BREAKING NEWS
latest

भाजपने मनसेलाही एनडीएच्या गोटात ओढण्याची तयारी सुरू केली ; राज ठाकरे यांचा गौप्यस्फोट

प्रतिनिधी: अवधूत सावंत

उबाठा शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसे एकत्र येणार अशी चर्चा गेल्या आठवड्यात जोरदारपणे सुरू होती. पण ही केवळ ‘चर्चाच’ राहिली. त्यामुळे मनसे भविष्यात कोणबरोबर युती करणार, याबाबत विविध राजकीय अटकळी बांधल्या जात होत्या. असे असताना, भाजपनं आता मनसेलाही एनडीएच्या गोटात ओढण्याची तयारी चालवली आहे. खुद्द राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा गौप्यस्फोट केल्याचं सूत्रांकडून समजतं. ‘भाजपनं आपल्याला युतीची ऑफर दिली’ असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. याबाबत भाजपकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

राज्यात गेल्या सव्वा वर्षात बऱ्याच राजकीय हालचाली झालेल्या आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यात एकनाथ शिंदे आपल्या सोबत ४० आमदार घेऊन भाजपच्या वळचणीला लागले. या बदल्यात त्यांनी राज्याचे सर्वोच्च असे ‘मुख्यमंत्री’ पद पदरात पाडून घेतले. त्यांच्या ‘गृहभेदाने’ शिवसेनेला खिंडार पडले. शिवसेना संपली असे वातावरण असतानाच, उद्धव ठाकरे यांनी राज्यभर दौरे करून एकनाथ शिंदे गट भाजपा समोर कसा ‘मिंधा’ झाला. पन्नास खोक्यांचा व्यवहार कसा झाला हे राज्यातील जनतेला पटवून देत अचूक टायमिंग साधले आहे. त्यामुळेच आतापर्यंत आलेल्या विविध सर्वेक्षणात महाविकास आघाडीने बाजी मारलेली असतानाच, भाजपने जूनच्या २ तारखेला राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ‘हेवीवेट’ नेते अजित पवार आणि इतर आठ आमदारांना गळाला लावून कार्यभाग साधून घेतला. राज्याच्या या राजकारणात मनसेचे नामोनिशाण दिसेनासे झाले. त्यामुळे येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ‘कोणता झेंडा घ्यावा हाती’ या चिंतेत कार्यकर्ते असताना, उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेबरोबर मनसे जाणार अशा बातम्या पेरण्यात आल्या. त्यामुळे मनसे कार्यकर्ते आनंदात असतानाच त्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटला. आता मनसे काय करणार या चर्चा सुरू झाल्या. या सगळ्या गोष्टींचा बॅकग्राउंड असताना सोमवारी मुंबईतील वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी राज ठाकरे यांनी पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत बोलताना भाजपच्या ऑफरची माहिती दिली. ‘भाजपनं माझ्याकडं युतीचा प्रस्ताव दिला आहे,' असं ते म्हणाले.

‘भाजपसोबत आधीच एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. मनसेही भाजपसोबत गेल्यास युतीचं नेमकं गणित काय असेल याबाबत काही कळायला मार्ग नाही. त्यामुळं भाजपच्या प्रस्तावावर मी अजूनही काही ठरवलेलं नाही,’ अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडल्याचं सूत्रांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले. भाजपला २०२४ मध्ये कोणत्याही परिस्थिती देशात पुन्हा एकदा सत्ता स्थापन करायची आहे. त्याशिवाय महाराष्ट्र विधानसभेची आगामी निवडणूक आणि मुंबई महापालिका हे देखील भाजपचं लक्ष्य आहे. २०१४ साली राज्यात १२२ आमदार निवडून आणणाऱ्या भाजपला २०१९ मध्ये १०५ आमदारांवर समाधान मानावं लागलं. २०१९ नंतर शिवसेना हा पक्षही भाजपपासून दूर गेला आहे. त्यामुळं भाजपला पुन्हा एकदा मित्रपक्षांची गरज आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून भाजपनं कागदावर आपली ताकद वाढवली आहे. मात्र, प्रत्यक्षात याचा किती फायदा होतो याबाबत नेतृत्वाला साशंकता आहे. मुंबईच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांचा गट आणि अजित पवार यांचा भाजपला किती उपयोग होईल याबाबतही खात्री नाही. त्यामुळेच राज ठाकरे यांना सोबत घेण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. राज ठाकरे यांची भाषणशैली आणि ‘ठाकरी जादू’ याचा मुंबईत फायदा होईल, असा भाजपचा अंदाज आहे. मनसेला देण्यात आलेली युतीची ऑफर हा याचाच भाग असल्याचं बोललं जातं. राज ठाकरे यांच्या कोर्टात भाजपने चेंडू टाकला आहे, ते तो कसा खेळतात, की आऊट होतात हे लवकरच समजणार आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत