ठाणे : दोनच दिवसांपूर्वी देशभरातील १० केंद्रीय कामगार संघटनांनी 'भारत बंद' ची हाक दिली होती, आणि आता त्यानंतर येत्या १४ जुलैला म्हणजेच सोमवारी 'महाराष्ट्र बंद' ची हाक देण्यात आली आहे. हॉटेल ऍण्ड रेस्टॉरंट असोसिएशनने १४ जुलैला 'महाराष्ट्र बंद' ची हाक दिली आहे. राज्य सरकारच्या अन्यायकारक कर धोरणांविरूद्ध असोसिएशन ऑफ हॉटेल्स अँड रेस्टरंट म्हणजेच 'आहार' संघटनेने हा एल्गार पुकारला आहे. त्यामुळे येत्या सोमवारी राज्यभरातील हॉटेल, रेस्टॉरंट, परमिट रूम आणि बार बंद राहणार आहेत.
यामुळे राज्याच्या महसुलावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. 'आहार' संघटनेच्या वतीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर 'महाराष्ट्र बंद' बाबत पोस्ट केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्र बंदचे कारण सांगितले आहे. १४ जुलै २०२५ रोजी राज्यव्यापी महाराष्ट्र बंद ! अन्याय्यकारक कराच्या बोज्याविरोधात महाराष्ट्रातील परमिट रूम आणि बार बंद राहणार आहेत. हॉस्पिटॅलिटी उद्योग आपला आवाज सर्वांसमोर मांडत आहे ! सोमवार, १४ जुलै २०२५ रोजी, महाराष्ट्रातील सर्व परमिट रूम आणि बार आमच्या उद्योगावर लादलेल्या अन्याय्य आणि प्रचंड कारवाढीच्या निषेधार्थ संपूर्ण बंद पाळतील. दारूवरील व्हॅट दुपटीने वाढ करण्यात आली. परवाना शुल्क १५ टक्के वाढवण्यात आले. उत्पादन शुल्कात ६० टक्केची मोठी वाढ करण्यात आली. राज्य सरकारच्या या तीव्र बदलांमुळे असंख्य लहान आणि मध्यम उद्योगांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. ज्यामुळे हजारो लोकांच्या नोकऱ्या आणि उपजीविका धोक्यात आली आहे. 'हॉटेल ऍण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया' कडून निष्पक्ष धोरणांची मागणी करण्यासाठी आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्राचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ही बंदची हाक देण्यात आली आहे. आम्ही सर्व उद्योग भागधारकांना एकत्र येऊन मजबूत राहण्याचे आवाहन करतो. चला आपण एक स्पष्ट संदेश देऊया आता पुरे झाले ! असेही या संघटनेने म्हटले आहे.
राज्य सरकारच्या अन्यायकारक करवाढीच्या धोरणाविरोधात इंडियन हॉटेल ऍण्ड रेस्टॉरंट असोसिएशन अर्थात 'आहार' संघटनेने १४ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. ही आमच्या अस्तित्वाची लढाई आहे, असे स्पष्ट शब्दांत सांगत संघटनेने आपली भूमिका मांडली आहे. दरम्यान या आंदोलनांतर्गत राज्यभरातील २० हजार हून अधिक हॉटेल व रेस्टॉरंट मालकांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. 'महाराष्ट्र बंद' चा सर्वाधिक प्रभाव मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर यांसह राज्यातील प्रमुख शहरी भागांमध्ये जाणवणार आहे. सोमवारी राज्यातील सर्व परमिट रूम्स, बार, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. हा बंद पूर्णतः शांततेत पार पडणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले आहे. मात्र, सरकारने जर याकडे दुर्लक्ष केले, तर पुढील काळात तीव्र आणि उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा ही संघटनेने दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा