BREAKING NEWS
latest

'जन गण मन' कॉन्व्हेन्ट शाळा, दावसा येथे दहावी, बारावी नंतर विद्यार्थांना करियर मार्गदर्शन व कौतुक सोहळ्याचे आयोजन..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

नागपूर - इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये कोणते क्षेत्र निवडावे यासाठी गोंधळून न जाता योग्य मार्गदर्शन लाभण्यासाठी 'जे एम एफ' शिक्षण  संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांचे मार्गदर्शन शिबिर जन गण मन कॉन्व्हेन्ट, दावसा, ता. नरखेड शाळेमध्ये आयोजित केले होते.
'जान्हवीज मल्टी फाऊंडेशन' शिक्षण संस्थेचे हे वर्ष म्हणजे मुंबई आणि नागपूर (दावसा) येथे कार्यरत असलेल्या संस्थेचे 'रौप्य महोत्सव' म्हणून साजरे होत आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, शाळेचे व्यवस्थापक श्री. महेश कळंबे, मुख्याध्यापक श्री. भजन सर, तसेच उपस्थित पाहुणे डॉ. कैलाश कडू, प्राचार्य दिलीप फीसके, डॉ. मारोतराव कोल्हे, श्रीमती सुभद्रा रेंगे, श्री. युवराज कोल्हे, सौ. छाया घाटोळे, सौ. कल्पना कळंबे, श्री. राकेश भांगे त्याच बरोबर २०० पेक्षा जास्त दहावी बारावी चे उत्तीर्ण विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन  व स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रत्येक मुलगा अथवा मुलगी जन्मजातचं वेगवेगळे गुण आत्मसात करून जन्माला आलेला असतो, जसजसे मोठे होऊ लागतो तसतसे  अंगभूत असलेले हे गुण प्रगल्भ होऊ लागतात व आवड निवड ठरवू लागतात, सांगण्याचा उद्देश हाच की , तुमच्या मध्ये असलेले गुण हे आता विखुरले गेले आहेत त्यामुळे दहावी बारावी मध्ये उत्कृष्ट गुण मिळवून देखील कोणत्या गुणवत्ते आधारे पुढे काय करायचे हा प्रश्न कायमच मनात सलत राहतो, त्यासाठी जसे हिऱ्याला पैलू पाडणारा उत्तम कारागीर मिळाला की त्याची चकाकी जगभर झळकते, तसेच उत्तम मार्गदर्शक लाभला की विद्यार्थ्यांचे भवितव्य चकाकते असे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. सगळेच डॉक्टर, इंजिनिअर, वकील,वैज्ञानिक नाहीत बनू शकत, पण म्हणून खजील न होता त्या पदव्यांसारखे इतर अभ्यासक्रम देखील तुमच्यासाठी उपलब्ध आहेत व ते तुम्ही करू शकता. प्रयत्न करत असताना आपल्या बुद्धिमत्तेला झेपेल असेच क्षेत्र निवडा असेही डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात नमूद केले.
     
एखादी गोष्ट अचूकपणे करायची आहे आणि ती मी करूनच दाखवणार हा ध्यास विद्यार्थी दशेत कायमच असला पाहिजे, परंतु मनावर आणि बुद्धीवर ताण न येऊ देता शांतपणे मार्ग काढत आपल्या योग्य विचारांच्या दिशेने जा, असे सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व पालकांना सांगून दिलासा दिला तसेच डॉ. कडू यांनी विद्यार्थ्यांंना मार्गदर्शन केले. अनेक विद्यार्थ्यांनी करियर विषयी मनात रेंगाळत असलेले प्रश्न डॉ. राजकुमार कोल्हे यांना विचारले, व त्यांनी देखील विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात घेऊन योग्य ती समाधानकारक उत्तरे दिली. मागील १२ वर्षा पासुन अशा प्रकारचा कौतुक सोहळा मुंबई पासून दावसा पर्यंत आयोजन करून 'जाह्नवीज मल्टी फाउंडेशन' शिक्षण संस्था 'रौप्य महोत्सव' साजरा करत आहे. 
त्याच बरोबर इतर शाळेतून देखील सर्वोत्कृष्ट आदर्श शिक्षक व उत्कृष्ट मुख्याध्यापक निवडून त्यांनाही शाल, श्रीफळ व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवरांचे आभार मानून, वंदे मातरम् म्हणून मार्गदर्शन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत