कल्याण दि.२१ : सध्या सुरू असलेल्या जलजागृती सप्ताहानिमित्त कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी जलनायक डॉ. स्नेहल दोंदे यांच्यासह कल्याण-डोंबिवली परिसराची "चला जाणू या नदीला" या उपक्रमांतर्गत काल पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान आधारवाडी बायोमायनिंग प्रकल्प, गांधारे पुलाखालील नदीची पाहणी तसेच तेथे सोडण्यात आलेल्या नाल्याची पाहणी, सांगळेवाडी नाला पाहणी, मोहने पंपिंग स्टेशन येथील उल्हास नदीची पाहणी करण्यात आली.
आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांनी सदर ठिकाणांची सद्यस्थिती जाणून घेतली व डॉ. स्नेहल दोंदे यांनी केलेल्या निरीक्षणावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले. डॅा.स्नेहल दोंदे यांनी नाल्याचे पाणी शुध्दीकरण प्रक्रिया करून नदीत सोडण्याकरिता आवश्यक उपाययोजनांची सविस्तर माहिती उपलब्ध करून देणार असल्याचे सांगत नदीसंवर्धनाच्या पुढील कार्यवाहीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी, महापालिकेस पूर्ण सहकार्य देण्याची ग्वाही दिली.
महापालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत दखल घेऊन त्यावर कृती आराखडा सादर करण्याबाबत आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांनी निर्देश दिले. यासमयी कल्याण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी, महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, जलनिःसारण, मलनिःस्सारण विभागाचे कार्यकारी अभियंता घन:श्याम नवांगुळ तसेच पर्यावरण व प्रदुषण नियंत्रण विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घोडे, कार्यकारी अभियंता एमआयडीसी डोंबिवली, एसआरओ, एमपीसीबी कल्याण, मनुसृष्टी: पर्यावरण सल्लागार उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा