BREAKING NEWS
latest

सुशिक्षित-सुसंस्कृत डोंबिवलीकर काल्पनिक सण साजरे करताना शहिदांचे वास्तव बलिदान नाकारत आहेत - कॉम्रेड काळू कोमासकर

 

प्रतिनिधी: अवधुत सावंत

  जात, धर्म, पंथ, सण हे सर्व काल्पनिक असून राजकारणी व राज्यकर्त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी लोकांची दिशाभूल करून देशासाठी ज्या शहिदांनी बलिदान केले आहे, त्या शहिदांचे वास्तव डोंबिवलीकर नाकारत आहेत. अशी टीका लालबावटा रिक्षा युनियन चे अध्यक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे  कौन्सिल सदस्य कॉम्रेड काळू कोमास्कर  यांनी डोंबिवलीकरांवर केली आहे.

२३ मार्च या शाहिद दिनानिमित्त शहीद भगतसिंग, शहिद राजगुरू, शहीद सुखदेव यांना डोंबिवली येथील बाजीप्रभू चौकात आदरांजली वाहण्यासाठी इंदिरा चौक, टिळक चौक मार्गे बाजीप्रभू चौक अशी रॅली काढून एका कार्यक्रमाचे आयोजन कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि लाल बावटा रीक्षा  युनियन यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी काळू कोमास्कर बोलत होते. या शहीद दिनाच्या कार्यक्रमात डोंबिवलीतील पंधरा संघटनांनी सहभाग दिला होता.

दिनांक २३ मार्च शहिद दिनानिमित्त डोंबिवली शहरात विविध संघटनांनी मिळून रॅली व सभेचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरुवात बाजीप्रभू चौकात उभारलेल्या शहिद  स्मारकापासून करण्यात आली, "इन्कलाब झिंदाबाद, भगतसिंग के देश में हिंदू-मुस्लिम जातीवाद नही चलेगा" अश्या घोषणांनी  रॅली दरम्यान डोंबिवलीचे रस्ते दणाणत होते. रॅलीचे रूपांतर बाजीप्रभू चौकात सभेमध्ये झाले.  क्रांतिकारी गीताने सभेची सुरुवात करण्यात आली. सभेमध्ये काँम्रेड काळू कोमास्कर, जनता दल सेक्युलरचे राज्य सचिव रवी भिलाने, बहुजन मुक्ती पार्टीचे  गौतम वाघचौरे, संयुक्त जयंती उत्सव मंडळाचे दीपक अहिरे, विद्यार्थी संघटनेचे अष्टपाल कांबळे, हॉकर्स फेडरेशनचे बबन कांबळे, अनिसचे कॉ.संजय पटेल, परेश काटे, राष्ट्र सेवा दलाचे जीवराज सावंत, कॉम्रेड शहिद भगतसिंग मित्रमंडळाचे कॉ.महेश आवारे, स्वाभिमानी शिक्षण संघटनेचे संजय गायकवाड, अन्याय अत्याचार निर्मूलन समितिचे केणी हे उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमात काळू कोमासकर म्हणाले की, देशात गुढीपाडव्यासारख्या स्वागत यात्रेला महत्त्व दिले जाते. हे सण, जात, पंथ, धर्म हे काल्पनिक आहेत. परंतु ज्या शहिदांनी देशासाठी बलिदान दिले. त्यांचा विसर सुशिक्षित आणि सुसंस्कृत म्हणविणाऱ्या डोंबिवलीकरांना पडला आहे ही अत्यंत खेदाची बाब आहे. रॅली दरम्यान अनेकांनी विचारले ही कशासाठी रॅली आहे. त्याचप्रमाणे काळू-कोमासकर यांनी महागाई मध्ये होरपळत चाललेल्या गरीब सामान्य माणसाची व्यथा मांडताना,  भाजपला लक्ष्य केले. तर रवी भिलाने यांनी डोंबिवलीत आल्यानंतर मला काम करण्यासाठी वेगळी ऊर्जा मिळते असे सांगितले. शाहीर पंकज कांबळे यांनी आपल्या शाहिरीने सभेचे वातावरण उत्साही केले. कार्यक्रमाची सांगता घोषणा आणि क्रांतिकारी गीताने करण्यात आला.


« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत