Responsive Adsense
आई म्हणजे आत्मा आणि ईश्वर असे म्हटले जाते. आई हा शब्द उच्चारला की मनात वात्सल्याचा पाझर फुटतो. ती प्रत्येकाच्या जीवनातील वरदान आहे. असे असताना समाजात घडणाऱ्या विपरीत घटनांना नेहमीच प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे संबंधितांच्या आईला जबाबदार धरले जाते.
जेव्हा परिसरात ८ व्या महिन्यात गर्भपात केलेले तेही मुलगा असलेले अर्भक गटारात फेकलेले आढळते तेव्हा संवेदनशील मनाला यातना होतात आणि आश्चर्यही वाटते. एकीकडे महिलांवर बलात्कार होतात तर दुसरीकडे महिला कशा वागतात? याचा विचार करून आपल्या पैकीच एका स्त्रीच्या क्रूर कृत्याची लाज वाटते. आधुनिकतेकडे आकर्षित होणाऱ्यांनी या घटनांचे दुष्परिणाम गांभिर्याने लक्षात घेतले पाहिजेत. समाजात कुमारी मातांचेही प्रमाण वाढत आहे. एक हात कमरेत आणि दुसऱ्या हाताने सिगारेटचा धूर हवेत सोडणारा, एक हात खांद्यावर आणि दुसऱ्या हाताने दारूचा पेग घेणारा प्रियकर मुलींना लयभारी वाटतो. कारण मुलीने बापालाअगोदरच प्रेम प्रकरणातील खलनायक ठरविलेला असतो. आईला नेहमी प्रमाणे गृहीत धरले जाते. आई होणे खरच इतक सोप आहे का? आईपणा बरोबर मुलांचे संस्कार , संगोपन , सुरक्षिततेची जबाबदारी तिला पेलवायची असते. आई होण्याची चाहूल लागते तेव्हा स्त्री आनंदाने भारावून जाते. त्याच बरोबर शरीरात होणाऱ्या बदलांनी अंतर्बाहय हेलावून जाते. गर्भधारणे पासून प्रसूती पर्यंतच्या वेदना ती निमूटपणे स्विकारते कारण तिला मूल केव्हा होणार? या प्रश्नाने आप्त-स्वकीयांनी भंडावून सोडलेले असते. त्यांची तोंड तात्पुरती बंद झालेली असतात. मातृत्वाच्या उंबरठ्यावर उभी असलेल्या स्त्रीला सतत आपल्याला होणारे बाळ कसे असेल? कसे दिसेल? प्रसूती व्यवस्थित होईल का? मला त्रास झाला तरी चालेल पण माझे बाळ निरोगी जन्माला यावे अशी तिची माफक इच्छा असते. तिच्यासाठी तो आनंददायी व अविस्मरणीय क्षण असतो. प्रसूती होईपर्यंत सर्वांनाच मुलगा की मुलगी होणार याबद्दल उत्सुकता असते. आपल्या देशात अजूनही लिंग भेदाला सामोरे जावे लागते. पहिली मुलगी जन्माला आली किंवा सर्व मुलीच असलेल्या स्त्रीला समाजात टोमणे ऐकावे लागतात. त्यापेक्षा भयंकर स्थिती तृतीयपंथी, दिव्यांग मूल जन्माला आलेल्या आईची असते. आई मुलांमध्ये भेदभाव करू शकत नाही.अजूनही तृतीयपंथी आणि दिव्यांग मुलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन दूषित आहे. त्यांना योग्य न्याय देताना आईला कौटुंबिक आणि सामाजिक कोंडीही सहन करावी लागते.
सर्वसामान्य मुलांच्या लैंगिक विकासाच्या दृष्टीने विषय, प्रकल्प असतात . परंतु असामान्य मुलांच्या विकासाच्या दृष्टीने अजूनही जनजागृती होणे अत्यावश्यक आहे. अशा मुलांकरीता आई ही दिपस्तंभ असते. स्वतःला विसरून तिला या मुलांच्या शारिरिक, मानसिक , बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी त्यांच्या भविष्याकरीता तारेवरची कसरत करावी लागते. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करूनही आज देशात विविध क्षेत्रात मेहनतीने, प्रामाणिकपणे ही मुले नेतृत्व करीत आहेत. त्यासाठी आईने प्राथमिक शरीरशास्त्रा पासून सुरूवात करून व्यापक अर्थाने जीवन शिक्षणा पर्यंत मेहनत घेतलेली असते. याउलट निसर्गाने कृपा केलेली स्मार्ट मुले आज भरकटलेली दिसतात. विविध माध्यमांमुळे मुलांमध्ये लैंगिक जाणिवा विकसित होत आहेत. मुलांना लवकर येणारी समज हा सर्वसामान्य पालकांसाठी चिंतेचा विषय आहे. विधि आयोगाच्या सहमतीने लैंगिक संबंध ठेवण्याच्या किमान वयोमर्यादे बाबत केंद्राकडून सूचना मागविल्या आहेत. सद्या ही वयोमर्यादा १८ वर्षे आहे ती १६ वर्षे करावी अशी मागणी जोर धरत आहे. विधि आयोगाने महिला आणि बालविकास मंत्रालयाकडेही त्यांचे मत मागितले आहे. तर दुसरीकडे प्रसूती दरम्यान माता व बालकांचे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी बालविवाह हा गुन्हा असा विरोधाभास पहायला मिळतो. यामध्ये प्रत्यक्ष दुष्परिणाम सहन करावे लागतात ते स्त्रीला. त्यामुळे वयात येणाऱ्या मुलीच्या संगोपना सोबत तिच्या संरक्षणाची आणि समुपदेशनाची भूमिका आईलाच निभवावी लागते. मुलगी वयात येते तेव्हा आई काळजीपोटी तिला राहण्याच्या सहलीला जाणे, मुलांसोबत खेळणे, पोहणे, पाय पसरून बसणे, अनोळख्या ठिकाणी जाण बंद करायची. शरीरा विषयी बोलणे घरामध्ये मान्य नव्हते . परंतू आता मुलीला अस्वस्थ करणारे, बुचकळ्यात टाकणारे, विचारात पाडणारे किंवा उध्वस्त करणारे अनेक अनुभव, प्रसंग, व्यक्ती तुझ्या आयुष्यात येऊ शकतील त्यांच्यापासून सावध रहा अशी सांगणारी अल्पशिक्षित आई आधुनिक मुलींना मागासलेल्या विचारांची वाटते.
शारीरिक दृष्ट्या स्री पुरूषां पेक्षा जास्त बळकट असते. सारख्याच परिस्थितीत वाढविल्यास मुली मुलांपेक्षा सहनशील असतात आणि जास्त वेदना सहन करू शकतात . जास्त खंबीरपणे आयुष्याशी सामना देऊ शकतात . वयात येताना मुलींची मानसिक अवस्था नाजूक हळवी होते. त्यांना मुलांबद्दल खूप आकर्षण वाटू लागते. मुलांच लक्ष वेधून घ्याव, सिनेमे पहावेत, शरीराचा सारखा विचार करावा, त्याविषयी बोलावे अशा सारख्या प्रवृत्ती या वयात मुलींमध्ये उफाळून येतात. व काही मुली खुप टोकाच वागतात. निसर्गाने दिलेल्या शक्तीचा गैरवापर न करता तिचा आदर राखायला आपल्याला जी शिकवते तिलाच संस्कृती म्हणतात .
वयात येताना आईशी मुलीचे संबंध अगदी मोकळेपणाचे हवेत आणि ती जे सांगेल ते आपल्या हिताचेच असेल असा विश्वासही हवा. सुमारे अठरा वर्षाच्या आसपास तिचे शरीर आईपणास समर्थ होते. त्यापूर्वी मुल होण म्हणजे तिला बाळंतपणाचा धोका, तिच्या मुलपणावर बंधन आणि पुढे जन्मणार मुल कितपत सशक्त असेल या विषयीही शंका म्हणून तर आपल्या शासनाने, कायदयाने मुलीच्या लग्नाच किमान वय अठरा वर्षे ठरवलेले आहे. ती अट खुद्द मुलीच्या, कुटुंबाच्या आणि समाजाच्याही हिताचीच आहे. आज शहरांमध्ये चांगल्या प्रतिष्ठित वस्त्यांमध्ये, रस्त्यांवर, कचरा कुंड्यांच्या आसपास, गटारात मासिक पाळीच्या रक्ताळलेल्या घड्या खुशाल भिरकावून देतात. त्याच प्रमाणे रक्तामासाचं अर्भक फेकून देण्याचा कल वाढलेला आहे. याला काय सुसंस्कृतपणा म्हणतात? घरातील पाळीव प्राण्याचा मृत्यू झाला तरी त्याला विधिपूर्वक दफन केले जाते.
इंग्रजी चित्रपट, मासिक , कथा कादंबऱ्या मधिल अवास्तव चित्रणाने शरीराची व मनाची गरज टोकाला गेल्याने कामेच्छा पूर्ण करण्यासाठी अचाट आणि अफाट कल्पनांमुळे उत्तेजित होणाऱ्या मुलांपेक्षा मुली जास्त भावनाप्रधान असतात या सर्वसामान्य प्रवृत्ती आहेत. परंतू आपल्याला माणसा सारख किमान सुसंस्कृत, विचारी, समतोल आयुष्य जगायच आहे इतपत भान युवक युवतींना शाळा महाविद्यालयातील शिक्षणाने येणार नसेल तर ते ज्ञान काय कामाचे? अर्थात मुलामुलींनी एकत्र वावरण्यात काहीच धोका नाही . मग एकत्र जगायच असेल तर पुरेशा माहितीनिशी, पुरेशा खबरदारीनिशी का जगू नये? पालकांना मित्र मैत्रीणीं सोबत सहलीला जातो, गणपती, नवरात्री सारख्या मंगल प्रसंगी फिरायला जातो अस खोट सांगून त्यांचा विश्वासघात करताना हल्लीच्या तरूणाईला काहीच वाटत नाही ? अजूनही आम्ही शिक्षणाने माणूस समृद्ध होतो या भ्रमात आहोत असे वाटते. यांना जिवशास्त्र शिकवल जीवनशास्त्र कोण शिकवणार? त्रिकोण , चौकोन, षटकोना पेक्षा महत्वाचा आहे आयुष्याचा दृष्टिकोन. विपरीत परिस्थितीतही जपणूक केली पाहिजे तत्वांची कारण व्याकरणा पेक्षाही अंतःकरणाची भाषा असते महत्त्वाची. लेकराला पाॕकेटमनी, बाईक अन भलेही दिली जरी कार किती छान झाल असत जर दिले असते संस्कार अशा आशयाची वाचनात आलेली कविता ह्याला आयुष्य म्हणाव काय? ही अशा प्रसंगी तंतोतंत पटते.
या वागण्याला केवळ तरूणाईला दोष देऊनही प्रश्न सुटणार नाहीत कारण लिव्ह इन रिलेशनशीपच फॕड वैवाहिक जीवनाचा आस्वाद घेतलेल्या दोन मुले असणाऱ्या जोडप्यां मध्येही वाढत आहे. आपल्याला अनेकदा भूक लागते आणि अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ आपल्या आसपास असतात. पण म्हणून काही दर भुकेला चोरून , बळजबरीने किंवा दुसऱ्यापुढच अन्न ओढून आपण आपल्या पोटाची तरतूद करत नाही . तर आपली भूक आटोक्यात रहावी आणि सन्मानाने भागवता यावी असे व्यवस्थापन शास्त्र अत्यंत दारिद्रयात दिवस काढणारी आई शिकवत असते. मग केवळ पैसा आणि कामशास्त्राच्या आहारी जाऊन आईच्या संस्कारांची कमी असा आपल्या आईचा उध्दार करायला लावणे केव्हातरी थांबणार आहे का?
आपल्या बाळाच्या ओढीने व्याकुळ होऊन अवघड कडा पार करणारी हिरकणी सर्वश्रुत आहे.
असा आपला इतिहास असताना पोटच्या गोळ्याला नाल्यात फेकून देणारी आई कुठून तयार झाली?
वर्षभर बेभान होऊन नाचा पण कधीतरी समाजसुधारक सावित्री बाई फुले, अनाथांची माय सिंधूताई सपकाळ यांना वाचा. केवळ एक दिवस मदर्स डे साजरा करण्यापेक्षा आईपणाचे महत्व प्रत्येक पाऊल उचलताना स्मरणात ठेवा. जिथे चुकतय तिथे खर बोलण्याची हिंमत ठेवा. जगाला नाही पण आईच्या मनाला नक्की समाधान मिळेल. गर्भातील बालकांचा मृत्यू टळेल ही माफक इच्छा. जय हिंद !
आपली नम्र,
सुरक्षा शशांक घोसाळकर
पवई, मुंबई .
प्रतिनिधी: अवधूत सावंत
महाराष्ट्र राज्य संतांची भुमी म्हणुन ओळखली जाते, तर मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून पंढपूरच्या पांडुरंगाचा सोहळा म्हणजेच आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. या आषाढी एकादशी वारीची फार मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. पंढपूरला पायी जाण्याची परंपरा शतकानुशतके सुरु आहे. देशासह जगभरातील लाखो भाविक पंढरपूर मंदिरात दर्शनासाठी येत असतात. टाळ-मृदुंगाच्या ठेक्यावर, ग्यानबा-तुकारामांच्या जयघोषात ‘विठुरायाचे’ नामस्मरण करीत वारकरी विठ्ठलाच्या नामस्मरणात लीन होतात. मुंबईत विशेषतः मध्य मुंबईच्या गिरणगावात विठ्ठल मंदिरासह काही ठिकाणी गेली अनेक वर्षे आषाढी एकादशी जल्लोषात साजरी केली जाते. बदलत्या काळासोबत मुंबई बेटावरच्या रूढी व परंपरा अस्तंगत होत आहेत. वाड्यावस्त्यांची मुंबई गगनभेदी होत आकाशाला भिडत चालली आहे. मुंबईची जीवनशैली बदलली तरी काही महाराष्ट्रीयन परंपरा अजूनही टिकून आहेत. त्यातील एक म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेली श्री विठ्ठलाची मंदिरे आणि त्यात होणारे अखंड हरिनाम सप्ताह. १९८० नंतर मुंबईतील गिरण्या आणि कारखाने धडाधड बंद झाले. कष्टकरी मुंबईबाहेर फेकला गेला आणि त्याबरोबर गिरणगावातील चाळीचाळीतून उमटणाऱ्या आणि मंदिरातील भजनांच्या सुरावटी मंदावल्या. मुंबईतील गिरण्या आणि कारखाने बंद पडल्यानंतर कष्टकरी मुंबईकर एक तर उपनगरात फेकला गेला किंवा आपल्या गावाकडे परतला. त्यामुळे मुंबईच्या चाळीचाळीत आणि छोट्या मोठ्या मंदिरातून ऐकू येणारे भजन, मंजुळ स्वर मंदावले.
पूर्वी गिरणगावात बारश्यापासून ते लग्नाच्या सत्यनारायणाच्या पुजेपर्यंत त्यापुढे एखाद्या मृत्यूनंतर स्मशानापर्यंत ते उत्तरकार्याच्या दिवसापर्यंत भजन कीर्तन मोठ्या संख्येने होत असे. त्याची जागा आता बेंजो, डीजेच्या धांगडधिंगायने घेतली आहे. अशा परिस्थितीत मुंबईची भजन संस्कृती जगविण्यासाठी निष्ठेने जी थोडी मंडळी प्रयत्न करीत आहेत त्यांचे योगदान फार मोठे आहे. पारंपरिकतेची कास धरत काहीजण मुंबईचा हा ठेवा आपापल्या परीने जपत असल्याचे दिसून येत आहे. काळाच्या ओघात मुंबापुरीतील वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह क्षीण होत तर काही पडद्याआड जाऊ लागले आहेत.
मुंबई नगरीला ‘सोन्याची नगरी’ म्हटले जाते. पण त्यापेक्षा तिला मंदिराची नगरी म्हणणेच अधिक संयुक्तिक ठरेल. मुंबई नगरीत जवळ जवळ ४८१ पेक्षा अधिक मंदिरे आहेत. त्यापैकी सर्वात जास्त मंदिरे मारुतीची, त्याखालोखाल क्रमांक येतो शंकर मंदिरांचा तर देवींची मंदिरे हि पुरातन आहेत. विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीची शंभर वर्षांहून अधिक वर्षे वारकरी परंपरा जोपासणारी अनेक मंदिर सुद्धा मुंबईत आहेत. प्रत्येक आषाढी एकादशीला टाळ मृदुंगाचा गजर आणि 'ग्यानबा-तुकाराम'च्या जयघोषात तल्लीन वारकरी हेच दृश्य मुंबईतल्या मंदिरांमध्येही पहायला मिळतं. श्री विठ्ठल रखुमाई दैवताचे भौगोलिक स्थान मुंबई शहरात कुठे आहे आणि त्याठिकाणी काय पारमार्थिक कार्यक्रम होतात याचा शोध घेण्याचा हा प्रयत्न आहे.
वडाळा -
वडाळा बस डेपोजवळ, कात्रक रोडवरील श्री विठ्ठल मंदिर सर्वाना परिचित आहे. एकेकाळी या मिठागराच्या बेटावर व्यापारी असत. त्यातील एका व्यापाऱ्याला विठ्ठल-रखुमाई ची मूर्ती सापडली, त्यांनी ती पंढरपूरला संत तुकाराम महाराजांना दाखवली आणि त्यांनी मंदिर बांधण्यास सांगितले अशी आख्यायिका आहे. पुढे मुंबई विस्तारात गेली आणि या मंदिराचा लौकिक वाढू लागला. आषाढी एकादशीला सर्वदूर मुंबईतील हजारो भाविक भक्त दिंड्या-पताका घेऊन येथे येत असतात. मुंबईतील ज्या विठ्ठल भक्तांना पंढरपूर येथे जाणे शक्य होत नाही, त्यांच्यासाठी हे मंदिर एक ‘प्रतिपंढरपूर’ म्हणून उभे आहे.
प्रभादेवी -
प्रभादेवी गावासाठी कै. हरी दामाजी परळकर यांच्या स्मरणार्थ त्यांची सून श्रीमती ताराबाई परळकर यांनी हे मुरारी घाग मार्गावर श्री विठ्ठल रखुमाई मंदिर सन १९०० मध्ये हे मंदिर बांधले. गुरुवर्य अर्जुन मामा साळुंखे, गुरुवर्य नारायणदादा घाडगे, गुरुवर्य रामदादा घाडगे अश्या चार पिढ्या परमार्थ करीत आहेत. सन १९१५ च्या काळात हभप रामकृष्ण भावे महाराज मुंबईत 'जगाच्या कल्याणा' या ध्येयाने प्रेरित होऊन आले होते. रामभाऊ हे श्री विठ्ठलभक्त आणि सेवाधारी होते, हाकेच्या अंतरावरील बाळकृष्ण वासुदेव चाळीत असा सप्ताह उत्तमरीत्या पार पडल्याचे त्यांनी स्वतः अनुभवले होते. आपल्या आचार-विचाराव्दारे 'जग लावावे सत्पथी' हेच कार्य ठळकपणे करणाऱ्या भावे महाराजांना रामभाऊ नाईक भेटले आणि विनंती केली, आमच्या मंदिरात सात दिवसांचा अखंड हरिनाम सप्ताह सुरु करावा. त्यांनी या सुचनेचे स्वागत केले आणि मग सन १९२१ पासून गोकूळ अष्टमी निमित्त श्रावण शुद्ध चतुर्थीपासून पुढे सात दिवसांचा दुसरा अखंड हरिनाम सप्ताह प्रभादेवीत सुरु झाला. त्याच मंदिरात पुढे काही काळानंतर माघ शुद्ध दशमी पासून सात दिवसांचा तिसरा अखंड हरिनाम सप्ताह सुरु झाला. भावे महाराजांनंतर गुरुवर्य अर्जुनमामा साळुंखे आणि गुरुवर्य हभप नारायणदादा घाडगे यांनी गुरुपदाची गादी सांभाळत महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात गावोगावी श्री सद्गुरू भावे महाराज वारकरी समाजाचे पारमार्थिक कार्य अनेक अखंड हरिनाम सप्ताहाच्या मार्फत पोहोचवले आहे. सद्गुरू हभप श्री रामकृष्ण भावे महाराज यांनी उभारलेल्या धार्मिक चळवळीला म्हणजे मुंबई शहरातील अखंड हरीनाम सप्ताह सुरु करण्याला सन १९२३ मध्ये एकशे तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. सद्गुरू भावे महाराज ट्रस्टची श्रीक्षेत्र पंढरपूर येथे महाद्वारात सुसज्ज धर्मशाळा असून विद्यमान गुरुवर्य हभप रामदादा घाडगे यांच्या गुरुपदाखाली हभप कृष्णामास्तर घाडगे यांच्या मार्गदर्शनाने मंदिरात अनेक भाविक भक्त वर्षभर पारंपरिक धार्मिक कार्यक्रम पार पाडीत असतात. आषाढी एकादशीला मुंबईतील अनेक भजनी मंडळी तसेच दादर ते वरळी पर्यंतचे हजारो वारकरी तसेच शालेय विद्यार्थी वेशभूषा दिंड्या घेऊन या पुरातन मंदिरात देवाच्या दर्शनाला येत असतात.
बांद्रा -
सरकारी वसाहतीत १९७६ पासून अस्तित्वात असलेल्या या मंदिरात श्रीविठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती या काळ्या पाषाणातील तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती संगमरवरी स्वरूपात आहेत. संत मुक्ताबाईंची सुंदर तसबीर आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 'संत मुक्ताबाई पुण्यतिथी समाधी सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह' साजरा होत असतो. या मंदिरातील ४० वारकऱ्यांनी अनेक वर्षे 'आळंदी ते पंढरपूर' अशी पायी वारी केली आहे. आज ही वसाहत मोडकळीस आली आहे, बरेच भाविक भक्त विस्थापित झाले आहेत तरीही आषाढी एकादशीला निष्ठेने उत्सव धार्मिक पद्धतीने पार पाडीत आहेत.
सेंच्युरी मिल वसाहत हरीहर संत सेवा मंडळ -
वरळी येथील कामगार वसाहतीत प्रांगणात निवृत्ती महाराज समाधी पुण्यतिथी सोहाळ्यानिमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण १९६५ पासून आयोजित केले जाते. बिर्ला परिवार आणि रामप्रसादजी पोद्दार हे खरे या धार्मिक कार्यक्रमाचे आश्रयदाते होते. गिरणी कामगारांनी सुरु केलेल्या या सोहळ्यास वै हभप निवृत्ती महाराज देशमुख नागपूरकर यांनी व्यापक स्वरूप दिले. अकराशे अकरा वाचक बसविण्याचा संकल्प सोडला परंतु तो २१०० पर्यंत गेला. पारायणाचार्य वै पुंडलिक महाराज वेळूकर यांनी आयुष्यभर परायणाची धुरा वाहिली तर नानासाहेब कोठेकर यांनी कीर्तन संयोजनाची जबाबदारी सांभाळली. श्रीमद भगवद्गगीता पाठाची परंपरा हभप राणे गुरुजी यांनी तर भजन परंपरा भजनसम्राट वै हभप मारुतीबुवा बागडे यांनी केले. गेल्या ५९ वर्षात माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, बाळासाहेब भारदे, वि.स.पागे यांनी व महाराष्ट्रातील उत्तमोत्तम नामवंत कीर्तनकारांनी हजेरी लावली आहे, गिरणी संपापर्यंत प्रतिष्ठा पावलेल्या या सप्ताहात श्रवणभक्तीसाठी हजारो भाविक आणि अभ्यासू हजेरी लावीत असत. रजनीकांत दीक्षित, मनोहर राणे, ललन गोपाळ शर्मा, दत्ताराम लांबतुरे आदी कार्यकर्त्यांनी आजही ही परंपरा टिकवून ठेवली आहे.
लोअर परेल -
येथील बारा चाळ येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर. श्रीक्षेत्र पंढरपूरला बडवे मंडळीकडून भाविकांना होणार त्रास आणि यात्रेच्या वेळी शासनाने सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १९६७ मध्ये जुन्नरचे कीर्तन केसरी गुरुवर्य रामदासबुवा मनसुख यांच्या नेतृत्वाखाली लढा सुरु होता. लोअर परेल येथील या मंदिरात भक्ती करणारे ज्ञानेश्वर मोरे माऊली हे वारकरी महामंडळाचे अध्यक्ष होते. तरुण वयातील एक अभ्यासू वक्ते म्हणून त्यांचा परिचय वारकरी पंथातील झाला होता. परंतु ४ जानेवारी १९७३ त्यांचे निधन झाले. तत्पूर्वी त्यांनी कोकणात १८ पारायणे करण्याचा संकल्प केला होता ते हयात असताना १४ पारायणे झाली उर्वरित ४ पारायणे त्यांच्या समाजातील अनुयायी यांनी केली. त्याच्यानंतर हभप कृष्णाजीराव शिंदे आणि पोपट बाबा ताजणे यांनीही संप्रदाय सांभाळण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. सध्या गुरुवर्य अनंत दादामहाराज मोरे हे उच्च विद्याविभूषित संप्रदायाचे गुरुवर्य म्हणून धुरा सांभाळत आहेत. श्रीक्षेत्र आळंदी आणि पंढरपूरला धर्मशाळा असून लोअर परेल येथील वर्षभर नैमित्तिक धार्मिक कार्यक्रम आणि अखंड हरिनाम सप्ताह होत असतात. आषाढी एकादशीला लोअर परेल मधील भाविक मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येत असतात.
वरळी कोळीवाडा -
श्री शंकर मंदिर हे कोळी बांधवानी १८ ऑगस्ट १९०४ मध्ये बांधले. त्यानंतर १९२२ ला आळंदी निवासी गुरुवर्य तुकाराम महाराज कबीर त्याठिकाणी आले. आणि त्यांनी अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात केली. साधारण १९२५ पासून याठिकाणी त्रयी सप्ताह (तीन आठवड्यांचा) अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली. तीन आठवडे सातत्येने चाललेला असा हरिनाम सप्ताह महाराष्ट्रात इतरत्र कुठेही नाही. १९५३ पासून आजतागायत हैबतबाबा दिंडी क्रमांक १ रथाच्या पुढे आळंदी ते पंढरपूर अशी पायी दिंडी वारी या मंदिरातील भाविक भक्त निष्ठेने करीत आहेत. अगोदरच्या काळात बैलगाडीतून सामान घेऊन दिंडी निघत असे. मामासाहेब दांडेकर, नारायणदादा घाडगे, प्रमोद महाराज जगताप, केशवमहाराज कबीर यांच्यासह शेकडो मान्यवर कीर्तनकारांनी कीर्तने झाली आहेत. या मंदिरात आरतीसाठी १९०८ पासूनचा पुरातन ढोल आहे. आषाढी एकादशीनिमित्त कोळीवाड्यातील शेकडो भाविक भक्त देवदर्शनासाठी येत असतात. विलास वरळीकर हे सध्या अध्यक्ष आहेत.
सायन -
शीव म्हणजे आताच्या सायन फ्लायओव्हर जवळील श्री विठ्ठल मंदिर. श्रीधर दामोदर खरे हे १८६० साली मुंबईत आल्यानंतर सायन मध्ये स्थायिक झाले. ते एकदा पंढरपूरला वारीसाठी गेले असता त्यांनी धातूंची मूर्ती आणली, परंतु ती चोरीस गेली. त्यानंतर त्यांनी पाषाणाची मूर्ती घडवून घेतली. त्यावेळी त्याठिकाणी आगरी-कोळी लोकांची वस्ती मोठ्याप्रमाणे होती, त्यांनी एकत्र येऊन मंदिर बांधले आणि १८९३ मध्ये मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली. पंढरपूरच्या रुक्मिणी मंदिरातील पुजारी पंढरीनाथ उत्पात यांना पुजारी म्हणून तर वासुदेव बळवंत सोमण यांच्या नेतृत्वाखाली मंदिराचा कारभार करण्यासाठी ट्रस्ट नियुक्त करण्यात आला. प्रत्येक सणानुसार या मंदिरातील मूर्तींना आभूषणे आणि वस्त्रालंकार घालण्यात येतात. आषाढी एकादशीला मंदिराला विलोभनीय सजावट करण्यात येते.
माहीम -
माहीम फाटक ते मोरी रोड या भागातील १९१६ सालचे प्रसिद्ध माहीम विठ्ठल-रखुमाई मंदिर. १९१४-१५ मध्ये माहीम इलाख्यात प्लेगची साथ पसरली होती. भयभयीत झालेले लोक एका तांत्रिक भगताकडे गेली तेव्हा त्याने सांगितले या बेटावर श्री विठ्ठल रखुमाई मंदिराची उभारणी करा. तेव्हा १९१६ साली मंदिराचे निर्माण केले. आणि पंढरपूरला जाऊन काळ्या पाषाणाच्या मूर्ती आणल्या. तेव्हापासून आषाढी एकादशीच्या दिवशी सांस्कृतिक आणि भजनाचे कार्यक्रम हजारो गर्दीत होत असतात.
बांद्रे -
बाळाभाऊ तुपे यांनी संकल्पना मांडल्यानंतर नाभिक समाजाने ९ जानेवारी १९४० साली श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराची उभारणी केली. स्थानिक भाविकांच्या गर्दीत आषाढी एकादशी साजरी केली. अनेक दिंड्या येत असतात.
भायखळा -
भायखळा पश्चिमेला ना.म.जोशी मार्गावर हे श्री विठ्ठल रखुमाई मंदिर १२९ वर्षाचे हे पुरातन मंदिर आहे. मंदिरात नित्य भजन, पोथीवाचन, आरती, हरिपाठ होत असतात. प्रदीर्घ चाललेली अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा निष्ठेने पार पाडली जात आहे. आषाढी एकादशीला सातरस्त्यापासून भायखळ्यापर्यंत हजारो भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात.
गोखले रोड दादर -
जीवनाचा सुरुवातीचा अधिक काळ अलिबाग येथे झाल्याने अलिबागकार हे आडनाव स्वीकारलेले परंतु मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील गणपत ल गुडेकर यांनी आपल्या धार्मिक कार्याला प्रभादेवीतील गोखले रोड झंडू फार्मसी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात १९५२ पासून श्रीराम नवमी निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात केली. गाथ्यावरील भजन, पोथी वाचन, एकादशीला कीर्तन हे तेव्हापासून नित्य होत असतात. १९६८ ला अलिबागकर महाराज यांचे निधन झाल्यानंतर गुरुवर्य हभप गोपाळबाबा वाजे यांनी धुरा सांभाळली. आणि पंढरपूर, आळंदी यासह महराष्ट्रात संप्रदाय पोहोचविला. श्रीक्षेत्र पंढरपूर येथे कासार घाटाजवळ या वारकरी समाजाची धर्मशाळा असून विद्यमान गुरुवर्य म्हणून नारायण महाराज वाजे हे समाज चालवीत आहेत. आषाढी एकादशीला दादर सैतानचौकी, एल्फिस्टन परिसरातील शेकडो भक्त दर्शनाला येत असतात.
दादर पश्चिम -
डी.एल वैद्य रोड मठाच्या गल्लीत हे विठ्ठल मंदिर आहे. शिवाजी पार्क परिसरातील शेकडो भाविक भक्त याठिकाणी नेहमीच दर्शनासाठी येत असतात. या मंदिरात नारदीय कीर्तन परंपरा राबविली जाते. या परंपरेचे शिक्षण आणि सादरीकरण विशेषतः महिलांचा सहभाग अधिक असतो. काही वर्षांपूर्वी अखिल भारतीय कीर्तन संस्थेचे महाराष्ट्र व्यापी कीर्तन संमेलन यांनी आयोजित केले होते. आषाढी एकादशीला दिवसभर भजने आणि कीर्तने होत असतात.
प्रतिनिधी: अवधुत सावंत
सध्याच्या घडीला देशात गुजरात मधील निवडणुकीची चर्चा रंगली आहे. या निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष या तीन पक्षात मुख्य टक्कर होणार असल्याचे सांगितले जात आहे. भाजपने जोरदार मुसंडी मारत वर्चस्व कायम राखण्यासाठी कंबर कसली आहे. तर भाजपला रोखण्यासाठी विरोधक जोर लावत आहेत.
यातच ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे. राष्ट्रवादीचे गुजरातमधील एकमेव आमदार कंधाल जडेजा यांनी राजीनामा दिला आहे. शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
पोरबंदरमधील कुटियाना येथून कंधाल जडेजा यांना उमेदवारी देण्यास राष्ट्रवादीने नकार दिल्यानंतर त्यांनी हा राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. कंधाल जडेजा हे २०१२ पासून कुटियाना मतदारसंघातून निवडून येत आहेत. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत ५० टक्क्यांहून अधिक मतांनी जिंकून येत भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव केला होता.
राज्यसभा निवडणुकीवेळी कंधाल यांनी बंडखोरी केली होती. उमेदवारी न मिळाल्याने कंधाल जडेजा यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे गुजरात प्रदेशाध्यक्षांनी दिली आहे. राज्यसभा निवडणूक आणि राष्ट्रपती निवडणुकीच्या वेळी कंधाल जडेजा यांनी पक्षादेश झुगारुन भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. कंधाल जडेजा यांनी ११ नोव्हेंबरलाच कुटियानामधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विशेष म्हणजे त्याच दिवशी राष्ट्रवादीने काँग्रेससोबत उमरेठ, नरोडा आणि देवगड बारिया या तीन जागांसाठी आघाडी केल्याचे जाहीर केले होते. पक्षाविरोधात जाऊन उमेदवारी दाखल करणाऱ्यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, गुजरात विधानसभेच्या १८२ मतदार संघांसाठी निवडणुका होत आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. गुजरातमध्ये एकूण दोन टप्प्यात मतदान होणार असून, पहिल्या टप्प्यातील मतदान १ डिसेंबर ला होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान ५ डिसेंबर रोजी होईल. मतमोजणी ८ डिसेंबर रोजी होणार आहे.
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा गंभीर आरोप केलेले आणि सध्या फरार घोषित मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह भारतातच असल्याचं समोर आलं आहे. स्वतः परमबीर सिंह यांच्या वकिलांनी याबाबत न्यायालयाला कालन (सोमवार) माहिती दिली. महाराष्ट्र पोलिसांकडून जीवाला धोका असल्याने परमबीर सिंह समोर येत नाहीत. पुढील ४८ तासात कोणत्याही सीबीआय किंवा इतर कोर्टात हजर राहण्यास तयार असल्याचा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला होता.
मुंबईच्या एस्प्लेनेड कोर्टाने परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्याच्या मुंबई पोलिसांच्या अर्जाला परवानगी देखील दिली आहे. परमबीर सिंग व रिजाय भाटी आणि विनय सिंग यांना फरार घोषित करण्यात आलं. परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्यात आल्यानंतर त्यांना ३० दिवसांची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत परमबीर सिंग न्यायायलयासमोर हजर झाले नाही तर त्यांची मालमत्ता सील करण्याचा अधिकार राज्य सरकारला मिळणार आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. वाय. बी. सेंटरमध्ये संजय राऊत व शरद पवार यांच्यात बैठक झाली. संजय राऊत अचानक पवारांच्या भेटीला आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. बैठकीनंतर संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न लवकरच सुटेल असे म्हटले आहे.
“शरद पवारांसोबत परबमबीर सिंह प्रकरणाची चर्चा करावी तितका तो गंभीर विषय नाही. इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी त्यांच्याकडे आणि आमच्याकडेही वेळ नाही आणि त्यानुसार शरद पवारांसोबत अनेक विषयांवर चर्चा झाली. एसटीचा विषय हा तुम्हाला गंभीर वाटत असेल तर तो लवकरच सुटेल. शरद पवारांची एसटी संपाबाबत काही भूमिका आहे त्याबाबत त्यांनी अनिल परब आणि अजित पवारांसोबत चर्चा केली आहे. एसटी संपाबाबत पवार यांच्या बोलण्यातून असं वाटत आहे की काहीतरी तोडगा लवकरच निघेल,” असे संजय राऊत यांनी म्हटले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे मागील अनेक आठवड्यांपासून अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत आहेत. अभिनेता शाहरुख खानचा पुत्र आर्यन खानला क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणामध्ये अटक झाल्यानंतर मलिक यांनी समीर वानखेडेंनी ते मुस्लीम असल्याचं लपवून आरक्षणाचा लाभ घेत नोकरी मिळवल्याचा आरोप केला. त्यानंतर वेळोवेळी कधी ट्विटरवरुन तर कधी थेट पत्रकार परिषदांच्या माध्यमातून मलिक यांनी समीर वानखेडेंवर आरोप केले. समीर यांच्या बाजूने त्यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने प्रसारमाध्यमांसमोर बाजू मांडण्यास सुरुवात केली. क्रांती आधी मलिक यांचं नाव घेणं टाळत होती मात्र आता ती थेट नाव घेऊन टीका करु लागलीय. मलिक आणि वानखेडे वादामधून क्रांती आणि मलिक यांच्या कन्येमध्येही ट्विटरवर नुकताच वाद झाला. असं असतानाच आता नवाब मलिक यांनी क्रांती रेडकरच्या चॅटचा एक स्क्रीनशॉर्ट शेअर करत तिच्यावर निशाणा साधलाय. मात्र या स्क्रीनशॉर्टबद्दल क्रांतीने काही तासांनी खुलासा केला असून हा सर्व प्रकार कोणत्या थराला चाललाय अशा शब्दांमध्ये तिने संताप व्यक केलाय.
मागील काही आठवड्यांपासून वानखेडे कुटुंबीय वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटी घेऊन आपली बाजू मांडत आहेत. दरम्यानच्या काळात नवाब मलिक यांनी दाऊदशी संबंधित संपत्ती घेतल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यानंतर मलिक यांनी आपला याच्याशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं होतं. याच वादाच्या पार्श्वभूमीवर एका युझरने क्रांतीला मलिक आणि दाऊद कनेक्शनसंदर्भात माहिती असल्याचं सांगितलं. त्याच विषयावरील हे चॅट आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारने अध्यादेश काढून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. इम्पिरिकल डेटावरून केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये गेल्या दोन ते तीन महिन्यांमध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षणासोबतच राज्यातील इतर अनेक मुद्द्यांवरून भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारने घेतलेली भूमिका म्हणजे ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार आहे, असा निशाणा पंकजा मुंडे यांनी साधला आहे.
“ओबीसींना अंधारात लोटणारा निर्णय”
ओबीसी आरक्षणाचा निर्णय रद्द झाल्याच्या निर्णयावरून पंकजा मुंडेंनी राज्य सरकारवर टीका केली आहे. “महाराष्ट्राला एक पुरोगामी राज्य म्हणून संपूर्ण देशाचे लोक बघत असताना आज राज्याची परिस्थिती बदललीये. पूर्वी लोक महाराष्ट्राचं उदाहरण घेऊन काम करत होते. आता मात्र लोक मला विचारतात की तुमच्या महाराष्ट्रात काय चाललंय? राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर आलेल्या सरकारने जनतेच्या हिताच्या मुद्द्यांवर मार्गक्रमण करायला हवं होतं. पण असं कुठेही होताना दिसत नाही. राज्यातील बहुजन, ओबीसींना अंधकारात लोटणारा निर्णय, अर्थात ओबीसींचं आरक्षण रद्द होण्याचा निर्णय या सरकारच्या काळात झाला. ओबीसी आरक्षण स्थगित झाल्यानंतर रद्द होईपर्यंतच्या कालावधीत राज्य सरकारने पावलं उचलली असती, तर ओबीसींचं आरक्षण वाचलं असतं”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने भाजपाचा दारुण पराभव केला आहे. २१ जागांपैकी १७ जागांवर दणदणीत विजय मिळवत जिल्हा मध्यवर्ती बँकेत महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी वर्चस्व मिळवले आहे. भाजपाला अवघ्या चार जागा मिळाल्या आहेत. मात्र या निवडणुकीमध्ये काँग्रेस आमदाराला पराभव स्वीकारावा लागला आहे.
अत्यंत चुरशीने सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या या निवडणुकीसाठी २१ नोव्हेंबर रोजी मतदान झालं होतं. या निवडणुकीमध्ये ८५ टक्के मतदान झालं. याच निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने भाजपचा दणदणीत पराभव केला आहे. २१ जागांपैकी १८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत १४ जागांवर विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीने आधीच तीन जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. या निवडणुकीमध्ये राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपाला केवळ चार जागा मिळाल्या आहेत.
Stay Connected
Most Reading
-
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. वाय. बी. सेंटरमध्ये संजय राऊत व शरद पवार ...
-
वैजापूर । बैलशर्यतीत दाखल गुन्ह्या संदर्भात माहिती विचारणाऱ्या पत्रकाराला पोलीस निरीक्षकाने अर्वाच्य भाषा वापरत शिवीगाळ केल्याची घटना सोमवार...
-
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारने अध्यादेश काढून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. इम्पिरिकल ...
-
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा गंभीर आरोप केलेले आणि सध्या फरार घोषित मुंबईचे माजी पोलीस आयु...
-
प्रतिनिधी: अवधुत सावंत दिनांक ०५/१०/२०२३ रोजी बांगला देशातील एन.जी.ओ च्या अधिकारी मुक्ता दास यांनी 'फ्रीडम फर्म' या पु...