BREAKING NEWS
latest

स्वतःचे वर्तमान अंधारात अन् दुसऱ्यांचे भविष्य सांगतोय...

जून महिन्याचा पहिला आठवडा होता. साधारणतः दुपारच्या बारा वाजण्याची वेळ... सूर्य देवाने अक्राळ-विक्राळ आगीचे रोद्ररुप धारण केलेलं... *माझ्या रोझोदा गावात* यावेळेला कोणी घरा बाहेर दिसणे तसे फार कठीणच. अतिमहत्वाचे काम असेल तर अन्यथा कोणीही घरा बाहेर पडणार नाही. कारण जळगाव जिल्ह्यात मे आणि जून महिन्याचे ऊन ४७ ते ४८ अंश सेल्शियश ड्रिग्रीत किंवा त्या पेक्षा जास्तच तापमान ! येथे सकाळी साडे सात वाजेपासून उष्णतेची दाहता जाणवायला लागते. या दरम्यान शाळेला सुट्टी लागल्याने मी माझ्या रोझोद्याला आलेला होता. आमचा रावेर तालुका केळी बागायतदार हिरवळ असला तरी उष्णतेच्या तीव्रतने मात्र जीवाची लाहीलाही होते. रोझोदापासून पाच किलो मीटरवर असलेल्या सावदा येथे नगरपालिकेच्या मंगल कार्यालयात मित्राचे स्टँर्डटाईम लग्न होते, अतिउष्णता त्यात वरणपोळी, वांग्यांची भाजीचे स्वादिष्ट जेवण वरुन तापमान तर खालून जागा तापलेली भूमाता त्यामुळे जेवण न करता फक्त हजेरी लावून पैशे बजावून अन् घरी निघालो ...
       कडाक्याचे ऊन असल्याने डोक्याला बागायतदार मोठा रुमाल लपेटलेला, त्यावर हेल्मेट, लांब बाह्यांचा खादी कुर्ता अन् पायात मोजे व बुट. एवढ्या जबरदस्त स्वसंरक्षणात सुध्दा उन्हाची तीव्रता त्यापेक्षा कितीतरी भयानक होती. म्हणून जे स्वतःला जपतात, ज्यांना उष्णता सहन होत नाही अशी मंडळी सहजासहजी मे व जून महिन्यात गावी येणे टाळतात. मला मात्र सुट्टीत गावी आल्याशिवाय करमत नाही. रणरणत्या उन्हात काहीतरी थंड खाण्याची इच्छा झाली. *माझ्या रोझोद्यातील गणेश चौधरीच्या कोल्ड्रींक दुकानात गेल्यानंतर आईस्क्रीमची गणेशला आँर्डर दिली.* गणेशकडील आईस्क्रीमचा आस्वाद घेत गावातील मित्रांसोबत गप्पा रंगल्या असताना एका अनोळखी माणसाचा चंचू प्रवेश झाला... त्याने देखील आईस्कीमची आँर्डर दिली. पांढरा कुर्ता, पांढरे पण थोडे मळकट धोतर, डोक्यावर धारदार गांधी टोपी अन् कपाळावर लाल टिळा... माणूस जरा सावळा असला तरी भारदस्त, रुबाबदार आणि साखरेपेक्षाही गोड त्याची वाणी... स्वादिष्ट आईस्क्रीम लागल्याने गणेशला पुन्हा आईस्क्रीमची आँर्डर मी दिली आणि पुन्हा आईस्कीमवर ताव मारणे सुरु...अचानक माझे त्या माणसाजवळ असलेल्या एका नाजूकशा सुंदर पिंजऱ्याकडे व त्यातील सुंदर पोपटाकडे लक्ष गेले... 
      मला नेहमीच असं काहीतरी वेगळं दिसलं की त्याविषयी जाणून घेण्याची कुतूहलता असते व लिखाण करावेसे वाटते. अर्थात लहानपणापासून पत्रकारितेत काम करीत असल्याने लिखाणासाठी काहीतरी नवीन शोधवृत्ती नजरेत असतेच, त्यात कवी असल्याने आगळे-वेगळे पाहिल्यानंतर तो विषय कवितेत मांडणे हे स्वाभाविकच ! कारण म्हणतात ना, "जे न देखे रवी, ते देखे कवी." त्यात आजून भर म्हणून की काय समाजाचा एक जागृक नागरिक म्हणजे शिक्षक म्हणून मी सहज त्या सदगृहस्थाकडून बंद पिंजऱ्यातील पोपटा संदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अर्थात नवनवीन, आगळी- वेगळी माहिती जाणून घेण्याचे किडे तसे माझ्यात लहानपणापासूनच ! तो पोपट पिंजऱ्यातून बाहेर येऊन बाहेर पसरवलेल्या पत्त्यांच्या आकारासारख्या कार्डांपैकी एक कार्डला तो गुणी पोपट आपल्या चोचिने उचलून ते कार्ड आपल्या मालकाच्या हाती निमूटपणे देऊन अथवा बाहेर काढून तो पोपट परत आपल्या पिंजऱ्यात जातो. त्या कार्डामध्ये समोरील व्यक्तीचे भविष्य लिहिलेले असते. ही पूर्वकल्पना मला असताना सुध्दा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. साधारणतः साठ वर्ष पार केलेले शिवराम जानबा हिंगे हे मराठवाड्यातून चार महिन्यांपासून पिंजरा व पोपट घेऊन *स्वतःचे वर्तमान अंधारात असताना दुसऱ्यांचे भविष्य सांगण्यासाठी व पोटाची खळगी भरण्यासाठी निघालेले...* इच्छा नसतानाही आपण परंपरागत काम करीत असल्याची खंत शिवराम यांनी व्यक्त केली.
       ते म्हणतात, 'माझे वडील जानबा हिंगे हे तिसरी नापास होते. आई सुगंधा निरक्षर पण कष्टाळू , शांत स्वभावाची होती. मला दोन मोठे भाऊ, मी सर्वात लहान. वडील पोपटाला पिंजऱ्यात ठेवून गावो-गावी जात व लोकांचे भविष्य सांगत. त्याकाळी या कामाला तसा खूप चांगला प्रतिसाद जनतेकडून मिळत असे, कोणी आनंदाने घरातील धान्य देई तर कोणी दोन रुपये, तीन रुपये देऊन आपले भविष्य उत्सुकतेने ऐकत. आजूबाजूला प्रचंड गर्दी व्हायची. 
      मराठवाडा तसा दुष्काळीच. त्यात निसर्गाने कृपा केलीच तर खाण्या-पिण्याची समस्या थोड्या फार प्रमाणात सुटत असे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याचे शाळा शिकताना मिळेल ते काम मिळेल त्या पैशात करावं लागे. मोठे भाऊ देखील काही वर्षानंतर वडिलांप्रमाणे पिंजरा, पोपट आणि भविष्य नोंद असलेले कार्ड घेऊन चांगला पांढराशुभ्र पेहराव करुन पोटाची खळगी भरण्यासाठी गावो-गावी हिंडत. माझे शिक्षण व काम सुरुच होते. घरातील एकंदरीत आर्थिक परिस्थिती विवंचनेची असताना देखील मी अभ्यास करीत होतो. त्यात वडिलांना रोज संध्याकाळी देशी दारुच्या अड्यावरील ती घाणेरडी दारु पिण्याची वाईट सवय लागलेली.
       थोड्याच वर्षांनी दोघ भावांचे लग्न झाले. घर खूप लहान व घरात अठराविश्व दारिद्रय त्यात वडील दररोज रात्री दारु पोटात टाकून आल्यानंतरचा होणारा तमाशा, कटकट पाहून फार वाईट वाटायचे. त्यात काही दिवसांनी दोघे मोठे भाऊ वहिनीला घेऊन औरंगाबाद येथे राहू लागले. मी शाळेमध्ये जाऊन फावल्या वेळेत मिळेल ते काम करीतच होतो. वडिलांचे देशी दारु पिऊन तराट होणे जरा जास्तच वाढले होते व नंतर त्यांचे आईसोबत भांडण करणे सुरुच...
        आई माझी तशी खूप शांत व समजूतदार. तिच्याकडे बघून तिची खूप दया येते होती. ती सतत मला समजावून सांगता असे, *"बाळा शिवराम, खूप शिक हं, शिकून श्यान लय मोठ्ठा सायेब हो."* ब-याच वेळा आईच्या कुशित शिरुन म्या ढसा-ढसा रडायचो. आई मायेने डोक्यावरुन, तोंडावरुन हात फिरवत धीर देत समजूतदारीच्या गोष्टी सांगे. ती मला नेहमीच म्हणायची, *"बेटा शिवराम, माझं ऐक, तू ह्यो पोपट, पिंजरा घेऊन लोकायचे भविष्य सांगत फिरु नको, अरे आपलंच वर्तमान अंधामय असताना दुसऱ्यांचं काय भविष्य सांगायचे ?"* माझी माय निरक्षर जरुर होती मात्र ती अडाणी अजिबातच नव्हती. तर दुसरीकडे आमचे वडील आता पहाटेपासून त्या मळकट देशी दारुच्या अड्ड्याची वाट धारायचे ती रात्रीच्या अकरा वाजेपर्यंत. त्यांच्या देशी प्रेमात जास्तच वाढ झाली होती.
       एक महिन्यापासून वडिलांनी एकच हेका धरला होता. ते मला म्हणत होते, *" शिवा तुझे शाळत जानं आता बंद कर , ह्यो पोपट, पिंजरा अन् ते कार्ड घेऊन आपल्या परंपरेचे काम तू कर."* यावरुन माय अन् बाप्पामध्ये एक दिवशी खूप भांडण झाले. माय बाप्पाले सांगत होती *"आपल्या शिवा ले नका हे काम सांगू, त्याकामात आता राम शिल्लक राहिली नी, शिवा तू नोकरी कर, मिळल ते काम कर पन हे काम नको करु."* केवढी समजूतदार मही माय... !
         घरात अठराविश्व दारिद्रय. त्यात मोठ्या भावंडांनी आमच्याकडे दुर्लक्ष केलं. एके दिवशी नेहमीपेक्षा जरा जास्तच वडिलांनी देशी दारुवर प्रेम केलं व्हतं. घरात सारखी कटकट सुरु होती, माय शांत होऊन आपली कामे करीत होती. रात्रीचे नऊ वाजले असतील. मी अभ्यास करीत बसलो होतो. पिताश्री अड्ड्यावरुन पुन्हा एक फेरी मारुन आले. त्यामुळे त्यांच्या वाणीवरचा ताबा राहिलेला नव्हता. आईला सारखे हाणून-पाडून शिव्या देत होते, तरीही माय शांत. मी ही चुप्प ! घरात आपले कोणीही ऐकून घेत नाही हे ध्यानात येत वडिलांचा पारा सटकला आणि आईला मारु लागले. कारण नसताना आईला मार पडणे हे मनाला पटत नव्हते. बरं हे रोजचंच ! आईची कशीबशी सुटका मी केली. थोडं वातावारण शांत झालं. पुन्हा अर्धा तासानंतर आईला मारहाण सुरु झाली, आक्सून-बोक्सून खूप रडलो मी, वडिलांचे ते आईला मारहाण करणे थांबत नव्हते. कशी-बशी अवकया करुन आईची सुटका केली. तिला फार मार लागला होता. दवाखान्यात नेऊन तिच्या जखमांवर मलमपट्टी करुन व डाँक्टरने दिलेली औषधी घेऊन आईला घरी आणले. आईला औषध दिले. तोपर्यंत आमचे पिताश्री घोरायला लागले होते. आईची दुरावस्था पाहून फार वाईट वाटत होते. तिची किव येत होती तर दुसरीकडे वडिलांबद्दल राग येते होता. मनात विचारचक्र वेगाने सुरु होते. मन सैरा-वैरा बेभान होऊन धावत होते. काय करायचे? आज घरात जे सुरु आहे ते भयानकच आहे. काही क्षणासाठी भविष्य अंधःकारमय दिसत होते.
        आईला औषधीमुळे तर पिताश्रींना मदिरेमुळे गाढ झोप लागली होती. विचारांचे थैमान सुरु असतानाच कागद पेन घेतला अन् आईच्या नावाने चिट्ठी लिहून त्यात लिहिले होते कि *''आई कामासाठी मी कुठेतरी शहरात जात आहे. तू माझी चिंत्ता करु नकोस, थोड्या दिवसांनी तुला भेटायला नक्की येईल. तू तुझी अन् पिताश्रींची काळजी घे."* मी ठरवले शेवटी घर सोडायचे ...
      वडिलांच्या बांडीसाच्या खिशातून सातशे रुपयांची चोरी केली म्हणा वा खिशातून ते घेतले म्हणा. झोपलेल्या आई- बापाच्या चरणांना स्पर्श केला. आईच्या उशीखाली ती चिठ्ठी ठेवली, नायलाँनच्या पिशवीत माझे कपडे टाकले. चोर पावलांनी अन् जड अंतःकरणाने इच्छा नसतानाही रात्री साडे अकरा वाजता सर्वांचा निरोप घेत बस स्टँडवर पोहचलो.. तरीही जायचे की नाही...सारखे विचार मनात येणे सुरुच होते. एक रिक्षा उभीच होती रिक्षातील शेवटच्या प्रवाशाची रिक्षाचालक वाट बघत होता. निर्धार केला अन् अखेर गाव सोडलं... !
        औरंगाबाद शहर माझ्या गावापासून पाच किलोमीटर अंतरावर. तसे औरंगाबादमध्ये माझे क्वचितच येणे-जाणे होत असे. रिक्षा ब-यापैकी वेगाने आली. औरंगाबाद रेल्वे स्टेशनपर्यंत चालत गेलो. घरुन निघालो असलो तरी आई सारखी नजरेसमोर दिसत होती. *'आईला न सांगता आपण घरुन निघालो, ही आपली चूक तर नाही नां? आईला वाईट तर वाटणार नाही ? बाबा पुन्हा आईला मारहाण तर करणार नाही ?'* सारखे तेच-तेच विचार डोक्यात येत. रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश केला. तिकीट कुठे काढायचे ? आपल्याला कुठे जायचे आहे ? कसलाच निर्णय नाही की नियोजन नाही. दहा मिनीटात एक ट्रेन आली. ती कुठे जातेय... आपल्या कुठे जायचे आहे...? कुठे उतरायचे ?... कसलेच भान नाही. अखेर ट्रेनमध्ये विना तिकीट चढलो. ट्रेनच्या दरवाजाजवळ काही तरुण गप्पा मारत बसले होते. त्यांच्या शेजारी जाऊन पिवशी ठेवत मी देखील बसलो. गाडीत प्रवाशांच्या बोलण्याचा आवाज ऐकू येत होता. मी शांत बसलो होतो. ओळखीचे तसे कोणीच दिसत नव्हते. थंड हवेच्या स्पर्शाने डोळे मिटायला लागले. विना तिकीट प्रवासाला सुरुवात झाली. झोप मात्र चांगल्यापैकी लागली.
           सकाळ होत गेली तशी गाडीतील प्रवाशांची ये-जा सुरु झाली. बरेच लाथ मारुन जात होते. थोड्या वेळानंतर एक रेल्वे स्टेशन आले. भरपूर प्रवाशी तिथे उतरु लागले मग मी सुध्दा पिशवी घेऊन खाली उतरलो. उतरणारे प्रवाशी मार्गस्थ होऊ लागले. मी मात्र तिथेच थांबून टकामक आजूबाजूचे दृश्य न्याहाळू लागलो. ते कल्याण स्टेशन होते. सारंकाही नवखेच वाटत होते ते. एका नळाजवळ गेलो, गुळणा करुन चेहऱ्यावर पाणी मारलं केसांवरुन कंगवा फिरवत जिना चढत कल्याण स्टेशनच्या बाहेर पडल्यावर चहा प्यालो.
     पहिल्यांदाच रेल्वेने प्रवास केला. कल्याणला आलो होतो. सगळीकडे माणसांची धावपळ दिसत होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ताण-तणाव दिसत होता. मी पदयात्रा करीत चालत होतो. भुकेने पोटात काहूर माजवले होते तर आईची सारखी आठवणही येत होती. समोर एक सामान्य माणसाला परवडेल व पोटभर जेवण मिळेल असे भोजनालय दिसले. भोजवालयात गेलो, हात धूतले आणि जेवणासाठी जाऊन बसलो. काहीवेळातच जेवणाचे ताट आलं. मुले विविध पदार्थ ताटात वाढू लागले. भूक सपाटून लागलीच होती अन् मग तुटून पडलो जेवायला. जेवण तसे चांगलेच होते. पन्नास रुपयात पोटभर जेवण करुन बाहेर पडलो. दिवसभर फिरुन फिरुन दमलो. रात्र होत होती पुन्हा त्याच भोजनालयात जाऊन जेवण केले. थोडं फिरलो ओळखीचे असं कोणीच दिसत नव्हतं. फिरता फिरता रात्र झाली. एक बंद दुकान दिसलं आणि तिथेच पाठ टेकवली. विचारांचे थैमान डोक्यात सुरु होतं. घरची आठवण येत होती. आईचा विचार करता डोळ्यांतून अश्रूंच्या धारा टपकू लागल्या. *"पिताश्री आईला मारहाण तर करीत नसतील ना ?"* शरीराने जरी कल्याणमध्ये असलो तर मन मात्र घराकडे होते. शहरात तर आलो पण कामाचं काय ? विचार करता करता झोप लागली.
       पहाटे तीन वाजेपासून लोकांची वर्दळ सुरु झाली. कचरा उचलणा-या महिला, झाडू मारणारे, मार्केटमध्ये येणारे जाणारे लोक आप-आपल्या कामात गर्क. मी झोपेतून उठून सारं काही बघत होतो. थोडा फ्रेश होत चहाचा आस्वाद घेतला. पुन्हा गर्दीतील लोकांकडे पाहणे सुरु... शहरातील लोकांचे जीवन वाटते तेवढे सोपे नसल्याची खात्री पटली. नवनवीन रस्त्याने मी चालत होतो. सगळीकडे धावपळ, कोणी बससाठी तर कोणी रिक्षा, लोकल ट्रेन पकडण्यासाठी धावत होते. माझ्यासाठी हे सारं-सारं नवलाईचे. चालून-चालून मी दमलो होतो. एक दोन ठिकाणी काम मिळेल का? यासाठी चौकशी केली पण तसा प्रतिसाद मिळाला नाही. भूक सपाटून लागली पुन्हा त्याच भोजनालयात गेलो, हात स्वच्छ धूतले आणि जेवणासाठी बसलो. नेहमीप्रमाणे मुले येऊन वाढू लागली, मी जेवण करायला सुरुवात केली. थोड्याच वेळात एक विचार मनाला स्पर्श गेला कि 'आपणही या भोजनालायात काम मागितले तर... दोन पैशे मिळतील व जेवणाची, राहण्याची सोय देखील होईल.' चपाती वाढणारा आता काहीसा ओळखीचा व्हायला लागला होता. तो पचाती वाढत जवळ येताच मी त्याला *'इथे मला काम मिळेल का ?'* असे विचारले तर *'जेवण झाल्यावर मला भेट'* त्याने सांगितले. काहीसा जीवात-जीव आला. लगबगीने जेवण केलं. हात धूतले अन् काऊन्टरवर पन्नास रुपये जमा केले. एका कोपऱ्यात त्या चपाती वाढणाऱ्या मुलाची वाट बघत उभा राहिलो. तोच पाठिमागून येऊन त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवत विचारले कि *"तुला इथे काम हवे आहे का ? चल, मालकाकडे तुझी बोलणी करुन देतो... आमचा मालक फार चांगला माणूस आहे. तो देईल तुला काम."* 
        मालकाकडे गेल्यावर माझी विचारपूस केली, पगार व राहण्या-खाण्याबाबत विचारले. इतर मुलांना जो पगार तोच पगार मला व राहण्याची-जेवणाची सोय देखील तिथेच असल्याने एकदाची काळजी मिटली. मिळेल ते काम प्रामाणिकपणे मी करु लागलो. ग्राहकांसह मालक तसेच सोबतच्या मित्रांसोबत माझे बोलणे व इतर वागणे चांगले असल्याने कमी वेळेतच त्या सर्वांची मने मी जिंकली. मालकाच्या मर्जीतील विश्वासू म्हणून मला ओळख प्राप्त होत गेली. सर्वांसमोर माझी प्रतिमा चांगली निर्माण झाल्याने मालकाच्या आज्ञेनुसार मी वाढपीचे काम करण्याऐवजी वाढप करणाऱ्या मुलांवर लक्ष देऊ लागलो. आँडर घेऊ लागलो. आमचा मालक खूप सज्जन माणूस. चांगल्या करीता चांगला होता तो. मला मुलासारखी चांगली वागणूक मिळू लागली. पगार वाढला गेला एवढेच नव्हे एका बँकेत माझ्या नावाचे खाते देखील मालकाने उघडून दिले. माझा पगार त्या खात्यात जमा करु लागलो. काही कामानिमित्त मालकाच्या घरी जाणे-येणे माझे होऊ लागले. बघता बघता त्यांची पत्नी चांगल्यापैकी मला ओळखू लागली. मालकाच्या लग्नाला बरेच वर्ष होऊन सुध्दा त्यांना मुलबाळ नव्हत. मला ते दोघ मुलासारखीच वागणूक देत असत. अर्थात ते कोणावरही सहज विश्वास ठेवत नसतं. मात्र माझे काम आणि बोलण्यामुळे माझ्यावर विश्वास त्यांचा झाला होता. आई बाबांची आठवणही येत होती. कामाचा ताण पाहता मालकाकडे सुट्टी मागण्याची हिम्मत होत नव्हती. अधून-मधून मला गल्ल्यावर देखील बसण्याची सूचना मालकाकडून मिळत असे. सात आठ वर्षे त्याठिकाणी राहिल्यामुळे माझ्यासाठी त्या भोजनालयातील व्यवस्थापन करणे कठीण राहिले नव्हते. हळूहळू मालकांचे भोजनालयात येणे कमी होऊ लागले. सर्व काम मी सांभाळून घेत असल्याने मालक आता बिन्धास्त होते. भोजनालयातून मालकाला चांगले उत्पन्न मिळत होते. पैसा भरपूर असला तरी मुलबळ नसल्याचे शल्य त्या दोघांच्या चेहऱ्यावरुन स्पष्टपणे जाणव होते.
        असे असताना मालकाला कैन्सरचा आजार असल्याचे मला समजले. आजार बरा होण्यासाठी पैशे खूप खर्च होत असताना तीन चार वेळा शस्त्रक्रिया होऊनही तब्बेतीत सुधारणा तशी होताना जाणवत नव्हती. दिवाळीचे दिवस होते. नेहमीप्रमाणे भोजनालयात लाईटिंगसह दिव्यांची रोषणाई छान सजवण्यात आली होती. तर त्याच वेळेस मालकांना मुंबईच्या टाटा हाँस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले गेले. नंतर ब-यापैकी तब्बेतीत सुधारणा होत असल्याचे जाणवल्याने त्यांची घरी रवानगी करण्यात आली आणि त्यानंतर आठ दिवसातच मालकांचा मृत्यू झाला. मालकाच्या मृत्यूची वार्ता सर्वत्र वा-यासारखी पसरली. प्रत्येकाकडून हळहळ व्यक्त केली जात होती. मला तर काहीच सूचत नव्हत. मालकीणबाईची अवस्था फारच वाईट झाली होती. सारं होत्याचे नव्हते झालं होतं. भोजनालय बंद ठेवाण्याचा निर्णय त्यांच्या नातेवाईकांच्या सूचनेवरुन समजला. मी भोजनालय बंद केले. दुसऱ्या दिवशी मालकीणबाईची भेट घेतली, त्यांची झालेली अवस्था पाहून खूप रडायला आले. *"आता भोजनालय तुलाच सांभाळायचे आहे."* असे मला मालकीणबाई सांगितलं. भोजनालय काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात आल्याने गावी जाण्याचा विचार आला. मालकीणबाईच्या कानावर तसे सांगून गावाकडे निघालो...
      आपण ब-याच वर्षानंतर गावी जात असल्याचा आनंद होताच तर दुसरीकडे मालकाचे निधन झाल्याचे दुःख !
         ट्रेनने पहाटे औरंगाबादला उतरुन रिक्षाने गावाकडे निघालो. रस्त्याने जाताना बराच झालेला बदल डोळे टवकारुन न्याहळ होतो. आई-बाबा आपल्याला पाहून किती आनंदीत होतील, त्यांना भेटण्याची उत्सुकता मोठी होतीच. रिक्षातून उतरुन घराकडे जातांना जो-तो माझ्याकडे सारखा टकामका पाहतच होता अन् काहीतरी ते आपसात चर्चा करीत होते. माझे पाय पटापट अंतर पार करीत होते. घराकडच्या रस्त्यावर माणसांची खूपच गर्दी जाणवत होती. घर जवळ येतातच घर आणि घराजवळ जास्त गर्दी दिसू लागली. नेमकी गर्दी कसली ? हे कळू शकत नव्हतं की कोणी येऊन सांगतही नव्हते. घराच्या समोर येताच व सर्वांनी मला पाहताच सारे महिला-पुरुष मोठ-मोठ्याने रडू लागले. हा योगायोगच होता. त्यात बरेच ओळखीसह नातेवाईक दिसत होते. जवळ जाऊन बघतो तर वडिलांचा मृत्यू झालेला ! आई, भाऊ, वहिनी वडिलांच्या जवळ बसून रडत होती. आई वडिलांच्या डोक्याजवळ बसून ओक्या-बोक्सी रडत होती. मी देखील आईजवळ गेलो, मोठ-मोठ्याने रडू लागलो. आईच्या गळ्यात पडून रडू लागलो...
       *एकीकडे मालक गेल्याचे दुःख तर दुसरीकडे वडील गेल्याचे दुःख ! चोहीबाजूने अंधारच अंधार...* 
       माझी तर हिम्मतच खचली. सर्वांनी माझे मन हलके व शांत होईस तोवर मला रडू दिले. मी थोडा सावरत आईला शांत केलं अन् नातेवाईक येऊन मला घरा बाहेर घेऊन आले. मोठ्या शोकाकूल वातावरणात वडिलांना अखेरचा निरोप दिला. दुसऱ्या दिवशी आईच्या जवळ बसून बोलत असताना काही जवळचे नातेवाईक आले ते सारेचं भावनिक होऊन माझ्यासोबत बोलू लागले. आई त्यासर्वांसमोर मला गहिवरुन सांगू लागली कि *"हे बघ शिवा, तुझ्या वडिलांनी मृत्यू होण्याच्या एक दिवस अगोदर माझ्याकडून वचन घेतले होते व सांगितले होते कि, आपला शिवा जेव्हाही घरी येईल तेव्हा त्याला पिंजरा व पोपट घेऊन लोकांचे भविष्य सांगण्याचे आपले पारंपारिक काम शिवाला करायला सांग, तेव्हाच माझ्या आत्म्याला शांति लाभेल !"* आई मोठ्या जड अंतःकरणारे मला सांगत होती. कारण मुळात तिला देखील हे काम करणे पसंत नव्हते आणि मला देखील ! 
      अखेर जन्मादात्याची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी इच्छा नसताना देखील हे काम गावो-गावी जाऊन पोटाची खळगी भरण्यासाठी फिरावं लागत असल्याची खंत शिवराम हिंगे यांनी गणेशच्या कोल्ड्रींकच्या दुकानात आईस्क्रीमचा रणरणत्या उन्हात आस्वाद घेताना शिवराम यांनी डोळ्यांतून अश्रूंच्या धारा येत आपली व्यथा माझ्याजवळ मांडली. शिवराम पुढे म्हणतात कि *"आता सुशिक्षित जनतेला आमच्यासारख्यांकडून भविष्य ऐकून घेणे आवडत नाही. जनतेचा विश्वास देखील होत नाही. ब-याच लोकांकडून आमची टिंगल केली जाते, अपमानीत केले जाते आणि त्यातून पैसा देखील मिळत नाही. त्याचबरोबर उन्हाळ्याचे दिवस, आमच्या मराठवाड्यात वाईट परिस्थिती असल्याने स्वतःबरोबर कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी व वडिलांनी दिलेल्या शपथेनुसार वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी हे काम करावे लागत असल्याचे शिवराम सांगतात. परंतु शिवराम म्हणतात कि माझ्या दोन मुलांना मी हे काम करु देत नाही. मोठा मुलगा दोन वर्षांपासून नोकरीला लागला तर दुसरा देखील नोकरीसाठी फिरत आहे. शेवटी बदलत्या काळानुसार आपल्याला सुध्दा बदल करणे गरजेचे आहे. कारण परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. शेवटी पोपटाकडून आपले भविष्य ऐकून घेण्यापेक्षा, आपले भविष्य आपल्याच हाती आहे."*
     एक तासापेक्षा अधिक वेळ कसा गेला हे मात्र कळले नाही. मित्रांसह श्री. हिंगे यांच्या आईस्कीमचे बिल गणेशकडे मी दिले. श्री. हिंगे खूप सज्जन गृहस्थ. वयाने मोठे असले तरी आम्ही सर्वांना राम-राम व धन्यवाद करीत आपली पोटाची खळगी भरण्यासाठी मार्गस्थ झाले...

        *राजेंद्र चौधरी. [ माध्यमिक शिक्षक ]*
 हरचंद लोखंडे माध्यमिक विद्याभवन. बोरीवली. मुंबई.
       पत्रकार : भारत २४ तास न्यूज
     रोझोदा. ता. रावेर. जि. जळगाव.
      *मो.९४२३४७२७६५*
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत