मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पंढरपूर येथे ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाद्वारे आयोजित ‘निर्मल दिंडी’ उपक्रमाचा समारोप करण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आपल्या सर्व संतांनी निसर्गप्रेम आणि स्वच्छतेचा संदेश दिला आहे. तसेच नद्यांवर प्रेम करायला शिकवले आहे. ‘निर्मल वारी’ उपक्रमाच्या माध्यमातून ज्ञानेश्वर माऊलींचा हा संदेश प्रत्यक्षात उतरवण्याचे कार्य आपण करत आहोत. दरवर्षी मोठ्या संख्येने राज्यभरातून वारकरी, देहभान हरपून भगवान विठ्ठलाच्या चरणी लीन होण्यासाठी पंढरपूरात येतात. वर्षानुवर्षे आवश्यक अश्या स्वच्छतेच्या सेवा उपलब्ध नसल्यामुळे वारी मार्गावर आणि पंढरपूर शहरात वारीनंतर कचऱ्याची मोठी समस्या निर्माण होत असे. २०१८ साली या समस्येच्या अनुषंगाने ‘निर्मल वारी’ उपक्रम सुरु करण्यात आला.
या उपक्रमाच्या माध्यमातून पालखींच्या मुक्कामाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने शौचालयांची व्यवस्था राज्य शासनाने केली. त्यामुळे यावर्षी आपली वारी अधिक स्वच्छ, म्हणजेच ‘निर्मल’ झालेली आहे. स्वच्छतेत वाढ झाल्याने महिला वारकऱ्यांची संख्या देखील वाढलेली दिसून येत आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. ‘निर्मल वारी’ उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी ग्रामविकास आणि आरोग्य विभागाच्या सर्व संबंधितांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो, असेही मुख्यमंत्री म्हणाले. याप्रसंगी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या ‘चरणसेवा’ उपक्रमाचे तसेच राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून महिला सेवेच्या उपक्रमाचेही मुख्यमंत्री यांनी कौतुक केले. यावेळी मंत्री ऍड. माणिकराव कोकाटे, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा