BREAKING NEWS
latest

उद्धव ठाकरे यांच्याकडे सुषमा अंधारे यांची पक्षातून हकालपट्टी करायची मागणी..


 प्रतिनिधी: अवधुत सावंत

  सुषमा अंधारे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली जात आहे. मराठा युवा सेनेनंतर आता विश्व वारकरी सेनेने ही मागणी केली आहे. सुषमा अंधारे ज्या पक्षात राहतील त्या पक्षाला मतदान न करण्याची शपथ 'विश्व वारकरी सेने'ने गंगासागर येथे घेतली आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे या हिंदू धर्मियांच्या देव देवतांबद्दल बोलतानाचा व्हिडीओ समाज माध्यमात सर्वत्र व्हायरल होत असताना आता वारकरी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत.

  'विश्व वारकरी सेने'चे संस्थापक अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी पश्चिम बंगालच्या गंगा सागर येथील समुद्र किनारी उद्धव ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांची त्वरित पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. राज्यातील वारकऱ्यांना शपथ देऊन सुषमा अंधारे ज्या पक्षात जातील त्या पक्षाला मतदान न करण्याची शपथ दिली आहे. आगामी काळात राज्यातील वारकरी देखील अशी शपथ घेतील असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आगामी काळात सुषमा अंधारे व वारकरी संघटना यांच्यात नवीन संघर्ष बघायला मिळू शकतो.

  सुषमा अंधारे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी याआधी मराठा युवा सेनेने देखील केली आहे. अंधारे यांचं हिंदुत्व खोटं आहे. त्यांची हक्कालपट्टी न केल्यास शिवसेना भवनासमोर महाआरती करणार असल्याचा इशारा 'मराठा युवा सेने'ने दिला आहे.


« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत