कल्याण: गेल्या काही दिवसांपासून कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण पट्ट्यात भुरट्या चोर्या, घरफोड्या, वाटमार्या, रात्रीच्या सुमारास सार्वजनिक चालणारे अवैध धंदे, दारू, तसेच अंमली पदार्थांची सेवनाचे अड्डे सुरू झाले होते. रेल्वे स्टेशन परिसरात चोरी-छुपे गैरधंद्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली २४३ अधिकारी आणि कर्मचार्यांनी कल्याण-डोंबिवलीत पोलीस राज असल्याचे दाखवून दिले. रात्री आठ ते पहाटे चार वाजेपर्यंत पोलीसांच्या वेगवेगळ्या पथकांनी कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण भागात अचानक धरपकडीसह धाडसत्र मोहीम राबवून ३५३ बदमाशांवर कारवाई केली.
कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण पट्ट्यात यापूर्वीही अशाच प्रकारची धरपकड मोहीम सलग दोन ते तीन महिने राबविण्यात आली होती. जिल्ह्याचे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त अतुल झेंडे आणि त्यांच्या सहकार्यांनी दिवसाच नव्हे तर रात्रीच्या सुमारास चालणारे अवैध धंद्यांचे अड्डे शोधून उद्धवस्त केले होते. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, तसेच अंमली पदार्थांचे सेवन करणार्यांच्या विरोधात गुन्हे नोंदवून गुंडांना तुरूंगात धाडण्यात आले, तर अनेकांना कोर्टाच्या फेर्या मारण्यास भाग पाडण्यात आले. कल्याण-डोंबिवलीला नशामुक्त करण्याचा विडा उचललेल्या पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या या मोहिमेमुळे रहिवासी, व्यापारी, दुकानदार आणि व्यावसायिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
कारवायांनी उसंत घेतल्याने बदमाश मंडळींनी पुन्हा डोके वर काढले होते. रात्रीच्या सुमारास गैरधंदे करणार्यांसह सार्वजनिक ठिकाणी अड्डे सुरू झाले असल्याची चाहूल लागताच उपायुक्त अतुल झेंडे यांनी कल्याण-डोंबिवलीतील आठही पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना शनिवारी रात्री अचानक संदेश देऊन धरपकड आणि धाडसत्र राबविण्याचे आदेश दिले. या मोहिमेत उपायुक्त अतुल झेंडे यांच्यासह कल्याण विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे आणि डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे सहभागी झाले होते. कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील इमारती, रेल्वे स्थानक परिसरातील वाहनतळांच्या आडोशाने लपलेले भुरटे चोर, मद्यपी आणि गर्दुल्ल्यांची धरपकड सुरू केली. विविध भागात झाडा-झुडपांचा आधार घेऊन मद्यपान आणि अंमली पदार्थांचे सेवन करण्यासाठी बसलेल्या समाजकंटकांच्या झुंडी पोलीसांनी ताब्यात घेतल्या. काहींनी पोलीसांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तथापी अशांना पोलीसांनी पकडून त्यांची शहरात धिंड काढली. मद्यपान करून वाहने चालविणार्या चालकांकडून ४५ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईत ६ खतरनाक गुंडांना कोठडीचा रस्ता दाखविण्यात आला. २७ तडीपार गुंडाची तपासणी केली.
जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई
कल्याण-डोंबिवलीचे शहर आणि ग्रामीण भागात केलेल्या कारवाईसाठी १७ पोलिस निरीक्षक ४० सहाय्यक पोलिस निरीक्षक/पोलिस उपनिरीक्षक, २३६ पुरूष कर्मचारी आणि १८ महिला कर्मचार्यांनी सहभाग घेतला होता. २७ तडीपार, दारू पिऊन वाहन चालवणारे ६, जुगार खेळणारे ३, घातक शस्त्र बाळगणारे ३, तर नाकाबंदी दरम्यान हाती लागलेल्या ४५ जणांकडून ४१ हजार ५०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. या पथकांनी २० लॉजिंग ऍण्ड बोर्डिंग, २० हॉटेल्स आणि १२ बार तपासले. त्यामुळे 'ऑपरेशन ऑल आऊट'ची ही जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई मानली जाते.
मोहीम यापुढेही सुरूच ठेवण्यात येणार
कल्याण-डोंबिवली परिसरात अचानक पोलीसांकडून धरपकड आणि छापा मोहीम सुरू झाल्याने मोकळ्या मैदानांमध्ये ओल्या पार्ट्या झोडण्यासाठी बसलेल्या टोळक्यांची पळापळ झाली. धरपकड केलेल्या मद्यपींमध्ये सुस्थितीत घरातील काही जण हाती लागले. या सगळ्यांची कान पकडून उठाबशा काढल्या. त्यानंतर या सर्वांची ते राहत असलेल्या परिसरात वरात काढण्यात आली. शिवाय पोलीस ठाण्यात आणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. रात्री आठ वाजल्यापासून सुरू केलेली ही धरपकड मोहीम पहाटे चार वाजेपर्यंत सुरू होती. ही मोहीम यापुढे सुरूच ठेवण्यात येणार आहे. ३५० हून अधिक गुंड, समाजकंटक, मद्यपी, गर्दुल्ले, गैरधंदे करणार्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून न्यायालयामार्फत कारवाई केली जाणार आहे. कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण भागात शनिवारी रात्री ते पहाटेपर्यंत धरपकड आणि छापा मोहीम राबवून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे, शांततेचा भंग करणारे, परिसरात गैरधंदे करणार्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. ही मोहीम यापुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.