BREAKING NEWS
latest

अपहरण झालेल्या पाच वर्षांच्या मुलाला कुर्ला रेल्वे पोलीसांनी बारा तासांत शोधून काढले..


 प्रतिनिधी: अवधुत सावंत

  टिटवाळा येथे राहणाऱ्या फिर्यादी शबनम मोहन तायडे (वय: २५ वर्षे) या दिनांक. ०३.१२.२०२२ रोजी कुर्ला पश्चिम परिसरात कॅटरिंग च्या कामासाठी गेल्या असता घरी परत जाण्यासाठी रात्री उशिरा कुर्ला रेल्वे स्टेशन येथे आल्यावर शेवटची गाडी जाऊन लोकल वाहतूक बंद झाल्यामुळे त्या त्यांच्या ५ वर्षाच्या मुलासह कुर्ला रेल्वे स्टेशन फलाट क्र.१ वरील बुकिंग हॉलमध्ये झोपल्या असताना दि.०४.१२.२२ रोजी पहाटे ४ वाजता जाग येताच पाहिले की ५ वर्षांचा सोबत झोपलेला मुलगा गायब !  त्यांनी कुर्ला स्टेशन व राहत्या टिटवाळा परिसरात सर्वत्र शोध घेऊनही मुलगा काही सापडला नाही म्हणून त्यांनी कुर्ला रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी सांगितलेल्या हकीकतीवरून कुर्ला रेल्वे पोलीस यांनी त्यांची रीतसर फिर्यादीची नोंद घेऊन गु.रजि.नं. १३६१/२०२२, कलम ३६३ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

  सदर गंभीर गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम व पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या अधिपत्याखाली केलेल्या मार्गदर्शनानूसार तात्काळ दोन तपास पथकं तयार करण्यात आले व कुर्ला स्टेशन व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे यातील अपहृत बालकांस एक महिला घेऊन जात असल्याचे दिसून आल्याने तिची गुप्त माहितीदाराच्या माध्यमातून माहिती घेऊन तिचे मोबाईल फोन लोकेशन घेऊन प्रथम कुर्ला, विद्याविहार, जरीमरी व त्यानंतर गोरेगांव अशा विभागात शोध घेत असताना, गोरेगांव पूर्व येथील बुरगनपाडा झोपडपट्टी येथे तपास करीत असताना एका झोपडपट्टी मधून आरोपी महिला नामे रेहाना कासीम शेख (वय: २४ वर्षे) राहणार गोरेगांव पूर्व, मुंबई हिस गुन्ह्यातील अपहृत बालकासह ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी केली असता त्या आरोपी महिलेनेच गुन्ह्यातील बालकाचे अपहरण करून पोलीसांना माहिती मिळू नये म्हणून वेळोवेळी तिने तिचे राहण्याचे ठिकाण बदलत असल्याचे निष्पन्न झाले तसेच ते अपहृत बाळ फिर्यादी यांना बोलावून खात्री केले असता ते तिचेच असल्याचे सिद्ध झाल्यामुळे आरोपी महिलेस दि.०५.१२.२०२२ रोजी १६.२० वाजता अटक करण्यात आली असून आज दि.०६.१२.२०२२ रोजी मा.महानगर दंडाधिकारी ३५ वे न्यायालय, सीएसटी येथे हजर करण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष राठोड करीत आहेत.

  सदर गुन्ह्याच्या तपासाची कामगिरी मा.कैसर खालिद, पोलीस आयुक्त , लोहमार्ग मुंबई तसेच श्री. मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त, मध्य परिमंडळ, लोह.मुंबई, श्री.देविदास सोनावणे, सहा.पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाल्मिक शार्दूल, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, संदीप बागुल, सपोनि सुभाष राठोड, सपोनि साळुंखे, पोहवा प्रदीप शिंदे, शिर्सेकर, निकम, गोडे, गिरासे, झोम्बाडे, बागवान, पवार, महिला पोहवा पंडित, गुरव, आढाव, पोना पाटील, लवटे, पंदेरे, महिला पोना अभंग, पोशि कागणे, मपोशि पाटील यांनी सलग १२ तास कर्तव्यावर हजर राहून कारवाई पार पाडली आहे.



« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत