BREAKING NEWS
latest

राज्यातील सत्ता संघर्षाचा उद्या सर्वोच्च निकाल !

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
शिवसेनेत पडलेल्या फूटीमुळे गेल्या १० महिन्यांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर उद्या पडदा पडणार आहे. सुप्रीम कोर्टानं राखून ठेवलेला महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या (११ मे) रोजी जाहीर होणार आहे. सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांनी ही माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाकडून निर्णय जाहीर केला जाणार आहे. यामुळं आता राज्यात पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सर्वोच्च न्यायलयात उद्याच्या कामकाजाच्या यादीत महाराष्ट्राशी संबंधित दोन महत्त्वाच्या प्रकरणांचा निकालाबाबत उल्लेख असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उद्या कुणाच्या पारड्यात निकाल जातो हे उद्या सकाळी अकरानंतर समजू शकणार आहे. याप्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालयाचा सकाळी अकरानंतर निकाल अपेक्षित आहे. या निकालासाठी महाराष्ट्राची जनता आणि सर्वच राजकीय पक्षांसह देशाचे लक्ष निकालाकडे लागले आहे. उद्या या प्रकरणी फैसला झाल्यानंतर महाराष्ट्रातील शिंदे सरकारचे राजकीय अस्तित्व स्पष्ट होणार आहे.

या १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

एकनाथ शिंदे, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, संजय शिरसाट, यामिनी जाधव, चिमणराव पाटील, भरत गोगावले, लता सोनावणे, रमेश बोरणारे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, महेश शिंदे, अनिल बाबर, संजय रायमुलकर, बालाजी कल्याणकर​.

शिवसेनेच्या १६ अपात्र आमदारांबाबत एकूणच सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्ट उद्या निकाल देणार आहे. यावर भाष्य करताना विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सूचक भाष्य केलं आहे. सरकार स्थिर व्हायला पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळं जर सरकार कोसळलं तर मग काय ? यावरुन आता चर्चांना सुरुवात झाली आहे.

राज्यातील सरकार स्थिर आहे. एकनाथ शिंदे राजीनामा देणार नाहीत. २०२४ च्या निवडणुका त्यांच्या नेतृत्वात लढल्या जातील, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं आहे.

उद्या निकाल लागणार आहे तर आता २४ तास थांबायला पाहिजे.  सुप्रीम कोर्ट आता निर्णय लवकर देणार आहे. एवढे महिने आपण थांबलेलो आहे. तर आणखी २४ तास थांबूयात. माझा न्यायदेवतेवर पुर्णपणे विश्वास आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत