मुंबई : राज्यातील हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाला विरोध करत सरकारने तो निर्णय मागे घेतल्यानंतर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र विजय मेळावा घेतला. या मेळाव्याचे निमित्ताने तब्बल १९ वर्षांनंतर दोघे एकत्र आले. मुंबईतील वरळीतील डोम सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या विजयी मेळाव्याला प्रचंड गर्दी उसळली होती. दोघांनीही विजय मेळाव्यातून सरकारवर घणाघात केला. त्यांनी भविष्यातही एकत्र राहण्याचे संकेत दिल्याने मनसैनिक आणि उबाठा सैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे. आज सकाळी या मेळाव्यासाठी वरळी डोम सभागृह पूर्ण क्षमतेने भरून गेले होते. जागा नसल्याने अनेक कार्यकर्त्यांना बाहेर थांबावे लागले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर देश-विदेशातून आलेल्या मराठीप्रेमींनी तसेच चित्रपट सृष्टीतील कलाकारांनी सभागृहात हजेरी लावली होती. या मेळाव्याला विविध पक्ष आणि क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते अजित नवले, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, तसेच कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांची उपस्थिती होती. मात्र, या मेळाव्यात काँग्रेसचा एकही आमदार, खासदार किंवा प्रमुख नेते हजर नव्हते.
या मेळाव्याची सुरुवात गणेश वंदनेने करण्यात आली. वरळीतील ब्रास बँड पथकाच्या सादरीकरणातून वातावरण भारावून गेले होते. सन्माननीय उद्धव ठाकरे असा उल्लेख करत राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. ते म्हणाले की, हा मेळावा शिवतीर्थावर व्हायला हवा होता. तिथले संपूर्ण मैदान ओसंडून वाहिले असते. पण पावसामुळे जागेची अडचण निर्माण झाली. त्यामुळे हा कार्यक्रम इथे घ्यावा लागला. मी एका मुलाखतीतही स्पष्टपणे सांगितले होते की कोणत्याही भांडणापेक्षा, मतभेदांपेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आज जवळपास २० वर्षांनी मी आणि उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर एकत्र आलो आहोत. जे अनेकांना जमले नाही, जे बाळासाहेबांनाही साधता आले नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमले. त्यांच्यामुळे आम्ही एकत्र आले. आजचा हा मेळावा कुठलाही झेंडा न घेता फक्त ‘मराठी’ या अजेंड्यासमोर ठेवून पार पडत आहे. महाराष्ट्राकडे कोणीही वेड्या-वाकड्या नजरेने पाहू नये. हिंदीचा मुद्दा नव्हता. पण तो कुठून तरी अचानक आला. लहान मुलांनी हिंदी शिकावी, यासाठी सरकारकडून सक्ती केली जात आहे. कुणालाही विचारले जात नाही, शिक्षणतज्ज्ञांचंचे मत घेतले जात नाही. केवळ बहुमताच्या जोरावर सरकार निर्णय लादते. पण लक्षात ठेवा सत्ता तुमच्याकडे विधान भवनात आहे, रस्त्यावर मात्र आमच्याकडे सत्ता आहे.
उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या विजयी मेळाव्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, आमच्यातला (राज आणि उद्धव) आंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला. आम्ही एकत्र आलो आहोत आणि आता एकत्र राहणार आहोत. हे पाहून अनेक बुवा-महाराज व्यस्त झाले आहेत. कुणी लिंबू कापत आहे, कुणी टाचण्या मारत आहे, तर कुणी अंगारे-धुपारे करत गावाकडे गेला आहे. रेडेही कापत असतील. पण त्यांना सांगतो या भोंदूपणाविरोधात आमच्या आजोबांनी लढा दिला आणि आज आम्ही त्यांच्या वारसदार म्हणून तुमच्या पुढे उभे आहोत. हिंदी सक्ती तुमच्या सात पिढ्या आल्या तरी आम्ही होऊ देणार नाही .आज भाषणापेक्षा आमचे एकत्र दिसणे महत्त्वाचे आहे. मराठी भाषेसाठी आज सर्वांनी वज्रमुठ दाखवली आहे. मुख्यमंत्री म्हणतात मराठीसाठी आंदोलन करणे म्हणजे गुंडगिरी आहे. आम्ही गुंड आहोत. न्याय मागणे म्हणजे गुंडगिरी असेल, तर तुमच्या दरबारात न्याय मिळवण्यासाठी ही गुंडगिरीच करू. कारण, आजपर्यंत तुम्ही आम्हाला वापरून फेकले, पण आता आम्ही तुम्हाला फेकून देणार आहोत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा