मुकेश अंबानींना चार दिवसांत तिसरी धमकी : मागणीची रक्कम वाढली 400 कोटी रुपये, ई-मेल पाठवणाऱ्याने म्हटले- देशाच्या सर्वोत्तम शूटर कडून मारण्याची धमकी...
रोहन दसवडकर
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांना चार दिवसांत तिसरी जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. 27 आणि 28 ऑक्टोबरला धमक्या मिळाल्यानंतर मुकेश अंबानींना सोमवार 30 ऑक्टोबरला पुन्हा धमकी मिळाली आहे.
गमदेवी पोलिसांनी सांगितले की, सोमवारी सकाळी मुकेश अंबानी यांना त्यांच्या कंपनीच्या मेल आयडीवर एक ई-मेल आला. यामध्ये 400 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. मागण्या पूर्ण न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तत्पूर्वी, शुक्रवार 27 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी याच मेलवर 20 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती आणि शनिवारी 28 ऑक्टोबर रोजी 200 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. देशाच्या सर्वोत्तम नेमबाजांकडून त्यांंना मारले जाईल, असे मेलमध्ये म्हटले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच अकाउंटवरून आलेल्या मेलमध्ये लिहिले आहे की, 'आमच्या ईमेलला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, त्यामुळे आता ही रक्कम 200 कोटी रुपये आहे, जर ती मिळाली नाही तर डेथ वॉरंटवर स्वाक्षरी करा.' यापूर्वी 27 ऑक्टोबर रोजी पाठवलेल्या पहिल्या धमकीच्या ईमेलमध्ये 'तुम्ही आम्हाला 20 कोटी रुपये दिले नाहीत तर आम्ही तुम्हाला मारून टाकू, आमच्याकडे भारतातील सर्वोत्तम नेमबाज आहेत', असे लिहिले होते.
27 ऑक्टोबर रोजी पहिला ईमेल प्राप्त झाल्यानंतर, मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा प्रभारींच्या तक्रारीच्या आधारे, गामदेवी पोलिसांनी आयपीसीच्या कलम 387 आणि 506 (2) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. याआधीही अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यामुळे गेल्या वर्षी २९ सप्टेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्रालयाने त्यांची सुरक्षा झेड श्रेणीवरून झेड+ केली होती. सुरक्षेचा खर्च मुकेश अंबानी करतात. हा खर्च दरमहा 40 ते 45 लाख रुपये आहे.