कल्याण : कल्याण-शिळफाटा आणि मुंब्रा-पनवेल जोड रस्त्यांवरील कल्याण फाटा चौकात उड्डाण पूल उभारणीच्या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याच्या हालचाली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) सुरू केल्या गेल्या आहेत. तीन वर्षापूर्वी कल्याण शिळफाटा रस्त्यावरील वाहन कोंडीचा विचार करून शासनाने या रस्त्यावर तीन उड्डाण पूल उभारणीचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये कल्याण फाटा येथे उड्डाण पूल आणि भुयारी मार्गाचा समावेश आहे.
एकंदरीत २०० कोटी खर्चाचे हे काम आहे. एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंता गुरुदत्त राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याची निविदा प्रक्रिया एमएमआरडीएने सुरू केली आहे. कल्याण फाटा येथे उड्डाण पूल उभारणीचा संकल्पन बांधकाम आराखडा नियुक्त प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराने तयार करायचा आहे. ४२ महिन्यांमध्ये हे काम पूर्ण करण्याची अट निविदेत टाकण्यात आली आहे.
उड्डाण पूल व भुयारी मार्ग ४२ महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य
कल्याण-शिळफाटा आणि मुंब्रा-पनवेल जोड रस्त्यांवरील कल्याण फाटा चौकात उड्डाण पूल उभारणीच्या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याच्या हालचाली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरू केल्या आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने कल्याण शिळफाटा रस्त्यावरील वाहन कोंडीचा विचार करून शासनाने या रस्त्यावर तीन उड्डाण पूल उभारणीचा निर्णय घेतला. त्यामध्ये कल्याण फाटा येथे उड्डाण पूल आणि भुयारी मार्गाचा समावेश आहे.
या उड्डाण पूल आणि भुयारी मार्गामुळे बदलापूर, अंबरनाथ काटई मार्गे शिळफाटा चौक दिशेने येणारी, कल्याण, भिवंडी, डोंबिवली, उल्हासनगरकडून येऊन नवी मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने कल्याण फाटा येथे (दत्त मंदिर) उड्डाण पुलावरून थेट एमआयडीसीच्या जलवाहिन्यांवरील पुलावरून महापे-नवी मुंबई दिशेने जातील. ठाणे-मुंब्रा भागाकडून येणारी वाहने कल्याण फाटा येथील उड्डाण पुलाखालील भुयारी मार्गिकेतून पनवेल, तळोजा भागाकडे जातील. यामुळे कल्याण फाटा चौकात होणाऱ्या वाहन कोंडीतून आणि प्रवाशांची खोळंब्यातून कायमची मुक्तता होणार आहे. ग्रेड सेपरेशन या प्रणालीद्वारे हे काम केले जाणार आहे.
डोंबिवली, कल्याण, बदलापूर भागातून येणारी वाहने कल्याण फाटा (दत्त मंदिर चौक) येथून एमआयडीसीच्या जलवाहिन्या असलेल्या पोहच रस्त्यावरून खिंडीतून थेट महापे -नवी मुंबईकडे जातील, असे सुरुवातीला या पुलाचे नियोजन करण्यात आले होते. शिळफाटा खिंडीतील एमआयडीसीच्या जलवाहिन्या अन्य भागात स्थलांतरीत करण्याचे काम खूप खर्चिक आहे. त्यामुळे जलवाहिन्या आहे त्याच ठिकाणी ठेऊन उड्डाण पुलाची सीमारेषा बदलून जलवाहिन्यांवरून पुलाची मार्गिका खिंडीतून महापे रस्त्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर उतरविण्यात येणार आहे. पुलावरील मार्गिका तीन मार्गिकेची करण्यात येणार होती. खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीएकडे पाठपुरावा करून ही मार्गिका चार मार्गिकेची करावी आणि त्यासाठी वाढीव निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. ही मागणी चार वर्षापूर्वी प्राधिकरणाने मान्य केली आहे.
या उड्डाण पुलांव्यतिरिक्त काटई नाका, सुयोग हाॅटेल (रिजन्सी अनंतम प्रवेशव्दारासमोर ) येथे उड्डाण पूल प्रस्तावित आहेत. या पुलांमुळे या दोन्ही चौकांमध्ये होणारी कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. पनवेल, नवी मुंबई, ठाणे, मुंबई भागातून शिळफाटा रस्त्यांवरून जाणारी वाहने उड्डाण पुलांवरून थेट इच्छित स्थळी निघून जातील. स्थानिक शहरांतर्गत वाहने या पुलांखालून इच्छित स्थळी जाणार आहेत, असे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने सांगितले. यासंदर्भातच्या अधिक माहितीसाठी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.