BREAKING NEWS
latest

माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या साहित्य नगरीत दिग्गज साहित्यिकांच्या उपस्थितीत डोंबिवलीत दहा दिवस रंगणार दोन लाख पुस्तकांचा आदान प्रदानचा भरगच्च शानदार सोहळा कार्यक्रम..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

  डोंबिवली शहराच्या सांस्कृतिक वाटचालीत मानाचा तुरा ठरलेले 'पै फ्रेंड्स लायब्ररी'च्या संकल्पनेतून राबवल्या जाणाऱ्या पुस्तक आदान प्रदान सोहळ्याचे यंदा पाचवे वर्ष असून यंदा दोन लाख पुस्तकांचे आदान प्रदान करून जगभरात या शहरातील सोहळ्याचा विक्रम गाजवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. २० ते २९ जानेवारी या कालावधीत हा सोहळा आपल्या डोंबिवलीतील ह.भ.प सावळाराम महाराज क्रीडा संकुलातील बंदिस्त क्रीडांगणात संपन्न होणार आहे.

  या सोहळ्याच्या शुभारंभाला प्रख्यात साहित्यिक अच्युत गोडबोले, उमाताई कुलकर्णी, प्रख्यात राजकीय विश्लेषक डॉ. उदय निरगुडकर, डोंबिवलीचे लाडके सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण, कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे, मनसे आमदार राजू पाटील, महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते २० जानेवारी रोजी संध्याकाळी ५.३० वाजता उद्घाटन करण्यात येणार आहे.

  त्या सर्व परिसराला यंदा एपीजे अब्दुल कलाम नगरी असे नाव देण्यात येणार असून पुस्तकांनी त्यांची प्रतिकृती साकारण्यात येणार असून ते एक प्रमुख आकर्षण असणार आहे. त्यासोबतच पुस्तकाचे इग्लु, पिरॅमिड आणि अन्य प्रतिकृती साकारण्यात येणार आहे.

  दहा दिवसांत माजी केंद्रीय लोकसभा स्पीकर सुमित्राताई महाजन, महेश कोठारे, प्रणव सखदेव, अरुणा ढेरे, प्रल्हाद दादा पै, वसंत लिमये, चंद्रशेखर टिळक, रोहन चंपानेरकर, श्रीकांत बोजेवार, अतुल कुलकर्णी, अशोक कोठावळे, सुदेश हिंगलासपुरकर, दिनकर गांगल, कुमार केतकर, अरुण शेवते, अक्षय बर्दापूरकर, कमलेश सुतार, प्रसाद मिराजदार , प्रभू कापसे, वैद्य परीक्षित शेवडे यांच्यासह अनेक लेखक, साहित्यिक, प्रकाशक व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
  या सर्व उपक्रमात कल्याण-डोंबिवली महापालिका देखील यंदा सहभागी झाली असून ती एक जमेची बाजू आहे, 'वाचाल तर वाचाल' ही वाचन संस्कृती वाढीस लागावी या उद्देशाने आयुक्त चितळे यांनी या उपक्रमात महापालिका सढळ हस्ते सहकार्य करणार असल्याचे सांगून त्यांनी तातडीने वास्तू देऊन सहकार्याचा हात पुढे केला.
  सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण हे तर 'पै फ्रेंड्स लायब्ररी'च्या प्रत्येक उपक्रमात सहभागी होत असतात. साहित्य टिकणे वाढीस लागणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे अशा नात्याने ते नेहमीच मदत करतात, या सोहळ्याला देखील त्यांनी भरीव अर्थ सहाय्य केले असून कल्याण डोंबिवली महापालिका आणि 'डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार' हे या उपक्रमाचे सहआयोजक असल्याचे मुख्य आयोजक पुंडलिक पै यांनी सांगितले.

  राष्ट्रपती महामहीम द्रौपदीजी मुर्मू मॅडम, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जेष्ठ लेखिका सुधा मूर्ती यांच्यासह अनेक मान्यवरांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत.

  शहरातील सुमारे ४० साहित्यिक मंडळी या उपक्रमात सहभागी असून त्यांचे सर्व साहित्य यावेळी प्रदर्शनाच्या निमित्ताने बघायला मिळणार आहे.

कॉफी टेबल बुक

  यानिमित्त फ्रेंड्स लायब्ररी एक कॉफी टेबल पुस्तकाचे अनावरण करणार असून त्यात जवळपास ७५ मान्यवरांचे लेख आहेत, 'आझादी के ७५ साल' या थीमवर आधारित ते पुस्तक प्रसिद्ध होणार असून त्याचे अनावरण शुभारंभाच्या दिवशी होणार आहे.

  या सर्व उपक्रमात प्रख्यात 'एम्स हॉस्पिटल'ने हॉस्पिटल पार्टनर ही महत्त्वाची जबाबदारी उचलली आहे. डॉ.मिलींद शिरोडकर यांनी त्याबाबत पुढे येऊन या सोहळ्यात मोलाचे योगदान दिले आहे. 

  यानिमित्ताने शहरातील ३०हून अधिक शाळा त्यांच्या माध्यमातून १५ ते १९ जानेवारी दरम्यान ग्रंथ दिंडी काढणार आहेत. त्यात सुमारे १५ हजार विद्यार्थी सहभागी होतील. तसेच 'पै फ्रेंड्स लायब्ररी' आणि आयोजकांच्या माध्यमातून १९ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता इंदिरा गांधी चौकातून मानपाडा चार रस्ता टिळक चौक सर्वेश हॉल फडके पथ गणेश मंदिर या मार्गावर ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे.

  पत्रकार परिषदेला मंत्री चव्हाण, महापालिका सिटी इंजिनियर रोहिणी लोकरे, वृंदा भुस्कुटे, दीपाली काळे, दर्शना सामंत, धनश्री साने, ललिता छेडा, प्रवीण दुधे, प्रभू कापसे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत