BREAKING NEWS
latest

राज ठाकरे यांच्या मुख्यमंत्री भेटीनंतर चर्चांना उधाण..

प्रतिनिधी: अवधूत सावंत
   
नाशिक जिल्हा बँकेकडून कर्जधारक शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीसाठी तगादा लावण्यात येत आहे यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असे सांगण्यात आले असले तरी नेमकी काय चर्चा झाली याबद्दल राज्यात विविध तर्क वितर्क लढविण्यात येत आहेत.

आजच्या बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या मागे कर्ज वसुलीसाठी तगादा न लावण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे दिले असल्याचे अधिकृतरित्या सांगण्यात येत आहे.

सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास राज ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. राज्यात गेले काही दिवस सुरू असलेल्या राजकीय उलथापालथी वर राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली होती, दुसरीकडे उध्दव आणि राज यांनी एकत्र यावे अशीही चर्चा सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर काल मनसे चे अभिजित पानसे आणि खासदार संजय राऊत यांच्या भेटीनंतर अनेक चर्चा रंगल्या आहेत. म्हणूनच राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या या भेटीकडे वेगळ्या अर्थाने पाहिले जात आहे.

राज्यात अद्याप चांगल्या पावसाला सुरूवात झालेली नाही. पेरण्यांचे प्रमाणही कमी आहे, अशा परिस्थितीत नाशिक जिल्हा सहकारी बँक जिल्ह्यातील अल्प कर्जदार शेतकऱ्यांच्या मागे वसुलीसाठी तगादा लावत असल्याचे ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. तर मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून शेतकऱ्यांच्या मागे वसुलीसाठी तगादा लावू नका असे सांगितले. दरम्यान, याआधी यासंदर्भात ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने २० एप्रिल २०२३ रोजी मुख्यमंत्री शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली होती. या बैठकीत नाशिक जिल्हा बँक सक्तीने वसुली करत असल्याचा मुद्दा चर्चीला गेला होता.

आज झालेल्या भेटीत ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांसोबतच वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास आदी विषयांवर चर्चा करण्यात आली असेही सांगण्यात आले आहे तरी यात नेमकी राजकीय चर्चा काय झाली आणि त्याचे फलित काय ते अद्याप गुलदस्त्यात आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत