BREAKING NEWS
latest
Latest लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Latest लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मोठागाव रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाला गती देण्याची आमदार राजेश मोरे यांची कल्याण-डोंबिवली आयुक्तांकडे मागणी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव येथे दिवा-वसई रेल्वे मार्गावरील प्रस्तावित रेल्वे उड्डाण पुलाच्या (ROB) बांधकामासाठी निविदा प्रक्रिया तातडीने राबवून कामाला गती द्यावी, अशी मागणी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेऊन केली.
संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या महत्त्वाच्या उड्डाण पुलाला केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. मात्र मंजुरीनंतरही प्रत्यक्ष काम सुरू होण्यास विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत आमदार मोरे यांनी आयुक्त गोयल यांना निवेदन सादर करून निविदा प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याची मागणी केली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम तसेच शहर अभियंता अनिता परदेशी उपस्थित होत्या.

मोठागाव परिसरात मानकोली खाडी पुलावरून वाहतूक सुरू झाल्यानंतर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे मोठागाव रेल्वे क्रॉसिंग परिसरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली असून वाहन चालकांचा वेळ आणि इंधनाचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. तसेच रेल्वे फाटक ओलांडताना अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची बाबही समोर येत आहे.

स्थानिक नागरिक, प्रवासी आणि वाहनचालकांना दररोज या समस्यांचा सामना करावा लागत असल्याने उड्डाण पुलाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. मंजुरी मिळूनही कामाला अपेक्षित गती मिळत नसल्याबाबत आमदार मोरे यांनी आयुक्तांकडे विचारणा केली असता, संबंधित कामाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करून लवकरच प्रत्यक्ष काम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त अभिनव गोयल यांनी दिले.

मोठागाव रेल्वे उड्डाणपूल साकार झाल्यानंतर वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची अपेक्षा  डोंबिविलीकरांकडून व्यक्त केली जात आहे.

दिव्यात मृतदेह नेण्यासाठी रस्ता बंद, बिल्डरांच्या कथित दादागिरीविरोधात नागरिकांचा संताप..

विशेष प्रतिनिधी

दिवा : दिवा शहरातील बेडेकरनगर परिसरात राज वाघ यांचा मृत्यू झाला. पण मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्याच्या वेळी रस्ता बंद करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर समाजसेवक अमोल केंद्रे यांनी आक्रमक भूमिका घेत संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, बेडेकरनगर येथील पाटील टॉवर आणि रविना अपार्टमेंट परिसरातील रस्त्याच्या वापराबाबत अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. या मार्गावरून वाहन किंवा रिक्षा नेण्यासाठी नागरिकांकडून पैसे घेतले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सुमारे एक लाख लोकसंख्या असलेल्या या परिसरातील नागरिकांना दैनंदिन ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही सांगण्यात आले.

दरम्यान, एका मृत व्यक्तीचा मृतदेह रुग्णवाहिकेतून घरी आणल्यानंतर अंत्ययात्रेसाठी त्याच मार्गाचा वापर करावा लागणार असल्याचे माहिती असतानाही संबंधित रस्ता लोखंडी रॉड टाकून बंद करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच समाजसेवक अमोल केंद्रे घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या उपस्थितीत रस्त्याला लावण्यात आलेले कुलूप तोडण्याचा प्रयत्न सुरू असताना एका युवकाने चावी आणून कुलूप उघडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, "जिवंत माणसांनाच नव्हे तर मृतदेहालाही रस्ता नाकारला जात असेल तर ही अत्यंत अमानुष बाब आहे," अशी प्रतिक्रिया दिली. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या समस्येकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

या प्रकरणी संबंधित बिल्डर आणि जागा मालकांविरोधात पोलीसांनी चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, तसेच नागरिकांना मुक्तपणे रस्ता वापरण्याचा अधिकार मिळावा, अशी मागणीही स्थानिकांकडून करण्यात आली आहे.

अमोल केंद्रे, समाजसेवक, दिवा बिल्डरांची दादागिरी कधी बंद होणार. राज वाघ यांचे निधन झाले होते.अंतिम संस्कार करण्यासाठी बॉडी घेऊन जाण्याचा रस्ता बंद केला. पोलीस प्रशासनास कळवले, दिवा प्रभाग समिती यांनाही कळवले. बेडेकर नगर पाटील टॉवर येथे कित्येक वर्षापासून हिच परिस्थिती आहे. कोण बोलणार ? गुंडागर्दी, हुकूमशाही सुरू आहे. माणुसकी जिवंत राहिली नाही. कायद्याचा धाक राहिला नाही. मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो त्यावर योग्य ती कारवाई करून हा रस्ता कायमचा खुला करावा अशी मी दिवा वासियांतर्फे मागणी करत आहे.

कारखाने आणि व्यावसायिक कारखाने आणि व्यावसायिक वापरकर्त्यांना पेट्रोल पंपावरून इंधन खरेदीस बंदी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई : केंद्र सरकारने इंधनाच्या वितरणाबाबत महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. आता मोठ्या ग्राहकांना केवळ मोठ्या प्रमाणात विक्री करणाऱ्या ठिकाणांहूनच इंधन खरेदी करावे लागेल. कारखाने आणि व्यावसायिक वापरकर्त्यांना किरकोळ विक्री केंद्रातून इंधन मिळणार नाही. त्याचबरोबर सामान्य ग्राहक एका दिवसात जास्तीत जास्त २०० लीटर डिझेलच खरेदी करू शकतील. हे डिझेल पुन्हा विकण्यावर पूर्णपणे बंदी असेल.

देशाच्या काही भागांमध्ये किरकोळ पंपांवर अचानक वाढलेली असामान्य विक्री लक्षात घेऊन सरकारने हे पाऊल उचलले आहे. ही बंदी सुरुवातीला ९० दिवसांसाठी लागू करण्यात आली आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, या निर्णयामुळे सामान्य ग्राहकांसाठी इंधनाची कमतरता भासणार नाही.

पेट्रोलियम मंत्रालयाने ‘मोटर स्पिरिट ऍण्ड हाय स्पीड डिझेल (टेम्पररी रेग्युलेशन ऑफ सप्लाय थ्रू रिटेल आउटलेट्स) ऑर्डर, २०२६’ जारी केला आहे. यानुसार, आता कोणतीही फॅक्टरी, व्यावसायिक संस्था किंवा मोठ्या संस्था सामान्य गाड्यांसाठी असलेल्या पेट्रोल पंपावरून डिझेल-पेट्रोल खरेदी करू शकणार नाहीत. त्यांना त्यांच्या स्वतःच्या ग्राहक पंपावरून किंवा निश्चित केलेल्या बल्क सप्लाय चॅनेलद्वारेच इंधन घ्यावे लागेल.

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशाच्या काही भागांमध्ये किरकोळ पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलची विक्री अचानक खूप वाढली होती. तपासात असे समोर आले की किरकोळ आणि घाऊक किमतींमध्ये मोठा फरक असल्यामुळे कारखाने आणि व्यावसायिक वापरकर्त्यांनी घाऊक इंधन मागवणे बंद केले आणि ते थेट सामान्य पेट्रोल पंपांवरून गाड्या पाठवून इंधन खरेदी करू लागले. यामुळे सामान्य जनतेसाठी इंधनाच्या तुटवड्याचा धोका निर्माण होत होता.

पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या जमिनीचा प्रश्न सुटत संघर्ष संपला आणि महादेव भक्तांचा विजय झाला - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.०८ -  "महसूल आणि उद्योग विभागाच्या सकारात्मक सहकार्यामुळे पिंपळेश्वर महादेव मंदिराचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. आज अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की, पिंपळेश्वर महादेवाच्या मंदिरासाठी सुरू असलेल्या एका प्रदीर्घ संघर्षाला पूर्णविराम मिळाला असून यात सर्व महादेव भक्तांचा विजय झाला आहे," असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. ही सर्व जमीन आता पिंपळेश्वर महादेवाला समर्पित करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.
    
यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार किसन कथोरे, आमदार कुमार एयलानी, आमदार सुलभा गायकवाड, आमदार राजेश मोरे, माजी खासदार कपिल पाटील, माजी कॅबिनेट मंत्री जगन्नाथ पाटील, जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल, पिंपळेश्वर मंदिराचे विश्वस्त (ट्रस्टी) स्थानिक नगरसेवक अर्जुन पाटील, गजानन पाटील असे सर्व नगरसेवक आणि पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंदिरामध्ये विधीवत महापूजा करण्यात आली. याप्रसंगी भक्त मंडळाच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले. आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व मंत्रिमंडळातील आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आणि सहकार्यामुळे हे पवित्र कार्य पूर्ण झाले आहे. मात्र, आम्ही सर्व जण केवळ निमित्तमात्र आहोत. जे कार्य करायचे असते ते महादेवच करवून घेतात. त्यामुळे या यश प्राप्तीचे संपूर्ण श्रेय भगवान महादेवालाच जाते. हे पुण्यकर्म करण्याची संधी महादेवाने आम्हांस दिली आणि आमच्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून हे कार्य पूर्ण करून घेतले, याबद्दल मी मंत्रिमंडळाच्या वतीने महादेवाचे आभार मानतो. या मंदिराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला असून, तोच सुवर्ण इतिहास पिंपळेश्वर महादेवाला पुन्हा प्राप्त करून देण्याचे काम शासन या ठिकाणी करणार आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंढरीनाथ पाटील यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. याप्रसंगी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे आणि आमदार रवींद्र चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे आणि आमदार तथा भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण पिंपळेश्वर महादेव मंदिराची सुरुवाती पासून आत्तापर्यंत ची संपूर्ण माहिती आपल्या भाषणातून दिली, यांनी मांडलेल्या मंदिर परिसराच्या विकासाच्या सर्व मागण्या प्राधान्याने पूर्ण केल्या जातील, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

'जेएमएफ' शिक्षण संस्थेच्या 'जन गण मन' विद्यालयाचा एसएससी २०२५-२६ मध्ये पुन्हा १००% निकाल..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली कोपर : 'जाह्नवीज मल्टी फाउंडेशन' शिक्षण संस्थेच्या 'जन गण मन' विद्यामंदिर स्कूलने यंदाच्या एसएससी बोर्ड परीक्षेत पुन्हा एकदा उल्लेखनीय १००% निकाल मिळवत शैक्षणिक उत्कृष्टतेची गौरवशाली परंपरा कायम राखली आहे.

स्थापनेपासूनच शाळेने सातत्याने शंभर टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा जपली असून, दर्जेदार शिक्षण व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेली संस्थेची बांधिलकी यामुळेच हा यशस्वी प्रवास शक्य झाला आहे. विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि शिस्तबद्ध अभ्यासाच्या जोरावर शाळेचे नाव उज्ज्वल केले. यावर्षीच्या गुणवंत विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
निहार मोनल प्रवीण बागडे – ८९.४०%
आयुष मनीषा सुरज पांचाळ – ८८.८०%
नंदिनी रीना बसंत सिंग – ८७.८०%
या यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना डॉ. राजकुमार एम कोल्हे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभाशीर्वाद दिले. आत्मविश्वास, शिस्त आणि समर्पणाच्या बळावर जीवनात अधिक मोठी उद्दिष्टे गाठण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. डॉ. प्रेरणा राजकुमार कोल्हे, संस्थेच्या सचिव, यांनीही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून शाळेच्या सातत्यपूर्ण यशाबद्दल आनंद व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक व वैयक्तिक प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे, असे प्रेरणादायी मार्गदर्शन त्यांनी केले.

शाळेच्या या यशामागे प्रभारी मुख्याध्यापक अलपेश खोब्रागडे आणि तेजावती कोटीयन यांचे मोलाचे नेतृत्व व मार्गदर्शन लाभले असल्याचे व्यवस्थापनाने नमूद केले. तसेच शिक्षिका मंजुषा चौधरी, मीना वटकर, सीमा यादव, मृणाल विरकूड तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमांचे विशेष कौतुक करण्यात आले. पालक, हितचिंतक आणि नागरिकांकडून शाळेच्या व्यवस्थापनाचे, शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. या यशामुळे जन गण मन विद्यालयाने गुणवत्तापूर्ण शिक्षण व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध असलेल्या अग्रगण्य शैक्षणिक संस्थांमध्ये आपले स्थान अधिक भक्कम केले आहे.

भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित ‘युवाशक्ती जागर मोर्चा’ या राज्यव्यापी दौऱ्याचा शुभारंभ..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली, दि. २२ एप्रिल - भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित ‘युवाशक्ती जागर मोर्चा’ या राज्यव्यापी दौऱ्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतून दणक्यात शुभारंभ झाला. यामुळे राज्यातील युवकांना राष्ट्रनिर्मितीच्या ध्येयाशी जोडण्याची आणि त्यांच्या उर्जेला सकारात्मक दिशा देण्याची व्यापक मोहीम सुरू झाल्याचे उद्गार भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी काढले.

या प्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे व्यासपीठावरील सर्वात युवा मनाचे आणि ऊर्जावान नेतृत्व असल्याचे नमूद केले. आपल्या मनोगतात प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी यात्रेचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, “भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने राबवण्यात येणारा हा अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे. केंद्र व राज्य सरकारने तरुणाईसाठी घेतलेले लोककल्याणकारी निर्णय या यात्रेच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यातील युवकांपर्यंत पोहोचवले जातील. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असलेले सक्षम आणि प्रभावी युवाशक्तीचे संघटन उभारणे, हेच या यात्रेचे मुख्य ध्येय आहे.”

‘जागर युवाशक्तीचा, सशक्त राष्ट्रनिर्मितीचा’ हा संदेश देणारी ही यात्रा राज्यातील युवकांना एकत्र आणत त्यांना विकास, नवकल्पना आणि राष्ट्रहिताच्या विचारांशी जोडण्याचे कार्य करणार आहे. भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या नेतृत्वात ही यात्रा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार असून, युवकांमध्ये जागर निर्माण करून त्यांना सामाजिक आणि राष्ट्रीय बांधिलकीची जाणीव करून देईल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमास मंत्री जयकुमार गोरे, मंत्री अतुल सावे, मंत्री नितेश राणे, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, राज्यसभा खासदार अशोक चव्हाण, भाजपा प्रदेश सरचिटणीस व भाजयुमो प्रदेश प्रभारी सुनील राणे, मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांच्यासह इतर मान्यवर, भाजयुमोचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.

डोंबिवलीतील होली एंजल्स शाळेचा १००% यशाचा विक्रम करत सीबीएसईच्या शालान्त परीक्षेच्या निकालात सलग उत्तम कामगिरी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली - डोंबिवली येथील होली एंजल्स स्कूलने पुन्हा एकदा आपल्या शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखत सीबीएसई दहावी परीक्षा २०२६ मध्ये सलग २० व्या वर्षी १००% निकालाचा मानाचा तुरा रोवला आहे.
बुधवारी सायंकाळी उशिरा जाहीर झालेल्या या निकालात एकूण १५७ विद्यार्थ्यांपैकी ३५ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा जास्त गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. या परीक्षेत जय तुषार भारंबे (९७.२०%) याने प्रथम क्रमांक, दक्ष गणेश पाटील (९७.००%) याने द्वितीय क्रमांक, तर प्रणील उमेश म्हात्रे (९६.००%) आणि ऍन्जेलिन रिचर्ड नेय्यन (९६.००%) यांनी संयुक्त तृतीय क्रमांक मिळवला. 
विषयानुसारही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली असून, इंग्रजी आणि मराठी विषयांमध्ये प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवून विशेष उल्लेखनीय यश मिळवले आहे. ऍन्जेलिन नेय्यन, अद्वैत मेनन आणि अयान आंजर्लेकर शाळेतर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला यावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर ओमेन डेव्हिड, प्राचार्य बिजॉय ओमेन, खजिनदार लीला ओमन यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार अमित गोरखे लिखित ‘आधुनिक भारताचे शिल्पकार : युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

पिंपरी : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे, हे काळाची गरज आहे. याच उदात्त हेतूने आमदार अमित गोरखे यांनी शब्दांकित केलेल्या ‘आधुनिक भारताचे शिल्पकार : युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या पुस्तकाचे प्रकाशन आज पुणे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या शुभहस्ते या पुस्तकाचे लोकार्पण करण्यात आले.

पुस्तक सकारात्मक परिवर्तन घडवून आणणारे..

पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे केवळ एका काळापुरते मर्यादित नसून ते अनंत काळासाठी मार्गदर्शक आहेत. आमदार अमित गोरखे यांनी अत्यंत अभ्यासूवृत्तीने बाबासाहेबांच्या कार्याचा आढावा या पुस्तकात घेतला आहे. समता आणि बंधुतेचा हा विचार समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार माझ्या जीवनाचे प्रेरणास्थान..

या प्रसंगी आपली भूमिका मांडताना आमदार अमित गोरखे म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे खरे निर्माते आहेत. त्यांचे विचार माझ्या जीवनाचे प्रेरणास्थान राहिले आहेत. बाबासाहेबांनी दिलेली समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेची शिकवण जनमानसात, विशेषतः तरुणांमध्ये अधिक प्रभावीपणे रुजावी, या भावनेतून मी या पुस्तकाचे लेखन केले आहे. माझ्या लेखणीतून मांडलेला हा विचारांचा दीप समाजाला नवी दिशा देणारा ठरेल, असा मला विश्वास आहे.’

पुस्तकाचे वैशिष्ट्य..

या पुस्तकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक क्रांतीसोबतच त्यांचे आर्थिक विचार, राष्ट्र उभारणीतील योगदान आणि संविधानाच्या माध्यमातून त्यांनी दिलेला समतेचा संदेश सोप्या भाषेत मांडण्यात आला आहे. हे पुस्तक केवळ एक चरित्र नसून बाबासाहेबांच्या अर्थशास्त्र, जलव्यवस्थापन, वीज निर्मिती आणि कामगार कल्याण यांसारख्या दुर्लक्षित राहिलेल्या पैलूंवर सखोल भाष्य करते. प्रा. डॉ. वैभव ढमाळ यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली असून, त्यांनी बाबासाहेबांना ‘भविष्याचा शोध घेणारा महामानव’ असे संबोधले आहे. यात ‘महु ते महामानव’ या संघर्षापासून ते ‘चिरंतन बाबासाहेब’ या प्रवासापर्यंतचा प्रत्येक टप्पा अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे.

या पुस्तकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रीमुक्तीसाठी केलेले प्रयत्न आणि कामगारांना मिळवून दिलेले ८ तासांच्या कामाचे हक्क, यावर विशेष प्रकाश टाकण्यात आला आहे. लेखक अमित गोरखे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केल्याप्रमाणे, आजच्या तरुण पिढीला बाबासाहेबांचे ‘संवैधानिक नैतिकता’ आणि ‘धम्म विचार’ सुस्पष्टपणे समजावेत, या उद्देशाने या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय नेतृत्व हे केवळ सत्ता मिळवण्यासाठी नव्हते, तर ते समाजातील शेवटच्या घटकाला ‘राजकीय सत्ता’ हे प्रगतीचे साधन म्हणून मिळवून देण्यासाठी होते. त्यांच्या मते, जोपर्यंत शोषित वर्ग सत्तेच्या चाव्या हातात घेत नाही, तोपर्यंत सामाजिक गुलामगिरी नष्ट होणार नाही. रिझर्व्ह बँकेची स्थापना असो वा देशातील मोठे धरण प्रकल्प, या सर्वांच्या मुळाशी बाबासाहेबांचे विचार कसे आहेत, हे या पुस्तकातून सिद्ध होते. हे पुस्तक केवळ दलितांच्या कैवाऱ्याची कथा नसून, एका आधुनिक आणि विज्ञानवादी भारताची निर्मिती करणाऱ्या जागतिक दर्जाच्या नेत्याची गाथा आहे. सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि अभ्यासकांसाठी हा ग्रंथ एक अनमोल ठेवा ठरणार आहे.

पालिकेचे दुर्लक्ष की व्यवस्थेचा अभाव? दिवा स्टेशन परिसरात कचऱ्याचा प्रश्न गंभीर..

विशेष प्रतिनिधी

दिवा : दिवा शहरात कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, पूर्वेकडील मधल्या ब्रिजजवळील प्रवेशद्वारासमोर कचऱ्याचा मोठा ढीग साचल्याचे चित्र समोर आले आहे. सकाळी कामावर जाणारे नागरिक तसेच स्थानिक रहिवासी या ठिकाणी कचरा टाकत असल्याने परिसरात कचऱ्याचे प्रमाण वाढत आहे.

स्थानिक दुकानदारांच्या मते, या भागातील कचरा नियमितपणे उचलला जात नसल्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. परिणामी, कचऱ्याचे ढीग वाढून अक्षरशः कचऱ्याचा डोंगर तयार झाला असून, परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून लोकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरनीवर आहे.

या मार्गावरून कोकणात जाणारे प्रवासी, तसेच रोज वसई, पनवेल आणि रोहा येथे कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना नाकावर रुमाल ठेवून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांसह स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे ही समस्या अधिकच वाढत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. संबंधित ठिकाणी दररोज कचरा उचलून परिसर स्वच्छ ठेवावा, अशी जोरदार मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.

आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर धडकणार सिनेमा ‘धुरंधर-२'..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई : गेले २१ दिवस 'धुरंधर-२' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला आहे. हा सिनेमा सर्वात कमी वेळात १००० कोटींचा नेट आकडा गाठणारा एकमेव भारतीय चित्रपट ठरला असून धुरंधर-२ ने जागतिक पातळीवर १६६० कोटींहून अधिक कलेक्शन केले असून भारतात त्याने १२०० कोटींचा गल्ला पार केला आहे. कित्येकांनी हा सिनेमा एकपेक्षा जास्त वेळा थिएटरमध्ये जाऊन पाहिला आहे. अशातच आता या फिल्मच्या ओटीटी रिलीजसाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.

धुरंधरचा पहिला भाग 'नेटफ्लिक्स' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता. यानंतर प्रेक्षकांना वाटलं होतं की दुसरा भागही याच प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल. मात्र, आदित्य धर यांनी या चित्रपटाचे डिजिटल हक्क ‘जिओ हॉटस्टार’ ला विकले आहेत.हा स्पाय थ्रिलर पाहण्यासाठी जिओ हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन घ्यावे लागणार आहे.

नुकतंच हाती आलेल्या रिपोर्टनुसार, जिओ हॉटस्टार हा सिनेमा आयपीएल २०२६ संपल्यानंतर स्ट्रीम करण्याच्या तयारीत आहे. आयपीएलची धामधूम सुरू असताना चित्रपटाच्या व्ह्यूअरशिपवर परिणाम होऊ नये, हा यामागचा विचार आहे. त्यामुळे, मे महिन्याचा शेवटचा आठवडा किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात ‘धुरंधर-२’ ओटीटीवर धडक देण्याची दाट शक्यता आहे.

डॉक्टरांनी मुंबईत बसून केले ओमानमधील महिलेचे रोबोटिक किडनी ऑपरेशन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई - मुंबईतील 'कोकिलाबेन धीरूभाई अंबानी' रुग्णालयाने जागतिक आरोग्य दिन २०२६ रोजी एक मोठे यश संपादन केले आहे. रुग्णालयाचे डॉक्टर टी.बी. युवराजा यांनी मुंबईत बसून ओमानमधील मस्कत येथील मेडिकल सिटी रुग्णालयात ५५ वर्षीय महिलेचे रोबोटिक किडनी ऑपरेशन केले. ही सीमापार रिमोट रोबोटिक शस्त्रक्रिया भारतातून पहिल्यांदाच करण्यात आल्याचे मानले जात आहे.

ही शस्त्रक्रिया प्रगत ‘मेडबॉट ट्युमाई’ रोबोटिक प्रणाली आणि रिअल-टाइम कनेक्टिव्हिटीद्वारे करण्यात आली. डॉक्टरांनी दूर बसून संपूर्ण ऑपरेशन नियंत्रित केले आणि यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पूर्ण केली. कोकिलाबेन रुग्णालयातील यूरो-ऑन्कोलॉजी आणि रोबोटिक सर्जरीचे संचालक डॉ. टी.बी. युवराजा म्हणाले की, आरोग्यसेवेत हा एक मोठा बदल आहे. त्यांच्या मते, आता रुग्णांना चांगल्या उपचारांसाठी दुसऱ्या देशात जाण्याची गरज भासणार नाही, तर डॉक्टरच तंत्रज्ञानाच्या मदतीने रुग्णांपर्यंत पोहोचू शकतील.

उच्च न्यायालयाचे विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएमच्या तपासणीचे आदेश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई : भारताच्या निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच, मुंबई उच्च न्यायालयाने ईव्हीएम (EVM) ची तपासणी आणि छाननी करण्यास परवानगी दिली आहे. न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांनी हा आदेश दिला आहे. या प्रकरणातील याचिकाकर्ते हे काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य आणि माजी मंत्री नसीम खान आहेत तर प्रतिवादी दिलीप लांडे आहेत.

२०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत, शिंदे सेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांनी, मुंबई उपनगर जिल्ह्यातील चांदिवली मतदारसंघातून नसीम खान यांचा पराभव केला. खान यांनी निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यासंदर्भात बोलताना नसीम खान म्हणाले की, भारताच्या इतिहासात आतापर्यंत असे कधीही घडलेले नाही की, निवडणुका पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाने (ECI) उमेदवार आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत EVM ची तपासणी किंवा तपासणी मोहीम राबवली असेल. “हा एक ऐतिहासिक आदेश आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एप्रिल २०२४ मधील निकालाचा संदर्भ देत नसीम खान म्हणाले की, “या निकालानुसार, निकालांच्या घोषणेनंतर प्रत्येक विधानसभा मतदार संघातील ५ टक्के ईव्हीएममधील- म्हणजेच कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि VVPAT मधील - ‘बर्न झालेली मेमरी’ (burnt memory) किंवा मायक्रोकंट्रोलरची तपासणी व पडताळणी ईव्हीएम उत्पादकांच्या अभियंत्यांच्या एका पथकाद्वारे केली जाईल.”

मुंबई उपनगर जिल्ह्याच्या उप-निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नसीम खान यांना पाठवलेल्या पत्रानुसार, EVM उत्पादक कंपनी असलेल्या ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, बंगळुरू’ यांच्यामार्फत १६ आणि १७ एप्रिल रोजी मुंबईत केवळ ‘निदान चाचणी’ (diagnostic check) करण्यास परवानगी दिली जाईल.

काँग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारांना त्यांच्या संबंधित मतदारसंघांमध्ये EVM आणि ‘व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल’ (VVPAT) युनिट्सची पडताळणी करून घेण्यास सांगितले होते. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘INDIA’ विरोधी आघाडीतील सुमारे दोन डझन उमेदवारांनी EVM च्या विश्वासार्हतेबाबत चिंता व्यक्त केली.

नाशिकच्या मल्टी नॅशनल आयटी कंपनीत धर्मांतरासाठी महिलांचे लैंगिक शोषण..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
नाशिक : नाशिकमधील अशोक खरात प्रकरण सुरू असतानाच नाशिकच्याच एका अत्यंत नामांकित मल्टी नॅशनल आयटी कंपनीत महिलांचे लैंगिक शोषण, छळ आणि धर्मांतरणचे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी आतापर्यंत १३ गुन्हे दाखल झाले असून काही आरोपींना अटकही करण्यात आली आहे. मात्र या गुन्ह्यात जे काही आरोप करण्यात आले आहेत ते अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे.

लव्ह जिहाद पाठोपाठ हा नवा कॉर्पोरेट जिहादचा काही प्रकार आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत असून गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता एसआयटी (SIT) ची देखील स्थापना करण्यात आली आहे. लव्ह जिहादचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय तो नाशिक मधल्या एका मल्टीनॅशनल कंपनीत. या कंपनीत जे सुरू होतं, त्यामुळे राज्यभरात कॉर्पोरेट जिहादची चर्चा सुरू झाली आहे. मुंबई नाका परिसरात ही मल्टिनॅशनल कंपनी आहे. या कंपनीतल्या एचआर मॅनेजरकडून धर्मांतरासाठी जबरदस्तीसाठी केली जात होती. नमाज पठण करायला लावलं जायचं, मांसाहारी जेवण खायला लावायचं, हिंदू देवतांबाबत आक्षेपार्ह शब्दात बोललं जात होतं, मुलींना लज्जास्पद वागणूक दिली जायची, मुलींशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला जायचा, यापैकी पीडित महिला १८ ते २६ वयोगटातल्या आहेत. २०२२ पासून असे प्रकार कंपनीत सुरू होते.

राज्यातील सर्व जिल्ह्यांत एका फोनवर हजर होणार फिरते रुग्णालय..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असलेल्या नवीन रुग्णवाहिका दाखल होणार आहेत. १०८ या आपत्कालीन क्रमांकावर फोन करताच या रुग्णवाहिका रुग्णांच्या दारात हजर होतील. राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी या रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. शहर असो वा दुर्गम गाव, प्रत्येक ठिकाणी गरजूंना रुग्णवाहिकेची सेवा वेळेत मिळावी असा सरकारचा प्रयत्न आहे. या रुग्णवाहिका केवळ वाहन नसून ते एक ‘फिरते रुग्णालय’ असेल. या प्रकल्पासाठी ‘सुमित एसएसजी’ आणि ‘पिनाकल इंडस्ट्रीज’ ने हातमिळवणी केली आहे. या प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्रासाठी १७५६ रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

यामध्ये ऑक्सिजन यंत्रणा, प्रथमोपचाराची आधुनिक साधने आणि रुग्णांना ने-आण करण्यासाठी आरामदायी व्यवस्था असेल. रुग्णवाहिकांचे आतील रचना ही विशिष्ट पद्धतीने बनविण्यात आली आहे. यामुळे रुग्णवाहिकेतील स्वच्छता राखणे सोपे जाईल आणि संसर्ग पसरणार नाही.

शाळा सोडल्याचा दाखला वयाचा निर्णायक पुरावा नाही..

प्रतिनिधी: अवधुत सावंत 
   
मुंबई : ‘शाळा सोडल्याचा दाखला’ हा वयाचा निर्णायक पुरावा मानता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय आज मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला असून त्याच आधारे पोक्सोच्या गुन्ह्यातील आरोपीला जामीन मंजूर केला. २५ वर्षीय तरुणाने पीडित मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. तथापि, दोघांमध्ये प्रेमसंबंध असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. न्यायमूर्ती आर. एम. जोशी यांच्या एकलपीठाने हा निर्णय देत आरोपीला जामिनाचा दिलासा दिला. वसईतील वाळीव पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. आरोपीच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायमूर्ती आर. एम. जोशी यांच्या एकलपीठाने सुनावणी घेतली.

आरोपी तरुण हा २५ वर्षांचा होता तर मुलगी १५ वर्षांची होती. त्यांचे प्रेमसंबंध होते. आरोपीने आपल्या बहिणीची ओळख करून देण्याच्या बहाण्याने पीडित मुलीला घरी नेले. तेथे पीडित मुलीला फ्लॅटमध्ये डांबून ठेवले आणि बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडित मुलीने या संदर्भात जबाब दिल्यानंतर आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर १० ऑगस्ट २०२२ रोजी आरोपी जयेश पारधी याला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो तुरुंगात होता. त्याने ऍड. अर्जुन कदम यांच्यामार्फत जामीनासाठी उच्च न्यायालयात अपिल केले होते.

केंद्रीय मंत्रिडळाची महिला आरक्षण सुधारणा मसुद्याला मंजुरी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नारी शक्ती वंदन कायद्यात सुधारणा करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली. या प्रस्तावानुसार लोकसभेच्या जागांची संख्या सध्याच्या ५४३ वरून ८१६ पर्यंत वाढेल, ज्यापैकी २७३ जागा महिलांसाठी राखीव असतील. १६ ते १८ एप्रिल दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे, त्यामध्ये हे सुधारणा विधेयक मंजूर होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महिला आरक्षणानंतर उत्तर प्रदेशात लोकसभेच्या जागांमध्ये सर्वाधिक ४० जागांची वाढ होऊन एकूण जागा  ८० वरून १२० होणार आहेत. महाराष्ट्रात महिलांसाठी २४ जागा राखीव ठेवल्या जातील, ज्यामुळे लोकसभेच्या जागा ४८ वरून ७२ होतील.

संसदीय मंजुरी मिळाल्यानंतर, हा कायदा ३१ मार्च २०२९ रोजी लागू होईल. तो प्रथम त्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि काही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये प्रभावी होईल. प्रस्तावानुसार, आरक्षण उभ्या तत्त्वावर लागू केले जाईल, म्हणजेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या जागांमध्येही महिलांचा वाटा निश्चित केला जाईल.

बारामतीत काँग्रेसची माघार मात्र पाठिंबा नाही..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
पुणे : राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून काँग्रेसने अखेर माघार घेतली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिली होती. परंतु आज आकाश मोरे यांची उमेदवारी मागे घेण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन बारामतीच्या पोटनिवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले.

पोटनिवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. एकूण ५३ उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले होते त्यापैकी तीस उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज आज शेवटच्या दिवशी मागे घेतले. त्यानंतर आता इथे एकूण २३ उमेदवार रिंगणात असून त्यात बहुतांश अपक्ष उमेदवार रिंगणात राहिले असून त्यामुळे महायुतीच्या सुनेत्रा पवार यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.

या निवडणुकीबाबत आज सकाळपासून राज्यात राजकीय विविध घडामोडी आणि ट्विस्ट पाहायला मिळाले. महाराष्ट्राची सभ्यता, सुसंस्कृतपणा विचारात घेऊन बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार घेतली असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. बारामतीतून उमेदवारी माघारी घेतली असली तरी काँग्रेस आपल्या भूमिकेवर ठाम, २०२९ ला बारामतीत काँग्रेसचा आमदार असेल असे सपकाळ यावेळी म्हणाले.

बारामतीची पोटनिवडणूक लढली पाहिजे अशी काँग्रेस पक्षाची भूमिका होती, काँग्रेसचे हे वैचारिक पाऊल योग्यच आहे, कुठेही थांबता कामा नये ही भूमिका आहे. पण याबरोबर महाराष्ट्राची संस्कृती, समंजस्यपणा, सभ्यता याची एक किनारही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटातील नेत्यांनी संवाद साधून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची विनंती केली होती, त्यानंतर राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांशी व पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून बारामतीतून काँग्रेसची उमेदवारी माघारी घेत आहोत, आज दोन पावले मागे येऊन माघार घेतली असली तरी २०२९ च्या निवडणुकीत बारामतीतून काँग्रेसचा आमदार असेल, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

भिवंडी येथील प.रा.हायस्कूल चे निलेश शंकर नरवडे यांना ‘शिक्षकरत्न पुरस्कार २०२६’ जाहीर..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण - मुंबई येथील लक्ष्मी शैक्षणिक संस्थेतर्फे ज. ए. इ.चे प. रा. विद्यालय, भिवंडी येथील एनसीसी /आरएसपी अधिकारी  निलेश शंकर नरवडे यांना “शिक्षकरत्न पुरस्कार २०२६” जाहीर करण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचे सुपुत्र असलेल्या श्री. नरवडे यांनी शिक्षण क्षेत्रात तसेच एनसीसी आणि रस्ता सुरक्षा अभियान (आर एस पी) माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, देशभक्ती आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत लक्ष्मी शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष श्री. सुनील आहेर यांनी त्यांची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड केली आहे.

लक्ष्मी शैक्षणिक संस्था सन २०१७ पासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवत असून शिक्षकांना प्रेरणा देण्यासाठी दरवर्षी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करते. यावर्षी आदर्श मराठी शाळा, इंग्रजी संभाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व उपक्रमांचा पारितोषिक वितरण सोहळा रविवार, दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मंत्रालयाजवळ, मुंबई-३२ येथे पार पडणार असून, शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

या यशाबद्दल प. रा. विद्यालय भिवंडीचे शाळा समिती अध्यक्ष श्री. प्रदीप राका, मुख्याध्यापिका सौ. नंदा कोंगे, तसेच महाराष्ट्र राज्य 'मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा' ग्रुपचे प्रमुख व आर एस पी विभागीय समन्वय अधिकारी डॉ. मनिलाल शिंपी, 'दैनिक स्वराज्य तोरण' चे संपादक डॉ. किशोर बळीराम पाटील, 'निर्भया फाऊंडेशन इंडिया' चे अध्यक्ष मनोज बर्डे, जिल्हा समादेशक जितेंद्र सोनवणे, कला अध्यापक आर एस पी अधिकारी शिक्षक संदिप पाटील, मंगेश भामरे, विभागीय समन्वय अधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह शिक्षकवृंद व मित्रपरिवाराकडून निलेश नरवडे यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील १२०० शिक्षकांना अनिल बोरनारे यांच्याकडून अखेर न्याय; डीसीपीएस योजनेचे परिपत्रक जाहीर.

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण -  मुंबई महानगरपालिकेतील माध्यमिक शाळांमधील १२०० शिक्षकांना शिक्षक नेते अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्यामुळे न्याय मिळाला असून शिक्षकांच्या डिसिपीएस योजनेचे परिपत्रक मुंबई मनपा ने निर्गमित केले आहे मुंबई मनपाच्या संपूर्ण मुंबईमध्ये २४९ माध्यमिक शाळा असून त्यापैकी ५१ शाळा या अनुदानित व २०० शाळा या विनाअनुदानित आहेत. अनुदानित शाळांसाठी शासन अनुदान देते व विनाअनुदानित शाळा या मनपा स्वखर्चाने चालवते. सदर शाळांमध्ये जवळपास १५०० शिक्षक कार्यरत असून सन २००८ पासून सदर सर्व शिक्षक आपले काम जबाबदारीने पार पाडत आहेत. गेल्या १८ वर्षांपासून आर्थिक कल्याणकारी लाभांपासून वंचित आहेत. भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युईटी, मृत्यू उपदान, कुटुंब पेन्शन योजना यांसारख्या मूलभूत योजनांपासून वंचित होते.सदर शिक्षकांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. 

DC-। योजना सन २००७ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे DC-1 ही पेन्शन योजना लागू आहे या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांचा पगार मधून १०% रक्कम कपात करणे व तेवढीच रक्कम सरकारकडून ऍड करून सदर रक्कम DCPS च्या खात्यांमध्ये टाकली जाते, परंतु सदर कर्मचारी सेवेत कायम होऊन १४ वर्षे झाली परंतु  मुंबई मनपा शिक्षण विभागाकडून कर्मचाऱ्यांचे DCPS चे खातेच उघडले गेले नव्हते. या शिक्षकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे याबाबत पाठपुरावा देखील केलेला होता पण फक्त तुमचे काम सुरू आहे एवढेच आश्वासन शिक्षकांना मिळत होते. अखेर मुंबई मनपातील शिक्षकांनी शिक्षक महासंघ मुंबई व कोकण विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांच्याकडे धाव घेतली. 

बोरनारे यांनी लागलीच ९ ऑक्टोबर २०२५ रोजी याबाबत मुंबई महानगरपालिकेच्या करी रोड येथील शिक्षण अधिकारी कार्यालयात शिक्षणाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली या बैठकीला अनिल बोरनारे यांच्यासमवेत मुंबई मनपा क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष डॉ. जितेंद्र लिंबकर, अशोक गर्जे, रोहित कुलकर्णी, यशवंत पवार, चंद्रकांत घोडेराव, विक्रांत गायकवाड, धर्मेंद्र तिवारी, अंबादास माने तसेच शिक्षण अधिकारी सुजाता खरे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते या बैठकीत सकारात्मक निर्णय घेत या प्रकरणाची फाईल प्रमुख लेखापाल वित्त यांच्याकडे मंजुरी करता सादर करण्यात आली होती. त्यानंतर अनिल बोरनारे यांनी नवनियुक्त महापौर तसेच आयुक्त व उपायुक्त यांच्याकडे पाठपुरावा केला होता अखेर मुंबई महानगरपालिकेने परिपत्रक निर्गमित करून बाराशे शिक्षकांना न्याय मिळवून दिला असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.

डोंबिवलीतील सारंग गाव येथे जेपीएल स्पर्धा उत्साहात संपन्न..

विशेष प्रतिनिधी

डोंबिवली - डोंबिवलीतील सारंग गाव येथे आयोजित करण्यात आलेली 'जेपीएल २०२६- जवळेथर प्रीमियर लीग' ही क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडली. या स्पर्धेत गावातील १०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या स्पर्धेत कोणताही वाद किंवा गैरप्रकार न होता सामने शांततेत पार पडले.

या स्पर्धेला माजी परिवहन सभापती व माजी नगरसेवक संजय पावशे यांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. त्यांनी ५००० रुपयांची देणगी तसेच खेळाडूंना १००० रुपयांचे रोख बक्षीस देत मार्गदर्शन केले. ही स्पर्धा गावातील एकी, मैत्री आणि टीमवर्कचे उत्कृष्ट उदाहरण ठरली. 'टायगर ११' च्या सर्व सदस्यांनी मैदानाची तयारी, खेळाडूंची व्यवस्था, पाहुण्यांचे स्वागत आणि संपूर्ण नियोजन अत्यंत व्यवस्थित पार पाडले.

स्पर्धेत गांगो रवळनाथ क्रिकेट संघ (जवळेथर), टायगर ११ बॉईज, युवराज मोरे क्रीडा सामाजिक विकास फाउंडेशन, रचना फायटर, रविंद्र ११ धावडे वाडी (जवळेथर) आणि स्व. दिनेश मोरे स्मृती या संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेतील विजेते संघ म्हणून गांगो रवळनाथ क्रिकेट संघ (जवळेथर) आणि युवराज मोरे क्रीडा सामाजिक विकास फाउंडेशन यांनी बाजी मारली.

स्पर्धेतील सर्व सामने 'VMD Sports Live'  या यूट्यूब चॅनलवर थेट प्रक्षेपित करण्यात आले, त्यामुळे गावाबाहेरील क्रिकेटप्रेमींनाही स्पर्धेचा आनंद घेता आला. या उपक्रमासाठी गावातील ग्रामस्थ, मित्रपरिवार, देणगीदार आणि प्रायोजक यांनी उत्स्फूर्त सहकार्य केले. त्यांच्या पाठबळामुळेच स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडल्याचे आयोजकांनी सांगितले.

स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुनील सयाजी मोरे (नगरसेवक), प्रकाश भोईर (माजी नगरसेवक), संजय पावशे (माजी नगरसेवक), ज्योती पवन पाटील (नगरसेविका), सुजय विचारे (युवा मोर्चा अध्यक्ष, भाजप), योगेंद्र भोईर (शिवसेना उपजिल्हा अध्यक्ष) आणि कुंदन रामाणे (जाणता राजा मंडळ अध्यक्ष) उपस्थित होते.

स्पर्धेचे आयोजन अध्यक्ष विशाल धावडे, उपाध्यक्ष प्रतीक धावडे, सचिव महेंद्र धावडे, खजिनदार जितेंद्र धावडे आणि उपखजिनदार अक्षय धावडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. तसेच रोशन मोरे, शुभम केगडे, विशाल मोरे, विराज चव्हाण, दिनेश मोरे आणि टायगर ११ च्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.