BREAKING NEWS
latest

'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' : मराठी भाषेचे संगोपन करण्याची वेळ..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

“मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” दि. १४ जानेवारी ते २८ जानेवारी या कालावधीमध्ये साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठी भाषेच्या वापरा संदर्भात शासकीय कार्यालयांबरोबर शैक्षणिक संस्थांचा सहभाग वाढावा म्हणून सन २०१३ पासून  शासन निर्णयान्वये दरवर्षी “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” साजरा करण्याचा निर्णय घेण्यात  आला आहे. तर सन २०२१ पासून राज्यातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये/महामंडळे, केंद्र शासनाच्या  अखत्यारीतील सर्व कार्यालये, मंडळे/महामंडळे, सार्वजनिक  उपक्रम, सर्व खाजगी व व्यापारी  बँका, सर्व शैक्षणिक संस्था/विद्यापीठे/महाविद्यालये इत्यादी सर्व संस्थांमधून राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने दरवर्षी “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” दि. १४ जानेवारी ते २८ जानेवारी या कालावधीमध्ये साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्रात हा पंधरवडा अलीकडच्या काळात उत्साहाने आणि विविध उपक्रमांच्याद्वारे साजरा होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्याचबरोबर प्रत्येक वर्षी जगाच्या पाठीवरील कोठेही वास्तव्य करणारा मराठी माणूस २७ फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी भाषा दिन‘ म्हणून उत्साहाने साजरा करीत असतो. हे होत असताना गेल्या काही वर्षातील मराठी भाषेची मराठी माणसांकडूनच होत असलेली कुचंबणा पाहता या याकाळात गंभीरपणे मराठी भाषिकांनी आपल्या मातृभाषेचे चिंतन आणि संगोपन करण्याची वेळ आली आहे असे वाटते. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा किंवा मराठी भाषा दिवस हे मोजके क्षण सरकारी आदेशाने साजरे करूयात, परंतु मराठीची काळजी वर्षाच्या ३६५ दिवस करायला हवी. पण तसे होताना दिसत नाही. कवी जुलिअन यांनी “मराठी असे माझी मायबोली जरी आज ती राजभाषा नसे” हि खंत प्रकट केलेली होती. आज ती राजभाषा आहे पण, तिची अवस्था मात्र कशी आहे ते कवी कुसूमाग्रजांनी यापूर्वीच तितक्याच खेदाने नमूद करून ठेवल्याचे आपणा सर्वाना स्मरते आहे. आपल्या या मराठी साहित्याला साडेसातशेहुन अधिक वर्षाची परंपरा असली तरी मराठी बोलीभाषेला किमान एक हजार वर्षापेक्षा अधिकची परंपरा लाभलेली आहे.

सव्वा अकरा कोटी लोकांची मराठी ही जगातील १० व्या क्रमांकाची मोठी भाषा आहे. संपन्न ज्ञानभाषा असणारी मराठी महानुभावांची धर्मभाषाही आहे. मराठी ही राजभाषा असणारे सातवाहन,राष्ट्रकूट आणि मराठे हे राज्यकर्ते त्या त्या काळात भारतभर राज्य करीत होते. मराठी भाषा बोलणारे लोक आज जगातील ७२ देशात पसरलेले आहेत. भारताच्या अनेक राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात अनेक जण महत्वाच्या अधिकार पदावर काम करीत आहेत, त्यामुळे ही फक्त एका प्रांताची भाषा नसून ती महत्वाची राष्ट्रीय भाषा झाली आहे. मराठी भाषेत आजवर सुमारे एक लाख ग्रंथ प्रकाशित झालेले असुन त्यातील असंख्य ग्रंथ वैश्विकदृष्ट्या श्रेष्ठ ठरावेत असे आहेत. या एक हजार वर्षाच्या परंपरेत मराठीने अनेक संकटे पेलून आपली योग्यता आणि संपन्नता सिद्ध केलेली आहे. मराठी ही अमृतातेही पैजा जिंकणारी भाषा आहे. १६१४ मध्ये मराठीचे परदेशी उपासक फादर स्टीफन यांनी मराठीचा केलेला गौरव बघितला तर मराठीचे भव्य आणि सुंदर स्वरूप दिसून येईल.

जैशी हरळामांजी रत्नकीळा | की रत्नामाजी हिरा निळा | तैशी भाषा मांजी चोखळा | भाषा मराठी ||१||

जैशी पुष्पामांजी पुष्प मोगरी | की परिमळामांजी कस्तुरी | तैशी भाषामंजी साजिरी | मराठीया ||२||

केंद्र सरकारने आजवर भारतातील सर्वात प्राचीन भाषा म्हणून तामिळ, संस्कृत, तेलगू, कन्नड व मल्याळम या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. आपल्या मराठी भाषेला सुद्धा तो मिळावा अशी तमाम मराठी भाषकांची तीव्र इच्छा आहे. सरकारी पातळीवरूनसुद्धा तसा पाठपुरावा केला जातो आहे, पण अजूनही यश पदरात पडेनासे झाले आहे. या दर्जामुळे कोणत्याही भाषेच्या श्रेष्ठतेवर राजमान्यतेची मोहोर तर उमटते. आणि त्याचबरोबर भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून अनुदान मिळते व  भाषाविकासाच्या कार्याला चालना मिळते. आपल्या शेजारील तामिळ, तेलगू, कन्नड व मल्याळम भाषेला शास्त्रीय भाषेचा दर्जा मिळाला आहे. तिथे या भाषेचे चिंतन आणि चिंता वर्षभर केले जाते. पण मराठीची आपण फारशी चिंता करतो आहे अथवा चिंतन करतो आहे असे दिसून येत नाही. साहित्य संमेलनाच्या नावाने एक उरूस पार पडला की बस्स. कन्नड भाषेच्या उत्थापनासाठी सवंर्धनासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन केले जाते. कन्नड भाषा वाढावी यासाठी शासकीय पातळीवरून सर्व व्यवहार कन्नडमधून केले जातात. आपण मराठी माणूस कॉन्व्हेंटमध्ये जाणाऱ्या आपल्या मुला-नातवंडापासून अथवा आपले राज्यकर्ते स्वभाषा टिकविण्यासाठी कितपत प्रयत्न करतो याचे आता चिंतन करायला हवे.

कोणतीही भाषा हि ज्ञानाची भाषा असते. जे आपल्या भाषेत नाही ते इतर भाषेतून आपल्याला घेता येते. केवळ आपल्या भाषेला महत्व देऊन इतर भाषेला नकार म्हणजे एका दृष्टीने ज्ञानाला नकार असतो. परंतु इतर भाषेला अधिक महत्व देऊन स्वभाषेकडे दुर्लक्ष झाले तर ती भाषा आपले अस्तित्व गमावण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्या भाषेचे महत्व ओळखून इतर भाषा आत्मसात केली पाहिजे. इंग्रजीला नकार देऊन जसे चालणार नाही तसे तिचेच गोडवे गाऊनही चालणार नाही. मराठी भाषा संपन्न बनवण्यासाठी अन्य भाषेतून जे साहित्य,ज्ञान आणता येईल ते आणले पाहिजे. अशा प्रकारे मराठीचे ज्ञान भांडार वाढविता येणे शक्य आहे असे झाले तरच मराठी हि ज्ञानभाषा बनायला फार उशीर लागणार नाही.

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी | जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ||
धर्म,पंथ,जात एक जाणतो मराठी | एवढ्या जगात माय मानतो मराठी ||

असे कवी सुरेश भटांनी म्हटले आहे. खरोखरंच महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आल्याचा आणि मराठी भाषा ऐकण्या-बोलण्याचा सार्थ अभिमान आपणा सर्व मराठीजनांना आहे असे एकीकडे म्हणायचे आणि दुसरीकडे मराठी भाषेबद्दल खंत व्यक्त करायची. ज्यांना स्वतःलाच मराठीबद्दल अभिमान वाटत नाही तेच मराठी भाषेला दुय्यम दर्जा देतात. आमचे महाविद्यालयातील प्राध्यापक महोदय तर बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना म्हणतात की, मराठी विषय घेऊ नका. मराठी भाषा घेऊन पुढे काय करणार ? आणि घेतला तर त्यामागे निवडताना असा विचार असतो. एकतर तो सोपा आहे किंवा अवघड आहे म्हणून. सोपा या अर्थाने कारण आपली ती मातृभाषा आहे आणि अवघड या अर्थाने की त्यामध्ये भरपूर कविता असतात. पण काव्य म्हणजे मानवी जीवनातील हिरवळ आणि संत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, नामदेव यांचे अभंग म्हणजे मानवी जीवनाला दिशा देणारे तत्वज्ञान.

खरं तर आज महाविद्यालयीन स्तरावर मराठी विषय सक्तीचा करणे गरजेचे आहे. कारण मुलांच्या बुध्यांकाबरोबर भावनांक देखील वाढला पाहिजे. आणि हा भावनांक वाढविण्याचे काम मराठी साहित्य विषय करीत असतो. मातृभाषेमध्ये शिक्षण म्हणजे आईच्या दुधावर पोसणे. त्याला दाईच्या दुधाची जोड कशी येईल ? इंग्रजी शिकणे आणि इंग्रजीतून शिकणे यामध्ये निश्चितच फरक आहे. ज्ञानाची निर्मिती ही मानवी बुद्धीचा आणि विचारसामर्थ्याचा सर्वश्रेष्ठ अविष्कार असतो. असा अविष्कार इतर भाषेवर अवलंबून राहिल्याने कधीच होत नाही. विचारसामर्थ्य हे खऱ्या अर्थाने मातृभाषेतूनच घडत असते. आपण इतर कोणत्याही भाषेत बोलत असलो तरी विचार मात्र मातृभाषेतूनच करतो. म्हणूनच शिक्षणाचे माध्यम मातृभाषा असले पाहिजे असेच शिक्षण क्षेत्रातील विचारवंतांना वाटत आले आहे.

आज मराठी भाषेवर सर्वांगांनी असे आक्रमण चालू झाले आहे. यातून आपली मूळ मराठी भाषा वाचवायची अथवा टिकवायची असेल तर तिची नाळ कदापि तोडता काम नये. आज मराठी भाषा आणि संस्कृतीलाही मरणयातना भोगाव्या लागत आहेत. पर्यायाने या मरणयातना मराठी माणसांच्या आहेत. याला जबाबदार आपण मराठी भाषिकच आहोत. इंग्रजी अथवा इतर भाषेचा तिरस्कार करून मराठीचा विचार करता येणार नाही. यासाठी जागरूकपणे मराठी भाषेचा विचार करायला हवा. हतबल होऊन चालणार नाही. सकारात्मक कृती करायला हवी. आपल्याला भावनात्मक पातळीवर मराठीचा विचार करून चालणार नाही. व्यावहारिक पातळीवर मराठीबद्दल सांगोपांग विचार करायला हवा. मराठी माणसाच्या ठिकाणी असलेली भाषेबद्दलची उदासिनवृत्ती नाहीशी व्हायला हवी. तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. हा जागतिकारणाचा काळ आहे. आणि या जागतिकारणाची भाषा इंग्रजी आहे. त्यामुळे इंग्रजीपासून दूर जाऊन चालणार नाही. अशी मराठी मरणारही नाही आणि संपणारही नाही. परंतु तिचे पालन पोषण अर्थात संवर्धन मात्र होणे आवश्यक आहे. एकूणच माय मराठी भाषा ही सक्षम असून भाकरी देणारी भाषा म्हणून ती श्रेष्ठच आहे. मात्र मराठी भाषेला अधिक समृद्ध करण्यासाठी मराठीला अमृतरूपी गोडवा देणाऱ्या मराठीच्या बोली टिकवायला हव्यात.

 भाषा हि अंगवळणी पडल्यानेच समाजात रूढ होत असते, असा भाषेच्या जाणकारांचा अनुभव आहे. ती पर्यायी पारिभाषिक शब्दाने क्रमशः विकसित होत असते. हाही नवा अनुभव नाही. पण त्याकरिता वैयक्तिक व सामूहिक पातळीवर कितपत पायाभूत पद्धतीने प्रयत्न होतात हेच महत्वाचे आहे. कदाचित हे ओळखूनच भाषाविकास मंडळाची नव्याने स्थापना केली गेली असावी. पण हि स्थापना फक्त घोषणेपुरती उरली हेही या पंधरवड्याच्या निमित्ताने खेदाने नमूद केले पाहिजे. राजभाषा हि फक्त अशत: सचिवालयात आणि तिथल्या पत्रव्यवहारात राहू नये अशी आपली सततची अपेक्षा असते. ती समाजाभिमुख होणे व समाजाकडून तिचा अधिकात अधिक वापर होत गेल्यानेच राजभाषा म्हणून सिद्ध होणार आहे. हे काम कुणा एकट्या दुकट्याचे नसून सर्वस्व शासनाचेही नाही. तर ते शासन आणि समाज अशा दुहेरी पातळीवरून प्रकट होणारे असावे. आजच्या जागतिकीकरणाच्या काळात मराठी भाषेविषयी केला जाणारा विचार-चिंतन हे मराठीतूनच होत असल्याने मराठी भाषा अधिक काळ संवादी राहणार आहे.

जागतिकीकरणामुळे कितीही बलिष्ठ आव्हान तिच्यासमोर उभे राहिले असले तरी ती मरणार नाही. हे निर्विवाद सत्य आहे. इंग्रजीचा स्वीकार करीत असताना मराठी भाषेला त्यागून चालणार नाही. आपल्या भाषेचा स्वाभिमान जपणे आणि इतर भाषेचा आदर करणे हे सूत्र आत्मसात करण्याची वेळ आली आहे. आपली मातृभाषा अधिक समृद्ध करण्यासाठी तिच्या ज्ञानवाटा अधिक विस्तारित करायला हव्यात. नवनवीन  ज्ञान मराठी भाषेत आणण्याचा प्रयत्न सर्व मराठी जणांनी  केला पाहिजे कारण भाषेचा विकास हा सर्व समाजाचाच असतो. म्हणून सर्व समाजानेच आपल्या मराठी भाषेविषयी अस्मिता ठेवायला हवी. शेवटी असे म्हणावेसे वाटते, विश्वकल्याणाची संकल्पना ‘पसायदानाच्या‘ रूपात सर्वप्रथम ज्या माय मराठीत कोरली गेली ती विश्वात मराठी माणसाला श्रेष्ठत्व देणारी ठरली आहे.
रविंद्र मालुसरे
अध्यक्ष: मराठी वृत्तपत्र लेखक संघ

« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत