राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष संजय झिंजे सध्या पक्षात नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. झिंजे गेली अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीत असून माजी आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप यांच्या अगदी जवळचे मानले जातात. मात्र गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळेंशी त्यांची जवळीक वाढलेली पाहायला मिळत आहे. त्यातच काळे यांच्या पुढाकारातून माजी महसूल मंत्री, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरातांनी झिंजेंच्या निवासस्थानी भेट दिल्यामुळे ते काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चेला शहरात उधाण आले आहे.
झिंजे हे माजी नगरसेवक आहेत. अहमदनगर शहर हॉकर्स संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष असून सुमारे अडीच हजारहून अधिक हॉकर्स या संघटनेचे सभासद आहे. राष्ट्रवादीचे ते ज्येष्ठ नेते आहेत. माजी मंत्री आमदार थोरात नुकतेच शहर दौऱ्यावर आले असता अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयातील शहरातील कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर झिंजे यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली. यावेळी गप्पांचा फड रंगला होता. शहरातील अनेक महत्त्वाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
विशेष म्हणजे यावेळी झिंजे यांच्यावर मध्यंतरी झालेल्या भ्याड हल्ल्याची विचारपूस थोरात यांनी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी तीव्र भावना घडलेल्या प्रकाराबद्दल थोरातांच्या समोर व्यक्त करत घडलेला प्रकार हा निंदनीय असल्याची खंत व्यक्त केली होती. त्या प्रकरणापासून झिंजे हे राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये शहरात एकदाही दिसले नाहीत.
काळे यांच्या पुढाकारातून आमदार थोरात व झिंजे यांच्यामध्ये राजकीय चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. संजय झिंजे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर राष्ट्रवादीने तसेच आमदारांच्या वतीने अनेकांनी अनेक वेळा त्यांच्याशी संपर्क साधल्याचे बोलले जात आहे. मात्र त्यांनी त्याला अजिबात प्रतिसाद दिला नसून ते लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी सर्वत्र शक्यता वर्तवली जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा