BREAKING NEWS
latest

मी एक जबाबदार नागरिक ही भावना सगळ्यांच्या मनात आली तर विकासाचा वेग नक्कीच वाढेल - महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण दि.१२ : मी एक जबाबदार नागरिक, ही भावना सगळ्यांच्या मनात आली तर विकासाचा वेग वाढेल असे प्रतिपादन कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी आज बोलताना  केले, "मेरा युवा भारत" या केंद्र शासनाच्या उपक्रमा अंतर्गत कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि प्रेस क्लब, कल्याण यांच्या संयुक्त विद्यामाने कल्याण मधील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे "महापालिका कामकाज व महापालिकेचा अर्थसंकल्प" या विषयाबाबत महाविद्यालयीन विद्यार्थ्यां समवेत आयोजिलेल्या चर्चासत्रात विद्यार्थ्यांसमवेत संवाद साधताना महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी हे प्रतिपादन केले.
यावेळी महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक लक्ष्मण पाटील, मुख्य लेखा अधिकारी दिग्विजय चव्हाण, उपायुक्त अर्चना दिवे, धैर्यशील जाधव, अतुल पाटील, माहिती व जनसंपर्क विभाग प्रमुख संजय जाधव व उपक्रमाचे नोडल ऑफिसर प्रशांत भागवत तसेच इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता. समाजाप्रती आपले योगदान काय असेल हे आधी समजून घेतले पाहिजे, बजेट विषयी माहिती आजच्या तरुण पिढीला समजावी, या मुलांचे विचार समजून घ्यावेत या दृष्टिकोनातून आजच्या चर्चा सत्राचे आयोजन केले असल्याची माहिती आयुक्त डॉ. इंदुराणी  जाखड़ यांनी यावेळी दिली. यासमयी विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ व इतर संबंधित अधिकाऱ्यांनी सविस्तर माहितीपूर्ण उत्तरे दिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षण विभागाचे उपायुक्त धैर्यशील जाधव यांनी स्थानिक स्वराज्य संस्था, नियमावली, संस्थेची कर्तव्य याबाबत उपस्थित  विद्यार्थ्यांना माहिती दिली तर महापालिकेचे मुख्य लेखा वित्त अधिकारी दिग्विजय चव्हाण यांनी महापालिकेचे अंदाजपत्रक कसे तयार होते, त्यात काय तरतुदी असतात याचे विश्लेषण उपस्थित विद्यार्थ्यांसमोर सादर केले.

"माय युवा भारत" हे शासनाचं डिजिटल व्यासपीठ असून सर्व युवा वर्गाला एकमेकांना जोडण्यासाठी तुमच्या कल्पना देण्यासाठी केंद्र शासनाने हे डिजिटल व्यासपीठ तयार केले असून युवा वर्गाने <mybharat.gov.in> रजिस्ट्रेशन करून 'मेरा युवा भारत' या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन या उपक्रमाचे नोडल ऑफिसर प्रशांत भागवत यांनी आपल्या प्रास्ताविकात केले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन जनसंपर्क विभाग प्रमुख संजय जाधव आणि उद्यान अधीक्षक महेश देशपांडे यांनी केले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत