BREAKING NEWS
latest

आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेत डोंबिवलीकर महिलांनी सुवर्ण पदकांची लयलूट करत डोंबिवलीच्या शिरपेचात खोवला मानाचा तुरा..


 प्रतिनिधी: अवधुत सावंत

  मलेशियातील क्वालालांपुर येथे झालेल्या आठव्या आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेत महाराष्ट्र योगा फेडरेशनचे महाव्यवस्थापक सुरेश गांधी यांच्या नेतृत्वाखाली मलेशियात गेलेल्या भारतीय संघात २२ खेळाडूंचा समावेश होता. या स्पर्धेत भारतीय संघाने एकूण १३ सुवर्ण, चार रजत व तीन कांस्य पदके मिळवली. योगा स्पोर्ट्स, रिदमीक योगा, आर्टिस्टिक योगा अशा तीन प्रकारे पार पडलेल्या या स्पर्धेत या तिन्ही प्रकारात नोव्हायसिस, सब ज्युनिअर, ज्युनिअर, युथ, वरिष्ठ व प्रौढ गट या मध्ये संपन्न झाली. भारतासह मलेशिया, सिंगापूर, कंबोडिया, व्हिएतनाम तसेच श्रीलंका या देशांमधून एकूण ६२ खेळाडूंचा सहभाग होता.




  दिनांक २६, २७, २८ नोव्हेंबर रोजी मलेशिया येथे झालेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ५० ते ६५ या वयोगटात भारताचे नेतृत्व करणाऱ्या डोंबिवलीतील सौ. राधिका श्रीकृष्ण केतकर (वय: ६१ वर्षे) यांनी सुवर्ण पदक पटकावून प्रथम स्थान मिळविले आहे तर ४० ते ५० वयोगटात मीना घनवट (वय: ४६ वर्षे) यांनीही मलेशियात झालेल्या सात देशांतर्गत 'जागतिक योगा स्पोर्ट्स फेडरेशन' तर्फे आयोजित ८ व्या आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून डोंबिवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. 

  ह्या प्रवासादरम्यान आलेल्या आर्थिक तसेच अनेक अडचणींवर मात करत या दोघींनीही हे यश संपादन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर डोंबिवलीकरांकडून तसेच सर्वच  स्तरातून अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे. डोंबिवली येथील योगविद्याधम येथे या दोघींनी योग प्रशिक्षण पूर्ण केले आहे. योगगुरू रामदेव बाबा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून हे यश प्राप्त केल्याचे राधिका केतकर यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले. 

 'योगा कल्चर असोसिएशन' तर्फे जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय पायऱ्या पार करत आंतरराष्ट्रीय स्तर ह्या दोन्ही महिला पार करून भारतासाठी सुवर्णपदक मिळवले आहे. भारतातून एकूण १९ स्पर्धक व आंतरराष्ट्रीय स्तरावर ६२ स्पर्धकांमधून राधिका केतकर व मीना घनवट यांनी सुवर्णपदक प्राप्त केल्याबद्दल डोंबिवली भाजप पूर्वमंडलाचे उपाध्यक्ष पंढरीनाथ म्हात्रे यांनी त्यांच्या घरी भेट देऊन त्यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला.


« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत