डोंबिवली : 'जे एम एफ' शिक्षण संस्थेचे अहोभाग्यच म्हणावे लागेल की आज देवशयनी एकादशी, शुक्ल आषाढ यादिवशी विद्यार्थ्यांच्या रूपात साक्षात पांडुरंग रुक्मिणीच जणू काही 'जे एम एफ' मंडपम मध्ये अवतरले होते. मोठ्या संख्येने वारकरी होऊन आलेले जन गण मन इंग्रजी माध्यमिक शाळेचे आणि विद्यामंदिराचे विद्यार्थी संत मंडळीची मांदियाळीच जणू अवतरली होती.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे व इतर मान्यवरांनी विठल रखुमाई आणि पालखी मधील संत ज्ञानेश्वरांची विधीवत पूजा करून पालखी प्रस्थान सोहळा सुरू झाला. सर्वच मुलांनी विठूचा गजर करत, टाळ मृदूंगाचा घोष करत पालखी प्रस्थान सोहळ्यांमध्ये सामील झाले.
इयत्ता तिसरी व पाचवी मधील विद्यार्थ्यांनी संगीत शिक्षिका सौ. श्रेया कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रभागेच्या तीरी, उभा मंदिरी.. हा अभंग सादर केला. त्याच बरोबर शिशुविहार व पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य शिक्षिका दीपाली सोलकर व सर्व शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली रिंगण सोहळा संपन्न केला तर नाट्य विभागाचे शिक्षक श्री. प्रमोद पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली संत गोरा कुंभार नाटक छोट्या बाळ गोपाळ यांनी सादर केले.
विठ्ठलाचे बाह्यरुपी वर्णन करताना संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सांगितले की, विठ्ठल हा रंगाने सावळा आहे, गळ्यात तुळशीची माळ आहे, कानामध्ये मकर कुंडले आहेत असे विठ्ठलाचे सात्विक रूप बघताना आपला अहंपणा अलगद निसटून जातो तर अंतर्रूप पाहताना निस्सिम त्यागाची भावना जाणवते, आणि आज असे हे सावळे, सुंदर, मनोहर वाटणारे तुमचे रूप बघून साक्षात बालरूपातले विठ्ठल 'जे एम एफ' मंडप्पम मध्ये अवतरले आहेत असेच वाटत आहे. असे उद्गार काढून सर्वांना देवशयनी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.
देवशयनी एकादशी म्हणजेच आजपासून पांडुरंग चार महिने निद्रावस्थेत जातात, त्यावेळी पुढचे आठ महिने इतर देवगण संसाराचा कारभार चालवतात, हेच एक उत्तम उदाहरण तुमच्या सर्वांसाठी आहे की आपण आपल्या शाळेचा, आपल्या वर्गाचा एक भाग आहोत, वर्गप्रतिनिधी उपस्थित नसला तरी ती तुम्हा सर्वाची जबाबदारी आहे की वर्गाला शिस्तबद्ध ठेवणे आणि सहकार्य करणे. आज ही संतांची मांदियाळी बघून खऱ्या अर्थाने पांडुरंग आपल्या भेटीसाठी आला आहे असे जाणवत आहे, असे उद्गार संस्थेच्या सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी काढले व सर्वांना शुभेच्छा दिल्या. श्री.नरेश पिसाट, श्री.अवधूत देसाई, श्री.विठ्ठल कोल्हे यांनी हुबेहूब विट्ठल रुक्मिणी मंदिराची प्रतिकृती उभी केली, व समोरच तुळशी वृंदावन देखील तयार केले.
"याची देही, याची डोळा पाहिला माऊलींचा रिंगण सोहळा.."
विठ्ठलाच्या नामघोषात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात, फुगड्या खेळत माऊलींचा पालखी सोहळा संपन्न झाला. प्रसाद सेवन करून पुन्हा एकदा सर्व पालक, शिक्षक, विद्यार्थ्यांनी विठ्ठलाचा नामघोष करून सोहळ्याची सांगता झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा