BREAKING NEWS
latest
मुंबई लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मुंबई लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

भारत की शान राष्ट्रीय सन्मान 2023 पुरस्कार सोहळा


हर काम देश के नाम या ब्रिद वाक्याने प्रेरित समाजसेविका सुरक्षा शशांक घोसाळकर यांना नि:स्वार्थ सेवा व अलौकिक सामाजिक योगदानासाठी आयुषमान प्रतिष्ठान व स्वरकुलच्या वतीने गुरूनानक खालसा महाविद्यालय सभागृह, माटुंगा (पूर्व) येथे आयोजित सन्मान सोहळ्यात भारत की शान राष्ट्रीय सन्मान 2023 प्रख्यात लेखक,नाटककार, दिग्दर्शक, अभिनेता अशोकजी समेळ यांच्या शुभहस्ते प्रदान करून गौरविण्यात आले. याप्रसंगी सुप्रसिध्द बालकलाकार वरदा देवधर, गुरूनानक खालसा महाविद्यालयाचे संचालक किरण माणगावकर, आरटीआय अधिकारी अनिल गलगली,स्वरकुलसंस्थेच्या अध्यक्षा, कीर्तनकार डाॅ. वीणा खाडिलकर यांसारखे महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच राष्ट्रीय छात्र सेना विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. दिव्यांग व्यक्तींच्या देशभक्तीपर गीत, प्रसिध्द कवी, साहित्यिकांच्या सादरीकरणाने वातावरण भारावून गेले होते. मराठी चित्रपट उद्योगातील गायक, संगीतकार, अभिनेते त्यागराज खाडिलकर यांच्या अमृतवाणीतील सूत्र संचालनाने मंत्रमुग्ध सोहळा अनुभवल्याचा आनंद उपस्थितांच्या चेहऱ्यांवर दिसत होता. राष्ट्रगीताने अभूतपूर्व सोहळ्याची सांगता झाली.

आईपण भारी देवा...


आई म्हणजे आत्मा आणि ईश्वर असे म्हटले जाते. आई हा शब्द उच्चारला की मनात वात्सल्याचा पाझर फुटतो. ती प्रत्येकाच्या जीवनातील वरदान आहे. असे असताना समाजात घडणाऱ्या विपरीत घटनांना नेहमीच प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे संबंधितांच्या आईला जबाबदार धरले जाते. 

जेव्हा परिसरात ८ व्या महिन्यात गर्भपात केलेले तेही मुलगा असलेले अर्भक गटारात फेकलेले आढळते तेव्हा संवेदनशील मनाला यातना होतात आणि आश्चर्यही वाटते. एकीकडे महिलांवर बलात्कार होतात तर दुसरीकडे महिला कशा वागतात? याचा विचार करून आपल्या पैकीच एका स्त्रीच्या क्रूर कृत्याची लाज वाटते. आधुनिकतेकडे आकर्षित होणाऱ्यांनी या घटनांचे दुष्परिणाम गांभिर्याने लक्षात घेतले पाहिजेत. समाजात कुमारी मातांचेही प्रमाण वाढत आहे. एक हात कमरेत आणि दुसऱ्या हाताने सिगारेटचा धूर हवेत सोडणारा, एक हात खांद्यावर आणि दुसऱ्या हाताने दारूचा पेग घेणारा प्रियकर मुलींना लयभारी वाटतो. कारण मुलीने बापालाअगोदरच प्रेम प्रकरणातील खलनायक ठरविलेला असतो. आईला नेहमी प्रमाणे गृहीत धरले जाते. आई होणे खरच इतक सोप आहे का? आईपणा बरोबर मुलांचे संस्कार , संगोपन , सुरक्षिततेची जबाबदारी तिला पेलवायची असते. आई होण्याची चाहूल लागते तेव्हा स्त्री आनंदाने भारावून जाते. त्याच बरोबर शरीरात होणाऱ्या बदलांनी अंतर्बाहय हेलावून जाते. गर्भधारणे पासून प्रसूती पर्यंतच्या वेदना ती निमूटपणे स्विकारते कारण तिला मूल केव्हा होणार? या प्रश्नाने आप्त-स्वकीयांनी भंडावून सोडलेले असते. त्यांची तोंड तात्पुरती बंद झालेली असतात. मातृत्वाच्या उंबरठ्यावर उभी असलेल्या स्त्रीला सतत आपल्याला होणारे बाळ कसे असेल? कसे दिसेल? प्रसूती व्यवस्थित होईल का? मला त्रास झाला तरी चालेल पण माझे बाळ निरोगी जन्माला यावे अशी तिची माफक इच्छा असते. तिच्यासाठी तो आनंददायी व अविस्मरणीय क्षण असतो. प्रसूती होईपर्यंत सर्वांनाच मुलगा की मुलगी होणार याबद्दल उत्सुकता असते. आपल्या देशात अजूनही लिंग भेदाला सामोरे जावे लागते. पहिली मुलगी जन्माला आली किंवा सर्व मुलीच असलेल्या स्त्रीला समाजात टोमणे ऐकावे लागतात. त्यापेक्षा भयंकर स्थिती तृतीयपंथी, दिव्यांग मूल जन्माला आलेल्या आईची असते. आई मुलांमध्ये भेदभाव करू शकत नाही.अजूनही तृतीयपंथी आणि दिव्यांग मुलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन दूषित आहे. त्यांना योग्य न्याय देताना आईला कौटुंबिक आणि सामाजिक कोंडीही सहन करावी लागते.

सर्वसामान्य मुलांच्या लैंगिक विकासाच्या दृष्टीने विषय, प्रकल्प असतात . परंतु असामान्य मुलांच्या विकासाच्या दृष्टीने अजूनही जनजागृती होणे अत्यावश्यक आहे. अशा मुलांकरीता आई ही दिपस्तंभ असते. स्वतःला विसरून तिला या मुलांच्या शारिरिक, मानसिक , बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी त्यांच्या भविष्याकरीता तारेवरची कसरत करावी लागते. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करूनही आज देशात विविध क्षेत्रात मेहनतीने, प्रामाणिकपणे ही मुले नेतृत्व करीत आहेत. त्यासाठी आईने प्राथमिक शरीरशास्त्रा पासून सुरूवात करून व्यापक अर्थाने जीवन शिक्षणा पर्यंत मेहनत घेतलेली असते. याउलट निसर्गाने कृपा केलेली स्मार्ट मुले आज भरकटलेली दिसतात. विविध माध्यमांमुळे मुलांमध्ये लैंगिक जाणिवा विकसित होत आहेत. मुलांना लवकर येणारी समज हा सर्वसामान्य पालकांसाठी चिंतेचा विषय आहे. विधि आयोगाच्या सहमतीने लैंगिक संबंध ठेवण्याच्या किमान वयोमर्यादे बाबत केंद्राकडून सूचना मागविल्या आहेत. सद्या ही वयोमर्यादा १८ वर्षे आहे ती १६ वर्षे करावी अशी मागणी जोर धरत आहे. विधि आयोगाने महिला आणि बालविकास मंत्रालयाकडेही त्यांचे मत मागितले आहे. तर दुसरीकडे प्रसूती दरम्यान माता व बालकांचे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी बालविवाह हा गुन्हा असा विरोधाभास पहायला मिळतो. यामध्ये प्रत्यक्ष दुष्परिणाम सहन करावे लागतात ते स्त्रीला. त्यामुळे वयात येणाऱ्या मुलीच्या संगोपना सोबत तिच्या संरक्षणाची आणि समुपदेशनाची भूमिका आईलाच निभवावी लागते.   मुलगी वयात येते तेव्हा आई काळजीपोटी तिला राहण्याच्या सहलीला जाणे, मुलांसोबत खेळणे, पोहणे, पाय पसरून बसणे, अनोळख्या ठिकाणी जाण बंद करायची. शरीरा विषयी बोलणे घरामध्ये मान्य नव्हते . परंतू आता मुलीला अस्वस्थ करणारे, बुचकळ्यात टाकणारे, विचारात पाडणारे किंवा उध्वस्त करणारे अनेक अनुभव, प्रसंग, व्यक्ती तुझ्या आयुष्यात येऊ शकतील त्यांच्यापासून सावध रहा अशी सांगणारी अल्पशिक्षित आई आधुनिक मुलींना मागासलेल्या विचारांची वाटते.

शारीरिक दृष्ट्या स्री पुरूषां पेक्षा जास्त बळकट असते. सारख्याच परिस्थितीत वाढविल्यास मुली मुलांपेक्षा सहनशील असतात आणि जास्त वेदना सहन करू शकतात . जास्त खंबीरपणे आयुष्याशी सामना देऊ शकतात . वयात येताना मुलींची मानसिक अवस्था नाजूक हळवी होते. त्यांना मुलांबद्दल खूप आकर्षण वाटू लागते. मुलांच लक्ष वेधून घ्याव, सिनेमे पहावेत, शरीराचा सारखा विचार करावा, त्याविषयी बोलावे अशा सारख्या प्रवृत्ती या वयात मुलींमध्ये उफाळून येतात. व काही मुली खुप टोकाच वागतात. निसर्गाने दिलेल्या शक्तीचा गैरवापर न करता तिचा आदर राखायला आपल्याला जी शिकवते तिलाच संस्कृती म्हणतात . 

वयात येताना आईशी मुलीचे संबंध अगदी मोकळेपणाचे हवेत आणि ती जे सांगेल ते आपल्या हिताचेच असेल असा विश्वासही हवा. सुमारे अठरा वर्षाच्या आसपास तिचे शरीर आईपणास समर्थ होते. त्यापूर्वी मुल होण म्हणजे तिला बाळंतपणाचा धोका, तिच्या मुलपणावर बंधन आणि पुढे जन्मणार मुल कितपत सशक्त असेल या विषयीही शंका म्हणून  तर आपल्या शासनाने, कायदयाने मुलीच्या लग्नाच किमान वय अठरा वर्षे ठरवलेले आहे. ती अट खुद्द मुलीच्या, कुटुंबाच्या आणि समाजाच्याही हिताचीच आहे. आज शहरांमध्ये चांगल्या प्रतिष्ठित वस्त्यांमध्ये, रस्त्यांवर, कचरा कुंड्यांच्या आसपास, गटारात मासिक पाळीच्या रक्ताळलेल्या घड्या खुशाल भिरकावून देतात. त्याच प्रमाणे रक्तामासाचं अर्भक फेकून देण्याचा कल वाढलेला आहे. याला काय सुसंस्कृतपणा म्हणतात? घरातील पाळीव प्राण्याचा मृत्यू झाला तरी त्याला विधिपूर्वक दफन केले जाते.

इंग्रजी चित्रपट, मासिक , कथा कादंबऱ्या मधिल अवास्तव चित्रणाने शरीराची व मनाची गरज टोकाला गेल्याने कामेच्छा पूर्ण करण्यासाठी अचाट आणि अफाट कल्पनांमुळे उत्तेजित होणाऱ्या मुलांपेक्षा मुली जास्त भावनाप्रधान असतात या सर्वसामान्य प्रवृत्ती आहेत. परंतू आपल्याला माणसा सारख किमान सुसंस्कृत, विचारी, समतोल आयुष्य जगायच आहे इतपत भान युवक युवतींना शाळा महाविद्यालयातील शिक्षणाने येणार नसेल तर ते ज्ञान काय कामाचे? अर्थात मुलामुलींनी एकत्र वावरण्यात काहीच धोका नाही . मग एकत्र जगायच असेल तर पुरेशा माहितीनिशी, पुरेशा खबरदारीनिशी का जगू नये? पालकांना मित्र मैत्रीणीं सोबत सहलीला जातो, गणपती, नवरात्री सारख्या मंगल प्रसंगी फिरायला जातो अस खोट सांगून त्यांचा विश्वासघात करताना हल्लीच्या तरूणाईला काहीच वाटत नाही ? अजूनही आम्ही शिक्षणाने माणूस समृद्ध होतो या भ्रमात आहोत असे वाटते. यांना जिवशास्त्र शिकवल जीवनशास्त्र कोण शिकवणार? त्रिकोण , चौकोन, षटकोना पेक्षा महत्वाचा  आहे आयुष्याचा दृष्टिकोन. विपरीत परिस्थितीतही जपणूक केली पाहिजे तत्वांची कारण व्याकरणा पेक्षाही अंतःकरणाची भाषा असते महत्त्वाची. लेकराला पाॕकेटमनी, बाईक अन भलेही दिली जरी कार किती छान झाल असत जर दिले असते संस्कार  अशा आशयाची वाचनात आलेली कविता ह्याला आयुष्य म्हणाव काय? ही अशा प्रसंगी तंतोतंत पटते.

या वागण्याला केवळ तरूणाईला दोष देऊनही प्रश्न सुटणार नाहीत कारण लिव्ह इन रिलेशनशीपच फॕड वैवाहिक जीवनाचा आस्वाद घेतलेल्या दोन मुले असणाऱ्या जोडप्यां मध्येही वाढत आहे. आपल्याला अनेकदा भूक लागते आणि अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ आपल्या आसपास असतात. पण म्हणून काही दर भुकेला चोरून , बळजबरीने किंवा दुसऱ्यापुढच अन्न ओढून आपण आपल्या पोटाची तरतूद करत नाही . तर आपली भूक आटोक्यात रहावी आणि सन्मानाने भागवता यावी असे व्यवस्थापन शास्त्र अत्यंत दारिद्रयात दिवस काढणारी आई शिकवत असते. मग केवळ पैसा आणि कामशास्त्राच्या आहारी जाऊन आईच्या संस्कारांची कमी असा आपल्या आईचा उध्दार करायला लावणे केव्हातरी थांबणार आहे का? 

आपल्या बाळाच्या ओढीने व्याकुळ होऊन अवघड कडा पार करणारी हिरकणी सर्वश्रुत आहे.

असा आपला इतिहास असताना  पोटच्या गोळ्याला नाल्यात फेकून देणारी आई कुठून तयार झाली?

वर्षभर बेभान होऊन नाचा पण कधीतरी समाजसुधारक सावित्री बाई फुले, अनाथांची माय सिंधूताई  सपकाळ यांना वाचा. केवळ एक दिवस मदर्स डे साजरा करण्यापेक्षा आईपणाचे महत्व प्रत्येक पाऊल उचलताना स्मरणात ठेवा. जिथे चुकतय तिथे खर बोलण्याची हिंमत ठेवा. जगाला नाही  पण आईच्या मनाला नक्की समाधान मिळेल. गर्भातील बालकांचा मृत्यू टळेल ही माफक इच्छा. जय हिंद !


आपली नम्र,

सुरक्षा शशांक घोसाळकर

पवई, मुंबई .

"केडीएमसी भ्रष्टाचाराचा अड्डा म्हणूनच रस्त्यात खड्डा" ; खड्ड्यांच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीचे आंदोलन..


 प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी रस्त्यांमध्ये खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले आहे. पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभार व चुकीच्या नियोजनामुळे महापालिकेच्या हद्दीतील सर्व रस्त्यांवर मोठे मोठे खड्डे पडले आहेत. याच खड्ड्यांमुळे मलंग रोडवर एका युवकाला आपला जीव गमवावा लागल्याने पालिकेतील हे खड्डे जीवघेणे ठरत आहेत. त्यामुळे कल्याण-डोंबिवली  महानगरपालिका 'भ्रष्टाचाराचा अड्डा म्हणूनच रस्त्यात खड्डा' असा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे.

आम आदमी पार्टी, कल्याण डोंबिवली शहराच्या वतीने कल्याण पूर्वेतील चक्की नाका येथे ट्राफिक पोलिसांच्या चौकी समोर रस्त्यांमध्ये उभे राहून कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या वेळेस कल्याण डोंबिवली शहर अध्यक्ष ऍड. धनंजय जोग, राजेश शेलार, राजू पांडे, रवींद्र जाधव, अविनाश चौधरी, नीलम व्यवहारे, लक्ष्मी देशनहारे, इर्शाद शेख, मनोज कुमार, सिद्धांत गायकवाड, संतोष केदारे, सतीश तांबे, विनोद सुर्वे, आदी कार्यकर्त्यांनी आंदोलन करून आपला रोष व्यक्त केला.

नुकतेच मागच्या आठवडयात मलंगगड रोडवरील द्वारली गावा जवळ एका युवकाचा खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे दुर्घटना होऊन जीव गेला. मागील दोन तीन वर्षांपूर्वी असेच खड्ड्यांमुळे पाच कल्याणकर नागरिकांचा जीव गेला. तरी देखील महानगरपालिकेचे प्रशासन व त्यातील अधिकारी याना जाग येत नाही. कुंभकर्णाच्या गाढ झोपेत मस्तवालपणे नागरिकांच्या कर रुपी जमा होणाऱ्या पैशांत भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप यावेळी ऍड. जोगदंड यांनी केला. 

खड्ड्यांमुळे शहरातील लहान मुलांना, महिलांना, वयोवृद्ध नागरिकांना, वाहन चालकांना, रिक्षा चालकांना, दुचाकी स्वारांना, तसेच ट्राफिक पोलिसांना देखील नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.


जोगेश्वरी पूर्वेतील एका नाल्यात सापडला नवजात अर्भक



संदिप कसालकर

जोगेश्वरी पूर्व, न्यू इंदिरा नगर, कोकण नगर जवळील एका नाल्यात एक मयत नवजात अर्भक सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिनांक २२ जुलै २०२३ रोजी मेघवाडी पोलिसांना दुपारी ०१:१५ च्या सुमारास मुख्य नियंत्रण कक्ष, मुंबई येथून एक संदेश प्राप्त होताच घटनास्थळी मेघवाडी १ मोबाईल पोलीस पथक पोहोचले असता त्यांनी नवजात अर्भकास उपचारासाठी जवळीस ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषित केले.



दरम्यान अज्ञात आरोपी/पालक यांच्या विरोधात अपत्य जन्माची लपवणूक करण्याच्या उद्देशाने नवजात अर्भकास गुप्तपणे नाल्यात टाकून दिले म्हणून गु.र. न २४३/२०२३ कलम ३१८ भा.द.वी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत काही माहिती मिळाल्यास पोलीस उपनिरीक्षक गुसिंगे, मेघवाडी पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन मेघवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मांढरे यांनी केले आहे.

मुंबईत पावसाचं थैमान ! जोगेश्वरी पूर्वेतील 'या' शाळेचा भाग कोसळला...


संदिप कसालकर

महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. त्यात रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीतील दरड कोसळल्याची घटना ताजी असतानाच मुंबईतील अंधेरी पूर्व चकाला परिसरात रामबाग सोसायटीमध्ये दरड कोसळल्याची दुर्घटना घडली. तर आज जोगेश्वरी पूवेर्तील मेघवाडी परिसरातल्या पीपल्स वेल्फेअर इंग्लिश हायस्कुलमधील लॅबची गॅलरी सकाळी ६:४५ च्या सुमारास कोसळली. 




आपत्ती व्यवस्थापन पथक व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सुदैवाने या मध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान या हायस्कुलमधील कोसळलेला भाग हा वापरण्यात येत नसल्याचे येथील स्थानिक रहिवाशी यांनी सांगितले आहे. 



'डोंबिवली डायमंड्स रोटरी क्लब'च्या वतीने नामवंत पत्रकारांचा गुणगौरव समारंभ संपन्न..


 प्रतिनिधी: अवधूत सावंत

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डायमंड्स च्या वतीने दिनांक २२ जुलै २०२३ रोजी डोंबिवली पूर्वेकडील फडके रोड गणेश मंदिर संस्थान येथील वरद सभागृह येथे डोंबिवलीतील नामवंत पत्रकारांचा मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

'दै. प्रहार' चे जेष्ठ पत्रकार बापु वैद्य, केंद्रीय पत्रकार संघाचे तालुका संघटक तसेच साप्ताहिक 'न्याय रणभूमी', 'अंतिम न्याय' व 'लोकहीत न्यूज' चे धडाडीचे राष्ट्रीय पदक विजेता पत्रकार अवधुत सावंत, साप्ताहिक 'आपला भगवा','राजमुद्रा' च्या संपादिका सारिका शिंदे, 'जय महाराष्ट्र वृत्त वाहिनी','डोंबिवली फास्ट न्यूज' चे किशोर पगारे, 'दै. लोकमत' चे प्रशांत माने, 'पुढारी ऑनलाईन' च्या भाग्यश्री प्रधान आचार्य, 'आज तक' चे मिथीलेश गुप्ता, 'तरुण भारत ऑनलाईन' च्या जान्हवी मौर्य, 'क्राईम बॉर्डर' चे संपादक राजेंद्र वखरे, 'दै.मुंबई चौफेर' व 'वृत्तमनास' चे श्रीराम कांदू व दै. लोकसत्ता' चे भगवान मंडलिक या सर्व पत्रकारांचा रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डायमंड्स च्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या प्रसंगी किशोर पगारे, सारिका शिंदे, भाग्यश्री प्रधान आचार्य, राजेंद्र वखरे या पत्रकारांनी आपले मनोगत व्यक्त केले . 

त्याचबरोबर सतत पडणाऱ्या पावसातही आपल्याला सकाळी वेळेवर वर्तमानपत्र पोहचविणार्‍या मुलांना 'रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डायमंड्स' तर्फे रेनकोट देण्यात आले. तसेच पावसाळ्यात भर पावसातही प्लास्टिक कागदाच्या आडोशाने भाज्यांचा बचाव करत आपल्याला ताज्या भाज्या उपलब्ध करून देणाऱ्या काही गरजू भाजी विक्रेत्यांना क्लब तर्फे मोठ्या आकाराच्या छत्र्यांचे वाटप  करण्यात आले.

या कार्यक्रमास रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४२ चे असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन पराग धर्माधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन पराग धर्माधिकारी यांनी 'रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डायमंड्स' करत असलेल्या कार्याची थोडक्यात माहिती उपस्थितांसमोर दिली. क्लबचे नवनिर्वाचित अध्यक्ष रोटेरियन निलेश गोखले यांनी जागरूक समाज घडविण्याच्या पत्रकारांचा मोठा वाटा असल्याचे सांगत त्यांच्या निरपेक्ष कार्याची स्तुती करत कौतुक केले व असेच कार्य निरंतर करत राहण्यासाठी 'रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डायमंड्स' च्या वतीने शुभेच्छा दिल्या.

सदर कार्यक्रमास अध्यक्ष रोटेरियन निलेश गोखले, मानद सचिव रोटेरियन जगदिश तांबट, क्लबचे संस्थापक रोटेरियन राजेश कदम, रोटेरियन संजय टेंभे, प्रकल्प प्रमुख रोटेरियन मनोज क्षिरसागर, प्रकल्प प्रमुख रोटेरियन सुदिप साळवी, रोटेरियन साधना साळवी, रोटेरियन उमेश स्थुल उपस्थित होते.


जगातील सर्वच क्षेत्रात ब्राह्मणांची उत्तुंग भरारी - देवेंद्र फडणवीस


प्रतिनिधी: अवधुत सावंत

  जेव्हा लढण्याची वेळ आली तेव्हा हाती तलवार घेतली आणि समाजाला सुधारकांची गरज असताना सुधारकांचे काम केले. जगातील प्रत्येक क्षेत्रात ब्राह्मणांचे योगदान असून ब्राह्मणांनी  सर्वच क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्राह्मण उद्योजकांच्या परिषदेत डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले सभागृह सांगितले. 'ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल'च्या मुंबई विभागातर्फे डोंबिवलीतील उद्योजकांच्या दिनांक १२ व १३ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. तिथे राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या परिषदेला देशाच्या विविध भागातून ७०० हून अधिक ब्राह्मण उद्योजक उपस्थित होते.रविवारपासून ब्राम्हण उद्योजकांची दोन दिवसीय परिषद डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलामंदिरात आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुणवंत उद्योजकांना 'उद्यम जीवनगौरव पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, मुकुंद कुलकर्णी, अरविंद कोऱ्हाराळकर, महेश जोशी, श्वेता इनामदार, मकरंद पुंडलिक, अरविंद नांदापूरकर, विवेक वामोरकर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, कडोंमपा आयुक्त भाऊसाहेब दांगडे, अभिनेते प्रशांत दामले उपस्थित होते.


   ब्राह्मण समाजाने समाजाला वेळोवेळी दिशा देण्याचे काम केलेलं आहे ब्राह्मण समाजाच्या वेगवेगळ्या संघटना आहेत त्या निस्वार्थीपणे काम करीत आहेत त्याबद्दल मला अभिमान वाटतो. ज्यावेळी लढण्याची वेळ आली त्यावेळी हाती तलवार घेत आणि ज्यावेळी समाजाला सुधारण्याची वेळ आली त्यावेळी सुधारकाचे काम केले. प्रसंगी आपल्याच समाजाच्या माणसासमोर उभे राहण्याला ते कधीच कचरले नाहीत. आता स्टार्टअप पासून ते मोठ्या उद्योग व्यवसाय पर्यंत ब्राह्मण समाजाने प्रगती केली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण जगातील आर्थिक क्षेत्रांमध्ये पाचव्या स्तरावर आहोत २०३० साली आपण तिसऱ्या क्रमांकावर येऊ असा आशावाद यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

देशातील दूरसंचार क्रांतीमुळे नवे नवे व्यवसाय उभे राहिले असून या नव्या व्यवसायांना आपण समजून घेतले पाहिजे. ब्राह्मण समाजामध्ये विशेषता तरुणांमध्ये शिक्षणाच्या व रोजगाराच्या बाबतीत कमतरता व्यक्त केली जाते. ही कमतरता दूर करण्याचे काम समाजाने केले पाहिजे जगामध्ये खूप संधी उपलब्ध आहेत हे समजून सांगणारं कुणीतरी हवं. देश वेगाने प्रगती करत असताना ब्राह्मण समाजाने मोठे योगदान देशांमध्ये दिलेला आहे त्याच पद्धतीने यापुढेही ब्राह्मण समाजाने देशात आपले योगदान द्यावे. जगातील सात महत्वपूर्ण उद्योग कंपन्यांमधील चार कंपन्यांचे मुख्य अधिकारी हे ब्राम्हण समाजातील असल्याचा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आवर्जून उल्लेख केला. विदेशातील माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात ब्राम्हण वर्गाची सरशी असून बाकरवडी ते मद्य निर्मितीपर्यंत साऱ्या क्षेत्रात ब्राम्हण उद्योजकांनी भरारी घेत देशाच्या उद्योग आणि अर्थव्यवस्था वाढीस मोठा हातभार लावत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या परिषदेत बोलून दाखविले.

बीबीएनजी सारख्या संस्था शासनाकडे कधी काही मागत नसून त्या स्वयंभू असून त्यांचे कौतुक करत सरकार म्हणून अश्या संस्थांना गरजू व्यावसायिक, मार्गदर्शन, शिक्षण, रोजगार संधी याविषयी काही मदत साहाय्य हवे असल्यास आपण ते व्यक्तिशः आणि सरकार म्हणून मदत करू असे आश्वासन तेथील उपस्थित उद्योजकांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ज्या तरुणांना परदेशामध्ये उच्च शिक्षण घ्यायचे आहे त्यांच्यासाठी शिष्यवृत्तीची योजना सुरू केली आहे असेही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.














 

'निर्धार-एक हात आपुलकीचा' संस्थेचा उत्कृष्ट उपक्रम; नामवंत कलावंतांची हजेरी

जोगेश्वरी (पूर्व), मुंबई येथील अरविंद गंडभीर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या "निर्धार-एक हात आपुलकीचा" या सामाजिक संस्थेने अरविंद गंडभीर हायस्कूल येथे रक्तदान शिबिर आयोजित केले होते.

दर सहा महिन्यांनी निर्धारतर्फे हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते. या शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून व्यायामक्षेत्रात तसेच राज्यस्तरीय आणि देशव्यापी शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये विशेष नावलौकिक मिळवलेले जोगेश्वरी येथील ज्येष्ठ रहिवासी - जोगेश्वरी भूषण लक्ष्मण बोवलेकर तसेच मराठी नाट्य आणि सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते सुनील तावडे यांची उपस्थिती लाभली होती.

सकाळी ९ वाजता या दोन्ही पाहुण्यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. लक्ष्मण बोवलेकर आणि सुनिल तावडे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना रक्तदानाचे आणि उत्तम सुदृढ आरोग्याचे महत्व अधोरेखित केले.
त्यानंतर मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधील सुप्रसिद्ध अभिनेते जयवंत वाडकर, तसेच माजी रणजी क्रिकेट खेळाडू सुलक्षण कुलकर्णी, याांनी या शिबिराला उपस्थिती लावली व रक्तदान ही केले.

त्यानंतर रक्तदात्यांचा ओघ शिबिराकडे वाढू लागला. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळात एकूण १२५ इच्छुकांनी आपली नावे नोंदवली. त्यापैकी काहींना आरोग्याच्या कारणामुळे रक्तदान करता आले नाही.
एकूण ११४ रक्तदात्यांनी आपले रक्तदानाचे कर्तव्य पार पाडले. म्हणजे यावेळी निर्धारतर्फे आजपर्यंतचा रक्तदात्यांचा सर्वाधिक आकडा गाठून एक नवा विक्रम प्रस्थापित केला गेला. यामध्ये महत्वाची बाब म्हणजे १८ ते ३० वर्षे वयोगटातील तरुण रक्तदात्यांचा सहभाग अधिक होता. या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक रक्तदात्याला एस.आर.व्ही हॉस्पीटल तर्फे मोफत आरोग्य चिकित्साही उपलब्ध करून देण्यात आली.
यामध्ये रक्तदाब, मधुमेह चाचणी, डोळे, वजन, उंची, ह्या सगळ्या चाचण्या मोफत करून दिल्या जात होत्या.
हे रक्तदान शिबिर यशस्वीरीत्या पार पाडण्यात "निर्धार-एक हात आपुलकीचा" या समाजसेवी संस्थेचे सर्व कार्यकर्ते, जे.इ.एस महाविद्यालयातील एन.एस.एस. चे विद्यार्थी, मातोश्री मीनाताई ठाकरे रक्तपेढीचे तसेच एस.आर.व्ही हॉस्पिटलचे सर्व प्रतिनिधी यांनी मोलाचा हातभार लावला. शिबिराच्या समारोपाला प्रायोजक, निर्धार चे हितचिंतक, जे.इ.एस चे विश्वस्त आणि एन.एस.एस. युनिट चे विद्यार्थी आणि रक्तदाते यांचे निर्धारतर्फे आभार मानण्यात आले.