पंढरपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पंढरपूर येथे महाराष्ट्र शासन व कृषी उत्पन्न बाजार समिती, पंढरपूर यांच्यावतीने आयोजित ‘कृषी पंढरी’ या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे उदघाटन संपन्न झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, दरवर्षी आषाढी वारीच्या निमित्ताने राज्यभरातून आलेल्या वारकऱ्यांचा आणि शेतकरी बांधवांच्या मुक्कामाचे एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती, पंढरपूर. येथे शेतकरी बांधवांना एकाच ठिकाणी कृषी क्षेत्रात विकसित होत असलेले अद्ययावत तंत्रज्ञान, संशोधन, नव्या शेती पद्धती तसेच कृषी क्षेत्राशी संबंधित राज्य शासनाच्या सर्व योजनांची माहिती मिळावी, या उद्देशाने या कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले जात आहे. शेतीतील विविध यशस्वी प्रयोग, फलोत्पादन पद्धती, उत्पादन वाढविण्यासाठीचे संशोधन, माती परीक्षणापासून ते कापणीपर्यंतच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती या कृषी प्रदर्शनातून मिळते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. गावांमध्ये संपूर्ण कृषी व्यवस्थापन करून अल्पभूधारक शेतकऱ्यांना फायदा देण्याचा प्रयत्न नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या माध्यमातून होत आहे. दरवर्षी ₹५००० कोटीप्रमाणे, पुढील 5 वर्षांत ₹२५,००० कोटींची अतिरिक्त गुंतवणूक कृषी क्षेत्रात करण्यात येणार आहे. तसेच, शेतकरी बांधवांना दिवसा १२ तास वीज देण्यासाठी सौर ऊर्जेवर आधारित वीजनिर्मितीचे काम सुरू झाले असून, या योजनेत सोलापूर जिल्हा अग्रेसर आहे. गावांतील बहुद्देशीय सोसायट्यांना १८ प्रकारचे व्यवसाय करण्यास परवानगी देण्याची व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे.
या प्रसंगी प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधितांचे अभिनंदन केले. यावेळी मंत्री ऍड. माणिकराव कोकाटे, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री जयकुमार रावल, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा