BREAKING NEWS
latest

महापारेषणच्या २२० केव्ही जांभूळ अतिउच्चदाब उपकेंद्राचे काम अंतिम टप्प्यात; पहिला टप्पा ३० एप्रिलपर्यंत कार्यान्वित..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : महापारेषणच्या २२०/२२ केव्ही जांभूळ अतिउच्चदाब उपकेंद्राचे काम अंतिम टप्प्यात आले असून ३० एप्रिलपर्यंत ५० एमव्हीए क्षमतेचा पहिला ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित होणार आहे. परिणामी महापारेषणच्या १००/२२ मोरीवली उपकेंद्रावरील भार कमी होऊन महावितरणच्या बदलापूर, अंबरनाथ, कानसाई आणि कात्रप मधील ग्राहकांच्या अखंडित वीजपुरवठ्यात मोलाची मदत मिळणार आहे.

जांभूळ उपकेंद्रात ५० एमव्हीए क्षमतेचे दोन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येणार आहेत. यातील पहिला ट्रान्सफॉर्मर १९ एप्रिलला छत्रपती संभाजीनगरहून रवाना होईल आणि ३० एप्रिलपर्यंत तो कार्यान्वित करण्यात येईल. या उपकेंद्रातून निघणाऱ्या चारपैकी दोन उच्चदाब वीजवाहिन्यांचे काम पूर्ण झाले असून या वाहिन्या त्याचवेळी कार्यान्वित करण्यात येतील. त्यामुळे मोरीवली उपकेंद्रावरील भार कमी होऊन ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा मिळण्यात मोठी मदत मिळणार आहे. सध्या या भागाला मोरीवली १००/२२ केव्ही उपकेंद्रातून वीजपुरवठा होतो.वाढते तापमान आणि रात्रीच्या वेळी विजेची वाढलेली मागणी यामुळे महापारेषणकडून लोड रिलिफ मागीतला जात आहे. 

जांभूळ उपकेंद्राचा पहिला टप्पा कार्यान्वित होण्यापूर्वी स्थानिक स्तरावर उपलब्ध स्त्रोतांच्या आधारे वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.यात आवश्यकतेनुसार गोवेली स्विचिंगच्या गोवेली फिडरवर मोहन सबर्बिया फिडरचा भार, १७ नंबर स्विचिंगवर कानसाई फिडरचा भार आणि आनंदनगर स्विचिंगच्या पाले फिडरवर अंबरनाथ ६ नंबर फिडरचा भार फिरवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जेणेकरून महापारेषणकडून रिलिफ मागितल्यानंतर महावितरणच्या ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित होणार नाही.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत