाडे न देणे इ.) केल्याने त्या सर्वांना आर्थिक व मानसिक त्रास झालेला आहे. अशी माहिती पत्रकारांना देऊन ते रितसर पोलीस, पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना त्याबाबत निवेदना द्वारे दिली आहे. तसेच या विषयात पंधरा दिवसात कोणताही मार्ग न निघाल्यास ग्रामस्थ आणि शेतकरी आंदोलन करतील असा इशारा ही त्यावेळी दिला.

दिव्यातील ओमकार नगर नाले परिसरात नवजात मुलगी आढळल्याने खळबळ..

विशेष प्रतिनिधी

दिवा, दि.२५ डिसेंबर : दिवा येथील ओमकार नगर परिसरातील नाल्यात आज सकाळी एक नवजात मुलगी टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. नाल्याजवळून जाणाऱ्या नागरिकांना जोरजोरात रडण्याचा आवाज ऐकू आल्याने त्यांनी त्या दिशेने धाव घेतली असता नाल्यात एक नवजात अर्भक असल्याचे दिसून आले.

ही बाब लक्षात येताच परिसरातील एका तरुणाने प्रसंगावधान दाखवत थेट नाल्यात उतरून त्या चिमुकलीला बाहेर काढले. नागरिकांच्या मदतीने तात्काळ बाळाला उपचारासाठी कळवा येथील शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने सदर नवजात मुलीची प्रकृती सध्या स्थिर असून डॉक्टरांकडून आवश्यक उपचार सुरू आहेत.

या अमानुष कृत्यामुळे परिसरात संताप व्यक्त होत असून नवजात बाळाला नाल्यात टाकणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

'इसरो' ने प्रक्षेपित केला सर्वांत वजनदार उपग्रह..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
श्रीहरीकोटा, दि. २४ : इसरो ने आज हेवी-लिफ्ट लाँच व्हेईकल मार्क-३ (LVM3-M6) प्रक्षेपित केला. सकाळी ८ वाजून ५५ मिनिटांनी आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरून इसरोने अमेरिकेच्या ६ हजार १०० किलो वजनाच्या 'ब्लूबर्ड ब्लॉक -२' या उपग्रहाचे पृथ्वीच्या निम्न कक्षेत (लोअर अर्थ ऑर्बिट) यशस्वी प्रक्षेपण केले. भारतीय भूमीत भारतीय प्रक्षेपकाने प्रक्षेपित केलेला हा सर्वात वजनदार उपग्रह आहे. ५२ दिवसांच्या कालावधीत हे पहिलेच सलग LVM3 प्रक्षेपण मोहिमा देखील आहेत. हा जगातील सर्वात मोठा व्यावसायिक सॅटेलाईट आहे, जो अंतराळातून थेट सामान्य स्मार्टफोनला हाय-स्पीड ब्रॉडबँड देईल. LVM3 ची ही सहावी ऑपरेशनल मिशन आहे आणि आजपर्यंतची सर्वात जड पेलोड आहे.

भारताच्या हेवी-लिफ्ट रॉकेट LVM3 ने आज सकाळी अमेरिकेच्या कम्युनिकेशन सॅटेलाईट – ब्लूबर्ड ब्लॉक-२ ला पृथ्वीच्या खालच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रक्षेपित केले. ६१०० किलो वजनासह, हे रॉकेटने उचललेले सर्वात वजनदार पेलोड होते ज्याने त्याचे सहावे ऑपरेशनल फ्लाईट आणि तिसरे समर्पित व्यावसायिक मिशन पूर्ण केले. इसरोचे अध्यक्ष व्ही. नारायणन म्हणाले की LVM3 रॉकेटने नियोजित ५२० किमी कक्षेच्या तुलनेत ५१८.५ किमीची कक्षा गाठली. इसरोने सर्वात जड उपग्रह ब्लूबर्ड ब्लॉक-२ ला LVM3 रॉकेटवर प्रक्षेपित केले

इसरोची व्यावसायिक शाखा 'न्यू स्पेस इंडिया लिमिटेड'ने अमेरिकन कंपनी 'एएसटी स्पेस मोबाइल' सोबत करार केला होता. प्रक्षेपणानंतर १५ मिनिटांनंतर हा उपग्रह रॉकेटपासून वेगळा केला जाईल आणि हा उपग्रह पृथ्वीच्या खालच्या कक्षेत सुमारे ६०० किलोमीटर अंतरावर स्थापित केला जाईल.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आजपासून कार्यान्वित..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

नवी मुंबई दि.२५ :  नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आजपासून अधिकृतपणे कार्यान्वित होणार आहे. या उद्घाटनामुळे, नवी मुंबई देशासाठी आणि विकसित जगासाठी एक प्रमुख प्रवेशद्वार म्हणून उदयास येणार आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि असंख्य आव्हानांवर मात करून, हे महत्त्वाकांक्षी स्वप्न अखेरीस सत्यात उतरले आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे स्पष्ट केलं आहे.

सुरुवातीच्या टप्प्यात, हे विमानतळ दररोज ३० विमानांची ये-जा (उड्डाणे आणि लँडिंग) हाताळेल, ज्यामुळे प्रवासी सेवांची औपचारिक सुरुवात होईल. अधिकृत सूत्रांनुसार, पहिल्याच दिवशी गोवा, कोची, दिल्ली आणि हैदराबाद यांसारख्या प्रमुख शहरांसाठी विमानसेवा सुरू होतील.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला २००७ मध्ये नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (DGCA) मंजुरी मिळाली होती. तेव्हापासून, या प्रकल्पाने पर्यावरणीय परवानग्या, भूसंपादनाचे प्रश्न, पुनर्वसनाची आव्हाने, कायदेशीर अडथळे आणि तांत्रिक गुंतागुंत यांवर मात केली आहे. एका प्रदीर्घ आणि आव्हानात्मक प्रक्रियेनंतर, या विमानतळाचे पूर्ण होणे हे केवळ नवी मुंबईसाठीच नव्हे, तर संपूर्ण राज्यासाठी एक ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे असं सिंघल यावेळी म्हणाले.

नऊ कोटी प्रवाशांना वार्षिक हाताळण्याची क्षमता असलेल्या या नवीन विमानतळामुळे मुंबईतील प्रचंड गर्दीच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार लक्षणीयरीत्या कमी होण्याची अपेक्षा आहे. मुंबई महानगर प्रदेशात आता दोन आंतरराष्ट्रीय विमानतळे असतील, ज्यामुळे हवाई प्रवास अधिक कार्यक्षम, सुलभ आणि भविष्यासाठी सज्ज होईल.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कामकाजाच्या सुरुवातीमुळे उद्योग, माहिती तंत्रज्ञान, लॉजिस्टिक्स, पर्यटन आणि सेवा क्षेत्रालाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. विमानतळाच्या आसपास एक मोठ्या प्रमाणावर ‘एरो सिटी’ची योजना आखण्यात आली आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि नवी मुंबईच्या आर्थिक परिस्थितीत परिवर्तन घडेल.

एकंदरीत, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन हे केवळ हवाई सेवांची सुरुवात नसून, विकासाच्या एका नवीन अध्यायाची सुरुवात आहे. आजपासून विमानांची उड्डाणे सुरू झाल्यामुळे, नवी मुंबईला राष्ट्रीय नकाशावर अधिक महत्त्व प्राप्त होईल आणि हे विमानतळ भारताच्या विकसित राष्ट्र बनण्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरेल असा विश्वास विजय सिंघल यांनी यावेळी व्यक्त केला.

३९ व्या किशोर-किशोरी (सब ज्युनिअर) राज्य अजिंक्यपद खो-खोचा रणसंग्राम मुंबईत स्पर्धेची गटवारी जाहीर..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
 
मुंबई : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने तसेच मुंबई खो-खो असोसिएशन व श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादर यांच्या संयुक्त विद्यमाने ३९ वी किशोर व किशोरी (सब ज्युनिअर - १४ वर्षाखालील) राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा २५ ते २८ डिसेंबर २०२५ या कालावधीत मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ, सहकारनगर, वडाळा, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. या बहुप्रतीक्षित राज्यस्तरीय स्पर्धेसाठीची गटवारी जाहीर करण्यात आली असून संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण २४ किशोर व किशोरी संघ सहभाग नोंदवणार आहेत.
जेतेपदासाठी रंगणारी चुरस
किशोर गटात गतविजेते धाराशिव तर किशोरी गटात गतविजेते सोलापूर जेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. मात्र सर्वच गटांत प्रचंड तगडे प्रतिस्पर्धी असल्याने यंदाची स्पर्धा अत्यंत चुरशीची व उत्कंठावर्धक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रत्येक सामन्यात वेग, चपळता आणि डावपेचांचा सुरेख मिलाफ पाहायला मिळणार आहे.

उद्घाटन सोहळ्याची तयारी
या राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन गुरुवार, दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वा.  मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ (भारतीय क्रीडा मंदिर), सहकारनगर, वडाळा, मुंबई येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. उद्घाटनप्रसंगी शिवकुमार लाड (विश्वस्त, श्री समर्थ व्या. मंदिर), 'पेडणेकर ज्वेलर्स'चे आनंद पेडणेकर, प्रा. डॉ. जी. के. ढोकरट (प्राचार्य – बीपीसीए, शारीरिक शिक्षण महाविद्यालय), महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस डॉ. चंद्रजित जाधव, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार ऍड. गोविंद शर्मा, श्री समर्थ व्या. मंदिर व मुंबई मुंबई खो-खो संघटनेचे अध्यक्ष ऍड. अरुण देशमुख, प्रमुख कार्यवाह सुरेंद्र विश्वकर्मा यांच्यासह महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे व मुंबई मुंबई खो-खो संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.  

राष्ट्रीय पातळीचे स्वप्न
या किशोर-किशोरी राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेतून आगामी किशोर व किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूसाठी ही स्पर्धा स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्याची आणि राष्ट्रीय स्तरावर झेप घेण्याची सुवर्णसंधी ठरणार आहे.

किशोर गट – गटवारी
'अ' गट – धाराशिव, बीड, जालना; 'ब' गट – ठाणे, पालघर, जळगाव; 'क' गट – पुणे, रायगड, लातूर; 'ड' गट – सातारा, मुंबई उपनगर, हिंगोली; 'इ' गट – सांगली, नंदुरबार, सिंधुदुर्ग; 'फ' गट – नाशिक, रत्नागिरी, धुळे; 'ग' गट – सोलापूर, मुंबई, परभणी; 'ह' गट – छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नांदेड.

किशोरी गट – गटवारी
'अ' गट – सोलापूर, रायगड, नंदुरबार; 'ब' गट – धाराशिव, अहिल्यानगर, सिंधुदुर्ग; 'क' गट – सांगली, छत्रपती संभाजीनगर, लातूर; 'ड' गट – पुणे, पालघर, जळगाव; 'इ' गट – ठाणे, धुळे, परभणी; 'फ' गट – सातारा, मुंबई, हिंगोली; 'ग' गट – नाशिक, मुंबई उपनगर, बीड; 'ह' गट – रत्नागिरी, जालना, नांदेड

ही स्पर्धा म्हणजे महाराष्ट्रातील उदयोन्मुख खो-खो खेळाडूंसाठी कौशल्य, आत्मविश्वास आणि भविष्यातील यशाचा भक्कम पाया ठरणार असून मुंबईतील क्रीडाप्रेमींना चार दिवस अविस्मरणीय खेळाचा आनंद देणार आहे.

कल्याण-डोंबिवलीत निवडणुकीचे वारे; प्रशासन आणि राजकीय पक्ष सज्ज..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण - महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, त्यामध्ये कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचाही समावेश आहे. या संदर्भात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाने अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने दिनांक २५ डिसेंबर २०२४ रोजी दिलेल्या आदेशानुसार सन २०२५-२६ या कालावधीतील महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आवश्यक तयारी सुरू करण्यात आली आहे.

​उमेदवारांसाठी महत्त्वाचे नियम

खर्च मर्यादा निश्चित 💰: ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ही मर्यादा राज्य निवडणूक आयोग व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी ठरवलेल्या नियमांनुसार लागू राहणार आहे.

​खर्च नोंदवही अनिवार्य 📖: निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला त्यांच्या निवडणूक खर्चाची तपशीलवार नोंद ठेवणे बंधनकारक असून, सदर खर्चाची नोंद नियमितपणे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या खर्च निरीक्षकांकडे सादर करावी लागणार आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित उमेदवारावर कारवाई होण्याची शक्यता असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रशासन सज्ज 🏛️: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततामय व नियमबद्ध पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना सुरू केल्या आहेत. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर उमेदवारांनी व राजकीय पक्षांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
​या निवडणुकांमुळे शहराच्या राजकीय वातावरणाला पुन्हा एकदा चैतन्य येणार असून, नागरिकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे.

शिवसेना दिवा शहर प्रभाग २८ मधील प्रचाराचा जल्लोषात शुभारंभ तथा शक्तीप्रदर्शन..

विशेष प्रतिनिधी

दिवा : शिवसेना दिवा शहर प्रभाग क्रमांक २८ मधील प्रचाराचा शुभारंभ आज शिवसेना शहरप्रमुख तथा माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी सपत्नीक गणेशाची आरती करून व नारळ फोडून केला. यावेळी ‘जयजय महाराष्ट्र माझा’ या गीताच्या गजरात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

यानंतर गणेश नगर येथील गणेश मंदिरापासून दातिवली येथील मध्यवर्ती शाखेपर्यंत भव्य रॅली काढण्यात आली. प्रचाराच्या नारळ फोडण्याच्या कार्यक्रमास पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. जमलेल्या उत्स्फूर्त गर्दीमुळे प्रभाग क्रमांक २८ मधील सर्व नगरसेवक निवडूनच आल्याचा आत्मविश्वास कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत होता.
तर शिवसेना शहर प्रमुख रमाकांत मढवी यांनी उत्स्फुर्त असे कार्यकर्त्यांना संबोधित भाषण केले. त्यात त्यांनी म्हटले की “गेल्या आठ वर्षांत दिव्यात विकासकामे जी झालेली आहेत, त्याच जोरावर आगामी निवडणुकीत शिवसेनेचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील," असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच उमेदवार कोण हे न पाहता 'धनुष्यबाण' हीच आपली निशाणी आणि एकनाथ शिंदे हेच आपले नेतृत्व आहे, हे विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचवा," असे आवाहन मढवी यांनी कार्यकर्त्यांना केले. तर शेवटी मढवी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना प्रत्येक नागरिकाच्या 'घरोघरी जाऊन संवाद साधण्याचे' आणि गेल्या पाच वर्षांतील दिव्यातील कामांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यास सांगितले. प्रचाराच्या या भव्य शुभारंभामुळे प्रभाग २८ मध्ये शिवसेनेच्या प्रचाराला चांगलीच धार मिळाल्याचे चित्र दिसून आले.

या वेळी शिवसेना शहरप्रमुख तथा माजी उपमहापौर रमाकांत मढवी, उपशहरप्रमुख गणेश मुंडे, ऍड. आदेश भगत, माजी नगरसेवक दीपक जाधव, माजी नगरसेविका दर्शना म्हात्रे, सुनीता मुंडे, विभागप्रमुख अरुण म्हात्रे, केशव म्हात्रे, सचिन चौबे, चरणदास म्हात्रे, जगदीश भंडारी, राजेश पाटील, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, महिला आघाडी, युवासेना, युवतीसेना साक्षी मढवी तसेच अंगीकृत संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वंचित मुलींसाठी 'रोशन सफर'तर्फे शिक्षण सहाय्य कार्यक्रमाचे आयोजन..

विशेष प्रतिनिधी

कल्याण : भारतातील वंचित मुलींच्या शिक्षणाला पाठिंबा देण्यावर लक्ष केंद्रित करणारी एक 'ना-नफा' या तत्त्वावर चालणारी संस्था 'रोशन सफर'तर्फे सोमवार, दिनांक २२ डिसेंबर रोजी कल्याणमधील एका शाळेत विशेष सेवाभावी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आर्थिकदृष्ट्या वंचित समुदायातील मुलींना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी जागरूकता करणे आणि निधी उभारणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. लक्ष्यित शैक्षणिक पाठबळ आणि सामुदायिक सहभागाद्वारे, 'रोशन सफर' शालेय शिक्षणातील सर्वांगी अडथळे दूर करण्यासाठी आणि तरुण मुलींना दीर्घकालीन सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कार्य करते.

या उपक्रमाचे आयोजन शालेय वातावरणात करणे हे शिक्षणाप्रती असलेली त्याची खोलवर बांधिलकी दर्शवते आणि समर्थकांना अशा वातावरणाशी थेट जोडले जाण्याची संधी देते, ज्यांना अधिक बळकट करण्याचा हा उपक्रम प्रयत्न करत आहे. हा कार्यक्रम शिक्षणाच्या उपलब्धतेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना येणाऱ्या आव्हानांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करतो. 'रोशन सफर'च्या शैक्षणिक सक्षमीकरणाच्या व्यापक ध्येयाला पुढे नेण्यात हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. या उपक्रमाद्वारे उभारण्यात आलेला निधी वंचित मुलींच्या शिक्षणासाठी वापरला जाईल, ज्यामध्ये शाळेची शुल्क, शिक्षण साहित्य आणि सातत्यपूर्ण उपस्थिती आणि शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक संसाधने यांचा समावेश असेल.

आर्थिक मदतीव्यतिरिक्त, हा उपक्रम तरुण मुलींना सक्षम बनवण्यात, त्यांच्या कुटुंबीयांना बळकटी देण्यात आणि दीर्घकालीन सामुदायिक विकासाला चालना देण्यात शिक्षणाचे परिवर्तनकारी परिणाम अधोरेखित करण्याचा प्रयत्न करतो. 'रोशन सफर'ला मिळालेला नवा वेग त्याच्या नेतृत्वाच्या प्रयत्नांशी निगडित आहे. या कार्यक्रमाचा पाया रचणाऱ्या आपल्या दिवंगत आजोबांच्या निधनानंतर, झोया खान यांनी त्यांचा हा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी स्वीकारली.

झोया खान यांनी संस्थेचे कामकाज आणि आर्थिक बाबी समजून घेण्यात स्वतःला झोकून दिले, निधी संकलनाचे प्रयत्न अधिक बळकट केले आणि दीर्घकालीन शाश्वतता सुनिश्चित केली. चॅरिटीची (धर्मादाय संस्थेची) डिजिटल उपस्थिती म्हणजेच आधुनिक तंत्रज्ञान आणि ऑनलाईन माध्यमांचा वापर करून, देणगीदारांपर्यंत पोहोच विस्तारून आणि परिणाम व प्रगतीबद्दल नियमित संवाद साधून, त्यांनी भारतातील मुलींच्या शिक्षणाला पाठिंबा देण्यासाठी यूएसडी २०,००० (वीस हजार अमेरिकन डॉलर)हून अधिकचा निधी यशस्वीरित्या उभा केला आहे.

या कार्यक्रमात विद्यार्थी, समर्थक आणि समुदाय सदस्यांना गुंतवून ठेवण्याच्या उद्देशाने विचारपूर्वक आखलेल्या किंवा निवडलेल्या अनेक उपक्रमांचा समावेश असेल. यामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद, शिक्षणाचे मूल्य अधोरेखित करणारे शैक्षणिक सत्र, विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचे प्रदर्शन करणारे सांस्कृतिक कार्यक्रम आणि शिक्षण साहित्याचे वितरण यांचा समावेश आहे. एकत्रितपणे, हे उपक्रम एक अर्थपूर्ण अनुभव तयार करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत, जे 'रोशन सफर'चे ध्येय प्रतिबिंबित करतात आणि त्याच्या प्रभावाची प्रचिती देतात.

हा उपक्रम शैक्षणिक समतेच्या समान दृष्टिकोनातून वचनबद्ध व्यक्ती आणि सहयोगकर्त्यांच्या गटाद्वारे समर्थित आहे. झोया खान आणि तिचे कुटुंबीय 'रोशन सफार'च्या प्रयत्नांना मार्गदर्शन आणि पाठिंबा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी शाळा आणि समुदायाशी जवळून काम करणारे जुनैद शेख स्थानिक पातळीवर या कार्यक्रमांबाबत समन्वय साधत आहेत. या कार्यक्रमात अमेरिकेतील जगप्रसिद्ध तबलावादक जिम सँटी ओवेन एक अनोखा सांस्कृतिक पैलू जोडत आहेत, ज्यांची उपस्थिती 'रोशन सफर'च्या ध्येयामागील जागतिक पाठिंबा आणि ऐक्य दर्शवते. 

'रोशन सफर'च्या सह-संस्थापक, यूएसमधून मुख्य निधी उभारणाऱ्या, आणि सोशल मीडिया संचालक झोया खान यांनी उपक्रमाच्या उद्देशावर भाष्य करताना सांगितले, की जेव्हा मी माझ्या दिवंगत आजोबांकडून 'रोशन सफर'ची अमेरिकन शाखा हाती घेतली, तेव्हा मला सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या समुदायातील मुलींना मोठे स्वप्न पाहण्यास मदत करण्याची आणि ती स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांना संसाधनांनी सुसज्ज करण्याची संधी दिसली. शिक्षणात जीवनमान बदलण्याची ताकद आहे आणि या उपक्रमाद्वारे आम्हाला कायमस्वरूपी बदलाचे मार्ग तयार करण्याची आशा आहे. 'रोशन सफर' संस्था आशा, लवचिकता आणि संधीचे प्रतीक म्हणून उभी आहे, जी वंचित मुलींसाठी शिक्षणाला पुढे नेण्याच्या सखोल वचनबद्धतेने प्रेरित आहे. कल्याण येथील शाळेतील कार्यक्रमासारख्या उपक्रमांद्वारे, संस्था आपला उद्देश कृतीत उतरवते, जिथे सर्वात जास्त गरज आहे तिथे संधी निर्माण करते, आत्मविश्वास वाढवते आणि क्षमतांचे संगोपन करते. 'रोशन सफर' व्यक्ती, संस्था आणि समुदायांना त्यांच्या मिशनला (मोहीम) पाठिंबा देण्यासाठी आणि प्रत्येक मुलीला शिकण्याची, वाढण्याची आणि नेतृत्व करण्याची संधी मिळावी, या सामूहिक प्रयत्नाचा भाग बनण्यासाठी आमंत्रित करते.

'ग्लोबल इंग्लिश स्कूल'तर्फे पहिल्या वार्षिक कार्निव्हल मेळ्याचे भव्य आयोजन..

विशेष प्रतिनिधी

दिवा – ग्लोबल इंग्लिश स्कूल, दिवा (पूर्व) यांनी २० व २१ डिसेंबर रोजी रुणवाल ग्राउंड येथे शाळेचा पहिला वार्षिक कार्निव्हल मेळा मोठ्या उत्साहात साजरा केला. सदर कार्यक्रम हा दोन दिवस आयोजित करण्यात आलेला होता. सदर कार्यक्रमास पहिल्या दिवशी मुंब्रा पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे व दुसऱ्या दिवशी नितीन पगार पोलीस निरीक्षक मुंब्रा पोलीस स्टेशन व राजू पाचोरकर पोलीस निरीक्षक व इतर मान्यवर उपस्थित होते. 

सन्मानीय अतिथी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली व त्याचे उपस्थितिने कार्यक्रमाची शोभा वाढवली. विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक सादरीकरणांनी कार्यक्रमात रंग भरला. या मेळ्यात नृत्यप्रस्तुती, लाईव्ह गायन, जादूचे प्रयोग, मिमिक्री तसेच टॅलेंट हंट अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्यांचे प्रभावी सादरीकरण केले. याशिवाय विज्ञान प्रदर्शन, मनोरंजक खेळ, विविध राईड्स आणि शिक्षक-विद्यार्थ्यांनी आयोजित केलेला खाद्यपदार्थ विभाग हेही विशेष आकर्षण ठरले. पालक, विद्यार्थी व शिक्षक यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शाळेचा पहिला कार्निव्हल मेळा यशस्वी व अविस्मरणीय ठरला.

महाराष्ट्रातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजप पुन्हा नंबर १चा पक्ष..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विकासाभिमुख राजकारण व  भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे संघटन कौशल्य आणि अचूक निवडणूक नियोजन यांच्या जोरावर भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रात प्रथमच नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक निकालात अभूतपूर्व असे यश मिळवले आहे. महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांच्या मुखातून देवेंद्र आणि रविंद्र या जोडगोळीचा नेहेमी होणार आदरार्थी उल्लेख हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांनी सार्थ ठरवला. यंदाच्या निवडणुकीत प्रचारगीतातून गाजलेले "तुमची आमची भाजपा सर्वांची" हे बोल महाराष्ट्रातील जनतेने खरे करून दाखवले, हे या निकालावरून सिद्ध झाल्याचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

रविंद्र चव्हाण यांनी सहा महिन्यांपूर्वी प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा हाती घेतल्यानंतर अतिशय शिस्तबद्धपणे आणि संयम व आक्रमकपणाच्या अनोख्या शैलीतून महाराष्ट्र पिंजून काढला. यादरम्यान अनेक दिग्गज नेते त्यांनी भाजपात आणले. कोकणात वर्चस्व असलेल्या रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाचा खरंतर या निवडणुकांच्या निमित्ताने कस लागला, त्यात रविंद्र चव्हाण पैकीच्या पैकी गुणांनी उत्तीर्ण झाल्याचे स्पष्ट झाले. राज्यात अनेक ठिकाणी शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याशी भाजपाची लढत होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या चातुर्यामुळे आणि रविंद्र चव्हाण यांच्या संघटन कौशल्यामुळे अनेक ठिकाणी लढत जिंकली. 

मात्र त्याचवेळी राज्यात सत्तास्थानाला किंवा महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचं गणित देवेंद्र फडणवीस आणि रविंद्र चव्हाण यांनी एकत्रितपणे अचूक सोडवले. याबरोबरच उद्धव सेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीला भाजपने त्यांची जागाही दाखवली असे दिसते. श्रीकांत शिंदे यांच्याशी असलेले रविंद्र चव्हाण यांचे प्रेम व तिरस्कार असे दुहेरी संबंध गेल्या काही दिवसांतील भाजपा पक्ष प्रवेशामुळे अधिक गहिरे होतील का?, अशी शक्यता निकालांमुळे झाली आहे. जानेवारीत होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या बाबतीतही देवेंद्र-रविंद्र यांची किमया चालेल अशीच शक्यता अधिक असल्याने मात्र महायुतीतील सहकारी पक्ष आता कशी व्यूहरचना करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

'करवी इंटरनॅशनल स्कूल'मध्ये तिसरा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न..

विशेष प्रतिनिधी

दिवा :  'करवी इंटरनॅशनल स्कूल'मध्ये तीन दिवसीय वार्षिक क्रीडा महोत्सव अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या क्रीडा महोत्सवात प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी व सीनियर केजीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाने सहभाग नोंदवला.
या महोत्सवात विद्यार्थ्यांच्या मोटर स्किल्सच्या विकासावर विशेष भर देण्यात आला होता. शाळेच्या पटांगणात विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण व वयोगटाला अनुरूप खेळ आयोजित करण्यात आले होते. सॅक रेस, लेमन अँड स्पून रेस, बॉल इन द बास्केट, कप टॉवर, फ्रॉग जंप, बलून बॅलन्स तसेच कॉन्सेंट्रेशन ऍण्ड कॉ-ऑर्डिनेशन यांसारख्या खेळांमध्ये चिमुकल्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या क्रीडा महोत्सवाचे आयोजन शाळेच्या प्राचार्या कविता खंडेराव यांच्या नेतृत्वाखाली व शाळेचे संस्थापक रविंद्र वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद, उत्साह आणि आत्मविश्वास यामुळे संपूर्ण कार्यक्रम अधिकच रंगतदार झाला.
या यशस्वी क्रीडा महोत्सवासाठी शाळेतील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व सहकाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. विद्यार्थ्यांनी दाखवलेला उत्साह व खेळांतील धमालमुळे हा क्रीडा महोत्सव सर्वांसाठी संस्मरणीय ठरला.

दिवा शहरातील तलाव स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; भाजप दिवा मंडळाची तातडीच्या कारवाईची मागणी..

विशेष प्रतिनिधी

दिवा : दिवा शहरातील स्टेशन परिसरात असलेल्या तलावाची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली असून, तलावामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा, प्लास्टिक, सांडपाणी साचल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली  असून आरोग्याचा प्रश्न उद्भवला आहे. या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधत भारतीय जनता पार्टी, दिवा शहर मंडळाचे अध्यक्ष सचिन रमेश भोईर यांनी दिवा प्रभाग समिती व महापालिका प्रशासनाला निवेदन दिले आहे.

या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तलावाच्या अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला असून मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. याचा फटका परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत असून, प्रशासनाने याकडे तात्काळ गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.
भाजप दिवा मंडळाच्या वतीने तलावाची तातडीने स्वच्छता करून कचरा काढून टाकावा, तसेच भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी नियमित देखभाल व स्वच्छतेची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. या गंभीर विषयाकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे, अन्यथा नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आणखी गंभीर होऊ शकतो, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

प्रवाशांच्या खिशावर भार देत तिकिटांचे दर वाढवत नवीन वर्षाआधी रेल्वेचा मोठा धक्का..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

नवी दिल्ली:  नाताळचा सण आणि नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर भारतीय रेल्वेने लाखो प्रवाशांना मोठा आर्थिक झटका दिला आहे. रेल्वेने तिकिटांच्या दरात वाढ जाहीर केली असून, याचा थेट परिणाम सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशावर होणार आहे. रविवार, २६ डिसेंबर २०२५ रोजी रेल्वेकडून नवीन भाडे यादी जाहीर केली जाणार असून, या भाडेवाढीतून रेल्वेला सुमारे ₹६०० कोटींचे अतिरिक्त उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.

२१५ किमीपेक्षा जास्त प्रवासासाठीच भाडेवाढ

सामान्य श्रेणी (जनरल क्लास): २१५ किमीपेक्षा जास्त प्रवासासाठी प्रति किलोमीटर ₹१ मेल/एक्सप्रेस, नॉन-एसी आणि एसी श्रेणी: प्रति किलोमीटर ₹२ वाढ २१५ किमीपेक्षा कमी अंतराच्या प्रवासासाठी भाड्यात कोणताही बदल नाही.

५०० किमी प्रवासावर किती भार ?

नॉन-एसी श्रेणीमध्ये ५०० किलोमीटरच्या प्रवासासाठी प्रवाशांना तब्बल ₹१० जास्त मोजावे लागणार आहेत.

दिलासा कोणाला ? 

निम्न व मध्यम वर्गीय प्रवाशांसाठी दिलासादायक बाब म्हणजे ,उपनगरीय लोकल मासिक हंगामी तिकिटे (पास) या तिकिटांच्या दरांमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.

नाताळ–नवीन वर्षासाठी खुशखबर! २४४ विशेष रेल्वे फेऱ्या

प्रवाशांच्या गर्दीचा अंदाज घेत भारतीय रेल्वेने नाताळ आणि नवीन वर्षासाठी मोठा निर्णय घेतला आहे. देशातील सर्व आठ झोनमध्ये २४४ अतिरिक्त विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

कोणते मार्ग असणार विशेष ?

दिल्ली, हावडा, लखनौ आणि आसपासची शहरे
मुंबई–गोवा (कोकण) कॉरिडॉरवर विशेष दैनिक व साप्ताहिक गाड्या
मुंबई–नागपूर, पुणे–सांगनेर आणि महाराष्ट्रातील प्रमुख मार्गांवर अतिरिक्त सेवा
घराकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी आणि सुट्टीसाठी प्रवास करणाऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी ठरणार आहे.

तिकिटांच्या दरवाढीमुळे प्रवाशांमध्ये नाराजी असली तरी, सणासुदीच्या काळात सुरू करण्यात आलेल्या विशेष गाड्यांमुळे काहीसा दिलासा मिळणार आहे. आता प्रवाशांचे लक्ष फक्त एकाच गोष्टीकडे तिकिट मिळते का ? आणि किती महाग पडते ?

रोटरी क्लब ऑफ दिवा-ठाणे व एस.एम.जी विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने ९ वी आंतरशालेय चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न..

विशेष प्रतिनिधी

दिवा : रोटरी क्लब ऑफ दिवा-ठाणे आणि एस.एम.जी विद्यामंदिर, दिवा (पूर्व) यांच्या संयुक्त विद्यमाने दिवा शहरात ९ वी आंतरशालेय चित्रकला स्पर्धा २०२५ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या स्पर्धेत दिव्यातील विविध शाळांमधील तब्बल ८०२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत आपली कलागुणांची झलक सादर केली.
या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी रंग, कल्पकता आणि सर्जनशीलतेच्या माध्यमातून विविध विषयांवर सुंदर चित्रे साकारली. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि कलात्मक सादरीकरणामुळे संपूर्ण कार्यक्रमात आनंदी व उत्स्फूर्त वातावरण पाहायला मिळाले.
या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ दिवा-ठाणेचे अध्यक्ष किशोर पाटील, उपजिल्हा प्रांतपाल जितेंद्र नेमाडे, रोटरी क्लब ऑफ दिवा-ठाणेचे माजी अध्यक्ष साईनाथ म्हात्रे, ओम साई शिक्षण संस्थेचे सचिव स्वप्नील गायकर, तसेच गणेश टावरे, सी.ए विकास गुंजाळ उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो, असे मत व्यक्त केले.

या यशस्वी स्पर्धेसाठी आयोजक संस्था, शिक्षकवर्ग, स्वयंसेवक व पालकांचे मोलाचे योगदान लाभले. विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे ही ९ वी आंतरशालेय चित्रकला स्पर्धा यशस्वी व संस्मरणीय ठरली.

पत्रकारांच्या डोळ्यांची काळजी डिजिटल युगात महत्त्वाची ! प्रेस क्लब कल्याण रौप्य महोत्सवानिमित्त पत्रकारांसाठी नेत्र आरोग्य मार्गदर्शन शिबिर संपन्न..


प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण -: पत्रकार नेहमी बातमी मिळविण्यासाठी दिवसभर खूप धडपड करीत असतो पण तो स्वतःची काळजी कधीच घेत नाही. त्यातच आजच्या डिजिटल युगात सतत मोबाईलवर काम करत राहणे त्यामुळे डोळ्यांवर प्रचंड ताण येत आहे. डोळ्यांवर येणारा ताण प्रत्येक जण दुर्लक्षित करीत आहे याकडे दुर्लक्ष न करता आपल्या आरोग्याची काळजी व डोळ्यांची निगा राखणे महत्वाचे असून याकडे दुर्लक्ष करू नका असा सल्ला देत डोळ्यांची काळजी कशी घ्यावी व यासाठी काय करावे लागेल याबाबतची विस्तृतपणे माहिती ईशा नेत्रालय खडकपाडा शाखेच्या वरिष्ठ रेटिना शल्यचिकित्सक डॉ. पुष्पांजली रामटेके यांनी प्रेस क्लब कल्याण आयोजित वार्तालाप सोहळ्या प्रसंगी दिली.
कल्याण-डोंबिवली शहर परिसरात गेल्या पंचवीस वर्षांपासून पत्रकारांसाठी कार्यरत राहणारी ठाणे जिल्ह्यातील पहिली रजिस्टर संस्था 'प्रेस क्लब कल्याण' ला पंचवीस वर्ष पूर्ण होत असल्याने रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे त्यानिमित्त पत्रकारांच्या डोळ्यांची काळजी आणि डोळ्यांची निगा राखण्यासाठी कल्याण खडकपाडा येथील ईशा नेत्रालयाचा वार्तालाप सोहळा पार पडला. यावेळी डॉ. पुष्पांजली रामटेके, बाल नेत्र तज्ञ डॉ. स्नेहा पेशवाणी प्रेस क्लब चे अध्यक्ष आनंद मोरे, कार्याध्यक्ष कुणाल म्हात्रे, सचिव विष्णूकुमार चौधरी आदी सह अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी पत्रकारांनी डोळ्यांची काळजी कशी घ्यावी, रोज मोबाईलवर किती काम करावे, झोप किती घ्यावी, आराम कसा करावा अशा अनेक बाबींचा ऊहापोह डॉ. पुष्पांजली रामटेके यांनी केला. बाल नेत्र डॉ. स्नेहा पेशवाणी यांनी लहान मुलांच्या डोळ्यांची काळजी आधी पासूनच कशी करावी याबाबत अनेक उदाहरण देत मार्गदर्शन केले. डोळ्यांची तपासणी व शस्त्रक्रिया महागडी आहे म्हणून दुर्लक्ष करू नका, डोळे आहेत तर आपण जग बघू शकू व बातम्या करू शकतो त्यामुळे आपल्या डोळ्यांची सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रेस क्लब चे ज्येष्ठ सदस्य दत्ता भाटे यांनी केले. तर कार्याध्यक्ष कुणाल म्हात्रे यांनी उपस्थित मान्यवरांनी दिलेल्या माहितीकडे दुर्लक्ष न करता डोळ्यांची वेळेवर तपासणी करा असे यावेळी सांगितले. वार्तालाप सोहळ्या प्रसंगी ईशा नेत्रालयाच्या वतीने उपस्थित पत्रकारांना व त्यांच्या कुटुंबाच्या डोळ्यांची मोफत तपासणीचे फॅमिली कार्ड आणि आय मास्क देऊन पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवर डॉक्टरांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली व शंकाचे निरसन केले. 
या वार्तालापा प्रसंगी ईशा नेत्रालय खडकपाडा शाखेचे विस्तार अधिकारी गौरव कांबळे, शाखा अधिकारी राजश्री वाघ, विशाखा शहा आदी मान्यवरांचे जेष्ठ सदस्य नवीनभाई भानुशाली, अतुल फडके, सचिन सागरे, राजेश जाधव, रवि चौधरी यांनी स्वागत केले या वार्तालापाला ज्येष्ठ पत्रकार बापू वैद्य, आर टी. सुरळकर, नाना म्हात्रे, दिलीप पाटणकर, रविंद्र खरात, संतोष होळकर, केतन बेटावदकर, आकाश गायकवाड, चारुशीला पाटील, राजू काऊतकर, सिद्धार्थ कांबळे, नारायण सुरोशी, संभाजी मोरे आदी सह विविध दैनिकाचे आणि वृत्तवाहिनीचे पत्रकार उपस्थित होते. या सोहळ्याचे सूत्रसंचालन अशोक कांबळे यांनी आपल्या बहारदार शैलीत केले तर दत्ता भाटे यांनी आभार व्यक्त केले.

शिंदे गटाच्या मनमानी कारभाराला कंटाळून दिव्यात मिंधे गटाला मोठा धक्का देत ‘लाडक्या बहिणींचा’ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश..

विशेष प्रतिनिधी

दिवा :- दिवा शहरात शिंदे गटाला मोठा राजकीय धक्का बसला असून, शिंदे गटातील अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी जाहीरपणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे.

हा जाहीर प्रवेश आमदार तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव वरुण सरदेसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यामध्ये शर्मिला अजय म्हात्रे (शाखा संघटिका), मनाली मंगेश उगवे, वनिता देवकर, नंदा चव्हाण, भारती फडणीस, भाग्यश्री येवले, वृषाली जगताप, सपना पवार, गीता डोके, कुंदा डिके व ज्योती दळवी या महिला पदाधिकाऱ्यांनी मिंधे गटाच्या कार्यपद्धतीला रामराम ठोकत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला.

शिंदे गटात दिवा शहरात सुरू असलेल्या मनमानी कारभार, महिलांना विश्वासात न घेणे, संघटनात्मक निर्णयांपासून दूर ठेवणे व केवळ नावापुरती “लाडकी बहीण” योजना या धोरणामुळे आपण कंटाळलो असल्याचे या महिला पदाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले. प्रत्यक्षात महिलांचा सन्मान करणारा, निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेणारा आणि खऱ्या अर्थाने महिलांना बळ देणारा पक्ष म्हणजे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

या प्रवेशावेळी कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत, जिल्हाप्रमुख कल्पेश भोईर, धनंजय बोराडे, जिल्हा संघटक अभिजीत सावंत, जिल्हा संघटिका वैशाली दरेकर, युवा जिल्हा अधिकारी प्रतीक पाटील, विधानसभा प्रमुख ऍड. रोहिदास मुंडे, दिवा शहरप्रमुख सचिन पाटील, विधानसभा संघटिका योगिता नाईक यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

दिवा शहरात मिंधे गटाचा फसवा कारभार आता उघड होत असून, महिलांच्याच नेतृत्वातून मिंधे गटाला जबरदस्त चपराक बसल्याचे चित्र आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पाश्वभूमीवर हा प्रवेश शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची ताकद वाढवणारा असून, दिव्यातील राजकीय समीकरणे बदलणारा ठरणार आहे, असे ऍड. रोहिदास मुंडे यांनी सांगितले.

आधार पडताळणीसाठी नवा नियम; हॉटेल्स आणि इव्हेंटमध्ये फोटो कॉपीवर बंदी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिल्ली: भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) आधार कार्ड संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. आता हॉटेल्स, इव्हेंट स्थळे किंवा इतर कोणत्याही समकक्ष कार्यक्रमांसाठी आधार कार्डची फोटो कॉपी स्वीकारणे पूर्णपणे बंद होणार आहे. आधारची फोटो कॉपी जमा करणे हा सध्याच्या कायद्याचा भंग असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

हॉटेल्स आणि इव्हेंट आयोजकांसाठी नवी पडताळणी प्रक्रिया तयार

UIDAI चे CEO भुवनेश कुमार यांनी सांगितले की हॉटेल्स आणि इव्हेंट ऑर्गनायझर्ससाठी आधार-आधारित पडताळणीची नवी रचना तयार करण्यात येत आहे. यासाठी संस्थांना नोंदणी करून नव्या पडताळणी प्रणालीचा प्रवेश मिळू शकेल.

ते म्हणाले की, पडताळणी प्रक्रिया QR कोड स्कॅनिंगद्वारे किंवा नव्या आधार मोबाईल ऍपद्वारे केली जाईल. ही प्रक्रिया अधिक सुरक्षित, वेगवान आणि कागदविरहित असेल.

पेपर बेस्ड पडताळणी होणार बंद; नवा ऍप लवकरच

UIDAI ने या नव्या नियमांना मंजुरी दिली असून लवकरच ते नोटिफाय केले जातील. पेपर बेस्ड पडताळणी बंद करण्यासाठी नवी डिजिटल प्रणाली लागू केली जात आहे.

नव्या प्रणालीत खास इंटरमिडीएटरी सर्व्हरवरील अडचणी दूर करण्यावर भर देण्यात आला आहे. हॉटेल्स आणि इतर संस्थांना ऑफलाईन ऑथेंटिकेशन करावे लागेल, त्यानंतर त्यांना API चा प्रवेश मिळेल.

UIDAI सध्या बीटा टेस्टिंग करत आहे. नव्या ऍपमध्ये App-to-App authentication असेल, ज्यामुळे प्रत्येक पडताळणीसाठी सेंट्रल सर्व्हरशी जोडणीची गरज भासणार नाही. ही प्रक्रिया एअरपोर्ट, रिटेल स्टोअर्स आणि इतर अनेक ठिकाणी वापरता येणार आहे.

गोपनीयतेचे संरक्षण अधिक मजबूत होणार

भुवनेश कुमार यांनी सांगितले की नवी पडताळणी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर गोपनीयतेचे संरक्षण अधिक मजबूत होईल. पेपर बेस्ड पडताळणीत होणारे धोक्यांचे प्रमाण कमी होईल आणि आधार डेटा लीक होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात घटेल.

नव्या ऍपमधील सुधारणांमुळे डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन कायद्याला (DPDP Act) प्रत्यक्ष समर्थन मिळेल, ज्याची अंमलबजावणी १८ महिन्यांत होणार आहे.

आधार पडताळणी आता अधिक सुरक्षित, डिजिटल आणि पेपरविरहित

UIDAI च्या नव्या निर्णयामुळे देशभरातील हॉटेल्स, कार्यक्रम स्थळे आणि इतर संस्था नव्या डिजिटल पडताळणी प्रक्रियेकडे वळणार आहेत. यामुळे डेटा सुरक्षितता वाढेल आणि आधाराच्या गैरवापरावर नियंत्रण मिळेल.

दिव्यात ठाकरे पक्षाच्या विभागप्रमुखांनी हाती घेतला शिंदेंचा धनुष्यबाण..

विशेष प्रतिनिधी

दिवा:  दिवा शहरातील ठाकरे गटाला धक्का देत त्या पक्षाच्या दोन ज्येष्ठ विभागप्रमुखांनी आज शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. माजी उपमहापौर यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात उपशहर प्रमुख, माजी नगरसेवक, विभागप्रमुख, पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख गुरुनाथ नाईक, श्रीधर बेडेकर यांच्यासह माधुरी नाईक, सचिन भुवड आणि विकी नाईक यांनी शिंदे गटाचा धनुष्यबाण हाती घेतला. या प्रवेशामुळे दिवा शहरातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ज्येष्ठ शिवसैनिक गुरुनाथ नाईक यांचे त्यांच्या स्वगृही मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. दिवा शहरात सन १९८४ साली शिवसेना उभी राहत असताना केवळ पाच कार्यकर्ते सक्रिय होते, त्यापैकी एक म्हणून गुरुनाथ नाईक यांचे नाव घेतले जाते. पक्ष वाढीसाठी त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय असून, माजी महापौर रमाकांत मढवी यांच्या निवडणुकीत त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. या पक्षप्रवेशामुळे शिंदे गटाला दिवा शहरात बळकटी मिळणार असून, येत्या काळात राजकीय हालचाली अधिक तीव्र होतील, असे चित्र सध्या दिसून येत आहे.

दिव्यातील भाजपचे सतीश केळशीकर यांची ठाणे जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती..

विशेष प्रतिनिधी

दिवा, दि. १८ डिसेंबर : भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा, ठाणे शहर (जिल्हा) यांच्या वतीने शशिकांत (सतीश) मनोहर केळशीकर यांची ठाणे जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण, भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले, ठाणे शहर विधानसभा आमदार संजय केळकर, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, भाजप प्रदेश सरचिटणीस डॉ. माधवी नाईक-मेंढे तसेच भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली.

या प्रसंगी अनुसूचित जाती मोर्चा, ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष विरसिंह पारछा यांनी विशेष मार्गदर्शन करत, सतीश केळशीकर आपल्या कार्यकाळात समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून संघटना अधिक बळकट करण्यासाठी निश्चितच मोलाचे योगदान देतील, असा विश्वास व्यक्त केला.

नवनियुक्त सरचिटणीस सतीश केळशीकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, पक्षाला योग्य दिशेने पुढे नेण्याचे काम आपण प्रामाणिकपणे करू. वरिष्ठ नेते व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केलेली विकासकामे पुढे सुरू ठेवून संघटना अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाईल. भारतीय जनता पार्टीत कोणतेही गट नसून सर्वांना सोबत घेऊन काम करणारा हा पक्ष आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

डोंबिवलीत ऊर्जा संवर्धन दिनानिमित्त महापालिकेच्या चर्चासत्रात ७ कलमी शाश्वत विकास उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली: ऊर्जा संवर्धन दिनाचे औचित्य साधून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट तर्फे आयोजित चर्चासत्राला डोंबिवलीकरांनी मोठा प्रतिसाद दिला. केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून डोंबिवली पूर्वेतील रोटरी भवन येथे आयोजित या अनोख्या उपक्रमाला डोंबिवली परिसरातील १५० हून अधिक गृहसंकुलांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 
शाश्वत आणि सुरक्षित शहर विकासासाठी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या पुढाकाराने ७ कलमी मुद्द्यांची मांडणी करण्यात आली आहे. आयुक्त अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून आणि विद्युत-यांत्रिकी विभागाचे अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत यांच्या समन्वयातून कल्याणपाठोपाठ डोंबिवलीतही हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम घेण्यात आला. ज्यामध्ये कचरा व्यवस्थापन, सौरऊर्जा, पावसाचे पाणी साठवण (रेन वॉटर हार्वेस्टिंग), सांडपाण्याचा पुनर्वापर, वृक्ष लागवड, विद्युत सुरक्षा आणि अग्निसुरक्षा या सात मुद्द्यांचा समावेश असून त्याबाबत उपस्थित नागरिकांमध्ये तज्ञ व्यक्तींच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
आयुक्त अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून झालेल्या उपक्रमाचे डोंबिवलीकरांकडून विशेष कौतुक !

या सात मुद्द्यांवर कल्याण डोंबिवलीतील गृहसंकुलांनी प्रभावीपणे काम करण्याची गरज ओळखून कल्याण आणि डोंबिवलीमध्ये हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले. येत्या काळात कल्याण-डोंबिवलीतील प्रत्येक लहान मोठ्या निवासी संकुलापर्यंत हा ७ कलमी कार्यक्रम पोहोचवण्याचा महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांचा मानस आहे. त्यादृष्टीने कल्याणपाठोपाठ डोंबिवलीतही डोंबिवली रोटरी क्लब ऑफ ईस्टचे माधव चिकोडी यांच्या विशेष सहकार्याने हा उपक्रम घेण्यात आला. दरम्यान यावेळी उपस्थित नागरिकांनी शाश्वत आणि सुरक्षित विकास हा कार्यक्रम सोसायटीनिहाय घेऊन सोसायटीनुसार त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी यावेळी उपस्थित नागरिकांनी केली.