BREAKING NEWS
latest

प्रभादेवी-खाडा परिसरातील आनंददायी घटना आणि ज्येष्ठ पत्रकार स्व. राधाकृष्ण नार्वेकर..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

पाच दशके पत्रकारितेत अविरत काम व पत्रकारितेला आपला धर्म मानून समाजाभिमुख पत्रकारिता करणारे एक पोटतिडकीचा पत्रकार म्हणून स्व.राधाकृष्ण नार्वेकर यांची महाराष्ट्राला ओळख. त्यांचे कौटुंबिक स्नेही पत्रकार शिवाजी धुरी यांनी त्यांच्या ८५ व्या जन्मदिवसानिमित हृद्यस्पर्शी भावना व्यक्त करणारी पोस्ट नुकतीच लिहिली होती. त्यांच्याकडून ती माझ्या फेसबुक वॉल वर आली. समाजासाठी ठोस असे आपण सतत काही ना काही केले पाहिजे या ध्येयाने शिक्षकीपेशा सोडून नार्वेकर यांनी पत्रकारिता निवडली होती. याचा अनुभव मी १९८६ सालापासून घेत होतो, त्यावेळी दैनिक मुंबई सकाळ प्रभादेवी दत्तमंदिर लगत असलेल्या सकाळची इमारत होती त्यातून छापला जायचा. (सध्या त्याठिकाणी टॉवर उभा आहे) मी सुद्धा त्यावेळी जनसामान्यांचे प्रश्न लिहीत असे.  सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार माधव गडकरी यांच्या जागेवर संपादक म्हणून नार्वेकर आले होते. ढेंगभर अंतर असल्याने मी सतत तिथे जायचो त्यामुळे त्यांचा परिचय झाला होता. विचारपूस करायचे आणि स्वतःकडे असलेले ज्ञान मुक्त हस्ते वाटायचे.

  परवा शिवाजी धुरींची पोस्ट वाचल्यानंतर माझे मन ३५ वर्षे मागे गेले, त्यावेळी शापूरजी पालनजी कंपाउंड मध्ये राहणारी आणि प्रभादेवी म्युनिसिपल सेकंडरी स्कुल मध्ये शिकणारी  विजया नार्वेकर माझ्या भागातली विद्यार्थिनी महापालिकांच्या सर्व शाळांतून एसएससी ला पहिली आली होती आणि गुणवत्ता यादीत येण्याची तिची संधी थोडक्यात हुकली होती. साहजिकच सेंच्युरी बाजारच्या अलीकडे राहणाऱ्या सर्व नागरिकांना कमालीचा आनंद झाला होता. विजयाची दखल मुंबईतील वर्तमानपत्रांनी घ्यावी, तिच्या गुणवत्तेला प्रसिद्धी मिळावी या हेतूने मी राधाकृष्ण नार्वेकर साहेबांकडे गेलो. विषय आणि स्थानिक परिस्थिती त्यांना समजावून सांगितली. ऐकल्यावर त्यांच्यातील सामाजिक अंग जागे झाले. म्हणाले, रवींद्र या मुलीबद्दल मी स्वतः लिहितोच परंतु तिचा नागरी सत्कार सुद्धा व्हायला पाहिजे मी कार्यक्रमाला नक्की येईन. मी, रामनाथ म्हात्रे, शांताराम कांडरे, दशरथ बिर्जे, विनायक वायगंणकर, राठोड बाबूजी, कमलाकर माने, तुळशीदास शेळके अनिल जाधव, राजाराम सावंत, शिरीशेठ पाटील आणि इतरांनी कार्यक्रमाचे नियोजन केले, त्यानंतर स्टॅण्डर्ड मिलमधील ऑफिसर नंदगिरी साहेब यांनी मफतलाल हॉल (आयसीआयसीआय बँक) उपलब्ध करून दिला, बुधवार, दिनांक २९ ऑगस्ट १९८९ ला स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत मफतलालमध्ये कार्यक्रम झाला. खासदार शरद दिघे, आमदार शरयु ठाकूर, त्यावेळच्या मुख्याध्यापिका दाबके मॅडम, कृष्णा ब्रीद सर, रमेश परब, रामचंद्र बांधणकर हे पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. नार्वेकर साहेबांनी शब्द दिल्याप्रमाणे बातमी आणि परिस्थितीला वाचा फोडणारा एक लेख लिहिला. त्यावेळी शापुरजी पालनजी कंपाउंड, शास्त्री नगर आणि शिवसेना नगर येथील १६० घरांना पर्यायी जागा न देता घरे खाली करण्याच्या नोटिसा मुंबई महानगरपालिकेने दिल्या होत्या. आम्ही कार्यकर्ते कोर्टातही केस हरलो होतो त्यामुळे हा प्रश्नही यानिमित्ताने समोर येईल असा माझा स्वार्थ होता. आपण लिहीत असलेला प्रत्येक शब्द हा सामान्यजनांच्या उत्कर्षाकरीता उपयोगी पडला पाहिजे अशी त्यांनी पत्रकारिता केली. आज विजया सुखी समाधानी आयुष्य जगत आहे, तर याठिकाणचे झोपडीवासीय तेव्हा कल्पनाही केली नव्हती अशा २३ मजल्यांच्या टॉवर्समध्ये चांगल्या सोयीसुविधा असलेल्या घरात राहत आहेत. पेरलेले चांगले उगवले याचे आता समाधान आहे.
- रवींद्र मालुसरे
अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई
भ्रमणध्वनी: ९३२३११७७०४
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत