BREAKING NEWS
latest

आचार्य अत्रे आणि आधुनिक राज्यकर्ते!

आमच्या देशातील गरिबांच्या घरावरचे संरक्षक पत्रे उडाले तरी चालतील परंतू शब्दांचा किस घेत एकमेकांना चावणारे , धरणाच्या पाण्यावरून जनतेची थट्टा करणारे, एका पायावर रात्री अपरात्री एकत्र येऊन पहाटे शपथ विधी करणारे, शेपटीवाल्या प्राण्यालाही लाज वाटेल असे आधुनिक महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ आहे!

     पहिल्यांदा जंगलात वणवा पेटण्यासाठी एखादी विडी पुरेशी होती. आता राजकीय पक्षात फुट पाडण्यासाठी ईडी भुमिका बजावते. पूर्वी आंघोळीसाठी पाणी गरम करायला आमचे तांब्यांचे बंब पुरेसे असायचे. आता राजकारणात स्वतःच्याच विकासाच्या पोळया भाजायला म्हणे ट्रिपल इंजिन लागते. एकीकडे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील डोक्याला बाशिंग बांधून प्रतिक्षेत असणाऱ्या लग्नाळू युवकांना वेस ओलांडून मुलगी मिळताना असंख्य अडचणींवर मात करावी लागते. तर दुसरीकडे भारतातील अंजू आणि पाकिस्तानातील सीमा सहजपणे दुसर्‍यांदा संसार थाटतात. आम्ही मात्र कित्येक वर्षे सीमा प्रश्नात अडकून पडलो आहोत. सद्या चहा आणि रिक्षावाल्यांना सन्मान प्राप्त झाला आहे. त्यामुळे त्यांनी गॅस सिलेंडर आणि पेट्रोल,डिझेलच्या वाढत्या किंमतीची, महागाईची चिंता करू नये. विकास नावानेच अविकसित मानसिकतेच्या राज्यकर्त्यांची चलती आहे. तर दोन कुटुंबातील राजकीय भांडण सोडवताना हतबल झालेली चुलती आहे. 

     महिलांच्या प्रश्नावरून एकमेकींच्या झिंज्या उपटणार्‍या आता निमूटपणे पीडित महिलांचा केसाने गळा कापून एकमेकींच्या गळ्यात गळे घालून एकत्र नांदत आहेत. राजकीय नेते नियम बासनात गुंडाळून लिव्ह इन रिलेशनशीप मध्ये राहत आहेत. दादा, भाऊंचे झेंडे खांद्यावर घेऊन प्रसंगी विरोधकां सोबत हातापायी करून विविध केसेस पदवी सारख्या मिरवत त्यांना आगेबढो करणारे, स्वतःच्या आईबापाला वेळ न देणारे कार्यकर्ते लाडक्या नेत्याने विश्वासात न घेता पक्ष बदल केल्याने अनाथ झाले आहेत. त्यांच्या व्यथा आणि कथा परखडपणे आपल्या लेखणीतून मांडणारे आचार्य अत्रें सारखे प्रतिभावंत संपादक, लेखक नामशेष झाले आहेत. 

आचार्य अत्रे हयात असते तर त्यांनी मजबूत पुल कसे असावेत यासाठी आमच्या पु.ल.देशपांडे यांच्याकडे पाहून शिकावे. समृध्दी महामार्गावर उघडले स्वर्गाचे व्दार असे देवेंद्रच्या फोटोसहित ठिकठिकाणी स्वागत फलक लावावे. उगीचच विरोधकांसारखे यमाला बदनाम करणे सोडावे. टोल नाक्यावर मर्तिकाचे सामान उपलब्ध करून देण्यासाठी कार्यकर्ते नेमावेत असे सांगितले असते.  
    
टिका करण्यासाठी टीकाकार आणि समोरची व्यक्तीही तोलामोलाची लागते. त्यांच्या झंझावाती व्यक्तीमत्वाचे राष्ट्रपती डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी *रायटर अँन्ड फायटर ऑफ महाराष्ट्र* असे वर्णन केले होते. अनेक राजकीय नेत्यांवर ते बेधडक टीकास्त्र सोडत. भारतीय संघराज्याचे मंत्री आणि मुंबईचे महापौर सदाशिव कानोजी पाटील यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीस विरोध केला. या विश्वात जोपर्यंत सूर्य, चंद्र आहेत तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळू देणार नाही अशी वल्गना केली होती. त्यावेळी आचार्य अत्रे यांनी केलेली बोचरी टीका सर्वज्ञात आहे!

     आताच्या नेत्यांची पातळी पाहून आचार्य अत्रेही संभ्रमात पडले असते कारण भ्रष्टाचार करणारे नेते दुसर्‍या पक्षात गेले की धुतल्या तांदळा सारखे पांढरे शुभ्र होतात! त्यांच्यावर दगड फेकणारे मुग गिळून गप्प बसतात. एकीकडे राष्ट्रपती पदासाठी आदिवासी स्त्रिला प्रतिनिधीत्व करण्याची संधी आणि दुसरीकडे आदिवासी स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर बंदी अशी दुतोंडी भुमिका पार पाडतात. याचे धगधगते उदाहरण म्हणजे मणिपूर मध्ये सत्तेसाठी होणारी महाभारताची पुनरावृत्ती होय. लोकशाहीचे चिरहरण होत असताना नरेंद्र डोळ्याला पट्टी बांधून बसले आहेत. प्रसार माध्यमे कळीच्या नारदाची भुमिका बजावत आहेत. गेला माधव कुणीकडे ? असा जनतेला प्रश्न पडला आहे. तिच स्थिती पूरग्रस्तांची आहे. इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर पाहणी करण्यासाठी पायी चालत गेलेल्या मंत्र्यांचे प्रसार माध्यमातून तोंड भरून कौतुक होत आहे. वर्षानुवर्षे अडचणींचा सामना करणारी जनता हतबल झाली आहे.
चंद्रयान मोहीम यशस्वी करणाऱ्यां शास्त्रज्ञांना प्रश्न पडला आहे. चंद्रावरील विवरांचा शोध घेणे सोपे की आधुनिक तंत्रज्ञान विकसित होऊनही जमिनीवरील खड्डे बुजविणे?

शेतकऱ्यांना, शिक्षकांना त्यांनी दावणीला बांधले आहे. त्यांना वाटते यापुढे संगोपन आणि संस्काराचे
 काम करायला आपले रोबोट आहेत. काँम्प्युटरवर गेम खेळावा तसा आम्ही सर्जिकल स्ट्राईक केले. अशा बढाया मारणारे सोयीनुसार शहिदांना श्रध्दांजली देऊन मोकळे होतात. परंतू शहिदांच्या कुटुंबाला मंत्रालयात हक्कासाठी खेपा घालायला लावतात!
स्वतःला पुरस्कार घेताना वाहतूक व्यवस्था बंद करून झेड सिक्युरिटी साठी प्रशासकीय यंत्रणांवरील ताण वाढवून जनतेची कोंडी करतात. समाजप्रबोधन करणार्‍यांच्या सन्मानाचा दिखावा करण्यासाठी रखरखत्या उन्हात सोहळ्याचे आयोजन करताना लाखो अनुयायांच्या सुविधांच्या नियोजनाची जबाबदारी झटकतात. एकीकडे सुसंस्कृत, तत्वनिष्ठ, दूरदृष्टीचे 
जय जवान! जय किसान! घोषणामंत्र देणारे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री, मिसाईल मॅन राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम, महाराष्ट्राचे शिल्पकार मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण तर दुसरीकडे देशाच्या संपत्तीवर अधाशा सारखे तुटून पडणारे कुपोषित मनोवृत्तीचे स्वार्थी, ढोंगी नेते!     
आज जनतेचे सेवक, आमदार, खासदार, मंत्री हे निःस्वार्थी भावनेने कार्यरत नसून जनसेवेच्या नावाखाली स्वहित साधण्यासाठी सत्ता स्पर्धेत गुंतून गेले आहेत! मतदारहो, आपण आता पूर्वीपेक्षा जास्त जागरूक होणे ही काळाची गरज आहे.
देशाचे संविधान वाचवण्यासाठी तसेच जनतेचे स्वराज्य निर्माण करण्यासाठी तरुणाईने निर्भीड पत्रकारितेसाठी पुढाकार घ्यावा हीच खरी आचार्य अत्रे यांच्या स्मृतीला आदरांजली ठरेल.
आपली नम्र,
सुरक्षा शशांक घोसाळकर 
पवई,मुंबई.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत