BREAKING NEWS
latest
latest लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
latest लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये अभूतपूर्व ‘प्रति अयोध्या श्रीराम मंदिर ध्वजारोहण सोहळा’ आणि क्रीडा दिवस उत्साहात संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

श्री रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे
रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः

डोंबिवली :  दिनांक २५ नोव्हेंबर, मंगळवार - मार्गशीर्ष शुक्ल पक्ष, हा दिवस म्हणजे अयोध्येत उगवत्या सूर्याच्या स्वर्णकिरणांनी श्रीराम मंदिराच्या कळसावर पसरवलेले जणू श्रीरामांना अर्पण केलेले मानचिन्हच! याच पवित्र क्षणाची प्रतिकृती म्हणून 'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये देखील ढोल-ताशांच्या निनादात, लेझीमच्या तालात आणि “जय श्रीराम”च्या जयघोषात हा आगळावेगळा ध्वजारोहण सोहळा अत्यंत भक्तिभावाने संपन्न झाला.

“दोन प्रहरी का गं शिरी सूर्य थांबला… राम जन्मला गं सखी, राम जन्मला..”

                                            
     
रामजन्माच्या त्या मंगलवेळेला दुपारी बारा वाजता अयोध्येत पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संचालक श्री. मोहन भागवत यांच्या हस्ते जसे ध्वजारोहण झाले, त्याच क्षणी 'जे एम एफ'च्या ब्रह्मा रंगतालय च्या प्रांगणात या अद्वितीय सोहळ्याचे आयोजन झाले.

भव्य मिरवणुकीने सोहळ्याची सुरुवात


संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, आणि खजिनदार जाह्नवी कोल्हे यांनी शाळेच्या प्रवेशद्वारापासून राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, ऋषी-मुनी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वेशातील विद्यार्थ्यांसह मिरवणूक काढली. लहान मुलांनी गदा हातात घेत वानरसेनेच्या रूपात “जय श्रीराम”च्या जयघोषात प्रांगणात प्रवेश केला. पालखीत राम-लक्ष्मण-सीता-हनुमान यांच्या मूर्ती ठेऊन लेझीमच्या नादात आणि श्रीराम नामात तल्लीन होऊन मिरवणूक ध्वजारोहण स्थळी पोहोचली.



अंबाभवानी मंदिराचे पुजारी श्री. श्रीधर पुजारी यांनी वेदमंत्रांच्या घोषात सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांच्या हस्ते कलशपूजन, तर संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांच्या हस्ते राम-लक्ष्मण-सीतेची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर पंचवातीच्या समई प्रज्वलित करण्यात आली.

ध्वजारोहणाचा मंगल क्षण


भव्य भगवा ध्वज फुलांनी सजवण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी व योगी आदित्यनाथ जी यांच्या वेशातील विद्यार्थ्यांच्या हस्ते वेदमंत्रांच्या घोषात ध्वजारोहण पार पडले. या प्रसंगी मान्यवर डॉ. मोझेस, श्रीधर पुजारी, श्री. रोहित राजगुरु, सौ. जाह्नवी राजगुरू कोल्हे, डॉ. नाडर यांनी भगव्या ध्वजाला वंदन केले. हजारो पालक, 'जन गण मन' सीबीएसई व स्टेट बोर्डचे विद्यार्थी, 'वंदे मातरम' महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक यांच्या डोळ्यात भावनांचे अश्रू दाटले आणि सर्वांनी अयोध्या सोहळ्याचा जीवंत अनुभव घेतला. आठ मजली भव्य 'जे एम एफ' शिक्षण संस्थेची इमारत जणू श्रीरामाच्या जयघोषात न्हाऊन निघाली. फुलांच्या वर्षावात, श्रीरामभजनांच्या सुरांमध्ये तप्त्या  उन्हाची तमा न बाळगता उपस्थितांनी हा अभूतपूर्व सोहळा मनसोक्त साजरा केला.

संस्थेचे मार्गदर्शक विचार

संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे म्हणाले, “श्री राम’ हा दोन अक्षरी शब्द जरी असला तरी त्या दोन अक्षरांत संपूर्ण ब्रह्मांड सामावले आहे. त्याचे उच्चारण होताच मनात आर्त भावना जागृत होतात. अशा दिव्य सोहळ्याचे साक्षीदार होणे ही आजच्या पिढीची भाग्यलक्षणी गोष्ट आहे.” तर सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे म्हणाल्या, “भारत ही केवळ भूमी नसून देवभूमी आहे. त्या देवभूमीत जन्म घेणे हीच मोठी प्राप्ती. आमची 'जन गण मन' शाळा ही जणू त्या रामरायाचेच आशीर्वाद घेऊन उभी आहे.”

ध्वजारोहणाची आकर्षक सजावट श्री. नरेश पिसाट व सौ. उषा पिसाट यांनी मनोभावे केली, तर कलात्मक शिक्षक अभिषेक देसाई, दीपा तांबे, कस्तुरी, श्री. विठ्ठल कोल्हे यांनी भगव्या ध्वजावर कांचनवृक्ष, श्रीरामाचे सूर्यचक्र, तेजोमूर्ती यांची कलाकुसर करून सोहळ्यास दिव्यता प्राप्त करून दिली.

क्रीडा दिवस – २४ व २५ नोव्हेंबर

'जन गण मन' इंग्रजी माध्यमिक शाळा आणि विद्यामंदिरचा संयुक्त क्रीडा दिवस दोन दिवस ब्रह्मा रंगतालयाच्या प्रांगणात उत्साहात पार पडला. शिशुविहार ते इयत्ता दहावीपर्यंत एकूण सुमारे १,००० विद्यार्थ्यांनी धावणे, लंगडी, अडथळा शर्यत, चमचा–लिंबू शर्यत इत्यादी स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. अनेक विद्यार्थ्यांनी ट्रॉफी, प्रशस्तीपत्रके व पदके जिंकून शाळेचे नाव उज्ज्वल केले. उद्घाटन प्रसंगी संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापिका, क्रीडा शिक्षक रमेश वगे, सौ. वैशाली शिंदे, तसेच प्रमुख पाहुणे विनायक कांबळे यांनी मशाल प्रज्वलित करून क्रीडा स्पर्धांना प्रारंभ केला.


शिशुविहारातील बालकांनी आकर्षक अशी स्वस्तिक, ॐ, 'जे एम एफ' ची प्रात्यक्षिके तसेच नृत्य सादर केले, तर इयत्ता १ आणि २ च्या विद्यार्थ्यांना सर्वांना विजेता घोषित करून हनुमानाची गदा बक्षीस म्हणून देण्यात आली. डॉ. राजकुमार कोल्हे म्हणाले,“जिंकणे-हरणे ही नैसर्गिक बाब असली तरी दुसऱ्याच्या यशात सहभागी होणे म्हणजे अपयशालाही यशाची चव देणे होय.” तर डॉ. प्रेरणा कोल्हे म्हणाल्या, “खेळ मन आणि शरीर विकसित करतो. मानसिक-शारीरिक ताण दूर करण्यासाठी नियमित मैदानात उतरले पाहिजे. स्पर्धेपेक्षा खेळाचा आनंद अधिक महत्त्वाचा.”

क्रीडा दिवस यशस्वी करण्यासाठी प्राचार्य अलपेश व मयुरी खोब्रागडे, प्राचार्या ज्योति वेंकटरमण, प्राचार्या तेजावती कोटीयन, तसेच सौ. श्रेया कुलकर्णी, अभिषेक देसाई, प्रमोद पगारे, सपना यन्नम, स्नेहा डोळे, दीपा तांबे, दीपाली सोलकर, क्रीडा शिक्षक रमेश वगे, वैशाली शिंदे, आणि सर्व वर्गशिक्षकांनी परिश्रम घेतले.

भाजप मधून बाहेर पडून शिंदे सेनेत निघून गेलेल्या नगरसेवकांची पुन्हा घरवापसी..

प्रतिनिधी:अवधुत सावंत

डोंबिवली दि. १८: आगामी महापालिका निवडणुकीची चाहूल लागताच कल्याण-डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. विरोधी पक्षातील प्रभावशाली नेते आणि पदाधिकाऱ्यांसह एकमेकांच्या पक्षातील बड्या नेत्यांनाही आपल्या गोटात आणण्यासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या घडामोडीत आज आणखी एक महत्त्वाची भर पडली. शिवसेनेचे तालुकाप्रमुख महेश पाटील आणि त्यांची बहीण डॉ. सुनीता पाटील यांनी आज परत भाजपमध्ये घरवापसी केली. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमूख उपस्थितीत महेश पाटील यांनी हा भाजप प्रवेश केला आहे.

कल्याण-डोंबिवलीत आज सकाळपासूनच भाजपमध्ये इनकमींगचा मोठा धडाका सुरू आहे. आज सकाळी शिवसेनेतीलच युवा पदाधिकारी अनमोल म्हात्रे यांनी आपल्या समर्थकांसह प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये दाखल झाले. त्याला अवघे काही तासंही उलटत नाहीत तोच भाजपने आपल्या महायुतीतील मित्रपक्ष शिवसेनेला आणखी एक जबर धक्का दिला. कल्याण ग्रामीण भागातील मोठे प्रस्थ आणि पूर्वाश्रमीचे भाजप पदाधिकारी महेश पाटील आणि त्यांची बहीण माजी नगरसेविका डॉ. सुनीता पाटील यांनी आज परत भाजपमध्ये प्रवेश करत घरवापसी करून एकच खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्यासह सदस्य संजय राणे, संजय विचारे, सायली विचारे, माजी परिवहन सदस्य संजय राणे, संजय विचारे 
यांनी आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केला.
मला व माझ्या मुलाला मारण्याची सुपारी देणारा मोक्काचा आरोपी कुणाल पाटील, याला मोक्का मधून क्लीन चिट दिली गेली आहे. आमच्या पक्षातील नेते मंडळी कुणाल पाटील याला सपोर्ट करत असल्याने मी दडपणामध्ये वावरत होतो. श्रीकांत शिंदे यांना सांगितलं होतं की कुणाल पाटील हा फिरतोय आणि त्यांचे काका वंडार पाटील यांनी माझ्या - मुलाला आणि मला मारण्याची धमकी दिली होती. त्यावर पक्षाकडून मला काही समाधानकारक प्रतिसाद मीळाला नाही. मात्र आमच्या पक्षातले लोकचं त्यांना सपोर्ट करत आहेत म्हणून आज नाईलाजाने माझ्या समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश केल्याचे महेश पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर सांगितले.

'डावखर फिल्म्स' निर्मित व दिग्दर्षित महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचा 'गोंधळ' चित्रपट प्रदर्शित..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : दिग्दर्शक संतोष डावखर यांनी आपल्या दिग्दर्शनातून महाराष्ट्राच्या लोकपरंपरेला आधुनिक रुप देत ती जागतिक पातळीवर पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'गोंधळ' चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद स्वतः संतोष डावखर यांनी लिहिले असून 'डावखर फिल्म्स' निर्मित या चित्रपटाच्या सहनिर्मात्या दीक्षा डावखर आहेत. चित्रपटाला दिग्गज संगीतकार पद्मविभूषण इल्लैयाराजा यांचे संगीत लाभले आहे. 
मराठी चित्रपटसृष्टीत आशयघन कथा आणि कलात्मक आणि दर्जेदार सादरीकरणासाठी ओळख निर्माण करणारा 'गोंधळ' हा सिनेमा आता आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकणार आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा सूक्ष्म वेध घेणारा हा चित्रपट भारतीय सरकारतर्फे आयोजित केलेल्या गोव्यातील ५६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 'इंडियन पॅनोरमा गोल्डन पिकॉक सेक्शन' मध्ये निवडला गेला आहे. चित्रपटाच्या घोषणे पासूनच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती आणि आता चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षक या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद देत आहेत.
या चित्रपटाबाबत लक्षणीय बाब म्हणजे महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीतल्या अत्यंत पारंपरिक, धार्मिक आणि कलात्मक घटक असलेल्या 'गोंधळ' या परंपरेवर आधारित सिनेमाची कहाणी आहे. या परंपरेचा सन्मान राखत, चित्रपटगृहाबाहेर पारंपरिक गोंधळी मंडळींनी खास विधीपूर्वक अभिषेक करून चित्रपटाचा शुभारंभ केला. गोंधळातील पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि देवांच्या नावाचा जयघोष करत या मंडळींनी 'गोंधळ' चित्रपटाचा आनंद घेतला.
'गोंधळ' या चित्रपटात महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली लोककला, श्रद्धा, आणि संस्कृती यांचा समृद्ध आविष्कार आहे. 'गोंधळ' या चित्रपटाची कथा पारंपरिक गोंधळ विधीच्या पार्श्वभूमीवर उलगडते. नवरा-नवरीच्या आयुष्यातील विघ्नं दूर करण्यासाठी होणारा गोंधळ हा धार्मिक विधी असला, तरी चित्रपटातून मानवी भावना, श्रद्धा आणि समाजातील बदलत्या विचारसरणींचा वेध घेतला आहे.
हा चित्रपट पाहतांना काही महत्वाच्या बाबी लक्षात आल्या. आजवर मराठी सिनेमात अभावानेच दिसणारी गोष्ट म्हणजे कलात्मकतेसोबतच तांत्रिक बाबींमध्येही जणू नवा मापदंड निर्माण केला आहे. कॅमेऱ्याचे अप्रतिम दृष्यबंध, उत्कृष्ट छायाचित्रण, परिपूर्ण संपादन आणि जागतिक दर्जाच्या ध्वनीमिश्रणामुळे 'गोंधळ' हा चित्रपट पाहाताना एक दृश्य-सांस्कृतिक मेजवानी ठरला आहे.
चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल दिग्दर्शक संतोष डावखर म्हणतात, "प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम अवर्णनीय आहे. आम्ही 'गोंधळ' हा चित्रपट पूर्ण श्रद्धेने आणि प्रेमाने केला आणि आज प्रेक्षकांच्या प्रतिसादातून ते प्रेम परत मिळत आहे, यापेक्षा मोठा आनंद नाही. प्रेक्षकांना 'गोंधळ' आवडत आहे, हेच आमच्यासाठी सर्वात मोठं यश आहे." गोंधळ' म्हणजे आपल्या मातीतली आणि संस्कृतीतली कहाणी आहे. आत्मा, लोककलेचा वारसा आणि आधुनिकतेचा संगम यात प्रेक्षकांना अनुभवयाला मिळणार आहे. आपल्या मातीत रुजलेल्या श्रद्धा, परंपरा आणि विधींना आम्ही एका नव्या दृश्यात्मक रूपात मांडण्याचा प्रयत्न केला असून या चित्रपटामागे एक समर्पित आणि कल्पक टीम कार्यरत आहे. प्रत्येक दृश्य, प्रत्येक संवाद आणि प्रत्येक सूर हा आपल्या संस्कृतीचा स्पंदन अनुभवायला लावेल. 'गोंधळ' प्रेक्षकांना केवळ मनोरंजन नाही, तर एक भावनिक आणि भव्य अनुभव देईल, जो मनात बराच काळ रुंजी घालेल, याची मला खात्री आहे."
नुकतेच प्रदर्शित झालेले 'कांतारा' आणि 'दशावतार' यांसारख्या स्थानिक संस्कृतीवर आधारित चित्रपटांप्रमाणेच 'गोंधळ'ही महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला चित्रपट आहे. कर्नाटकाच्या २० टक्के प्रदेशात 'कांतारा' मधील परंपरा पाळली जाते, तर कोकणात 'दशावतार' ला मोठे स्थान आहे. मात्र 'गोंधळ' ही परंपरा महाराष्ट्रातील तब्बल ८० टक्के भागात साजरी केली जाते, ही या चित्रपटाची मोठी ताकद आहे. 'कांतारा' आणि 'दशावतार' च्या यशाने हे सिद्ध झाले आहे की, प्रेक्षकांना आपल्या संस्कृतीशी जोडलेली, मातीचा सुगंध असलेली सिनेमॅटिक मांडणी नेहमीच भावते. 'गोंधळ' ही हाच वारसा पुढे नेत, आंतरराष्ट्रीय दर्जाचा आणि स्थानिक संस्कृतीचा सुंदर संगम सादर करणार आहे.
या चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, माधवी जुवेकर, सुरेश विश्वकर्मा असे अनेक दिग्गज कलाकार झळकणार आहेत, संतोष डावखर यांनी कथा, पटकथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली असून, दीक्षा डावखर सहनिर्माती आहेत. 
बऱ्याच कालावधीनंतर एक छान आणि चांगला, हटके विषय घेऊन हा चित्रपट आपल्या भेटीस आलेला आहे .'गोंधळ' च्या इंडियन पॅनोरमामध्ये झालेल्या निवडीमुळे मराठी सिनेमाला नवी ओळख मिळाली आहे. चाहत्यांची उत्सुकता पाहता अंधश्रद्धेचा सूक्ष्म वेध घेणारा हा सिनेमा  मराठी चित्रपटसृष्टीत नवीन मापदंड प्रस्तापित करू शकेल यात काही शंका नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाने हा चित्रपट पाहिला पाहिजे.त्यातून आपल्या कुळाचाराबद्दल आणि परंपरेबद्दल नक्कीच आदर निर्माण होऊ शकतो.

डोंबिवलीला ‘ब्लाईन्ड-फ्री सिटी’ करण्याचा संकल्प करत ‘नेत्र रक्षा - डायबेटीस आय अवेअरनेस वॉक’ ला सुमारे १५०० नागरिकांचा सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली, दि.१६ : 'अनिल आय हॉस्पिटल', 'महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी' (MOS), 'इंडियन मेडिकल अससोसिएशन' (IMA) डोंबिवली आणि 'डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नेत्र रक्षा - ए वॉक फॉर डायबेटीस आय अवेअरनेस' या भव्य रॅलीला डोंबिवलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सुमारे १५०० नागरिकांनी या वॉक मध्ये आपला सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार माननीय श्री. रविंद्र चव्हाण, प्रदेशाध्यक्ष (भाजपा) यांनी उपस्थित राहून सर्व नागरिकांना आवाहन केले की, “नियमित डोळ्यांची तपासणी  करून डोंबिवलीला अंधमुक्त 'ब्लाईन्ड-फ्री' शहर बनवण्याच्या या उपक्रमात सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा.” तसेच त्यांनी 'अनिल आय हॉस्पिटल'च्या संचालिका तथा महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी' (MOS) च्या अध्यक्षा डॉ. अनघा हेरूर यांचे या जनजागृती उपक्रमाचे विशेष कौतुक केले आणि अशा उपक्रमांमुळे डोंबिवली आरोग्यदृष्ट्या सक्षम होत असल्याचे सांगितले.
'अनिल आय हॉस्पिटल' च्या संचालिका व महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी (MOS) चे अध्यक्षा डॉ. अनघा हेरूर यांनी सांगितले की, “प्रत्येक डायबेटीक रुग्णाने दर वर्षी किमान एकदा तरी डायबेटीक रेटिनोपॅथीची तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. उशिरा निदान झाल्यास दृष्टी गमावण्याचा धोका वाढतो.” तसेच त्यांनी नागरिकांना डोळ्यांच्या आजाराबद्दल जागरूक राहण्याचे आवाहन केले. या प्रसंगी महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी (MOS) तर्फे राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी भव्य ‘बाल नेत्र रक्षा अभियान’ जाहीर करण्यात आले. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये विस्तृत नेत्र तपासणी मोहीम राबवली जाणार आहे.
या रॅलीमध्ये डोंबिवलीतील विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, शालेय विद्यार्थी, डोंबिवली क्लस्टर कॉलेज ३४, रोटरी व रोटरॅक्ट क्लब्स, ज्येष्ठ डायबेटॉलॉजिस्ट डॉक्टर, तसेच 'इंडियन मेडिकल अससोसिएशन (IMA), सामाजिक संस्था आणि शेकडो डोंबिवलीकरांनी सहभाग घेतला. कार्यक्रमात आय एम ए प्रेसिडेंट (IMA) डोंबिवली चे डॉक्टर विजय चिंचोले, श्री. किशोर मानकामे, डॉ. सुशीला विजयकुमार, श्री. प्रभू कापसे, श्री. भाई पानवडीकर  यांचीही उपस्थिती लाभली.
नागरिकांच्या या मोठ्या प्रतिसादामुळे रॅलीला भव्य स्वरूप प्राप्त झाले असून, हा उपक्रम डोंबिवलीला अंधमुक्त शहर (ब्लाईन्ड-फ्री सिटी) करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे आयोजकांनी सांगितले. आगामी काळातही अशा जनजागृतीद्वारे नागरिकांचे डोळे आणि आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचे 'अनिल आय हॉस्पिटल' च्या संचालिका व महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी (MOS) च्या अध्यक्षा डॉ. अनघा हेरूर यांच्या तर्फे प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.

डोंबिवलीतील 'अनिल आय हॉस्पिटल' तर्फे १६ नोव्हेंबर रोजी सर्वात मोठ्या 'व्हिजन वॉक' चे आयोजन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : डोंबिवलीतील 'अनिल आय हॉस्पिटल', 'महाराष्ट्र ऑपथेलमोलॉजिस्ट सोसायटी' (MOS), 'डोंबिवलीकर ग्रुप', आणि 'इंडियन मेडिकल असोसिएशन' (IMA)  डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने “नेत्ररक्षा - डायबेटीस आय अवेअरनेस वॉक” ही भव्य जनजागृती मोहीम रविवार दिनांक १६ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.
या नेत्र जनजागृती मोहिमेत डोंबिवलीतील 'अनिल आय हॉस्पिटल' तर्फे प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर नेत्रजागृतीसाठी एक मोठी मोहीम राबवली जात असून, या माध्यमातून नागरिकांना मधुमेहामुळे होणाऱ्या डोळ्यांच्या आजारांबद्दल आणि अंधत्व टाळण्यासाठी वेळेवर तपासणीचे महत्त्व पटवून देण्याचा हेतू आहे. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी माननीय आमदार श्री. रवींद्र चव्हाण, (अध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र प्रदेश) असतील. सुमारे २,००० पेक्षा अधिक नागरिक या जनजागृती वॉकमध्ये सहभागी होणार असून. यात कॉलेज विद्यार्थी, रोटरी व रोटरॅक्ट क्लबस्, विविध सामाजिक व धार्मिक संस्था, डायबेटॉलॉजिस्ट, डॉक्टर तसेच डोंबिवलीतील नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र ऑपथेलमोलॉजिस्ट सोसायटी' (MOS) च्या अध्यक्षा डॉ. अनघा हेरूर यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली. 
रॅलीची सुरुवात सकाळी ७.०० वाजता गणेश मंदिर रोड येथून होणार असून, सकाळी ९.०० वाजता त्याच ठिकाणी समारोप करण्यात येईल. समारोपानंतर माननीय श्री. रवींद्र चव्हाण आणि डॉ. अनघा हेरूर संचालक 'अनिल आय हॉस्पिटल' तसेच अध्यक्षा (MOS) यांचे विशेष मार्गदर्शन होईल.

या निमित्ताने डॉ. अनघा हेरूर यांनी नागरिकांना आवाहन केले की, “मधुमेहामुळे होणारे डोळ्यांचे विकार वेळेवर तपासणी केल्यास टाळता येऊ शकतात. चला, आपण सगळे मिळून डोंबिवलीला डायबेटीसजन्य अंधत्वमुक्त बनवूया.”

'अनिल आय हॉस्पिटल' तर्फे सर्व नागरिक, सामाजिक संस्था, वरिष्ठ नागरिक, कॉर्पोरेट्स आणि युवकांना या मोहिमेत सहभागी होऊन “वेळीच नेत्रतपासणी करा आणि दृष्टी सुरक्षित ठेवा” हा संदेश समाजात पोहोचवण्याचे आवाहन डॉ. अनघा हेरूर यांच्या तर्फे करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क:

* श्री. भूषण फडतरे, मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) 'अनिल आय हॉस्पिटल'
संपर्क मोबाईल: ९८२१८८७७१६

* श्री. जय चौधरी, मार्केटिंग मॅनेजर  'अनिल आय हॉस्पिटल'
संपर्क मोबाईल: ८१०८८८१५५५

शिवसेनेचे कट्टर शिंदे गटाचे समर्थक दीपेश म्हात्रे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय) सचिव संतोष केणे यांचा भाजप मध्ये पक्ष प्रवेश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : एकेकाळचे कट्टर शिंदे समर्थक आणि आताचे उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे, तसेच काँग्रेस (आय) चे महाराष्ट्र प्रदेश सचिव माजी नगरसेवक संतोष केणे यांच्यासह अन्य माजी नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रविवारी आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत डोंबिवली जिमखाना येथे भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला. हे पक्ष प्रवेश उद्धवसेना आणि काँग्रेसला धक्का देणारे असले, तरी उद्धवसेनेत येण्यापूर्वी शिंदेसेनेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेल्या दीपेश म्हात्रेना आपल्या गळाला लावून एकप्रकारे भाजपने केडीएमसी निवडणुकीआधी शिंदेसेनेलाही शह दिल्याच्या चर्चेला उधान आले आहे.
डोंबिवलीतील जिमखाना येथे भाजप प्रदेशाध्यक्ष तथा आ. रवींद्र चव्हाण आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या पक्षप्रवेशाच्या वेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आ. सुलभा गायकवाड, आ. नरेंद्र पवार, जिल्हाध्यक्ष नंदू परब, राहुल दामले, मंदार हळबे, शशिकांत कांबळे, पूर्वमंडल अध्यक्ष मितेश पेणकर, पश्चिम मंडलाचे माजी अध्यक्ष समीर चिटणीस यांसह भाजपमधील अन्य मान्यवर तसेच महिला कार्यकर्त्या मनीषा राणे, वर्षा परमार, पूनम पाटील व असंख्य भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
             
भाजपात पक्ष प्रवेश केलेल्यांमध्ये उद्धवसेनेचे माजी नगरसेवक व सभापती दीपेश म्हात्रे यांच्यासह त्यांचे बंधू जयेश म्हात्रे, मातोश्री रत्नप्रभा म्हात्रे, काँग्रेस (आय) चे महाराष्ट्र प्रदेश सचिव माजी नगरसेवक संतोष केणे, संतोष तरे, अनंता गायकवाड, रामभाऊ ओव्हळ, देवानंद गायकवाड, प्रधान पाटील, माजी नगरसेविका वैशाली केणे, अनिता कर्पे, पूजा म्हात्रे, उद्योगपती संजय गायकवाड यांनी प्रवेश केला.


केडीएमसी पालिकेला भाजपच महापौर देणार : रवींद्र चव्हाण

भाजपावर विश्वास दाखवून ज्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला आहे, त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. केडीएमसीच्या निवडणुकीत भाजपच महापौर देईल, असा विश्वास पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आणि राज्यात महायुतीचे सरकार असून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना विकासाच्या दिशेने नेणारे पारदर्शक सरकार कोणी देऊ शकत असेल तर ते भाजप आहे. केडीएमसीतील आणखी काही नगरसेवक येत्या काही दिवसांत भाजपात प्रवेश करणार असल्याची माहितीदेखील चव्हाण यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांना दिली.

'जे एम एफ' चा नागपूर ग्रामीण भागात लेकीच्या विवाह मंडपात सांस्कृतिक, सामाजिक, ऐतिहासिक आणि कौतुकास्पद विवाह सोहळा धूमधडाक्यात साजरा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील दावसा गावातील 'जन गण मन' कॉन्व्हेंट शाळेच्या प्रांगणात, संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार एम. कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा राजकुमार कोल्हे यांची सुपुत्री जाह्नवी हिच्या विवाहानिमित्त, दिनांक ३१ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत विविध कार्यक्रमांचा उत्सवमय सोहळा पार पडला. या दरम्यान शाळेचा वार्षिक सांस्कृतिक सोहळा, 'जे. एम. एफ. ग्रामज्योत पुरस्कार' वितरण, आरोग्य शिबिर, आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर यांसारखे अनेक उपक्रम यशस्वीरीत्या पार पडले.

पहिल्या दिवशी, ढोल–ताशांच्या गजरात, ग्रामीण भागातील सर्वांना लग्नासाठी मानाच्या अक्षता व भेटवस्तू देऊन आमंत्रित करण्यात आले. स्वतः डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सहकाऱ्यांसह घरोघरी जाऊन सर्वांना विवाह आणि आरोग्य शिबिरासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. संस्थेच्या रजत महोत्सवी वर्षानिमित्त, पाहुण्यांचा रजत स्मरणिका आणि लक्ष्मी-गणपती मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. ग्रामीण जनतेसाठी हा आनंदाचा आणि अभिमानाचा सोहळा ठरला.

१ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत शाळेतील विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, मुख्याध्यापक श्री. भूपेंद्र भजन, व्यवस्थापक श्री. महेश कळंबे, श्री. युवराज कोल्हे, श्री. विजय भांगे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि स्वागत गीताने झाली. विद्यार्थ्यांनी नृत्य आणि अभिनयातून अप्रतिम सादरीकरणे करून उपस्थितांची मने जिंकली.
या प्रसंगी डॉ. कोल्हे म्हणाले, “लग्न आधी कोंडाण्याचे आणि मग रायबाचे, हाच शिवछत्रपतींचा संस्कार आहे,” असे म्हणत त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

पाच वर्षांतून एकदा दिल्या जाणारा मानाचा ‘जे.एम.एफ. ग्रामज्योत पुरस्कार’ यावेळी श्री. पवन बोंद्रे (सरपंच), श्री. योगेश नासरे, श्री. सागर दुधाने, आणि श्री. हितेशदादा बनसोड या सामाजिक कार्यकर्त्यांना प्रदान करण्यात आला. समाजहितासाठी कार्य करणाऱ्या या विभूतिंचा सन्मान करताना डॉ. कोल्हे म्हणाले, “स्वार्थापेक्षा परमार्थाचे कार्य करणाऱ्यांचा समाज नेहमी ऋणी असतो.”

आरोग्य शिबिर हे दरवर्षीप्रमाणे यंदाही पद्मश्री डॉ. महात्मे हॉस्पिटल व परमपूज्य श्री. नायर गुरुजी यांच्या चेतना परिवार, नागपूर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले. हजारो ग्रामस्थांनी याचा लाभ घेतला. २ डिसेंबर रोजी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहे.
२ नोव्हेंबर रोजी सकाळी आरोग्य शिबिर आणि संध्याकाळी जाह्नवी आणि रोहित यांच्या साखरपुड्याचा, संगीत आणि हळदीचा कार्यक्रम दिमाखात साजरा झाला. संपूर्ण दावसा गावासोबत रशिया आणि बेंगळुरू येथील पाहुण्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली.
रशियाहून आलेल्या मिस रशिया आणि मिस ग्लोबल मिसेस वेल्लेरी, श्री. व सौ. इरिना आंद्रे डॅनिलोव, तसेच इम्पीरियल कॉलेज, बेंगळुरूचे चेअरमन डॉ. हरिकृष्ण मारम हे विशेष पाहुणे उपस्थित होते. परदेशी पाहुण्यांनी भारतीय परंपरेप्रमाणे साडी आणि पारंपरिक पोशाख घालून कार्यक्रमात सहभाग घेतला आणि नृत्याविष्कार सादर करून सर्वांचे मन जिंकली. याच दिवशी तुळशी विवाह देखील पार पडला. मुंबईहून आलेल्या कलाकारांमध्ये चिन्मयी साळवी (वागळे की दुनिया फेम), आयुष्य संजीव, पियुष पांडे, बलजीत पांडे, आदित्य काळे, सिद्धार्थ अखाडे, आणि सिधांत खाडे आदींचा सहभाग विशेष ठरला.
३ नोव्हेंबर रोजी सर्वांच्या प्रतीक्षेचा क्षण उजाडला. मुंबई स्थित जाह्नवी कोल्हे आणि रोहित राजगुरू यांचा विवाह सोहळा भव्य थाटात संपन्न झाला. सर्वांचे लक्ष वेधणारा क्षण म्हणजे डॉ. राजकुमार कोल्हे यांनी स्वतः लिहिलेला मंगलाष्टक, ज्याला रोहित राजगुरू यांनी संगीतबद्ध केले. या मंगलाष्टकाच्या सुरात संपूर्ण सभागृह क्षणभर स्तब्ध झाले आणि अनेकांच्या डोळ्यांत अश्रू दाटले.
m"ईश्वराच्या दैव हाती, तोच जुळवितो नातीगोती.."

वराची मिरवणूक बैलजोड गाडीतून काढण्यात आली, आणि डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी पाच सुवासिनींसह औक्षण आणि पदप्रक्षालन करून स्वागत केले. सुमारे ३,००० हून अधिक लोक आणि ५० गावांचे प्रतिनिधी या सोहळ्याचे साक्षीदार ठरले. वधू-वराने एकमेकांना हार घालून पवित्र बंधनात अडकले. आई-वडील म्हणून डॉ. कोल्हे दांपत्यांनी भावनिक क्षणी आपल्या लाडक्या लेकीचा कन्यादानाचा संस्कार पूर्ण केला. भारतीय परंपरेनुसार परदेशी पाहुण्यांनी भारतीय पोशाख परिधान करून आपल्या संस्कृतीबद्दल आदर व्यक्त केला. तीन दिवसांच्या या सोहळ्यात संपूर्ण दावसा गाव रोषणाईने उजळून निघाले.

वधूचे आजी-आजोबा डॉ. मारोतराव कोल्हे व सौ. शकुंतला कोल्हे, तसेच श्री. परशुरामजी भांगे व सौ. पुष्पा भांगे यांनी नवदाम्पत्याला आशीर्वाद दिला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. महेश कळंबे, श्री. विठ्ठल कोल्हे, श्री. अल्पेश खोब्रागडे,  श्री. सोमेश भांगे, श्री. देवीदास सावरकर, श्री. आकाश नेहारे, सतीश कुशराम, श्री. बाबू सावरकर, श्री. नरेश पिसाट, आणि श्री. अवधूत देसाई, अनिल गुहेर, सोनू यांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे. श्री योगेश भाऊ भोसे यांनी जे बी. फार्म वर पाहुण्याचं मनसोक्त स्वागत केले,  तसेच श्री सती अनुसया माता भक्त निवास पारडसिंगा येथे शेकडो पाहुण्यांचे निवास सोय झाली. या सर्वांचे स्वागत आहे. 

शेवटी, वधूच्या पाठवणीचा क्षण सर्वांच्या डोळ्यांत पाणी आणणारा ठरला. आई डॉ. प्रेरणा कोल्हे म्हणाल्या, “सोनपावलांनी आमच्या आयुष्यात आलेली आमची जाह्नवी म्हणजे साक्षात लक्ष्मीच आहे. आता हीच लक्ष्मी सासरी जाऊन ते घर मंगलमय करणार यात शंकाच नाही.” वडील डॉ. राजकुमार कोल्हे यांनीही निशब्दपणे लेकीला आलिंगन देऊन भावूक निरोप दिला. नवरदेव श्री. रोहित राजगुरू यांनी हातात हात घेऊन आयुष्यभर विश्वास आणि प्रेम टिकवण्याचे वचन दिले.

"दाटून कंठ येतो, ओठात येई गाणे, जा आपुल्या घरी जा, लाडके सुखाने..."

या गीताच्या सुरात कोल्हे परिवाराने आपल्या लेकीला सासरी पाठवले. दुसऱ्या दिवशी हळद उतरविण्याचा कार्यक्रम आणि विविध खेळांचा आनंदोत्सव साजरा झाला, ज्यात सर्वांनी मनसोक्त आनंद लुटला.

प्रवासी महिलेची सोन्याचे दागिने असलेली बॅग घेवुन पसार झालेल्या रिक्षा चालकांस गुन्हे शाखा घटक-३ पोलीसांनी केले २४ तासात जेरबंद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : दि. ३०/१०/२०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवाशी असणाऱ्या सौ. बालीका बाळकृष्ण गवस (वय: ५६ वर्षे) धंदा: गृहीणी, मुळ गाव: मुळ झरे बांबर, पोष्ट: दोडा मार्ग, जिल्हा- सिंधुदुर्ग या दिपावली सणानिमित्त टाटा पॉवर, कल्याण (पुर्व) व स्टार कॉलनी, डोंबिवली (पूर्व) येथे राहणाऱ्या आपल्या दोन्ही मुलींकडे फराळाचे सामान घेवुन भेटण्याकरीता आल्या होत्या.

सदर प्रवासी महिला या स्टार कॉलनी डोंबिवली (पूर्व) येथील मुलीस भेटुन दि. ३१/१०/२०२५ रोजी दुपारी ०४:०० वाजण्याच्या  सुमारास त्या त्यांच्या टाटा पॉवर कल्याण (पुर्व) येथे राहणाऱ्या दुसऱ्या मुलीस भेटण्याकरीता स्टार कॉलनी, डोंबिवली (पूर्व) येथुन प्रवासी रिक्षा पकडुन जात असताना त्यांनी रिक्षात बसल्यानंतर त्यांच्या गळ्यातील ०३ तोळे वजनाचे सोन्याचे मणी मंगळसुत्र त्यांच्याकडील बॅगेत ठेवले होते. त्यांनतर त्या पिसवली येथील पिंगारा बारच्या समोर पोहचल्या असता रिक्षातुन खाली उतरून रिक्षा चालकाचे भाडे दिल्यानंतर त्या आपल्या मुलीची वाट पाहत उभ्या असताना रिक्षा चालक बॅगसह निघुन गेला. त्यानंतर काही वेळाने प्रवासी महिलेच्या लक्षात आले की, सोबत घेवुन आलेल्या व रिक्षामध्ये ठेवल्या दोन बॅगा त्यापैकी काळया रंगाच्या बॅगेत ०३ तोळे वजनाचे सोन्याचे मणी मंगळसुत्र असलेली बॅग सहीत दुसरी बॅग अशा ०२ बॅगा ह्या रिक्षावाला घेवुन गेला असल्याचे त्यांचे लक्षात आले. त्यांनतर काही वेळात प्रवासी महिलेची मुलगी त्यांना घेण्याकरीता आली तेव्हा त्यांनी सदरची हकिगत आपल्या मुलीस सांगितली. त्यांनतर प्रवासी महिला व तिच्या मुलीने रिक्षाचा शोध घेतला पंरतु सदर रिक्षा आढळुन आली नाही. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, त्या रिक्षामध्ये गळ्यातुन काळ्या रंगाच्या बॅगेत ठेवलेले ०३ तोळे वजनाचे सोन्याचे मणी मंगळसुत्र तसेच कपड्याच्या दोन बॅगा ह्या रिक्षात ठेवलेले असल्याचे रिक्षा चालक यांस माहिती असताना सदरच्या बॅगा ह्या रिक्षा चालक पळवून घेवुन गेला आहे.

त्यांनतर सदर प्रवासी महिला व तीचा जावई योगेश सावंत यांनी सदरबाबत गुन्हे शाखा, घटक-०३ कल्याण कडील पोलीस अधिकारी व अमंलदार यांना माहिती दिली असता पोलीसांनी सी.सी टि.व्ही फुटेजची पाहणी केली असता सदर रिक्षाचा नंबर MH05/CP-3343 असा असल्याचे समजले त्यानंतर पोलीसांनी सदर रिक्षा व रिक्षा चालकाचा शोध घेतला असता तो पोलीसांना सापडल्याने सदर प्रवासी महिलेस गुन्हे शाखा घटक-०३ कल्याण येथे बोलाविण्यात आले. त्याप्रमाणे त्या हजर झाल्या असता सदर प्रवासी महिलेस रिक्षाचालक नामे जयेश वसंत गौतम (वय: ३२ वर्षे) धंदा: रिक्षा चालक राहणार: पटवा चाळ, रूम नंबर ०२, गणेशवाडी, टिटावाळा मांडा रोड, टिटवाळा, ता. कल्याण यांस बॅगेत ठेवलेले ०३ तोळे वजनाचे सोन्याचे मणी मंगळसुत्र दाखविले असता सदरचे दागिने व रिक्षा चालक तोच असल्याचे पोलीसांना ओळखुन सागितले.

तरी गुन्हे शाखा, घटक-०३ कल्याण कडील पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवाशी असणाऱ्या सौ. बालीका बाळकृष्ण गवस या प्रवासी महिलेचे चोरीस गेलेले ३,६०,०००/- रूपये ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसुत्र व आरोपी रिक्षा चालक तसेच त्याचे ताब्यातील रिक्षा असा एकूण ५,२१,५५०/- रू किंमतीचा मुदद्देमाल हस्तगत करून रिक्षा चालकांस २४ तासात जेरबंद करून त्याच्या विरूध्द मानपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कामगिरी मा. श्री आशुतोष डुंबरे पोलीस आयुक्त ठाणे शहर, मा. श्री. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, मा. श्री. अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे व मा. श्री. शेखर बागडे, सहा पोलीस आयुक्त, (शोध-१) गुन्हे ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजित शिंदे, सपोनि. सर्जेराव पाटील, बळवंत भराडे, पोउपनि. किरण भिसे, विनोद पाटील, पोलीस अंमलदार दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे, अदिक जाधव, सुधीर कदम, सचिन भालेराव, पांडुरंग भांगरे, सचिन कदम, विजय जिरे, विलास कडु, गोरखनाथ पोटे, प्रशांत वानखेडे, उल्हास खंदारे, दिपक महाजन, प्रविण किनरे, गुरूनाथ जरग, विनोद चन्ने, मिथुन राठोड, गोरक्ष शेकडे, सतिश सोनवणे, गणेश हरणे, जालिंदर साळुंखे, मंगल गावित, चालक अमोल बोरकर यांचे पथकाने यशस्वीपणे केलेली आहे.

डोंबिवलीत अवैध ऑनलाईन लॉटरीचा धंदा पोलीसांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे जोमात सुरु..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : राज्यात ऑनलाईन लॉटरीवर कायदेशीर बंदी असतानाही, डोंबिवलीतील राम नगर, टिळक नगर, विष्णू नगर, मानपाडा, कल्याण परिमंडळ-३ पोलीस स्टेशनच्या हद्दीत खुलेआम अवैध ऑनलाईन लॉटरी सेंटर सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राम नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत लॉटरी सेंटर गेल्या महिन्यात २७ ऑक्टोबर २०२५ पासून सुरु झाले असूनही राम नगर पोलीसांना याची काहीच माहिती नाही असे होऊ शकत नाही. हे अवैध ऑनलाईन लॉटरी सेंटर दिवसरात्र चालू आहे. अनेक गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होत असून त्यांची कुटुंबे हलाकी आणि हालपेष्टाचे दिवस काढत आहेत. हे अवैध ऑनलाईन लॉटरी सेंटर आहुजा, भानुशाली नावाच्या व्यक्ती चालवत असल्याची माहिती समोर आली आहे.


राम नगर पोलीसांच्या नाकावर टिच्चून हा अवैध व्यवसाय सुरू आहे. रामनगर डोंबिवली पोलीसांच्या हद्दीत हा प्रकार घडत असूनही, पोलीसांना याची साधी कल्पना हि नाही हे होऊच शकत नाही असा डोंबिवलीकर नागरिकांचा समाज आहे. या अवैध ऑनलाईन लॉटरी सेंटर बाबत राम नगर पोलीसांना विचारणा केली असता ते माहिती घेऊन कळवतो असे उत्तर थातूरमातूर देत आहेत. तसेच ठाणे, कल्याण पोलीस कंट्रोल कडून माहिती घेतली असता त्यांनाही या लॉटरीबाबत काहीही माहिती नाही असे सांगण्यात आले.

टिळक नगर, विष्णू नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुद्धा खुलेआम अवैध ऑनलाईन लॉटरी सेंटर दिवसरात्र सुरु आहेत. एकीकडे शासन ऑनलाईन लॉटरी आणि जुगारावर बंदी घालून सर्वसामान्यांची फसवणूक थांबवण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे डोंबिवलीतील स्थानिक पोलीस स्टेशन कोणतीही कारवाई करत नसल्याने पोलीसांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दिवसरात्र चालणाऱ्या या लॉटरीच्या नादात अनेक तरुण, नोकरदार, बिगारी काम करणारे, नशेच्या आहारी गेलेली लोकं कमी वेळेत जास्त पैसे कमावण्याच्या आमिषाला बळी पडून आपली कष्टाची कमाई या जुगारात गमावत आहेत. याचा थेट परिणाम त्यांच्या कौटुंबिक जीवनावर होत असून, अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत.

त्यामुळे या गंभीर प्रकाराकडे पोलीस आयुक्त, पोलीस उप-आयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त आणि स्थानिक वरिष्ठ पोलीसांनी तातडीने लक्ष घालून, या अवैध लॉटरी सेंटर चालवणाऱ्या चालक मालकांवरती ताबडतोब कठोर कारवाई करावी तसेच यामागे वरदहस्त असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचीही चौकशी करून, दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी डोंबिवलीकर नागरिकांकडून जोर धरत आहे.

महाराष्ट्र ऑप्थाल्मॉलॉजिस्ट सोसायटी (MOS) संघाच्या अध्यक्षा डॉ. अनघा हेरूर यांचे कार्बाइड गन (Carbide Gun) वर तात्काळ बंदी घालण्याचे आवाहन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : 'अनिल आय हॉस्पिटल'च्या संचालिका आणि महाराष्ट्र ऑप्थाल्मॉलॉजिस्ट सोसायटी (MOS) च्या अध्यक्षा डॉ. अनघा हेरूर यांनी कार्बाइड गन आणि स्फोटक फटाके यांचा वापर तात्काळ थांबवावा, असे आवाहन केले आहे. या कार्बाइड गनमुळे देशभरात अचानक नेत्र अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. AIOS (ऑल इंडिया ऑप्थाल्मोलॉजिकल सोसायटी) च्या अहवालानुसार भोपालमध्ये १५० हून अधिक मुले जखमी झाली आणि काहींनी दृष्टी गमावली. मध्य प्रदेश, चंदीगड आणि पुणे येथे सुद्धा अशाच घटना नोंदल्या गेल्या ज्यात बहुतेक लहान मुले बळी ठरली. कॅल्शियम कार्बाइड आणि पाण्याच्या मिश्रणातून तयार होणारी ही कार्बाइड गन धोकादायक गॅस उत्पन्न करते ज्यामुळे डोळ्यांना गंभीर इजा, दृष्टी गमावणे आणि चेहऱ्याचे विकृतीकरण होऊ शकते.



डॉ. अनघा हेरूर म्हणाल्या,“ही खेळणी नाहीत, ही तर रासायनिक स्फोटके आहेत जी काही क्षणांत डोळ्यांचे नुकसान करू शकतात. सण आनंदाचा असावा, दुःखाचा नव्हे. सरकारने यावर पूर्ण बंदी आणावी आणि विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.” MOS (महाराष्ट्र ऑप्थाल्मॉलॉजिस्ट सोसायटी) ने AIOS (ऑल इंडिया ऑप्थाल्मॉलॉजिस्ट सोसायटी)च्या लोकजागृती मोहीम, कायदेशीर कारवाई आणि रुग्णालयांच्या तयारीबाबतच्या आवाहनाला समर्थन दिले आहे. नुकतीच दिवाळी आणि छटपूजा सण संपून ख्रिसमस आणि नववर्ष हे सण जवळ आल्याने MOS कडून सर्वांना विशेषतः पालकांना, शाळा प्रशासन यांना अशा धोकादायक वस्तूंचा वापर टाळावा आणि मुलांना त्यापासून दूर ठेवावे “दिवाळी संपली असली तरी सणांचा मौसम अजून सुरू आहे. आता एका डोळ्याचे सुद्धा नुकसान होऊ देऊ नका. प्रकाशाचा सण अंधाराचा कारण होऊ नये.”
 असे आवाहन MOS संघटनेच्या अध्यक्षा डॉ. अनघा हेरूर यांच्या कडून करण्यात आले आहे.
AIOS (ऑल इंडिया ऑप्थाल्मॉलॉजिस्ट सोसायटी)
आणि MOS (महाराष्ट्र ऑप्थाल्मॉलॉजिस्ट सोसायटी)
यांचे एकत्रित आवाहन केले आहे  कि कार्बाइड गनवर बंदी घाला, प्रत्येक डोळा आणि प्रत्येक मुलाचे संरक्षण करा.

डोंबिवलीच्या डॉ. अनघा हेरूर यांची महाराष्ट्र नेत्रतज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ आणि अनिल आय हॉस्पिटलच्या वैद्यकीय संचालक डॉ. अनघा हेरूर यांची नुकतीच महाराष्ट्र ऑप्थाल्मॉलॉजिस्ट सोसायटी (एमओएस) या भारतातील सर्वात मोठी नेत्रतज्ज्ञांची संघटनेच्या अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील नेत्ररोग क्षेत्राची नवी उंची गाठली जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
३५ वर्षांची अखंड रुग्णसेवा आणि नेतृत्व

डॉ. अनघा हेरूर या गेली ३५ वर्षे नेत्ररोग क्षेत्रात रुग्णसेवेत कार्यरत आहेत. त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली 'अनिल आय हॉस्पिटल'ने डोंबिवली, ठाणे, कल्याण, पलावा आणि बदलापूर येथे सात सुपरस्पेशालिटी नेत्ररुग्णालयांचा विस्तार साधला असून, संस्था यावर्षी ५३ वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण करत आहे.

त्यांनी आजवर लाखो रुग्णांना नेत्रारोग्य सेवा दिली असून मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिनाचे आजार, लेसिक शस्त्रक्रिया व इतर नेत्रशस्त्रक्रियांमध्ये त्यांना विशेष प्राविण्य आहे. त्यांच्या कुशल हातून असंख्य रुग्णांना पुन्हा स्पष्ट दृष्टी लाभली आहे.

पुरस्कार व गौरव!

नेत्ररोग क्षेत्रातील उत्कृष्टता, सामाजिक बांधिलकी आणि नेतृत्व या तिन्ही गोष्टींचा सुंदर संगम डॉ. अनघा हेरूर यांच्या कार्यात दिसून येतो. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झाले आहेत.
🏅 प्रमुख पुरस्कार आणि सन्मान:

Bhishagvarya Award – The Best Doctor
Doctor of the Year Award – IMA
Ishwarchandra Award – MOSCON
Hargobind Mishra IIRSI Gold Medal – Gwalior
Albal Oration Award – Solapur, 2025
RJK Singh Community Ophthalmology Award
Tejaswini Award
Dombivli Bhushan Puraskar
Adarsh Dombivilikar Award
Navdurga Puraskar
Stree Sanman Puraskar (मार्च 2023)
Woman Ophthalmologist of the Year – Hyderabad, 2023
Business Leader Award
Role Model of the Year – Noida
Best Surgical Video Award – Rajasthan Ophthalmological Conference, 2018
Best Surgical Skills Award – Women’s Ophthalmological Society, 2018
Best Scientific Team Presentation – WOS, Bengaluru, 2019
Winner – Best Surgical Video (Challenging Cases) – ROSCON, 2019
Gold Medal – IBeach Film Festival

हे पुरस्कार केवळ त्यांच्या व्यावसायिक कौशल्याचे नव्हे, तर त्यांचा दृष्टीकोन, समर्पण आणि नेतृत्वगुणांचेही प्रतीक आहेत.

महिला सक्षमीकरण व समाजसेवा

डॉ. अनघा हेरूर यांना महिला सक्षमीकरण आणि सामाजिक उत्तरदायित्व यावर प्रगाढ विश्वास आहे. त्या अनेक आरोग्य जनजागृती उपक्रमांद्वारे समाजसेवेचे कार्य सातत्याने करत आहेत आणि अनेक महिला डॉक्टर्स व तरुणींसाठी प्रेरणादायी ठरल्या आहेत.

अध्यक्षा म्हणून दृष्टीकोन – “Unite, Illuminate, Innovate”

MOS च्या अध्यक्ष म्हणून डॉ. अनघा हेरूर यांनी या वर्षासाठी थीम जाहीर केली आहे —
“Unite, Illuminate, Innovate”*
त्यांचा दृष्टीकोन — *“One Vision, One Mission, One MOS.”

त्या महाराष्ट्रातील सर्व नेत्रतज्ज्ञांना एकत्र आणून अभ्यास, संशोधन, आणि उत्कृष्ट रुग्णसेवा यांचे केंद्र तयार करण्याचा संकल्प बाळगतात.

नवीन उपक्रम – रुग्ण व डॉक्टरांसाठी

अध्यक्षा म्हणून डॉ. अनघा हेरूर यांनी काही महत्त्वाचे सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम सुरू केले आहेत —

👁️🗨️ डायबेटिक आय अवेअरनेस वॉक – डोंबिवली
१६ नोव्हेंबर रोजी डोंबिवली येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठा 'डायबेटिक आय अवेअरनेस वॉक' आयोजित केला जात आहे.
या उपक्रमाचा उद्देश आहे — “डायबेटिसमुळे होणारे अंधत्व टाळूया.”

👶 Bright Eyes – बाल सृष्टी अभियान
राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी नेत्र तपासणी आणि दृष्टिजागर कार्यक्रमाचे आयोजन.
“आपल्या पुढच्या पिढीची दृष्टी सुरक्षित ठेवूया.” हा यामागील हेतू आहे.

🎓 तरुण नेत्रतज्ज्ञांसाठी ऍकॅडमिक प्रोग्राम्स..
MOS च्या माध्यमातून तरुण डॉक्टर्ससाठी अत्याधुनिक शैक्षणिक आणि संशोधन संधी निर्माण केल्या जातील, ज्यामुळे महाराष्ट्रातील नेत्रवैद्यक क्षेत्र जागतिक दर्जावर पोहोचेल.

महाराष्ट्रात नेत्रसेवा उच्च दर्जावर

डॉ. अनघा हेरूर यांचे ध्येय आहे की राज्यातील प्रत्येक नागरिकाला आधुनिक, सुलभ आणि दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध व्हावी. त्यांच्या मते, “नेत्रसेवा ही केवळ वैद्यकीय जबाबदारी नाही, ती मानवी सेवेचे सर्वोच्च रूप आहे.”

अंतिम संदेश

“असेल दृष्टी, तर पाहू सृष्टी!”
या विश्वासाने प्रेरित होत,
डॉ. अनघा हेरूर MOS च्या माध्यमातून महाराष्ट्रात नेत्रस्वास्थ्याचे नवे युग सुरू करत आहेत. जिथे प्रत्येक नेत्रतज्ज्ञ एकत्र, प्रत्येक रुग्ण सुरक्षित, आणि प्रत्येक दृष्टी उजळलेली असेल.