BREAKING NEWS
latest

देवेंद्र फडणवीसांनी कल्याण-डोंबिवलीची जागा कोण लढवणार याबाबत केलेल्या वक्तव्याने खासदार श्रीकांत शिंदेंना मोठा दिलासा..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

कल्याण लोकसभेची जागा शिंदे गट लढवणार असल्याची फडणवीसांची स्पष्टोक्तीने युती सरकारमध्ये एकनाथ शिंदे हेच बॉसच्या भूमिकेत असल्याचे मी स्वीकारले आहे असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी ते माझे वरिष्ठ असल्याचे आपल्या वागण्यातून कधीही जाणवू देत नाहीत असे म्हणत गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यातील वादाचे कारण ठरत असलेल्या कल्याण-डोंबिवली लोकसभेच्या जागेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. लोकसभेची कल्याण-डोंबिवलीची जागा शिवसेनाच (शिंदे गट) लढवेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करुन टाकले. तसेच आगामी निवडणुकांमध्ये शिंदे गटाचे उमेदवार 'धनुष्यबाण' या चिन्हावरच लढतील, भाजपच्या चिन्हावर लढणार नाहीत, असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. त्यांच्या या स्पष्टोक्तीमुळे शिंदे गट आणि भाजपमध्ये सुरु असलेल्या धुसफूस कमी होण्याची शक्यता सध्या आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत राजकीय मुद्द्यांवर सविस्तरपणे भाष्य केले. यावेळी त्यांनी कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघाची जागा ही शिंदे गटाकडे राहील, असे स्पष्टपणे सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे सध्या या लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कल्याण आणि डोंबिवलतील भाजप पदाधिकाऱ्यांनी आक्रमकपणे या जागेवर दावा सांगायला सुरुवात केली होती. यावरुन शिंदे गट आणि भाजपमध्ये स्थानिक पातळीवर टोकाचा संघर्ष निर्माण झाला होता. हा वाद इतक्या टोकाला गेला होता की, कल्याण, डोंबिवलीतील भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांना सहकार्य करायचे नाही, असा ठराव मंजूर केला होता. देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू असलेल्या रवींद्र चव्हाण यांनीही या गोष्टीला मूकपणे का होईना पण अनुमोदन दिले होते. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघाबाबत ठामपणे भूमिका घेतात का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी या लोकसभा मतदारसंघावरचा शिंदे गटाचा दावा मान्य करत ही जागा तेच लढवतील, असे सांगितले आहे. त्यामुळे आता भाजप आणि शिंदे गटातील स्थानिक पातळीवरील धुसफूस संपण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याशिवाय, विद्यमान सरकारमध्ये एकनाथ शिंदे हेच बॉसच्या भूमिकेत असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. मी मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षे सरकार चालवले असले, तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी वरिष्ठ (बॉस) म्हणून स्वीकारले आहे. मात्र, ते माझे वरिष्ठ असल्याचे आपल्या वागण्यातून कधीही जाणवू देत नाहीत. आमच्यात योग्य समन्वय आहे. मी राजशिष्टाचाराचे कायम पालन करतो, असे फडणवीस यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांना जनतेने स्वीकारण्यास सुरुवात केली असून, ते राज्यभरात फिरत आहेत. ‘शासन आपल्या दारी’सह वेगवेगळय़ा योजना, उपक्रम आणि जनहिताचे निर्णय या माध्यमातून ते जनतेपर्यंत पोहोचत आहेत. एकनाथ शिंदे यांनी जनतेच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत