डोंबिवली दि.०२ जुलै : डोंबिवली पूर्वेकडील कल्याण-शीळ रोडलगत सोनारपाडा येथील साईबाबा मंदिरासमोर २७ गावांच्या अस्मितेचा व अस्तित्वाच्या लढ्यासाठी सर्व पक्षीय युवमोर्चा तर्फे 'बेमुदत धरणे आंदोलन' आज सकाळी ११ वाजल्यापासून सुरू करण्यात आले. सर्व पक्षीय युवमोर्चा चे प्रमुख सल्लागार संतोष केणे यांनी नारळ वाढवून व वंदनीय लोकनेते दि. बा. पाटील, संत सद्गुरु सावळाराम महाराज व स्व. रतन म्हात्रे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात झाली.
यावेळी गजानन पाटील यांनी उपस्थित प्रकल्पग्रस्त बाधित शेतकरी भूमिपुत्र तथा गावकरी यांना हे बेमुदत धरणे आंदोलन सरकारकडून शेतजमीन धारक भूमीपुत्रांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध छेडले जात असून २७ गावांच्या अस्मितेसाठी लढा देऊन त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आणि गावकऱ्यांच्या प्रमुख प्रलंबित मागण्या तसेच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत जबरदस्तीने समाविष्ट केलेल्या २७ गावातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत याकरिता राज्य शासनाचे लक्ष वेधून सरकारकडून मागण्या मान्य करून घेण्यासाठी मंगळवार दि. ०२/०७/२०२४ पासून दररोज सकाळी ठीक ११.०० ते सायं. ६.०० वाजेपर्यंत केले जात असल्याचे सांगितले.