अहमदाबाद : अहमदाबाद येथील एअर इंडिया विमान अपघाताच्या एएआयबीच्या चौकशी अहवालात कॉकपिटमधील पायलटचा संवाद समोर आला आहे. कॉकपिट व्हॉयस रिकॉर्डर (सीव्हीआर) नुसार, पायलट सुमीत सभरवाल याने दुसरा पायलट कुंदर याला विचारले, तू इंजिन का बंद केले? अहमदाबादमध्ये १२ जून रोजी झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल समोर आला आहे. अपघाताच्या महिन्याभरानंतर आलेल्या या चौकशी अहवालात ही धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (एएआयबी) ने हा अहवाल दिला आहे. त्यानुसार, टेकऑफ झाल्यानंतर विमानाचे दोन्ही इंजिन काही सेकंदात बंद पडल्याचे म्हटले आहे. त्यामुळेच विमानाचा अपघात झाल्याचे म्हटले आहे. हा अहवाल प्राथमिक आहे. सध्या अपघाताची सविस्तर चौकशी सुरू आहे, असेही तपास अहवालात म्हटले आहे.
एएआयबी ने १५ पानांचा अहवाल दिला आहे. त्यात म्हटले आहे की, विमानाने सकाळी ०८:०८ वाजता १८० नॉट्सची कमाल इंडिकेटेड एअरस्पीड घेतली होती. त्यानंतर लगेचच, इंजिन-१ आणि इंजिन-२ चे इंधन कट-ऑफ स्विच (जे इंजिनांना इंधन पाठवतात) ते ‘रन’ वरून ‘कटऑफ’ परिस्थितीत गेले. फक्त एका सेंकदात हे घडले. त्यामुळे इंजिनमध्ये इंधन येणे बंद झाले. त्यानंतर दोन्ही इंजिन एन१ व एन२ रोटेशन स्पीड वेगाने निकामी झाले.
अपघातात २६० जणांचा मृत्यू
एअर इंडियाच्या विमानाचा १२ जून रोजी अपघात झाला होता. या विमानाने अहमदाबाद विमानतळावरुन लंडन जाण्यासाठी टेकऑफ घेतले होते. विमान टेकऑफ घेतल्यानंतर काही सेंकदात मेडिकल कॉलेजच्या हॉस्टल परिसरात क्रॅश झाले. या अपघातात विमानातील २४१ जणांसह २६० जणांचा मृत्यू झाला. या अपघातात एक व्यक्ती वाचला. विमानात १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, एक कॅनडाचा नागरिक तर ७ पोर्तुगाल नागरिक होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा