महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची अश्वारूढ प्रतिमा भेट दिली. या भेटीत एकनाथ शिंदे त्यांचे वडील संभाजी शिंदे, सुविद्य पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, त्यांची पत्नी वृषाली शिंदे नातु रूद्रांश यांच्या सोबत होते. याप्रसंगी अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत महाराष्ट्रासंबंधी विविध विषयांवर चर्चा केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसातच पुन्हा दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी ते सहकुटुंब दिल्लीत आहेत. अमित शहा यांच्या या गाठीभेटी म्हणजे राज्यात लवकरच मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असल्याचे संकेत असल्याचे बोलले जात आहे. त्यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज म्हटले आहे की, दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून एकनाथ शिंदे यांचा करेक्ट कार्यक्रम करतील. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आज एक ट्विट केले आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की, मी अजित अनंत पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की… या सर्व घडामोडींमुळे सध्या राजकीय जोरदार चर्चा रंगत आहेत. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावरुन पायउतार होणार का, अशी चर्चाही सर्वत्र सुरू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा