एक दिवा अवयव दानाचा
एखाद्याला आयुष्याची भेट देणे किंवा इतरांना जगण्यासाठी मदत करण म्हणजे दान होय. दान हे नेहमी सत्पात्री व गरज असणा-या व्यक्तिंना दिले पाहिजे. कर्णाने दिलेले कवच कुंडलाचे दान, शिबि राजाने कबुतराचे प्राण वाचविण्यासाठी आपल्या अंगावरचे मांस काढून दिले. धर्म ग्रंथानुसार प्रत्येक व्यक्तीने आपल्या सामर्थ्यानुसार दान केले पाहिजे. प्रामाणिकपणे, शुध्द अंतःकरणाने दिलेले दान उपयुक्त ठरते.
वय,जात,रंग किंवा धर्म यातील समानतेचे दान म्हणजेच अवयवदान. ज्या रूग्णांचे अवयव कायम स्वरूपी निकामी झालेले असतात. अशा अनेक रूग्णांसाठी अवयवदान नवसंजीवनी देऊ शकते.
डोळे,यकृत,हृदय,फुफ्फुस, स्वादुपिंड, आतडे,मूत्रपिंड, रक्तवाहिन्या,त्वचा,हाडे,हृदयाच्या झडपा,नसा, काॅर्निया,कानाचे ड्रम या अवयवांचे 6 ते 72 तासात पुनरोपण होते.एक दाता निरोगी अवयवाने आठ जणांचे जीव वाचवू शकतो.
भारतात प्रत्येक वर्षी 3 आँगष्ट रोजी शासकीय आणि निमसरकारी संस्था मध्ये अवयवदान दिन साजरा केला जातो.तामिळनाडू,महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ,दिल्ली, पंजाब ही देशातील सर्वाधिक अवयवदान देणारी राज्य आहेत. एखादा रस्ता अपघात झाल्यास केवळ इस्पितळात मृत्यू पावलेल्यांच्या शरीराचे अवयव दान करता येते. कर्करोग,एड्स, संसर्ग किंवा कोणत्याही गंभीर आजाराने ग्रस्त लोक अवयव देऊ शकत नाहीत. अवयवदान ही प्रक्रिया एखादी व्यक्ती जिवंत असताना किंवा तिच्या उत्तराधिका-यांच्या संमतीने ती मृत्यू पावल्यावर केली जाते. भारतात अवयवदान प्रक्रिया केंद्र सरकारच्या कायद्यानुसार पार पडते. अवयवदानासाठी केंद्र सरकारची नॅशनल ऑर्गन आणि टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन ही संस्था काम करते. या संस्थेच्या www.notto.nic.in या सर्वोच्च संकेतस्थळावर स्वेच्छेने अवयवदाता म्हणून नोंद करता येते. 18 वर्षावरील कोणतीही व्यक्ती आपल्या मर्जीने अवयवदान करू शकते. अवयवदान करताना पैसे घेणे कायद्याने गुन्हा आहे. त्यासाठी 1 ते 2 वर्षाची शिक्षा तर 5 लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो.
जिवंत असताना आपण एक किडनी,स्वादुपिंडाचा तुकडा आणि यकृताचा एक छोटा भाग दान करू शकतो. याला स्वॅप ट्रान्सप्लांट म्हटले जाते म्हणजेच दोन विविध कुटुंबातील व्यक्तींमध्ये करण्यात आलेले अवयवदान. ट्रान्सप्लांट ऑफ ह्युमन ऑर्गन ॲक्ट 1994 नुसार स्वॅप ट्रान्सप्लांटला कायदेशीर मान्यता आहे. अवयव प्रत्यारोपण यशस्वी होण्यासाठी रक्त आणि ऊती जुळाव्या लागतात.
विविध आघात,अपघात ,युध्द, आगी विविध कारणांमुळे अवयवदानाची आवश्यकता भासते. त्वचादान करण्यासाठी भारतात पहिली त्वचापेढी मुंबईच्या लोकमान्य टिळक रूग्णालयात 2000 साली सुरू झाली. घरी मृत्यू झालेल्या व्यक्तीचे सहा तासांपर्यंत डोळे व त्वचा यांचे दान करता येते. गरजू रुग्णाचे वय,रक्तगट, त्याच्या आजाराची तीव्रता,प्रतिक्षा यादीनुसार सर्वाधिक गरजू रुग्णाला अवयव दान केला जातो. परस्परांचे नाव व पत्ता गोपनीय ठेवला जातो.
देहदान केल्यास मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी उपयोगात येतो. मृतव्यक्तित हृदयक्रिया बंद पडल्याने नेत्र आणि त्वचा वगळता इतर अवयवांना रक्त पुरवठा थांबल्याने हे अवयव प्रतिरोपणासाठी बाद ठरतात.
अपघाताने डोक्याला मार लागल्याने मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने अथवा मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर एखादया व्यक्तिची चेतना व श्वासोच्छ्वास कायमस्वरूपी बंद झाल्यास त्या व्यक्तिचा मस्तिष्क स्तंभ (ब्रेन डेड) झाल्याने त्या व्यक्तिचे नेत्र,यकृत,हृदय, फुफ्फुस, स्वादुपिंड, आतडे,मूत्रपिंड, त्वचा,हृदयाच्या झडपा,कानाचे ड्रम या अवयवांचे दान होऊ शकते. भारतामध्ये मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा 1994 नुसार मस्तिष्क स्तंभ मृत्यू व अवयवदान या गोष्टींना मान्यता दिली आहे. अवयव काढल्यानंतर त्याचे शरीर सन्मानपूर्वक नातेवाईकांना अंतिमविधिकरीता परत केले जाते.
अवयवदानाला संमती दिल्यानंतर त्यासाठी करण्यात येणा-या चाचण्यांचा तसेच इतर वैद्यकीय खर्च मृताच्या नातेवाईकांना करावा लागत नाही. व्यक्ति मृत झाली तरी त्याचे डोळे दोन ते सहा दृष्टीहीनांना नवजीवन देण्याचे महानकार्य करतात. आपल्या अवयवदानाची माहिती जवळच्या नातेवाईकांना देणे अत्यावश्यक आहे. त्यांच्या संमतीनेच अवयवदानाचे महानकार्य पूर्णत्वास जाऊ शकते. प्रत्येकाने संकल्पपूर्वक कटिबद्ध होऊन अवयवदानरुपी दिव्याने गरजू रूग्णांच्या आयुष्याला तेजोमय करूया.
जय हिंद!
आपली नम्र,
पवई,मुंबई.