BREAKING NEWS
latest

लोकसभा निवडणुकीत कल्याण मध्ये कमी तर राज्यात सरासरी ५४.३३ टक्के मतदान..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्यात सोमवारी राज्यातील १३ मतदारसंघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत उत्साहात सरासरी ५४.३३ टक्के मतदान झाले. अनेक मतदान केंद्रांवर लांबच्या लांब मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. निवडणुक आणि मतदार याद्यांचा घोळ हे समीकरण गेल्या अनेक निवडणुकांपासून सुरु आहे. ते या निवडणुकीतही पहायला मिळाले. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भिवंडी व कल्याण पश्चिममधील हजारों नागरीकांची नावे मतदार यादीतून अचानक गायब झाली आहेत. ती संख्या १ लाखांहून अधिक असल्याचे समजते.

सकाळपासून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी नागरीक मोठ्या उत्साहात मतदान केंद्रावर पोहचले होते. पण मतदार यादी तपासली असता त्यांची नावेच मतदार यादीत नव्हती. अनेकदा मतदार याद्या डोळ्याखालून घातल्या, मात्र नाव न दिसून आल्याने नागरीकांनी नाराजी व्यक्त केली. कल्याण पश्चिमेकडील विद्यापिठाच्या उपकेंद्रात असलेल्या मतदान केंद्रात नागरीकांनी जोरदार घोषणाबाजी करून निवडणुक आयोगाचे अक्षरशः वाभाडे काढले.

पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे : धुळे ५६.६१ टक्के, दिंडोरी ६२.६६, नाशिक ५७.१०, पालघर ६१.६५, भिवंडी ५६.४१, कल्याण ४७.०८, ठाणे ४९.८१, मुंबई उत्तर ५५.२१, मुंबई उत्तर मध्य ५१.४२, मुंबई उत्तर पूर्व ५३.७५, मुंबई उत्तर पश्चिम ५३.६७, मुंबई दक्षिण ४७.७०, मुंबई दक्षिण मध्य ५१.८८
शहरी, ग्रामीण भागात मतदार स्वयंस्फूर्तीने रांगेत अनेक मतदारांची नावे यादीतून गायब

कल्याण लोकसभा मतदार संघातील शहरी, ग्रामीण भागात पक्षीय कार्यकर्त्यांनी दारात येण्यापूर्वीच मतदारांनी सकाळपासून मतदान केंद्राबाहेर स्वयंस्फूर्तीने रांगा लावल्या होत्या. उन्हाचा चटका टाळण्यासाठी नागरिक विशेषत ज्येष्ठ नागरिक, आजी, आजोबा सकाळीच हातातील कापडी पिशवीत मतदान केंद्रावर लागणारे निवडणूक ओळखपत्र, आधारकार्ड, सोबत पाण्याची बाटली घेऊन मतदानासाठी दाखल झाले होते. शासनाने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा यावेळी चांगला परिणाम झाल्याचे दिसून आले. पक्षीय कार्यकर्त्यांची वाट न पाहता किंवा घरी मतदार क्रमांकाची पावती आली नसली तरी मतदार स्वतःहून केंद्रावर दाखल झाले होते.

डोंबिवली कल्याणमधील मतदार सकाळी पावणे सात वाजल्यापासून मतदान केंद्राबाहेर मतदानासाठी रांगा लावून होते. डोंबिवली पूर्व भागात सीकेपी सभागृहातील मतदान यंत्रात बिघाड झाल्याने येथील केंद्र पावणे आठ वाजता मतदानासाठी सज्ज झाले. तोपर्यंत या केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मंजुनाथ शाळेतील एका यंत्रात बिघाड झाला. तो तातडीने दुरुस्त करून मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली. कल्याण, डोंबिवलीतील सुमारे ६० हजाराहून अधिक एमटी अनुक्रमिकेतील मतदारांनी नावे गायब असल्याची चर्चा राजकीय पदाधिकारी करत होते.

मागील अनेक वर्ष मतदान करणाऱ्या अनेक मतदारांची नावे यावेळी मतदार यादीतून गायब आहेत. एकाच घरातील मुलांची नावे यादीत आहेत पण आई-बाबांची नावे वगळण्यात आली आहेत. यामुळे अनेक मतदार संतप्त आहेत. डोंबिवलीतील मोठागाव शाळा क्रमांक २० येथे मतदान केंद्र ३६ वर एका मतदाराला चक्कर आली. त्याच्यावर तातडीने अत्यावश्यक उपचार करण्यात आले. या मतदाराने मतदान न करताच केंद्रातून काढता पाय घेतला. मतदान केंद्रांच्या बाहेर मतदारांचे यादीतील अनुक्रमांक शोधण्यासाठी पक्षीय कार्यकर्ते पहाटे पासून बसले होते.

कल्याणमध्ये वायेलनगर भागात एका तरूणीचे नाव यादीत नव्हते. मतदान न केल्यास कर्मचाऱ्यांचे तीन दिवसांचे वेतन कापण्याची तंबी कार्यालयाने दिल्याने ही तरूणी अस्वस्थ होती. यादीत नाव नसलेले मतदार विविध केंद्रांवर जाऊन आपले नाव कोणत्या यादीत आहे का याचा शोध घेत होते.

इंग्लंडमध्ये निवास असलेले पर्जन्य तज्ज्ञ लक्ष्मीकांत आणि निलीमा चिमोटे या दाम्पत्याने खास निवडणुकीसाठी भारतात येऊन डोंबिवलीतील केंद्रावर अरूणोदय स्वामी शाळा, डॉन बॉस्को केंद्रावर मतदान केले. १९५२ पासून प्रत्येक निवडणुकीत मतदान करणाऱ्या डोंबिवलीतील संस्कृत अभ्यासक सुमित्रा गुर्जर (९०) यांनी स. वा. जोशी शाळेत, कल्याणमधील डॉ. सारंगधर (९६), मधुकर काळे (९८) यांनी १९५२ पासून मतदान केले आहे. सज्ञान झाल्यापासून मतदानाचा प्रत्येक वेळी हक्क बजावणारे शीतल आणि शशांक देशपांडे यांचीही नावे मतदार यादीतून गायब होती. माजी खासदार राम कापसे यांचे चिरंजीव डॉ. आनंद, स्नुषा जान्हवी, काका हरदास यांच्या काही कुटुंबीयांचीही नावे मतदार यादीतून गायब आहेत.
भिवंडीत कपिल पाटील चिडले बोगस मतदान होत असल्याचा केला आरोप

भिवंडी शहरामध्ये सकाळपासून शांततेत सुरू असलेल्या मतदानात सायंकाळी काही ठिकाणी वादंग होत गालबोट लागले आहे. खंडूपाडा बाल कंपाऊंड मिल्लत नगर येथील अल्पसंख्यांक बहुल असलेल्या मतदान केंद्रावर कपिल पाटील प्रचंड चिडलेले दिसले या ठिकाणी बोगस मतदान होत असल्याचा आरोप पाटील यांनी केला.

यावेळी पाटील यांनी निवडणूक अधिकारी तसेच पोलीस यंत्रणा यांना धारेवर धरत मतदान केंद्र परिसरात उभे असलेल्या नागरिकांच्या घोळक्याला बाहेर हाकलून लावण्यासाठी मागणी करीत या भागातील मतदान केंद्रावरील गर्दी बाजूला केली. या वेळी अनेक मतदान केंद्रावर बोगस मतदान होत असल्याच्या तक्रारी कपिल पाटील यांनी केल्या असून काही ठिकाणी बोटावरील शाई पुसण्यासाठी केमिकल घेऊन बसल्याचे दिसून आल्याचा आरोप करीत लोकशाही वाचवायला निघालेले लोकशाहीची हत्या करीत असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.

मतदार याद्यांचा घोळ, त्यातच केंद्रांवर असणारी अपुरी सुविधा यामुळे मतदारांमध्ये संतापाचे वातावरण होते. परिणामी काही मतदारांनी आपलं मतदानाचा हक्क न बजावताच घरी जाणे पसंत केले. तर काही मतदार मात्र मतदान करायचंच या दृढ निश्चयाने केंद्रावरच दटुन राहिले होते.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत