BREAKING NEWS
latest

डोंबिवलीत प्रथमच संपन्न झाला महापालिका आयुक्तांचा जनता दरबार..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

कल्याण : महापालिका क्षेत्रातील नागरीकांच्या समस्यांचे जलद गतीने निराकरण व्हावे, या दृष्टीकोनातून दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी महापालिकेच्या मुख्यालयातील आयुक्त दालनात जनता दरबाराचे आयोजन करण्यात येते. आता डोंबिवलीतील नागरीकांना विशेषत: ज्येष्ठ नागरीकांना देखील जनता दरबारात समक्ष उपस्थित राहून आपल्या समस्या आयुक्तांसमोर मांडता याव्यात यासाठी प्रथमच आयुक्तांच्या जनता दरबाराचे आयोजन डोंबिवली (पूर्व) येथील पी.पी चेंबर्स येथे 'फ' प्रभाग कार्यालयाच्या इमारतीत काल दुपारी करण्यात आले होते. यावेळी सुमारे ७५ ते ८० नागरीकांनी जनता दरबारास उपस्थित राहून आपल्या समस्या आयुक्त व अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. सदर समस्यांवर चर्चा करुन त्यांचे त्वरीत निराकरण करण्याबाबतचे निर्देश आयुक्तांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
अनधिकृत बांधकामे होऊ नये यासाठी सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना सक्त सुचना देण्यात आल्या असून असे बांधकाम होताना दिसले तर त्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश आपण दिले आहेत, महापालिका रुग्णालये, नागरी आरोग्य केंद्र यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील असून केंद्र शासनाच्या “नॅशनल क्वालिटी अश्यूरन्स स्टँडर्ड” व “कायाकल्प” या प्रकल्पा अंतर्गत/सेवांतर्गत नागरी आरोग्य केंद्रे व महापालिका रुग्णालये यांच्या कार्यप्रणालीबाबत कालबध्द नियोजन करण्यात येत आहे आणि येत्या कालावधीत अधिक दर्जेदार सुविधा देण्याचा आपण प्रयत्न करु अशी माहिती आयुक्त अभिनव गोयल यांनी योवळी पत्रकारांशी बोलताना दिली.

जनता दरबार संपन्न झाल्यानंतर आयुक्त अभिनव गोयल यांनी अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे तसेच इतर अधिकाऱ्यांसमवेत थेट चालत डोंबिवली स्थानक परिसराची पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सुचना दिल्या.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत