डोंबिवली, ४ जुलै - अनेक वर्षे कल्याण-शीळ मार्गावरून वाहतूक कोंडीने हैराण झालेल्या प्रवाश्यांची वाहतूक कोडीतून काहीशी मुक्ती होणार आहे. शिवसेना (शिंदे गट) माध्यमातून औपचारिकरीत्या निळज्यातील काटई-पलावा पुलाचे उदघाटन केले. कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे आणि शिवसेना कल्याण जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांनी फित कापून अधिकृतरित्या पुलाचे उदघाट्न झाल्याचे जाहीर केले. यावेळी शिवसेनेचे हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
निळजे काटई-पलावा पुलाच्या उदघाट्ना प्रसंगी जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांनी आम्ही फक्त ट्विट करत नाही तर आम्ही कामही करतो असे सांगत विरोधकांना टोलाही लगावला. गेले दहा वर्षे ज्यांनी काम करायला पाहिजे होते त्यांनी काहीही काम केले नाही. मात्र शिवसेना जे बोलते ते काम करते असेही सांगितले. कल्याण-शीळ रस्त्यावर वाहतूक कोंडी होत होती. अनेक वर्षांपासून येथून वाहतूक करणाऱ्यांसाठी हा रस्ता डोकेदुखीचा विषय ठरला होता. विशेष म्हणजे या मार्गावरील पलावा जंक्शन पुलाचं काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेलं होतं. त्यामुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत होती.
या पुलाबाबत मनसेचे नेते व माजी आमदार राजू पाटील यांनी वारंवार आवाज उठवला होता. याच पुलाच्या कामावरून ठाकरे गट आणि मनसे हे दोन्ही पक्ष एकत्र आले होते. तसेच या दोघांनी पलावा पुलाच्या ठिकाणी मोर्चे काढून आंदोलनही केले होते. परंतु आता हा पुल नागरिकांसाठी शुक्रवारपासून खुला करण्यात आला आहे. आता पलावा एक्सपिरिया मॉल येथे वाहतूक कोंडी होणार नाही. वाहन चालकांना रखडावं लागणार नाही. यापूर्वी पलावा पुलाचं काम कधी पूर्ण होईल? असा प्रश्न विचारला जात होता त्यातून आता सुटका झाली आहे. आता हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यामुळे कामावरून घरी येणारी लोकं वेळेत घरी पोहोचतील. पण सत्ताधारी महायुतीने या पलावा पुलाचे उदघाट्न करताना गोपनीयता का ठेवली असेही विचारले जात आहे. शिवसेना कोणतेही काम गाजावाजा करून करते त्याला यावेळी फाटा देण्यात आला आहे.
निळजे काटई पलावा पुलाच्या उदघाट्ना प्रसंगी, लताताई पाटील, सदानंद थरवळ, राजेश कदम, महेश पाटील, बंडू पाटील, अर्जुन पाटील, दत्ता वझे, संजय पावशे, जनार्दन म्हात्रे, रणजित जोशी, भरत भोईर, सतीश मोडक यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा