डोंबिवली (कोपर) - व्याख्यानाचे वक्ते व 'जे एम एफ' शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांचे प्रेरणादायी विचार श्रोत्यांना कायमच उस्फुर्त करत असतात. आपली व्याख्यानमाला सुरू करताना डॉ राजकुमार कोल्हे म्हणाले की, नवीन दिवस म्हणजे मिळणारी नवीन संधी असते, प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या अंगात असणाऱ्या चांगल्या वाईट सवयींचा गुलाम असतो, अंगभूत असणाऱ्या चांगल्या सवयी नेहमीच भविष्यकाळातील जीवन सुसह्य करून टाकतात तर वाईट सवयी ह्या भूत, वर्तमान आणि भविष्य यांचा पाठलाग करत राहतात. प्रथमतः वेळेचे नियोजन आणि वेळेची किंमत असणे हेच खरे यशाचे गमक आहे. पैसा आणि वेळ या गोष्टीला जर तुम्ही प्राधान्य दिले तर अनेक सकारात्मक गोष्टी तुमच्या जीवनात घडतील, यासाठी योगा करणे, आवडीचे खेळ खेळणे या चांगल्या सवयी जर लावून घेतल्या तर भविष्यकाळातील जीवन तुम्ही आनंदाने आणि आत्मविश्वास पूर्वक जगू शकाल. स्वतः बरोबरच इतरांचाही आदर करण्याची कला आणि सवय सर्व जन माणसात असावी हे सांगताना डॉ. राजकुमार कोल्हे यांनी स्वामी विवेकानंद यांचे उदाहरण दिले की भारतातील प्रत्येक स्त्री ही पूजनीय, वंदनीय, महाराणी आहे म्हणूनच आमच्या भारतीय संस्कृती मधे स्त्रियांशी हस्तांदोलन न करता आम्ही हात जोडून नमस्कार करून स्त्री चा आदर करतो.
आपल्या कामाशी, कर्तव्याशी प्रामाणिक राहा, असे सांगत जे आर. डी. टाटा यांचे उदाहरण दिले. भूतकाळ हा मनाचा पुसटसा आरसा असतो तर भविष्यकाळ हा मनाचा, विचारांचा स्पष्ट दिसणारा चकाकणारा आरसा असतो म्हणूनच भविष्यातील जीवन सुकर करण्याकरिता अंगभूत वाईट सवयींचा निचरा करा व चांगल्या सवयी वृद्धिंगत करून भविष्यातल्या आव्हानांना सामोरे जाण्याचे धाडस दाखवा असेही वक्ते डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले.
मधुबन वातानुकूलित दालनात उपस्थित असलेले सर्व शिक्षक, विद्यार्थी यांनी मनात रेंगाळत असलेले अनेक प्रश्न डॉ. राजकुमार कोल्हे यांना विचारले व त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळवली तसेच चांगल्या सवयी व वाईट सवयी कोऱ्या कागदावर लिहून वाईट सवयी चा कागद अग्निकुंड मधे टाकून येणाऱ्या नवीन वर्षांची सुरुवात ही फक्त आणि फक्त चांगल्या सवयीनी करायची असा प्रण देखील घेतला. अंगातील आळस जाऊन उत्साह येण्यासाठी सर्व उपस्थितांनी हलके फुलके नृत्य सादर केले. अध्यक्ष डॉ. राजकुमार, संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे व खजिनदार जान्हवी कोल्हे यांनी सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन मनात ठरवलेल्या संकल्पाने आणि आनंदाने येणारे २०२६ हे वर्ष सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करणारे ठरो अशा सदिच्छा दिल्या.