BREAKING NEWS
latest

युवकांकडून विचार हाेणार का ? राज ठाकरेंचा परखड सवाल..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

 राज्यात सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणं साजरी हाेत आहे. सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. मिरवणुकींची जाेरदार तयारी सुरू आहे. असे असताना काल ठाण्यामध्ये राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा वर्धापन दिन झाला. राज ठाकरे यांनी यानिमित्ताने पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राज ठाकरे काय बाेलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले हाेते. यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत कार्यकर्त्यांना आणि राज्यातील युवकांनी जयंती कशी साजरी करावी याबाबत खडेबोल सुनावले. 

राज ठाकरे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरूषांचे केवळ पुतळे उभारून काहीही हाेणार नाही. त्यांचे आचार-विचार आत्मसात केले पाहिजेत. त्यांच्या विचारांचे आत्मचिंतन करण्याची वेळ आता आपल्यावर आली आहे. या महापुरूषांचे विचारांचे आचरण केले नाही, तर महाराष्ट्रासाठी येणारा काळ हा अत्यंत अवघड हाेईल”. 

राज ठाकरे यांनी पुतळ्यांवरून राजकारण करणाऱ्यांना यावेळी फटकारले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील स्मारकाची यावेळी त्यांनी आठवण करून दिली. इंदू मिलमध्ये माेठी वास्तू उभी राहिली पाहिजे. इतकं माेठं  ग्रंथालय तिथं उभे राहिले पाहिजे की, अख्ख्या जगाने त्या ठिकाणी ज्ञान मिळविण्यासाठी आले पाहिजे. नुसते पुतळे उभारून काहीएक हाेणार नाही. नाक्यानाक्यावर, चाैकात शिवाजी महाराज किंवा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळे उभारून काय साध्य हाेणार आहे? महापुरूषांचे पुतळे उभारून आपल्या हाती काहीही लागणार नाही. या महापुरूषांचे आचार-विचार आता कृतीत उतरवून आणण्याची गरज आहे. महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी येणाऱ्या या पिढीला हे करावेच लागेल, असं झाले नाही तर महाराष्ट्राच्या भविष्याची वाटचाल अवघड हाेईल, असेही ठाकरे म्हणाले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत