नववधू साठी आईच्या ममतेने काळजाला हात घालणारी आणि म्हटली जाणारी सुरेल भावनिक मंगलाष्टकं, त्याचं ड्रोन आणि क्रेन द्वारे होणारे चित्रिकरण, शेवटचं मंगलाष्टक संपताच नवं वधू वरांंवरील अक्षतांचा वर्षावं, हजारो पाहुणे आणि वऱ्हाडी मंडळींनी केलेला टाळ्यांचा कडकडाट, त्याला मिळालेली बॅंडची सुरेल साथ यामुळे भारावलेल्या मंगलमय वातावरणात डोळ्यांचे पारणे फेडणारा आगरी वधू-वर सामुदायिक विवाह सोहळा दिमाखदारपणे सायंकाळच्या गोरज मुहूर्तावर श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर प्रांगणात सोमवारी पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला.
आगरी समाज प्रबोधन संस्थेच्या वतीने या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते ११ वधू-वरांचा हा विवाह सोहळा श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर प्रांगणात सोमवार दि. २२ मे २०२३ रोजी सायंकाळी पार पडला. या सोहळ्याला ४ ते ५ हजार समाज बांधव वधूरांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते.
सध्या आगरी समाजाच्या लग्न सोहळ्यात अवाढव्य खर्चिक व फिल्मी पद्धतीच्या रूढी परंपरा सुरू झाल्यामुळे आगरी मुला-मुलींची लग्न करणे अत्यंत महागडे व कर्जबाजारीपणाचे झाले आहे. परिणामी बहुसंख्य समाज कर्जबाजारी होवून उध्वस्त होत आहे. म्हणून, साखर पुडे, हळदी समारंभात होणारा खर्च कमी व्हावा व ४/५ दिवस चालणारे लग्न समारंभात काही परिवर्तन व्हावे व यातून समाज बांधवांना दिलासा मिळावा, या हेतूने आगरी समाज प्रबोधन संस्थेने ही सामुदायिक विवाह सोहळ्याची संकल्पना राबविण्याची सुरुवात केली आहे. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे, लग्नाच्या सर्व विधी रूढी परंपरेतील तज्ञ आगरी समाज बांधव यांच्या हस्ते केले, सर्व प्रमुख पाहुणे आगरी समाजाचेच होते. तसेच आगरी गीतं सादर करणारे आगरी वाद्यवृंद व आगरी बँण्डबाजे या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण होते. सदर सोहळा संपूर्ण आगरी परंपरा व संस्कृती नुसार संपन्न झाला. या सोहळ्याला समाज बांधवांकडून उत्सफुर्तपणे व प्रचंड प्रमाणात आर्थिक व सर्व प्रकारची मदत मिळाली. आणि या विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या
नव दाम्पत्यांना आशीर्वाद देण्यासाठी मनसे आमदार राजू पाटील आले होते. त्यांनी प्रत्येक वधू वरास एक लाख रुपये भेट म्हणून दिले. तसेच, माजी राज्यमंत्री जगन्नाथ पाटील, जेष्ठ नेते आर सी पाटील, माजी आमदार सुभाष भोईर, माजी आमदार प्रकाश भोईर, पालिकेचे माजी स्थायी समिती सभापती रमेश सुकऱ्या म्हात्रे, ठाण्याचे उपमहापौर रमाकांत मढवी, हभप बाळकृष्ण महाराज, माजी नगरसेवक महेश पाटील, माजी नगरसेविका डॉ. सुनिता पाटील, गुलाब वझे, संतोष केणे, प्रकाश म्हात्रे, हभप प्रकाश महाराज म्हात्रे, गणेश म्हात्रे, संजय गायकवाड (उद्योजक), भिवंडी आगरी महोत्सवचे अध्यक्ष ईशूभाऊ म्हात्रे, अमर म्हात्रे, नलिनी पाटील, कोमल चौधरी, हेंदर मामा पाटील, दत्ता मळेकर, लक्ष्मण पाटील, अग्रसेन मासिक चे नरेंद्र म्हात्रे तसेच कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, ठाणे, पनवेल, मुंबई तालुक्यातील समाजातील पदाधिकारी शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नव दाम्पत्यांना सुख-समृद्धीचा आशीर्वाद देताना आमदार राजू पाटील म्हणाले की, या सोहळ्यामुळे मी भारावून गेलो आहे पुढच्या वर्षी हा सोहळा प्रीमियरच्या ग्राउंडवर आयोजित करण्याचा त्यांचा मानस आहे. २५ वधु-वर या सोहळ्यात सहभागी होतील असा मानस आमदार पाटील यांनी व्यक्त केला. तर रमेश म्हात्रे म्हणाले की, आमच्या समाजासाठी आम्ही काहीतरी देणं लागतो. त्यामुळे दरवर्षी हा सोहळा नेत्रदीपक व्हावा, यासाठी समाजाने संस्थेला सहाय्य केले पाहिजे.
गेली सहा महिने आगरी समाज प्रबोधन संस्थेच्या वतीने या विवाह सोहळ्यासाठी तयारी करण्यात येत होती. या विवाह सोहळ्यासाठी काटेकोर पद्धतीने नीटनेटके व्यवस्थापन केल्यामुळे सगळ्या उपस्थित्यांनी संस्थेचे कौतुक केले आहे. यासाठी संस्थेचे अध्यक्ष गंगाराम शेलार, सचिव काँम्रेड काळू कोमास्कर, खजिनदार हनुमान पाटील, पदमाकर पाटील, राम म्हात्रे, दयानंद म्हात्रे, मुरारी जोशी, गजानन पाटील, मारूती गायकर, भरत जोशी, ऍड. तृप्ती पाटील, अंजली भोईर, दिपक ठाकूर, जगदीश ठाकूर, हभप हनुमान महाराज, रमेश टावरे, जीवन मढवी, महेश संते, काँम्रेड जे.एन पाटील, करसन पाटील, डाँ.शोभा पाटील, सुनील पाटील, संजय पाटील, भिवंडी तालुक्यातील कार्यकर्ते रमेश कराळे,जयदीप सर बजागे, मनोहर हजारे, अंबरनाथ बदलापूरचे कार्यकर्ते काँम्रेड जी आर. पाटील, पनवेल शिवकर गावचे सरपंच अनिल ढवले या कार्यकर्त्यांनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा