BREAKING NEWS
latest

'जन गण मन कॉन्व्हेन्ट स्कूल' मध्ये वार्षिक स्नेह संमेलन आणि आरोग्य शिबिराचे धमाकेदार आयोजन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली: स्नेह संमेलन हा लहान मोठ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. दिनांक ५ डिसेंबर रोजी जन गण मन कॉन्व्हेन्ट स्कूल मधे १२ वा 'प्रेरणोत्सव' वार्षिक स्नेह संमेलन आयोजित करण्यात आला. मुलांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी त्यांच्या शिक्षकांनी घेतलेली वर्षभराची मेहनत काल दिसून आली व हर्ष उल्हासात सर्वांनीच ह्या कार्यक्रमाचा आनंद घेतला. 'जे एम एफ' संस्थेचे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कुमार सिंग व डॉ. मयंक मिश्रा, शाळेचे मुख्याध्यपक श्री. भजन सर, व्यवस्थापक श्री. महेश कळंबे सर तसेच इतर मान्यवर व शाळेचे पदाधिकारी ह्यांचे स्वागत करून व सरस्वती पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
गणपती बाप्पा हा छोट्या मुलांचा आवडता बालमित्रच. शिशुविहार च्या छोट्या मुलांनी 'आमच्या पप्पांनी गणपती आणला..'  ह्या गाण्यावर ताल धरून स्नेह संमेलनाला सुरुवात करून दिली. शिशुविहर ते दहावी पर्यंत च्या सर्वच विद्यार्थी विद्यार्थिनींनी त्यांच्यातील गुण कौशल्य दाखवून उपस्थित प्रेक्षकांना आनंद दिला. मोठ्या प्रमाणात पालक वर्ग उपस्थित राहून आपल्या पाल्याचे कौतुक करत होते.

प्रमुख पाहुण्यांनी आपल्या गोष्टीरूप भाषणातून मुलांना छान संदेश दिला. घरातील वातावरण कसे असावे, पालकाने आपल्या पाल्या सोबत कसे वागावे, बोलावे हे सांगून त्यांच्या बालमनावर होणारे विपरीत व चांगले परिणाम कसे होतील त्यासाठी पालकांनी जागरूक राहावे असे सांगून संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी पालकांना समुपदेशन केले. मुलांचा विकास झाला तरच गावाचा विकास होणार असे सांगून आपल्या पाल्यांना रोजच शाळेत येण्यासाठी प्रोत्साहित करा असे सांगितले.
आकाशाला गवसणी घालायची असेल तर नुसते आकाशाकडे बघून विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा तोच वेळ प्रयत्न करण्यात घालवा,/असे सांगून सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी मुलांना प्रेरणा दिली. दावसा सारख्या खेडेगावात कॉन्व्हेन्ट स्कूल सुरू करून कोल्हे दांपत्याने गावच्या विकासासाठी पाहिले पाऊल उचलले. आज संपूर्ण दावसा गावामधे शिस्तबध्द व विकसित शाळा म्हणून 'जन गण मन कॉन्व्हेन्ट स्कूल' चे नाव घेतले जाते. उच्च शिक्षित शिक्षक वर्ग जबाबदारीने आपापली कर्तव्य पार पाडतात. २०२३ - २४ ह्या वर्षातील पहिलीच दहावीची बॅच सुरू झाली. दहावी नंतर काय करायचे ह्याचे वैयक्तिक मार्गदर्शन डॉ. राजकुमार कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना केले. हुशार मुलांना पारितोषिके देऊन त्यांचा गौरव करण्यात आला तसेच सर्वच मुलामुलींनी उत्कृष्ट रित्या नृत्य करून दावसा रहिवाशांनी ह्या मुलांना काही रोख रकमा देऊन त्यांचा उत्साह वाढवला. पावसाळी वातावरण असून देखील अतिशय उत्साहात सर्व दावसा रहिवाशांनी प्रेरणोत्सव स्नेह संमेलनाला हजेरी लावून मुलांचा आनंद द्विगुणित केला. सर्वच मुलांनी न कंटाळता कार्यक्रमाच्या शेवट पर्यंत आपला उत्साह तसाच ठेवला. उपस्थित मान्यवरांचे  खोब्रागडे सर यांनी आभार मानले व तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन मयुरी टीचर व संजीवनी टीचर ह्यांनी केले. वंदे मातरम् गाऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
कायमच दुसऱ्यांच्या हिताचा विचार करणारे कोल्हे दाम्पत्य म्हणजे प्रगतशील आणि विकसनशील दाम्पत्य म्हणायला हरकत नाही.ज्या प्रमाणे शाळा सुरू करून युवा पिढीचा विचार केला त्याचप्रमाणे गावचे ही हित कशात आहे हे ओळखून डॉ. राजकुमार कोल्हे आणि डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी फक्त दावसा ह्या गावचाच विचार केला नाही तर आजूबाजूच्या खेडेगावाचा ही विचार करून दरवर्षी 'मोफत आरोग्य सेवा शिबिर' चे आयोजन जन गण मन कॉन्व्हेन्ट स्कूल मधे करतात. रहिवाशांच्या शारीरिक समस्या व त्यावरील निदान होण्यासाठी दरवर्षी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात डॉक्टरांचे पथक दाखल होते व मोफत सवलतीत सर्व गावकऱ्यांचे डोळे तपासणी, शारीरिक तपासणी केली जाते. ह्या वर्षी देखील दिनांक ६ डिसेंबर, भारताचे राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून ६ डिसेंबर ला मोफत आरोग्य शिबीरचे आयोजन शाळेच्या प्रांगणात केले होते. साधारण ५०० पेक्षा अधिक संख्येने लोकांनी ह्या शिबिराचा लाभ घेतला. आजूबाजूच्या परिसरातील लोकांनीही लाभ घेतला. खाजगी रुग्णालयात अवास्तव पैसा मोजावा लागतो त्यासाठी त्यांच्या गरजांचा विचार करून मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधे देण्यात आली. आजच्या ह्या शिबिरामध्ये मुंबईतून दोन डॉक्टर तसेच नागपूर मधून चेतना परिवार संस्था, खडगाव मधून १० डॉक्टरांचे पथक व त्यांचे २० सहकारी आले होते. चेतना संस्थांचे प्रमुख परमपूज्य श्री. नायर गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली अतिशय काळजीपूर्वक आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधे दिली. डोळे तपासणी करून मोफत नंबर चा चष्मा देण्याची सुविधा देखील डाॅ. महात्मे हास्पिटल यांनी उपलब्ध करून दिली. त्याच बरोबर शाळेतील विद्यार्थ्यांची देखील डोळे व आरोग्य तपासणी करण्यात आली. साधारण सकाळी १० ते २ ह्या वेळे मधे आरोग्य शिबिर चालू होते. ह्यानंतर सर्व गावकऱ्यांना व शाळेतील शिक्षक, मुलांना दुपारच्या भोजनाचा आस्वाद ही देण्यात आला. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो अशी भावना ठेऊन डॉ. राजकुमार कोल्हे व चेतना परिवार, नागपूर यांनी प्रेमाचे प्रतीक म्हणून सर्व गावकऱ्यांना ब्लँकेट वाटप करण्यात आले. परदेशी लोकांना नेहमीच भारताची त्यातूनच खेडेगावाची भुरळ पडते. त्यांच्या ह्याच गोष्टीचा विचार करून 'जे एम एफ' संस्थेचे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी दावसा ह्या आपल्या गावाला परदेशी लोकांसाठी पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याची कल्पना  अस्तित्वात आणण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. जेणेकरून सर्व सोयी सुविधा, निसर्गरम्य परिसरात राहण्याची सोय, शाकाहारी जेवण, आणि संत्री मोसंबी च्या शेतामध्ये राहून चुलीवरचे जेवण बनवण्याची कल्पना अस्तित्वात येत आहे. 
ह्या सर्व कार्यक्रमामध्ये 'जन गण मन इंग्लिश सेकंडरी स्कूल आणि विद्यामंदिर', 'जन गण मन ज्युनिअर कॉलेज', 'वंदे मातरम् पदवी महाविद्यालय (मुंबई)' ह्यांचे ही या उपक्रमाला सहकार्य लाभले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत