प्रतिनिधी: अवधुत सावंत
महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यान सीमाप्रकरणी पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली असून कर्नाटकमधील काही संघटना या विषयाला हिंसक वळण देण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. हे प्रकरण न्यायालयात असताना याआधी महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक, महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेल्या वाहनांवर चढत निदर्शने करणे इत्यादी प्रकार सुरु आहेत. हा प्रकार एवढ्यावरच न थांबता कन्नड वेदिका रक्षण संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा पुतळा देखील दहन केल्याने आता सर्व सीमा उल्लंघन करण्याचे कार्य कर्नाटक कडून झाले आहे, नेमक्या या वादावर तोडगा निघावा म्हणून महाविकास आघाडीचे नेते पुढाकार घेताना दिसून येत आहे. सीमावाद प्रकरणी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे, खासदार सुप्रिया सुळे, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत, राजन विचारे तसेच अरविंद सावंत यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्ली येथे भेट घेतली.
यावेळी केंद्रीय मंत्री अमित शाह आणि महाविकास आघाडी नेत्यांमध्ये बैठकीच्या वेळी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांचे महाराष्ट्रविरोधात प्रक्षोभक वक्तव्य, राज्यात सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून करण्यात येणारी वादग्रस्त विधाने, शिवाजी महाराजांबद्दल महाराष्ट्रात केली जात असलेली उलटसुलट विधाने इत्यादी विषय केंद्रीय गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी प्रसिद्धीमाध्यमांना दिली. खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना विश्वास व्यक्त केला की, केंद्रीय गृहमंत्र्यांनी या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी आश्वस्त केले आहे, त्यामुळे नक्की काहीतरी मार्ग ते काढतील.
सध्या गुजरातमध्ये नव्याने भाजपने विजय प्राप्त केला असल्याने या राज्यातील शपथविधी आटोपल्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रकरण सोडविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. केंद्र सरकार याप्रकरणी जातीने लक्ष देत प्रकरण सोडवणार व कुठल्याही प्रकारचा पक्षपात केला जाणार नाही, असा आम्हाला विश्वास असल्याचे मत यावेळी सुप्रिया सुळे यांनी मांडले. एकंदरीतच महाराष्ट्रातील विरोधी पक्ष सीमावाद प्रकरणी सक्रिय झाल्याने, राज्य सरकारची याप्रकरणी भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे कारण वेळीच हे प्रकरण नियंत्रणात आणले गेले नाही तर चिघळले जाण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही असंही त्या बोलल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा