BREAKING NEWS
latest

पहलगाम आतंकवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मुसासह तीन दहशतवादी ठार..

प्रतिनिधी अवधुत सावंत
   
श्रीनगर : भारतीय लष्कराच्या 'ऑपरेशन महादेव" अंतर्गत भारतीय सैन्याने आज श्रीनगरच्या लिडवास भागात लपलेल्या तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार मारले. चिनार कॉर्प्सने एक्स वर हे वृत्त दिले. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये पहलगाम हल्ल्यातील मुख्य आरोपी हाशिम मुसा देखील होता. वृत्तसंस्था पीटीआयनुसार, लष्कराच्या अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे की मारला गेलेला दहशतवादी हाशिम मुसा होता. इतर दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले. उर्वरित दोन दहशतवाद्यांपैकी एकाचा २०२४ मध्ये सोनमर्ग बोगदा प्रकल्पावरील हल्ल्यात सहभाग असल्याचे सांगितले जात आहे.

दहशतवाद्यांकडून अमेरिकन एम४ कार्बाइन, एके-४७, १७ रायफल आणि ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत. काही इतर संशयास्पद वस्तू देखील जप्त करण्यात आल्या आहेत. मंगळवारी लष्कराकडून ऑपरेशन महादेवची माहिती दिली जाऊ शकते.

लष्कराच्या म्हणण्यानुसार, सकाळी ११ वाजता गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर लिडवासमध्ये शोध मोहीम सुरू करण्यात आली. यादरम्यान, दुरून दोनदा गोळीबाराचा आवाज ऐकू आला. या भागात सुरक्षा दलांची तैनाती वाढवण्यात आली आहे. २२ एप्रिल रोजी झालेल्या या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता आणि १६ जण गंभीर जखमी झाले होते. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांच्या धार्मिक ओळखीच्या आधारे निवडकपणे लक्ष्य केले होते. ही घटना पहलगाम शहरापासून ६ किमी अंतरावर असलेल्या बैसरन खोऱ्यात घडली.

हल्ल्यानंतर केलेल्या तपासात तीन दहशतवाद्यांची नावे उघड झाली. २४ एप्रिल रोजी अनंतनाग पोलिसांनी ३ रेखाचित्रे प्रसिद्ध केली. तिन्ही दहशतवाद्यांची नावे अनंतनागचा आदिल हुसेन ठोकर, हाशिम मुसा उर्फ सुलेमान आणि अली उर्फ तल्हा भाई अशी आहेत. मुसा आणि अली हे पाकिस्तानी आहेत. मुसा हा पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपमध्ये कमांडो होता. त्यांच्यावर प्रत्येकी २० लाख रुपयांचे बक्षीसही ठेवण्यात आले आहे. एनआयएने अटक केलेल्या दोन आरोपींनी या तीन दहशतवाद्यांची नावे उघड केली आहेत की इतर काही दहशतवाद्यांची नावे हे सध्या स्पष्ट झालेले नाही.

महाराष्ट्राची दिव्या देशमुख नवी महिला बुद्धिबळ जागतिक विजेती..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
युरोप : जॉर्जियामधील बटुमी येथे पार पडलेल्या FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक २०२५ स्पर्धेत भारताच्या दिव्या देशमुखने अभूतपूर्व कामगिरी करत अंतिम फेरीत अनुभवी ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीला पराभूत करून भारताची पहिली महिला विश्वविजेती ठरली आहे. दिव्या देशमुखने वयाच्या केवळ १९व्या वर्षी हे यश संपादन करून भारताच्या बुद्धिबळ क्षेत्रात एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या विजयामुळे दिव्या देशमुख भारताची चौथी महिला ग्रँडमास्टर बनण्याच्या दिशेने मोठं पाऊल टाकत आहे. दिव्याने भारताची ८८ वी ग्रँडमास्टर होण्याचा मानही मिळवला.

या स्पर्धेच्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींपैकी एक म्हणजे अंतिम फेरीत दोन भारतीय महिला खेळाडू एकमेकांविरुद्ध खेळत होत्या. कोनेरू हम्पीच्या अनुभवासमोर दिव्याच्या धाडसी निर्णयक्षमता आणि सखोल तयारीचा विजय झाला. यामधून भारताच्या बुद्धिबळ क्षमतेचं आंतरराष्ट्रीय स्तरावर ठोस प्रदर्शन झालं आणि चीनसारख्या बलाढ्य बुद्धिबळ राष्ट्रांवर मात करण्यात भारत यशस्वी झाला.

FIDE महिला विश्वचषक २०२५ च्या अंतिम फेरीतील विजेत्या दिव्या देशमुखला सुमारे ४२ लाख रुपये आणि उपविजेत्या कोनेरू हम्पीला सुमारे ३० लाख रुपये बक्षिसे मिळतील. याशिवाय, या खेळाडूंनी अत्यंत प्रतिष्ठित ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेसाठी देखील पात्रता मिळवली आहे.

बुद्धिबळ तज्ञांनी दिव्याच्या विजयाचे विशेष कौतुक केले असून विश्वनाथन आनंद यांच्यासारख्या दिग्गजांनी तिच्या खेळातील परिपक्वता आणि आत्मविश्वासाची प्रशंसा केली आहे. या यशामुळे देशभरात नवोदित बुद्धिबळपटूंना प्रेरणा मिळेल आणि महिलांच्या सहभागास नवे दालन खुले होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये ३० शाळेच्या ४००० विद्यार्थ्यांसोबत ४ दिवसीय 'जे एम एफ' गुरू पौर्णिमा आंतरशालेय स्पर्धांचे व कारगिल दिवसाचे भव्य आयोजन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : 'जे एम एफ' शिक्षण संस्थेचे २०२५ हे वर्ष "रजत महोत्सव" म्हणून साजरे होत आहे. संपूर्ण वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन संस्थेमध्ये करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या अंगभूत कला गुणांना वाव मिळण्यासाठी दरवर्षी प्रमाणेच या वर्षी देखील 'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये गुरू पौर्णिमा निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन दिनांक २३ ते २६ जुलै या चार दिवसांमध्ये करण्यात आले. दिनांक २३ व २४ जुलै रोजी अनुक्रमे बुद्धिबळ आणि चित्रकला व प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन केले गेले तर दिनांक २५ व २६ जुलै रोजी अनुक्रमे एकांकिका नाटक, पथनाट्य, व समूह गायन तसेच समूह नृत्य आणि शिशुविहरचे वेशभूषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
'जे एम एफ' शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, व इतर पदाधिकारी यांच्या हस्ते सरस्वती पूजन व महर्षी वेद व्यास पूजन करण्यात आले. पथनाट्य व एकांकिका स्पर्धेचे परीक्षक श्री. रमेश जाधव व निहारिका राजदत्त यांनी परीक्षण केले तर समूह गायनाचे परीक्षक श्री. श्रीधर अय्यर यांनी केले. समूह नृत्याचे परिक्षक श्री. भावेश बोमेरा व रेशम कदम यांनी परीक्षण केले तर शिशु विहार च्या वेशभूषा स्पर्धेचे परीक्षण मिस डोंबिवलीकर आणि मिस कल्याण मुकुट विजेत्या निशिता शिंदे व श्वेता जगताप यांनी केले.
"सा कला या विमुक्तये" म्हणजेच कला ही सर्व बंधनातून मुक्त करते असे सांगत  संस्थेचे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी पुढे आपल्या भाषणात नमूद केले की, प्रत्येक क्षणाला मनुष्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत असतात, बोलताना देखील न कळतपणे अभिनय होत असतो. जन्मतःच घेऊन आलेली ही अभिनय कला म्हणजे दैवी देणगी आहे. आज मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेले सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करून तुम्हाला अभिनय स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो असे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी विद्यार्थांना सांगितले तर अभिनयाबरोबरच संगीत ऐकणे, गाणे म्हणणे म्हणजे स्वतः बरोबरच इतरांना देखील आनंद देणे होय. बाळ जन्माला येते ते रडतच येते, त्यातही सूर गवसतो, बोबडे बोल बोलताना देखील आलाप, ताना ऐकायला मिळतात अशी ही अभिजात संगीताची दैवी देणगी सर्वानाच असते. फक्त त्याला पैलू पडण्याचे काम संगीताचे गुरू करत असतात, असे संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी समूह गान स्पर्धेच्या वेळी मुलांना सांगून त्यांना शुभेच्छा दिल्या.
वेशभूषा स्पर्धांची छोटी मुले बघून जणू काही 'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये, "हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमलीचे.." असेच भासत होते. वेशभूषेची "निसर्ग थीम" असल्या कारणाने सर्व सहभागी विद्यार्थी झाडे, वेली, फुले आणि अन्य प्रकारे सजून आली होती. समूह नृत्यांमध्ये देखील असंख्य मुलांनी सहभाग दर्शवला होता. जिंकलेल्या सर्व विद्यार्थ्यांना संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार व दिग्दर्शिका जाह्नवी कोल्हे व मान्यवरांच्या हस्ते पदके, चषक, प्रशस्तीपत्रक देण्यात आले तसेच सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना देखील सहभाग प्रशस्तीपत्रक देण्यात आले. जास्तीत जास्त संख्येने सहभागी झालेल्या 'डॉन बॉस्को' शाळेला सर्वोत्कृष्ट सहभागी शाळा ६५० विद्यार्थी म्हणून मोठे चषक देण्यात आले.
'जे एम एफ' शिक्षण संस्थेचे २०२५ हे वर्ष रौप्य महोत्सव म्हणून साजरे होत आहे, त्या निमित सहभागी झालेल्या प्रत्येक शाळेला 'जे एम एफ' शिक्षण संस्थेकडून "स्मृतिचिन्ह" देण्यात आले. चार दिवस सुरु असलेल्या या स्पर्धामध्ये सुमारे चार हजारांच्या वर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. संगीत शिक्षिका सौ. श्रेया कुलकर्णी, नृत्य शिक्षक श्री. अभिषेक देसाई आणि दीपाली सोलकर, नाट्य विभागाचे शिक्षक श्री. प्रमोद पगारे,  मुख्याध्यापिका सौ. ज्योती व्यंकटरामण व तेजावती  कोटीयन , महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक श्री. अलपेश खोब्रागडे, श्री. विठ्ठल कोल्हे, शिशुविहरच्या उपमुख्याध्यापिका सौ. मयुरी खोब्रागडे तसेच इतर सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी प्रतिनिधी यांनी 'जे एम एफ' गुरुपौर्णिमा आंतरशालेय स्पर्धा उत्तमरित्या नियोजन करून यशस्वीरित्या पार पाडल्या.
२६ जुलै हा "कारगिल विजय दिवस" म्हणून ओळखला जातो. येत्या ९ ऑगस्ट ला राखी पौर्णिमाचे औचित्य साधून जन गण मन इंग्रजी माध्यमिक शाळा आणि विद्यामंदिर मधील सर्व विद्यार्थिनींनी स्वतःच्या हाताने राखी तयार करून सीमेवर कार्यरत असलेल्या आपल्या बंधू जवानांना राखी पोहचती केली, यावेळी आपल्या भारत देशाचा झेंडा फडकवत शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहिली व वंदे मातरम् म्हणून कार्यक्रमांची सांगता झाली.

भारत विकसीत करतोय जगातील पहिला ड्युअल स्टेल्थ 'रामा' (RAMA) ड्रोन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
हैदराबाद : भारतात जगातील पहिला ड्युअल स्टेल्थ ड्रोन विकसीत केला जात आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे हा ड्रोन केवळ शत्रूच्या हाय-रेझोल्यूशन रडार आणि इन्फ्रारेड सिग्नलपासून बचाव करणार नाही, तर काही सेकंदात हल्ला करण्यास देखील सक्षम असेल. या ड्रोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ‘रडार ऍब्सॉर्प्शन ऍण्ड मल्टीस्पेक्ट्रल ऍडॉप्टिव्ह’ तंत्रज्ञान रामा (RAMA) या तंत्रज्ञानावर आधारित ड्रोनला रामा (RAMA) असे नावही देण्यात आले आहे. या ड्रोनचे वजन १०० किलो आहे आणि ते ५० किलोपर्यंत वजन वाहून नेऊ शकते. रामासह हे ड्रोन २०२५ च्या अखेरीस भारतीय नौदलाकडे सोपवले जाऊ शकते.

हे एक विशेष स्वदेशी कोटिंग मटेरियल आहे, जे रडार आणि इन्फ्रारेड डिटेक्शन ९७% कमी करते. यामुळे ड्रोन शत्रूच्या रडार आणि इन्फ्रारेड सिग्नलपासून पूर्णपणे लपू शकतो. सध्या, फक्त अमेरिका, चीन आणि रशियाकडेच रडारपासून लपणारे स्टेल्थ ड्रोन आहेत.

संरक्षण मंत्रालयाच्या मदतीने हैदराबादस्थित स्टार्टअप कंपनी 'वीरा डायनॅमिक्स आणि बिनफोर्ड रिसर्च लॅब' हे ड्रोन विकसित करत आहे. ड्रोन तयार करण्यासाठी वीरा डायनॅमिक्सने त्यांचे रामा (RAMA) वापरले आहे आणि बिनफोर्ड लॅब्सने त्यांचे स्वायत्त ड्रोन तंत्रज्ञान त्यात समाविष्ट केले आहे.

१ ऑगस्टपासून होणार UPI च्या नियमांमध्ये मोठे बदल..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई, दि. २५ : येत्या १ऑगस्ट, २०२५ पासून उपि च्या नियमांमध्ये काही मोठे बदल होणार आहेत. हे बदल GPay, PhonePe, Paytm यांसारखे ऍप्स वापरणाऱ्या सर्व ग्राहकांवर लागू होतील. हे बदल UPI सेवा अधिक चांगली, सुरळीत आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी करण्यात येत आहेत.

आता तुम्ही एका UPI ऍपवरून एका दिवसात फक्त ५० वेळाच तुमच्या बँक खात्यातील शिल्लक (बॅलन्स) तपासू शकाल. वारंवार बॅलन्स चेक केल्याने सर्वरवर अनावश्यक दबाव येतो, तो कमी करण्यासाठी हा नियम आणला आहे.

तुमच्या मोबाईल नंबरशी जोडलेल्या बँक खात्यांची यादी तुम्ही एका दिवसात फक्त २५ वेळाच पाहू शकाल. यामुळे अनावश्यक एपीआय कॉल्स कमी होतील आणि युपीआय सेवा अधिक सुरळीत चालेल.
नेटफ्लिक्स, म्युच्युअल फंड एसआयपी किंवा इतर बिलांचे ऑटोपे व्यवहार आता फक्त कमी गर्दीच्या (नॉन-पीक) वेळेतच पूर्ण होतील. यासाठी सकाळी १० वाजण्यापूर्वी, दुपारी १ ते संध्याकाळी ५ वाजेदरम्यान, रात्री ९:३० नंतर या तीन वेळा ठरवण्यात आल्या आहेत.
एखादा व्यवहार अयशस्वी झाल्यास (फेल झाल्यास), तुम्ही दिवसातून फक्त ३ वेळाच त्याचे स्टेटस तपासू शकाल. तसेच, प्रत्येक वेळी स्टेटस तपासण्यासाठी किमान ९० सेकंदांचे अंतर ठेवावे लागेल. यामुळे सर्वरवरील भार कमी होऊन व्यवहारांच्या परतीची (रिव्हर्सल) किंवा पुन्हा प्रयत्न करण्याची (रिट्राई) शक्यता वाढेल.

३० जून २०२५ पासून एक महत्त्वाचा बदल आधीच लागू झाला आहे. तो म्हणजे आता तुम्ही कोणाला पैसे पाठवाल, तेव्हा पेमेंट करण्यापूर्वी तुम्हाला त्या व्यक्तीचे बँकेत नोंदणीकृत नाव दिसेल. यामुळे चुकीच्या खात्यात पैसे जाण्याचा किंवा फसवणुकीचा धोका मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.

लाडकी बहीण योजनेच्या महिलांचे पैसे लाटणाऱ्या 'लाडक्या पुरुषां'कडून होणार वसुली..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : महायुती सरकारने सुरू केलेली 'लाडकी बहीण योजना' वारंवार नवनव्या वादात अडकत आहे. कधी निधीमुळे तर कधी लाभार्थींवरुन लाडकी बहीण योजना वादग्रस्त ठरत असल्याचं दिसून येत आहे. आता तर पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आले आहे. 

लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडून वर्षाला ४० हजार कोटींचा खर्च येत आहे. याचा लाभ पुरुषांनी घेतल्याचंही समोर आलं आहे. गेल्या दहा महिन्यात लाडक्या पुरुषांना २१ कोटी ४४ लाख रुपयांचं वाटप झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आता या लाडक्या पुरुषांवर कारवाई होणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी सांगितलं की, महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेत धोका देऊन भाग होणाऱ्या पुरुषांविरोधात कारवाई केली जाईल आणि त्यांच्याकडून ही रक्कम वसूल केली जाईल. या लाडकी बहीण योजनेतील १४ हजार पुरुष लाभार्थी आहेत. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहिन्याला १५०० रुपये मिळतात. यासाठी वार्षिक उत्पन्न, कुटुंबाची स्थिती याबाबत अनेक निकष लावण्यात आले आहेत. ही योजना गेल्या वर्षी २०२४ च्या ऑगस्टमध्ये सुरू झाली होती. यामुळे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला फायदा झाला. याबाबत अजित पवार म्हणाले, सरकारी नोकरी करणाऱ्या काही महिलादेखील लाभार्थी झाल्या होत्या, त्यांची नावं हटविण्यात आली आहे.

‘डिजिटल गव्हर्नन्स’ ही गरज नाही तर आवश्यकता - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत माहिती तंत्रज्ञान विभाग, महाराष्ट्र शासन आणि ‘समग्र’ संस्था यांच्यामध्ये ‘ई-गव्हर्नन्स’ सुधारणांना गती देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. डिजिटल रेग्युलेशन आणि शासकीय प्रणालीच्या आधुनिकीकरणात महाराष्ट्र राज्याने नेहमीच देशात आघाडी घेतली आहे. आता डिजिटल गव्हर्नन्स ही केवळ सुविधा न राहता, काळाची गरज बनली आहे. सर्व शासकीय योजना आणि सेवा ऑनलाईन प्रणालीद्वारे नागरिकांपर्यंत सहज पोहोचतील.

‘नो ऑफिस डे’ सारख्या उपक्रमातून नागरिकांना कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज भासणार नाही सर्व प्रक्रिया ऑनलाईन पूर्ण करता येणार आहेत. भविष्यात शासकीय सेवा व्हॉट्सऍप सारख्या सहज वापरता येणाऱ्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होतील. यासाठी प्रत्येक विभागाने आपापली उद्दिष्टे, कालमर्यादा आणि अंमलबजावणीची रूपरेषा निश्चित करून त्यानुसार काम करणे आवश्यक ठरेल. संपूर्ण प्रक्रियेत नागरिकांचा सक्रीय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून, शासन व नागरिक यांच्यातील समन्वय साधल्यास शासनाच्या सेवा अधिक प्रभावी पद्धतीने सामान्यांपर्यंत पोहोचतील.

त्याचबरोबर शासनाचे सकारात्मक ब्रँडिंगही सुनिश्चित होईल. या सामंजस्य करारामुळे शासकीय व्यवस्थेत मूलभूत आणि दीर्घकालीन परिवर्तन घडणार असून, या उपक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘समग्र’ संस्थेला शुभेच्छा दिल्या. यावेळी मंत्री ऍड. आशिष शेलार, समग्रचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव गोयल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.